सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

कृपाशंकर हा आदर्श असल्यावर ’कार्यकर्ता’ संपणारच ना?


मी सातत्याने कार्यकर्ता अ़सा शब्द वापरत असतो. मग मला समाजात वावरणारे कार्यकर्ते दिसत नाहीत काय? ते कार्यकर्ते आपापल्या पक्ष संघटनेत काय काम करत असतात? जे आज सगळीकडे कार्यकर्ते म्हणून वावरताना दिसतात, त्याना कार्यकर्ता असे संबोधले जात असले, तरी ते कधीच कार्यकर्ते नव्हते आणि नाहीत. ते आपापले हेतू साध्य करून घ्यायला त्या त्या संघटनेत दाखल झालेले संधीसाधू आहेत. त्यांनाच आजकाल कार्यकर्ता म्हटले जात असते. पण ते नेमके कुठले कार्य करतात? त्याचा सामान्य जनता, तिच्या समस्या, समाजाचे प्रश्न इत्यादीशी संबंध काय? ज्यांना आपण कार्यकर्ता समजतो वा तशी आपली समजूत करून देण्यात आलेली आहे, ते प्रत्यक्षात वेगवेगळ्या पातळीवरचे कृपाशंकर सिंग असतात, म्हणजे नेमके काय असतात? हे जाणून घ्यायचे असेल तर मुळात कृपाशंकर समजून घ्यावा लागेल. १९७४ सालात उत्तरप्रदेशातून मुंबईत रोजगार शोधायला आलेला हा माणुस, गेल्या ३८ वर्षात कुठून कुठे पोहोचला ते पाहिले तर कार्यकर्ता ही संकल्पना किती रसातळाला गेली आहे त्याचा थोडफ़ार अंदाज येऊ शकतो.  

   सध्या याच कृपाशंकरची त्याच्या कुटुंबासह असलेली सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यामुळे त्याचे नाव गाजते आहे. कालपर्यंत मुंबई कॉग्रेस पक्षाचा अध्यक्ष असलेल्या या माणसाचे पक्ष, समाज, राजकारण यातले योगदान काय? तो आजच्या कॉग्रेस संस्कृतीचा आदर्श आहे. आणि इतर पक्ष त्याच मार्गाने चाललेले आहेत. त्यातले कार्यकर्ते सुद्धा कृपाशंकर होण्यासाठी धडपडणारे आहेत. १९७४ साली मुंबईत रोजगार शोधत आलेल्या कृपाभय्याने अवघ्या दहा वर्षात राजकारणात लुडबुड सुरू केली. १९८५ साली प्रा. जनर्दन चांदुरकर या कॉग्रेस आमदाराकडे ऑफ़िसबॉय म्हणून रुजू झालेल्या या माणसाने कांद्याबटाट्याचा धंदा सोडून कार्यकर्त्याचा वेश अंगावर चढवला आणि बघता बघता अवघ्या चौदा वर्षात तो थेट महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री बनला. अशी कोणती गुणवत्ता त्याच्यापाशी आहे, की त्याने हा पल्ला इतक्या झटपट गाठावा? कारण त्याला आपल्या कार्यालयात ऑफ़िसबॉय म्हणुन ठेवणारे प्रा. चांदुरकर अजुन साध्या आमदारकी पलिकडे जाऊ शकलेले नाहीत. वरीष्ठांना खुश करणे, खुशमस्करेगिरी, लांगुलचालन, दलाली, मध्यस्थी, याच पायर्‍या चढत कृपाशंकर यांनी नव्या राजकीय संस्कृतीचा पाया घातला. त्यावर आजच्या राजकारणातील कार्यकर्ते वाटचाल करू पहात असतात. चारपाचशे करोड रुपयांची बेहिशोबी मालमत्ता हा माणुस जमवतो आणि न्यायालयात दाद मागितली असताना देखील त्याच्यावर कारवाई करायला पोलिस बिचकतात, हा आजच्या कार्यकर्त्या समोरचा आदर्श आहे.  

    २००५ सालाच्या जुलॆ महिन्यात मुंबईत अतिवृष्टीने महापुराची परिस्थिती निर्माण केली होती. तेव्हा याच कृपाशंकरचा मतदारसंघ गटाराच्या पाण्यात बुडाला होता. तेव्हा हा कार्यकर्ता आलिशान इस्पितळात उपचार घेत झोपला होता. लोकांच्या हालअपेष्टांकडे बघायला त्याच्या अंगात त्राण नव्हते. पण पुर ओसरल्यावर जेव्हा मुंबईकरांचे हाल बघायला कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मुंबईत आल्या, तेव्हा आपली रुग्णशय्या सोडून हेच कृपाशंकर दॊडत आले होते. जनतेच्या कामासाठी ते आजारी होते. पण पक्षाध्यक्षांचे आगमन झाल्याचे कळताच त्यांचा आजार चुटकीसरशी गायब झाला होता. याला आजकाल उत्तम का्र्यकर्ता म्हणतात. तसे नसते तर त्यांना मुंबई कॉग्रेसचे अध्यक्षपद कशाला मिळाले असते? लोकांच्या हालअपेष्टांकडे बघायला वेळ नसलेला माणुस सार्वजनिक जीवनात काय करत असतो? त्याला काय साधायचे असते? तेच कृपाशंकर यांनी करून दाखवले आहे. सत्तेत राहून वरच्या नेत्यांची मर्जी राखायची, बदल्यात सत्तापदे मिळवून जनतेची लूट करायची, याला हल्ली समाजकार्य म्हणतात. ते करू शकतो त्याला कार्यकर्ता म्हणतात. कृपाशंकर हा त्यातला आदर्श आहे. समाजात आज आपण सगळीकडे पहातो ते लहानमोठे कृपाशंकरच आहेत. काही त्यांच्या जवळपास पोहोचु शकलेले तर काही तिथपर्यंत जाण्याची स्वप्ने रंगवनारे. सत्तेच्या राजकारणात वरच्या वरच्या नेत्यांची ओळख काढायची, त्यांची मर्जी संपादन करायची, त्यांना सतत खुश ठेवायचे, त्याचे फ़ायदे इतरांना मिळवून द्यायचे, कधीकधी त्यांच्यासाठी मध्यस्थी दलाली करायची, अशा रितीने वाटचाल करण्याला आता कार्यकर्ता म्हणतात. नेता होण्याची कुवत नसलेले असे शेकडो लोक हल्ली कार्यकर्ता होऊन नेत्याला लाजवणारे लाभ पदरात पाडून घेतात. संधीसाधूपणा एवढेच त्याचे खरे वर्णन होऊ शकेल.  

     १९९९ सालात विलासराव देशमुख प्रथमच मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना दिल्लीत मध्यस्थीची गरज नियमित भासू लागली. त्याचा फ़ायदा घेत कृपाशंकर बडी हस्ती होऊन बसले. १४ वर्षापुर्वी जो माणुस ऑफ़िसबॉय असताना विलासराव मंत्री होते, तोच आता त्यांना दिल्लीत मध्यस्थीसाठी मदत करू लागला. ही त्याची प्रगती नक्कीच होती. पण मुख्यमंत्री व पक्षाची ती अधोगती होती. कुठली संस्कृती राजकारण व सार्वजनिक जीवनात जोपासली जाऊ लागली त्याचा हा पुरावा होता. जेव्हापासून अशा लोकांची चलती झाली व तेच कार्यकर्ते म्हणुन मिरवू लागले, तेव्हापासून सार्वजनिक जीवनातून कार्यकर्ता हद्दपार होऊन गेला. जनतेचे प्रश्न घेऊन लढणारे, लोकहिताची फ़िकीर असलेले, घरचे खाऊन लष्कराच्या भाकर्‍या भाजणारे, लोकलज्जा बाळगणारे दिसेनासे होत गेले. त्यांची जागा दलाल. मध्यस्थ, कंत्राटदार, ठेकेदार, संधीसाधू, आपमतलबी, स्वार्थी लोकांनी व्यापली. अशा लोकांना निवडणुका जिंकायला हाताशी पैसे असले तरी लोकप्रियता नव्हती. मग त्यांनी विभागात दहशत माजवू शकेल अशांना हाताशी धरले. त्यातून गुंडगिरीला प्रतिष्ठा मिळाली. हळुहळू त्यांनीही कार्यकर्त्यांचा वेश अंगावर चढवला. अशा असंगाशी संग करणे ज्या सभ्य लोकांना शक्य नव्हते, त्यांनी सार्वजनिक जीवनातून बाजूला होण्यात धन्यता मानली. सहाजिकच लोकसेवेला कार्य समजणारा कार्यकर्ता हद्दपार झाला आणि निवडून येण्याची क्षमता हा उमेदवारीचा निकष बनत गेला. कृपाशंकर ही त्याच राजकारणाची देणगी आहे.    

   अगदी स्पष्टच सांगायचे तर याच कालखंडात, पुर्वी ज्यांना समाजकंटक म्हटले जायचे, अशा मंडळींनी स्वत:ला कार्यकर्ता म्हणून शुद्ध करुन घेतले. मात्र ते होताना खराखुरा  कार्यकर्ता अंतर्धान पावला. लोकांची सेवा, लोकांविषयी कळकळ, नि:स्वार्थी भावनेने संघटनेत काम करणारा, कसलीही अपेक्षा न बाळगता वैचारिक भूमिकेसाठी झुंजणारा, असा कार्यकर्ता कुठेतरी गडप होऊन गेला. त्याच्या जागी स्वत:ची तुंबडी भरायची संधी शोधणारे दरोडेखोर राजरोस लुटमार करत उजळमाथ्याने समाजात वावरू लागले. त्यांनाच आता कार्यकर्ते म्हटले जाते आणि नव्या तरूण पिढीला तर कार्यकर्ता म्हणजे काय तेच समजेनासे झाले आहे. कारण कृपाशंकर हा आता आदर्श बनला आहे. पण तो आदर्श नाही. तीस चाळीस वर्षे मागे जाऊन त्यांना कार्यकर्ता म्हणजे काय व कसा, त्याची आदर्श उदाहरणे शोधावी लागणार आहेत. ज्यांना किंचित स्वार्थ देखील पाप वाटत होते असा तो कार्यकर्ता असे. आणि असायलाच हवा. जसे हे कृपाशंकरचे उदाहरण दिले तसेच खरा कार्यकर्ता कसा हवा व असायचा त्याचेही उदाहरण देणे अगत्याचे आहे. मग अण्णा हजारे हा चमत्कार वाटणार नाही.
स्वातंत्र्योत्तर काळात असे अनेक कार्यकर्ते होते आणि सर्वच पक्षात होते. अगदी कालपरवाची उदाहरणे मी सादर करणार आहे. ती समजून घेतली तर भ्रष्टाचार कुठे सुरू होतो आणि का बोकाळतो त्याचा अंदाज येऊ शकेल. (क्रमश:)
(भाग-१८८) २६/२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा