सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

एक रानरेडा काही शिकवू शकतो काय?


आपले अधिकार हे मालमत्तेसारखे असतात. आपणच आपल्या मालमत्तेकडे दुर्लक्ष केले मग कोणीही तिथे कब्जा मिळवतो. धुडगुस घालतो. जुन्या पडलेल्या दुर्लक्षित घराचे चिरे कोणीही पळवून नेतात. आपल्या म्हणजे सामान्य नागरिकाच्या अधिकाराची स्थिती नेमकी तशीच झालेली आहे. आपले तिकडे साफ़ दु्र्लक्ष झाले आहेच. पण आपला जो वॉचमन म्हणजे प्रतिनिधी असतो, त्यानेही त्याची राखण केलेली नाही. त्यामुळेच प्रशासन नावाच्या यंत्रणेने आपल्या अधिकार व सत्तेवर कब्जा केला आहे आणि ते आपल्यावर बिनबोभाट सता गाजवत असतात. ते आपले सेवक आहेत आणि आपल्यालाच त्यांच्या सेवेत राबवून घेत असतात. याचे कारणही समजून घ्यायला हवे आहे. ते कायम त्याच कामासाठी कार्यालयात बसलेले असतात. त्यासाठी पगार घेतात. पण त्यांनी खरोखर किती काम केले, त्याची झाडझडती घेण्यासाठी आपण कधीच तत्पर नसतो. आपले प्रतिनिधीही ते काम करत नाहीत. त्यामुळेच या शिरजोरांनी त्यांना सोयीचे असे कामाचे स्वरुप बदलून टाकले आहे. काम त्यांचे आणि त्यासाठी त्यांनी आपल्यालाच कामाला जुंपले आहे. आपल्याला असे भासवले जाते, की काम आपले आहे म्हणुन आपणच धावपळ केली पाहिजे. पण वस्तुस्थिती नेमकी उलट आहे.

     सर्व प्रकारची नोंद ज्याने ठेवायची त्यानेच त्याची जमवाजमव केली पाहिजे ना? त्यात त्रुटी राहिली तर तोच त्याला जबाबदार आहे ना? मग नोंद करायला तुम्हाला खेटे घालायला लावणे गैर नाही काय? सुरूवात तिथून करावी लागेल. ते काम कोणी करायचे? तेच काम आपण म्हणजे आपल्यातल्या कार्यकर्त्यांनी करायचे आहे. अशा कार्यकर्त्यांची एक फ़ळी वा फ़ौज उभी करणे अगत्याचे आहे. त्यांचीच एक नवी संघटना असायला हवी आहे. ती काय करू शकते? तिने पहिले काम करायचे ते आपापल्या भागात समुहभावना निर्माण करण्याचे. गाव वस्तीतल्या कोणालाही सरकारी यंत्रणेसमोर एकाकी पडू न देण्याची मोहिम हाती घ्यायची. या सर्व सरकारी कचेर्‍यांमध्ये सामान्य जनतेचे हाल होतात. कारण ती जनता म्हणजे एकटा एक नागरिक असतो. त्याच्याऐवजी एक जमाव समोर आला, तर समोरचा अधिकारी कर्मचारी वचकतो. जिथे एखाद्या माणसाला असे सतावले जात आहे, खेटे घालायला भाग पाडले जाते, तिथे जमावाने हजेरी लावून जाब विचारणारी कार्यकर्त्यांची फ़ौज उभी केली तर ताबडतोब परिणाम घडवू शकते. काम का अडले, कुठे अडचण आहे, काय त्रुटी आहेत, वेळ का लागतो आहे, याचा जाब विचारणारी फ़ौज नियमित दिसू लागली, मग संबंधीत अधिकार्‍याचे वर्तन आपोआप बदलू लागते. तेच तेच लोक प्रत्येकवेळी एका वस्ती, गावातून येताना दिसू लागतात, तेव्हा त्याच कर्मचार्‍याचे त्या गाव, वस्तीशी वागणेही बदलू लागते.

   आपल्याबद्दल तक्रार होत नाही, जाब विचारला जात नाही, अडला माणूस लाच देतोच, या समजुतीला शह दिला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट लोकांना आपले अधिकार ठाऊक आहेत, याची जाणिव प्रशासनात निर्माण केली पाहिजे. एका बाजूला अधिकाराबद्दल जागरुक, तर दुसरीकडे जाब विचारणारा, पाठपुरावा करणारा जमाव यांचा अनुभव प्रशासकीय सेवेतल्या लोकांना यायला हवा आहे. तुम्ही आम्ही एक एकटे त्यांच्या टेबलापाशी जात असतो व आशाळभूतपणे त्यांच्या उपकाराची प्रतिक्षा करत असतो, त्यातून ही मुजोरी आलेली आहे. तिला संघटितपणे शह देण्याची गरज आहे. म्हणुनच मी निवडणूक न लढवणार्‍या संघटनेचा आग्रह धरतो आहे. राजकीय कार्यकर्ते, पण निवडणूक न लढवणारी फ़ौज असे चित्र मला भावते. याचे दोन फ़ायदे संभवतात. एका बाजूला प्रशासनाला वेसण घातली जाऊ शकते. तर दुसरीकडॆ निवडणूका लढवणार्‍यांना अशा जमावाची दहशत बसू लागते. जे एकदिलाने अशा छोट्या लढाया करतात, त्यांना मोठे शिकारी सुद्धा वचकून असतात.

      मध्यंतरी डिस्कव्हरी या वाहिनीवर एक छान माहितीपट दाखवला होता. सिंहांचा एक गट रानरेड्यांच्या कळपावर हल्ला चढवतो. त्यातल्या पिल्लाला ते पळवतात. बाकीचे हे धिप्पाड रेडे दुरून ती शिकार निमुटपणे बघत असतात. असे नेहमीच घडते. पण त्या दिवशी एका रेड्याने अकस्मात आक्रमक पवित्रा घेतला. थेट तो सिहांच्या दिशेने सरसावला. त्याच्या त्या आक्रमणाने पाच सहा सिंह पांगले. एकाने रेड्याच्या पिल्लाला पकडून ठेवले, तर बाकीचे रेड्याच्या आक्रमणाचा सामना करायला सरसावले. पण त्यातुन स्फ़ुर्ती घेऊन कळपातले इतर रानरेडेही पुढे झाले होते आणि त्यांनी सिंहांवर हल्ला चढवला. मग सिंहांची पळता भुई थोडी झाली. त्या आक्रमक रेड्यांनी आपल्या पिल्लाची यशस्वीपणे शिकारीतून सुटका केली. असे सहसा घडत नाही. शिकारी श्वापद नेहमी सावजांच्या एकटेपणाचा लाभ उठवत असतात. जो तावडीत सापडतो त्याच्या मदतीला बाकीचे येणार नाहीत, याची खात्रीच त्या शिकारी श्वापदाला शक्तीमान बनवत असते. ज्यांची शिकार होत असते, त्यांनी आपल्या समुहबळाचा वापर केल्यास प्रतिकार अशक्य नसतो. त्या एका आक्रमक रेड्याने तेच त्या दिवशी दाखवून दिले.

    आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणतो किंवा भ्रष्टाचारी व्यवस्था म्हणतो, त्यांची ताकदसुद्धा तशीच आहे. ती आपल्या एक एकटेपणात सामावलेली आहे. त्यावरचा उपाय त्या रेड्याने दाखवलेला आहे. ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो तो प्रत्यक्षात नागरी जीवनातील शिकारीचा भयंकर जीवघेणा खेळ होऊन बसला आहे. त्यात शासन, प्रशासन व त्यांना सहभागी असलेले राजकारणी हे शिकारी श्वापदे झालेली आहेत. तर तुम्ही आम्ही सामान्य माणसे त्यातली सावजे झालो आहोत. ज्याची शिकार होत असते, त्याची लांडगेतोड आपण दुर उभे राहून शांतपणे पहात असतो. आणि आपल्यावर तसाच प्रसंग आला, मग मात्र आपण इतरांनी मदत करावी अशी अपेक्षा बाळगत असतो. त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. तोच एकमेव आर्ग आहे.

   आपल्याला शिकारीचा हा खेळ थांबवणे भाग आहे. तो थांबवण्याचा मार्ग म्हणजे उलट श्वापदाची शिकार करणे नसून त्यांच्या क्रुर फ़सव्या सापळ्यातून आपल्यासारख्यांना सोडवण्यात, प्रत्येकाने घरचे कार्य समजून पुढाकार घेणे; हाच तो मार्ग आहे. आज त्याची वेळ असेल, उद्या तीच वेळ आपल्यावर येणार हे विसरून गेलो, म्हणून आज अशी परिस्थिती आली आहे. अशा परिस्थितीतून कोणी दुसरा आपल्याला वाचवू शकत नाही. एका शिकार्‍याच्या तोंडातून सावजाला वाचवणारा दुसरा शिकारी असेल तर तो त्या सावजाचे प्राण वाचवत नसतो. तर दुसर्‍याची शिकार त्याच्या तोंडातून काढून आपल्या तोंडी घास घ्यायला पुढे सरसावलेला असतो. आपण नेहमी अशाच बनावाला बळी पडतो. मग उशीरा लक्षात येते, की आपण आगीतून सुटून फ़ोफ़ाट्यात पडलो आहोत. आपण प्रेषिताची प्रतिक्षा करतो तेव्हाच आपण सैतानालाही आमंत्रण देत असतो. इथेही तेच झालेले आहे. आपल्याला भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे. मात्र त्यासाठी दुसर्‍याने काहीतरी करावे अशी आपली अपेक्षा आहे. कितीही अपेक्षा केल्या तरी तसे कधी घडणार नाही. उलट त्याची अधिक किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे, लागली आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर आपल्याला स्वत:च पुढाकार घ्यावा लागणार आहे. आपले अधिकार व हक्क यासाठी आपणच पुढे येण्याची गरज आहे. त्यालाच मी सामान्य माणसातल्या कार्यकर्त्यांची फ़ौज म्हणतो.

     जो आपल्यातल्या कोणाची शिकार होताना निमूटपणे बघत बसत नाही, तर प्रतिकाराला पुढे होतो आणि अन्याय भ्रष्टाचाराशी दोन हात करतो. अशा कार्यकर्त्यांची फ़ौज हवी आहे. त्याने मोर्चे, मिरवणूका, सत्याग्रह, धरणे असे काहीही करण्याची गरज नाही. फ़क्त आपल्या वस्ती गावातील एकट्या छळल्या जाणार्‍या नागरिकाच्या मदतीला धावून जावे, त्याच्या बाजूने उभे रहाणे, सुद्धा खुप परिणामकारक ठरू शकते. असे दोन पाच तरूणही खुप मोठे काम करू शकतात. त्यांच्या पुढाकाराने इतरांना प्रोत्साहन मिळू शकते, स्फ़ुर्ती चढू शकते. लक्षात घ्या त्या रेड्याकडे प्रचंड ताकद व धारदार शिंगे होती, पण त्यांनी कधीच त्याचा प्रतिकारासाठी वापर केला नव्हता, तसा विचारही केला नव्हता. पण एक प्रयत्न त्यांना सिंहावर मात करायचा साक्षात्कार घडवून गेला. आपली कहाणी वेगळी नाही. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि अण्णांना घरातून पकडणार्‍या सत्ताधार्‍यांना लोकांच्या इच्छेपुढे गुडघे टेकायची पाळी आली होते ना? मग सांगा, आपण स्वत:साठी काहीच करणार नाही काय? मग विचार करा, आपण काय करू शकतो? आणि आपणच स्वत:साठी काही करणार नसू, तर इतर कोणी कशाला आपल्यासाठी काही करील?   (क्रमश:)
(भाग-१८७) २५/२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा