शनिवार, ११ जानेवारी, २०१४

प्रेषिताच्या शोधात भारतीय

   भारतीत समाज जीवनात व्यक्तीमहात्म्य खुप महत्वाचे असते, जी व्यक्ती समाजमनाला भुरळ घालू शकते किंवा भारावून टाकू शकते; तिच्यामागे पळण्याची मानसिकता मोठी प्रभावी असते. ती जशी गावात वस्तीमध्ये असते, तशीच प्रादेशिक, भाषिक व राष्ट्रीय पातळीवरही प्रभावशाली आहे. त्यापासून भारतीयांची सुटका नाही. कोणीतरी उद्धारक वा प्रेषित यावा आणि त्याने आपले जीवन उजळून टाकावे, अशी स्थायी मानसिकता या भूमीमध्ये कायम कार्यरत असते. जेव्हा असा कोणी राष्ट्रीय ताकदीचा उद्धारक नसतो, तेव्हा इथली जनता स्थानिक, प्रादेशिक वा वस्तीच्या पातळीवरचे प्रेषित शोधून त्यांच्या मागे धावत सु्टते, असा आपला इतिहास आहे. स्वातंत्र्य चळवळ असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील भारताची वाटचाल असो, त्यात अशी अनेक लहानमोठी व्यक्तीमत्वे उदयास आलेली दिसतील. त्यांनी समाजजीवन वा राजकीय, सांस्कृतिक जीवन व्यापलेले दिसेल. जेव्हा अशा अशा कुणा व्यक्तीमत्वाचा राष्ट्रीय पातळीवर वावर असतो, तेव्हा त्याच्याच भोवती राजकारण किंवा समाजजीवन घुटमळत असते. गांधी नेहरू वा पुढल्या कालखंडात इंदिराजी अशी व्यक्तीमत्वे होती. त्यांनीच कॉग्रेसला कायम सत्ता उपभोगू दिली. त्या व्यक्तीमहात्म्याला आव्हान देऊ शकणारे व्यक्तीमत्व विरोधकांना समोर आणता आले नाही. म्हणूनच कॉग्रेस सातत्याने टिकून राहिली. नेहरूंच्या अस्तानंतर तसे व्यक्तीमत्व नसल्याने कॉग्रेस प्रभावहीन होऊन स्थानिक व प्रादेशिक व्यक्तीमहात्म्यासमोर तिला पराभूत व्हायची वेळ आली. मग कात टाकल्याप्रमाणे १९७० च्या दशकात इंदिराजींचे व्यक्तीमहात्म्य पुढे आले आणि पुन्हा कॉग्रेसची सत्ता कायम राहिली, आणिबाणीच्या निमित्ताने तिला जयप्रकाश नारायण यांच्या व्यक्तीमत्वाने हादरा दिलेला होता. पण त्यांनी सत्तेपासून दूर रहाण्याने पुन्हा इंदिराजींकडे लोकांना वळावे लागले. थोड्याच काळात इंदिराजींच्या हत्येनंतर तीच पोकळी भारतीय राजकीय व समाजजीवनात आली आणि अवघे समाजजीवन भरकटत गेले. कॉग्रेस निकामी प्रभावहीन होत गेली. पण दुसरीकडे ती पोकळी भरून काढणारे देशव्यापी व्यक्तीमत्व अन्य पक्षात उदयास आले नाही. सहाजिकच स्थानिक व प्रादेशिक व्यक्तीमत्वाच्या आश्रयाला जात भारतामध्ये विस्कळीतपणा येत गेला. त्यातून बाहेर पडण्यासाठी कॉग्रेसच्या धुर्त नेत्यांनी आपल्या पक्षाला एकत्रित बांधू शकतील अशा सोनिया गांधींना पुढे आणले. त्यांचे व्यक्तीमहात्म्य उभे केले. पण असे व्यक्तीमत्व नुसतेच व्यक्ती असून भागत नाही, त्याच्यापाशी नेतृत्व करण्याची आणि धाडस करण्याची क्षमता असावी लागते. ती राजीव गांधीमध्ये नव्हती आणि सोनियांमध्येही नाही. म्हणूनच गेल्या तीन दशकात भारतामध्ये समाजजीवन विस्कळीत होत गेले. स्थानिक व प्रादेशिक प्रभावी व्यक्तीमत्वांच्या हाणामारीत राष्ट्रीय एकात्म चेहरा विस्कटून गेला. मोदींच्या रुपाने तसे व्यक्तीमत्व समोर आलेले आहे. त्यामुळेच रमेश त्यांना ‘फ़ॅसिस्ट आव्हान’ म्हणत आहेत. नेमके तसेच इंदिराजींचे रूप नव्हते का? इंदिराजींनी आणिबाणी लादून आणि तमाम विरोधी लोकांना गजाआड डांबून आपल्या एकाधिकारशाहीचा साक्षात्कारच देशाला घडवला होता. मोदींनी अजून तसा कुठला साक्षात्कार तरी घडवलेला नाही. पण तरीही त्याच इंदिराजींचे निष्ठावान भक्त जयराम रमेश मात्र मोदींना फ़ॅसिस्ट आव्हान ठरवत आहेत. त्यातला विखार बाजूला ठेवून म्हणुन त्यांचे विधान तपासणे अगत्याचे होऊन जाते. मोदींमध्ये जयराम रमेश नेमके असे काय बघत आहेत वा त्यांना काय दिसते आहे, की त्यांनी मोदींना कॉग्रेससमोरचे खरे मोठे आव्हान मानावे, त्याचे उत्तर काहीसे गुंतागुंतीचे आहे.

   रमेश यांना इंदिराजींचे व्यक्तीमत्व आठवलेले असावे. १९७० च्या आसपास इंदिराजी ज्याप्रकारे राजकीय क्षितीजावर उगवल्या आणि पुढल्या दोन दशकात त्यांनी जुन्याजाणत्या राजकारण्यांना निकालात काढून भारतीय राजकारणाचा चेहरामोहराच बदलून टाकला, तशीच वाटचाल मोदी करीत आहेत काय? मोदी हे ‘स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान’ या शब्दांना म्हणूनच वेगळे महत्व आहे. रमेश वा कुठल्याही कॉग्रेस नेत्याने भाजपाच्या कुठल्या नेत्याचा इतका धसका घेतलेला नव्हता किंवा अन्य कुठल्या बिगर कॉग्रेस नेत्याला लक्ष्य केलेले नव्हते. गेल्या दोनचार वर्षात कॉग्रेसने आपली सगळी ताकद व बुद्धी मोदी विरोधात पणास लावल्यासारखे राजकारण केलेले आहे. त्यातूनच रमेश हे मोदींना आव्हान कशाला म्हणतात, त्याची साक्ष मिळते. ज्या कॉग्रेस पक्षात सोनिया व राहुल गांधींचे एकमुखी नेतृत्व आहे; त्याने विस्कळीत व अनेक आवाजात बोलणार्‍या भाजपाच्या मोदी या नवख्या नेत्याला इतके घाबरावे कशाला? मोदींच्या मागे भाजपा एकमुखी उभा नाही आणि लालकृष्ण अडवाणी व अन्य नेतेही मनपुर्वक मोदींच्या मागे नाहीत. कदाचित मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला, तर भाजपात दुफ़ळीही माजू शकते. इतके असताना रमेश या व्यक्तीमत्वाबद्दल इतके गडबडून गेल्यासारखे बोलतात व कॉग्रेसही मोंदीबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेते; याचा अर्थ काहीतरी घाबरण्यासारखे नक्कीच आहे. ते कारण मोदींना पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून मिळणारा प्रतिसाद हेच असावे. कारण गेल्या वर्षभरात मोदींची वाढलेली लोकप्रियता व त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद; त्यांचे व्यक्तीमहात्य वाढवण्रारा आहे. दिर्घकाळानंतर भारताच्या राजकीय क्षितीजावर देशव्यापी लोकप्रियता असलेला आणि कुठेही जाऊन जनतेला भारावून टाकणारा, नवा नेता उदयास आलेला आहे. किंबहूना इंदिराजींच्या अस्तानंतर प्रथमच देशात कुणी एक देशव्यापी राजकीय व्यक्तीमत्व उदयास आलेले आहे, याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. रमेश आणि कॉग्रेसला त्याच व्यक्तीमत्वाने भयभीत केलेले आहे. त्याची प्रचिती नित्यनेमाने येत असते. आम्ही मोदींना मोजत सुद्धा नाही, अशी ग्वाही कॉग्रेसचे नेते प्रवक्ते नेहमी देत असतात. पण त्या पक्षाचे सर्व राजकारण मोदींच्या वाटेत अडथळे आणण्यापुरतेच मर्यादित होऊन गेले आहे. आपल्या पक्षाची धोरणे आखून, बदलून त्याच्या अंमलातून लोकांमध्ये आपले स्थान पक्के करण्यापेक्षा सगळा कॉग्रेस पक्ष मोदींची खुसपटे काढण्यात वा त्यांच्यावर हल्ले करण्यातच रममाण झाला आहे. कधी इशरत जहानची खोटी चकमक, तर कधी झाकीया जाफ़रीचा खटला, तर कधी अमित शहाचे पाळत प्रकरण किंवा अशाच कुठल्या प्रकरणात मोदी यांना गुंतवण्याचे व बदनाम करण्याचे डावपेच आखण्यात कॉग्रेसची शक्ती खर्ची घातली जात आहे. हे कशाचे लक्षण आहे?

   गेल्या दोनतीन दशकात भारताच्या राजकारणाचा ज्यांनी अभ्यास केला असेल, त्यांना असे एका व्यक्तीमत्वाच्या विरोधात देशाचे राजकारण घुटमळताना कधी दिसले नसेल. त्याच्या आधी इंदिराजींच्या कारकिर्दीत मात्र तसे सातत्याने होत असे. तमाम विरोधी पक्ष व राजकीय टिकाकारांचे एकमेव लक्ष्य इंदिरा गांधी असायच्या. त्याबद्दल त्यांनीही कधी तक्रार केली नव्हती. उलट आपल्या विरोधकांना व टिकाकारांना तो उद्योग चालवायला पुरेसे खाद्य इंदिराजी अगत्याने पुरवित असत. आपल्याला शिवीगाळ व्हावी व आपला उद्धार सतत होत रहावा, अशी तजवीज जणू इंदिराजी मुद्दाम करायच्या. नेमकी तीच आज मोदींच्या बाबतीतली स्थिती आहे. कुठूनही व कोणतेही कारण नसताना विषय मोदीपर्यंत आणला जातो किंवा येतो. देशातल्या कुठल्याही विषय वा गोष्टीचा संबंध मोदींशी जोडला जातोच. अवघे राजकारण व सार्वजनिक जीवन एका व्यक्तीभोवती घुसळते व घुमते आहे. इंदिराजीच्या राजकीय कारकिर्दीत अशीच स्थिती असायची. कॉग्रेस व विरोधी पक्षाच्या धुसळणीचा मध्यबिंदू इंदिराजी हेच व्यक्तीमत्व असायचे. त्या व्यक्तीमत्वाने देशाच्या समाजजीवनाचे जणू दोन तुकडे पाडलेले होते. एका बाजूला इंदिरा समर्थक व दुसर्‍या बाजूला उर्वरित सगळे; अशी स्थिती असायची. तुम्ही इंदिरेचे समर्थन करा किंवा त्यांचा द्वेष करा, पण तुम्ही त्यांच्याक्डे काणाडोळा वा दुर्लक्ष करू शकत नव्हता. आज मोदींच्या बाबतीत वेगळे म्हणता येईल काय? खरे तर तसेच सोनिया वा राहुल गांधींच्या बाबतीत व्हावे, ही रमेश यांच्यासारख्या रणनितीकारांची अपेक्षा होती आणि असते. पण सर्व अधिकार हाती देऊनही ते दोन्ही नेते त्या कसोटीला उतरू शकलेले नाहीत. पंधरा वर्षापुर्वी सोनियांना राजकारणात आणणार्‍या नेत्यांनी तेच उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून वादग्रस्त सोनियांना कॉग्रेसच्या सर्वेसर्वा म्हणून स्थानापन्न केले होते. आरंभी त्यांनीही तसे वादग्रस्त राहुन आपल्या व्यक्तीमत्वाची छाप चांगली पाडली होती. सत्तेवर असलेला भाजपा व त्याचे सर्व नेते सोनियांना परदेशी वगैरे म्हणून लक्ष्य करीत होते, त्याचा लाभ कॉग्रेसला मिळू शकला होता. तसा नेता भाजपाकडे नव्हता. त्यामुळेच सोनियांचे व्यक्तीमत्व चमकत होते. पण कसोटीच्या प्रसंगी त्यांचा टिकाव लागला नाही. आणि गुजरातच्या दंगलीचे अतिरेकी राजकारण करण्यातून त्यांनीच मोदींना तसे प्रभावी देशव्यापी व्यक्तीमहात्म्य बहाल करण्याची चुक केली. अर्थात मोदी त्याचा लाभ उठवून खरेखुरे राजकीय आव्हान म्हणून समोर उभे ठाकतील, अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. मात्र टिकेचे घाव सोसताना त्यातून मोदींनी देव होण्यापर्यंत मजल मारली; तेव्हा त्यांच्या टिकाकारांना भान येते आहे. रमेश आपणच घातलेल्या टिकेच्या घावातून निर्माण झालेला नवा देव आणि त्याच्या भक्तीला लागलेली लोकसंख्या बघून, भयभीत झाले आहेत. कारण दोनतीन वर्षात समोर आलेला मोदी त्यांना जुन्या इंदिरा गांधींच्या व्यक्तीमत्वाची आठवण करून देऊ लागला आहे. आजच्या पिढीतल्या बहुतांश पत्रकार अभ्यासकांना इंदिराजी हे व्यक्तीमत्व वाचून वा ऐकून माहिती आहे. पण त्यांच्या राजकीय घटनाक्रमाचे साक्षीदार नसलेल्यांना त्यातली उर्जा व दाहकता उमगणे अशक्य आहे. इंदिराजी हे व्यक्तीमत्व वाचून वा ऐकून त्याच्या राजकीय प्रभावाचा अंदाज येऊ शकत नाही. तो त्या काळाच्या अनुभूतीमध्ये जाऊन उलगडावा, असाच विषय आहे. रमेश यांना म्हणूनच मोदींमध्ये आव्हान दिसते आहे. त्यांना मोदींमध्ये इंदिरा गांधी दिसत आहेत. पण ते व्यक्तीमत्व कॉग्रेसमध्ये नसून कॉग्रेस संपवायला कटीबद्ध झालेले आहे, म्हणून जयराम रमेश यांच्यासह तमाम कॉग्रेस नेत्यांची गाळण उडालेली आहे.  (अपुर्ण)        

शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

जयराम रमेश काय म्हणाले?



  गेल्या जुन महिन्यात भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची देशव्यापी लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांना आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचार समोतीचे प्रमुख म्हणून नेमले. त्यांची नेमणूक जाहिर होताच सर्वत्र एकच गदारोळ सुरू झाला. कारण गेल्या दहा वर्षात गुजरात दंगलीचे निमित्त करून मोदींना सातत्याने बदनाम करण्यात आलेले होते. त्या बदनामीच्या मागे कॉग्रेसची प्रेरणा होती, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच बदनामीची अतिशयोक्ती होऊन मोदींबद्दल जगभर कुतूहल वाढत जाऊन त्यांचे रुपांतर क्रमाक्रमाने लोकप्रियतेत झाले. परिणामी मोदींचेच नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जाऊ लागले. आधी काही उद्योगपती व नंतर माध्यमांनी भाजपाला खिजवण्यातून ती चर्चा वाढतच गेली. पुढे भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार करणे म्हणजे साक्षात आत्महत्याच असल्याचा सिद्धांत मांडला जाऊ लागला. पण अशा अनावश्यक चर्चेतून लोकांसमोर मोदी देशाचे भावी पंतप्रधान होण्याची कल्पना अनवधानाने मांडली गेली. सततच्या चर्चेने त्या कल्पनेला वजन प्राप्त होत गेले आणि गुजरातच्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर लोकांनाही असा पंतप्रधान असावा, असेच वाटू लागले. थोडक्यात मोदींच्या आडोशाने भाजपाला बागुलबुवा दाखवण्याच्या नादात मोदी विरोधकांनीच लोकांच्या मनात मोदींना पंतप्रधान पदी बसवायची कल्पना रुजवली. त्यातून उदासिन व निराश भाजपा कार्यकर्त्यांना उभारी येत गेली आणि परिणामी भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्याकडून मोदींनाच भावी पंतप्रधान बनवण्याची मागणी वाढू लागली. खरे तर त्या कालखंडात मोदी गुजरातमध्ये तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूक लढवण्यात गर्क होते. परंतु त्यांचा डोळा ती लढाई जिंकून पंतप्रधान पदावर खुलेआम दावा करण्याचाच होता. वर्षभरापुर्वी ती लढाई जिंकल्यापासून मग मोदींनी दिल्लीवर स्वारी करण्याचा चंग बांधला. खरे तर त्यांच्या विरोधकांनी तिथेच हा बागुलबुवा दाखवण्याचे थांबवले असते; तर मोदींना इतक्या लौकर त्या उमेदवारीपर्यंत मजल मारणे शक्य झाले नसते. पण त्यांना हवी तशीच खेळी त्यांचे विरोधक करत गेले आणि मोदींचे काम सोपे होत गेले. आपल्याच पक्षातून व दिल्लीच्या पक्षीय श्रेष्ठींकडून आपल्याला सुखासुखी मान्यता मिळणार नाही; याची मोदींनाही खात्री होती. पण माध्यमातील अपप्रचार व कार्यकर्त्यातील उत्साह, यांचा नेमका उपयोग करीत मोदींनी आपली वाटचाल योग्य दिशेने चालू ठेवली होती. सतत मोदी व त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या चर्चेने त्यांचे काम अतिशय सोपे करून टाकले होते. एका बाजूला त्याचे दडपण पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधकांवर वाढत होते. तर दुसरीकडे पक्षाच्या विजयासाठी उतावळा झालेला तळागाळातला कार्यकर्ता अधिकच निष्ठेने मोदींच्या मागे गोळा होत गेला.

   ज्यांना राजकारणाचा अभ्यास आहे आणि जनमानसाचा अंदाज आहे, अशा कॉग्रेस नेत्यांमध्ये केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांचा समावेश होतो. पक्षाच्या निवडणूक रणनिती व प्रचाराचे मुद्दे शोधण्यात तेच पुढे असतात आणि राहुल गांधी यांची भाषणे तेच लिहून देतात, असे म्हटले जाते. कॉग्रेस समोर असलेली राजकीय आव्हाने व त्याच्यावरचे उपाय शोधण्यासाठी असलेल्या अभ्यासगटात, त्यांचे स्थान प्रमुख आहे. सहाजिकच अशा माणसाला पक्षासमोर असलेले सर्वात भीषण आव्हान सर्वात आधी उमगणार हे वेगळे सांगायला नको. मोदींच्या बाबतीत बाकीचे कॉग्रेस नेते नाके मुरडत असताना, रमेश यांनी मात्र अकस्मात २०१३ च्या मध्यास मोदी हे कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान असल्याची कबुली देऊन टाकली. त्यामुळे पक्षातच इतके वादळ उठले. ते रमेश यांचे व्यक्तीगत मत असल्याचे अधिकृत प्रवक्त्याला जाहिरपणे सांगावे लागले. दुसरे एक ज्येष्ठ कॉग्रेसनेते सत्यव्रत चतुर्वेदी तर कमालीचे संतापले आणि त्यांनी रमेश यांना मोदींचे नेतृत्व इतकेच आवडत असेल, तर त्यांनी भाजपात निघून जावे; इथपर्यंत टोकाची टिका केलेली होती. रमेश यांनी खरे तर मोदींचे अजिबात कौतुक केलेले नव्हते. उलट विषारी भाषेत टिका करताना मोदी हे भस्मासूर असल्याचीही मल्लीनाथी केलेली होती. मग अवघा कॉग्रेस पक्ष विचलीत होण्याचे कारण काय असावे? तर रमेश यांनी मोदी हे पक्षासमोरचे आजपर्यंतचे सर्वात मोठे व खरे आव्हान असल्याची कबुली दिलेली होती. ती कबुली त्यांचे खरेच व्यक्तीगत मत असते, तर त्यावर इतके काहूर माजले नसते. प्रवक्त्याने झटकून टाकण्यावर विषय संपवला गेला असता. पण ते रमेश यांचे व्यक्तीगत मत नव्हते. तर कॉग्रेसच्या धोरणात्मक बैठकीत झालेल्या चर्चेचा सूर त्यातून अनवधानाने बाहेर आला. त्यासाठी तमाम पक्षनेते संतापले होते. जे पक्षाने व्यवहारी सत्य म्हणून स्विकारले आहे, त्याची जाहिर वाच्यता केल्याने बाकीचे नेते चिडले होते. शिवाय रमेश हा नेता असे म्हणतो, म्हणजे भाजपालाही मोदी हेच आव्हान असल्याचा संकेत कॉग्रेसने द्यावा, असा त्याचा अर्थ झाला होता. म्हणूनच रमेश यांच्या विधानावर इतका कल्लोळ कॉग्रेसमध्ये झाला. अर्थात रमेश यांची गळचेपी केल्याने व्हायचे परिणाम बदलता आलेले नाहीत. अवघ्या सहा महिन्यातच त्याची प्रचिती चार विधानसभा निकालातून समोर आलेली आहे. चार राज्यात कॉग्रेसचा पुरता सफ़ाया झाला आणि भाजपाला सगळीकडे निर्णायक यश मिळालेले आहे. या सर्वच निवडणूकीत मोदींनी आघाडीवर राहुन पक्षाचा प्रचार केला आणि अनेक राज्यात त्यांनी घेतलेल्या सभांना अफ़ाट प्रतिसाद जनतेकडून मिळतो आहे. सहाजिकच आगामी राजकारणात कॉग्रेस समोरचे मोदी हेच ऐतिहासिक आव्हान असल्याची साक्ष घटनाक्रमच देतो आहे.

   यातला निकाल बाजूला ठेवून रमेश यांनी मोदींविषयी असे भाकित कशाला करावे, त्याची मिमांसा मोठी उदबोधक ठरावी. रमेश हे इंदिरा गांधीच्या काळात कॉग्रेसमध्ये आलेले आणि राजीव गांधींच्या काळात पक्षाच्या कामात सहभागी झालेले बुद्धीमान नेते आहेत. त्यांनी इंदिराजी व राजीव गांधींनी प्रचंड जागा जिंकताना व लाटेवर स्वार होऊन सत्ता संपादन करताना जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच लाटेवर स्वार होणारा किंवा लाट उभी करणारा नेता जवळून बघितला आहे. लाटेचे राजकारण कसे हेलकावे घेते आणि लाटेवर स्वार होणारा नेता कसा असावा लागतो; त्याचाही अभ्यास रमेश यांनी केलेला आहे. मोदी जर त्याच चौकटीत वा साच्यात बसत असतील, तर दुबळ्या विस्कळीत कॉग्रेसचा ते धुव्वा उडवणार; हे बघायची डोळस नजर रमेश यांच्याकडेच असू शकते. म्हणूनच त्यांनी मोदींना भस्मासूर म्हणावे किंवा बकासूर म्हणावे. त्यापेक्षा त्यांनी कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान संबोधणे, खुप महत्वाचे व सूचक आहे. एका राज्याचा वादग्रस्त मुख्यमंत्री यापेक्षा नरेंद्र मोदी यांची देशातील राजकारणाची अन्य़ कुठली कारकिर्द नाही. दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात वा सत्तेच्या आखाड्यात मोदी यापुर्वी कधीच नव्हते. पक्षानेही त्यांना तशी कधी संधी दिलेली नाही. मग सहा महिन्यापुर्वी जुन २०१३ मध्ये रमेश यांनी मोदींबद्दल असे भाकित कशाला करावे? कॉग्रेस सारख्या बलाढ्य देशव्यापी व शतायुषी पक्षाला भाजपाच्या जुन्याजाणत्या अनुभवी नेत्यांचे असे भय कधी वाटले नाही. वाजपेयी यांच्यासारखा लोकप्रिय नेताही आव्हान वाटला नाही. मग मोदींचे भय कशाला? भय मोदी या व्यक्तीविषयी असावे, की त्याच्या लोकप्रियतेची भिती? भाजपातील कार्यकर्त्याला उत्साहीत करण्याच्या मोदींच्या क्षमतेला रमेश घाबरले, की जनमानसात जाणवणार्‍या मोदीविषयक आकर्षणाने रमेश यांची झोप उडवली असेल? यातले शेवटचे कारण खरे आहे. व्यक्तीकेंद्री राजकारण झाल्यावर पक्षाच्या संघटनात्मक व प्रभावक्षेत्राच्याही पलिकडे जाऊन यश मिळते; हा निवडणूकांचा इतिहास आहे. मोदींच्या लोकप्रियतेमध्ये त्याचेच संकेत पाहुन रमेश यांना भिती वाटलेली आहे. इंदिराजींच्या व्यक्तीमत्वाने जसे भारतीय राजकारण मंतरले होते, त्याची चाहुल मोदींच्या आगमनाने लागलेली आहे. चाणाक्ष राजकीय अभ्यासकाला व डोळसपणे राजकारणाचे आकलन करणार्‍यांनाच त्याच्या सुगावा लागू शकतो. रमेश तशा मोजक्या नेत्यांपैकी व अभ्यासकांपैकी आहेत. म्हणुनच त्यांनी मोदीविषयक केलेल्या विधानाला महत्व आहे. म्हणूनच कॉग्रेसमध्ये त्यांच्या त्या जाहिर विधानाबद्दल कमालीच्या नाराजीचा सूर उमटला. (अपुर्ण) 

सोमवार, ६ जानेवारी, २०१४

आपापले स्वार्थ आणि हितसंबंध

  १९८५च्या त्याच मुंबई महापालिका निवडणूकीतले काही किस्से इथे मुद्दाम सांगायला हवे. आपल्या सर्वच शाखाप्रमुखांना उमेदवार करायच्या बाळासाहेब ठाकरेंच्या हट्टाबद्दल त्यांचेच नेते साशंक होते, तसेच अनेक शाखाप्रमुखही साशंक होते. दादर प्रभादेवीचा शाखाप्रमुख आपल्याला उमेदवारी अर्ज भरावा लागू नये, म्हणून गायब झाला होता. तर तिथे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या मोतीराम तांडेल नावाच्या जुन्या वयस्क शिवसैनिकाला अर्ज भरायची मुदत संपल्यावर शोधून सेनेचा उमेदवार घोषित करण्यात आले. पुढे तो निवडून आल्यावर हा शाखाप्रमुख पाच वर्षे आपल्या नशीबाला दोष देत होता. चोवीस वर्षानंतर २००९ सालात त्यानेच आमदारकी टिकवण्यासाठी कॉग्रेसची उमेदवारी मिळवताना पक्षांतर केले होते. दुसरा किस्सा सांताक्रुज विमानतळ परिसरातला आहे. तिथे शाखाप्रमुखासह उपशाखाप्रमुखही उमेदवार व्हायला राजी नव्हते, तेव्हा लेऑफ़मुळे बेकार असलेला एक गटप्रमुख आपले डिपॉझीट कोणी भरणार असेल, तर निवडणूक लढवायला सिद्ध झाला. वर्गणी काढून त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आणि तोही निवडून आलेला होता. मुद्दा इतकाच, की चार महिन्यापुर्वी जी सेना आपल्या गिरणगावाच्या बालेकिल्ल्यातून संपली म्हणून माध्यमातले सेक्युलर आनंदोत्सव करीत होते; त्यांना थक्क करीत १९८५ सालच्या मे महिन्यात सेनेने मुंबई महापालिकेवर प्रथमच स्वबळाने भगवा फ़डकवला. तिथून मग सेनेची महाराष्ट्रात धोडदौड सुरू झाली. नंतर अवघ्या पाच वर्षात दत्ता सामंत व कामगार आघाडी इतिहासजमा होऊन गेले होते. हा सगळा इतिहास एवढ्यासाठी कथन करायचा, की तेव्हा मी सुद्धा डॉ. दत्ता सामंतांच्या यशाने भारावून गेलो होतो आणि आता शिवसेनेचे दिवस संपले, असे मानू लागलो होतो. योगायोगाने त्याच कालखंडात शिवसेनाप्रमुखांनी सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे पुनरुज्जीवन करून नव्या स्वरूपात त्याचे प्रकाशन सुरू करण्याचे योजले होते. त्याची जबाबदारी व्यावसायिक पत्रकार म्हणून माझ्याकडे आली. त्याच्या धोरणात्मक बाजूचा उहापोह करण्यासाठी बाळासाहेबांशी माझा सतत संपर्क येऊ लागला होता. पक्षाचे मुखपत्र हे अनुयायांना मार्गदर्शक व अन्य पक्षांसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे असते. त्यामुळेच ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध करायच्या मजकुराची दिशा ठरवण्यासाठी बाळासाहेबांशी मी अनेक मुद्दे व विषयांवर चर्चा करीत असे. आरंभी माझ्या राजकीय आकलनानुसार सेनेसमोर दत्ता सामंत व त्यांची कामगार आघाडी हेच स्थानिक व प्रभावी आव्हान आहे; अशी माझी ठाम समजूत होती. पण त्याविषयी साहेब अजिबात गंभीर नव्हते. वारंवार त्याबद्दल मी बोलत असे, त्यामुळे एके दिवशी त्यांनी मला सामंत हा कसा तात्कालीन बुडबुडा आहे आणि त्याची दखल घेण्य़ात आपली शक्ती खर्च करू नये, याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले. अर्थात तेव्हा मला ते पुर्णपणे पटलेले नव्हते. पण १९८९ सालात डॉ. सामंत त्याच गिरणगावात चारीमुंड्या चित झाले; तेव्हाच मला साहेबांचे भाकित पटले. कारण त्यानंतर कामगार आघाडी व सामंत यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही.

   राजकारणातील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व वस्तुनिष्ठ मिमांसा करण्यासाठी किती वास्तववादी असावे लागते; त्याचे धडे अशा विविध अनुभवातून मला गिरवता आलेले आहेत. अनेकदा आपण घडणार्‍या घडामोडी व घटनांकडे आपापल्या स्वार्थ व हितसंबंधांच्या चष्म्यातून बघत असतो. त्यामुळेच आपले स्वार्थ व समजूती वास्तवाचे चित्रच विकृत करतात. सहाजिकच आपल्या हाती आलेली वा उमगलेली माहितीच नासलेली असते. मग त्यावर आधारीत केलेली मिमांसा वा त्यानुसारचे आकलन वास्तववादी कसे असेल? आपण प्रत्येक घटना वा गोष्टीकडे आपल्या आवडीनिवडीनुसारच बघत असतो आणि हवे असलेले अर्थच त्यातून शोधायचा प्रयास करीत असतो. त्यामुळेच समान माहिती वा तपशील समोर असूनही भिन्न व्यक्ती, वेगवेगळे निष्कर्ष काढत असतात. राजू श्रीवास्तव नावाचा एक नकलाकार आहे. त्याने टिव्हीवर रंगवलेली एक नक्कल आठवते. त्याने कथन केलेल्या त्या विनोदातून राजकीय मिमांसेत येणारा फ़रक स्पष्ट होऊ शकेल. उत्तरप्रदेशात तेव्हाच्या सरकारने प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे धोरण आखले होते आणि त्यावर जोरदार चर्चा चालू होत्या. त्याच संदर्भात राजूने मोठा मस्त किस्सा तयार केला व रंगवला होता.

   एका गावात चौकात गोळा झालेल्या डझनभर कुत्र्यांमध्ये चर्चा चालू असते. आपल्याही गावात वीज येणार म्हणून कुत्रे सुखावलेले असतात आणि कधी वीज येणार यापेक्षा रस्त्यावर खांब टाकले कधी जाणार, यावर तावातावाने बकवास चालू असते. त्यातला एक अतिउत्साही कुत्रा वीज कधी यायची ती येवो, आणि खांबावर दिवे लागायचे तेव्हा लागोत; पण निदान ताबडतोब गावागावात दिव्याचे खांव तर विनाविलंब उभारले गेलेच पाहिजेत, असे ठासून सांगत असतो. तितकेच नाही, तर काही कुत्रे त्यासाठी सभा मोर्चे काढायचीही भाषा अगत्याने बोलत असतात. तेव्हा इतका वेळ गप्प बसलेला एक तुलनेने अननुभवी कुत्रा शंका विचारतो, तुम्हाला कशाला या गावोगावी येऊ घातलेल्या वीजपुरवठ्याची पंचाईत? तुम्ही टिव्ही बघणार आहात, की कॉम्प्युटर चालवणार आहात? नसेल तर असल्या बाष्कळ चर्चा हव्यात कशाला? बाकीचेही त्या प्रश्नाने वरमतात. पण मग त्यातला वयोवृद्ध कुत्रा पुढाकार घेतो आणि त्या चिकित्सक कुत्र्याला म्हणतो, ‘इथे कोणाला वीज येण्याची चिंता आहे? आपल्याला गावात वीज येण्याशी कर्तव्य नाही बाबा. आपला स्वार्थ फ़क्त वीजेच्या खांबाशी आहे, गावोगाव चौकाचौकात खांब असले, मग आपली टांग वर करण्याची सोय होते ना? ते खांब प्रत्येक ठिकाणी नसले, मग आपली किती गैरसोय होते? वीजेच्या निमित्ताने असे अधिक खांब लागले, तर केवढी मोठी समस्या निकालात निघेल त्याचा विचार कर.’ तात्काळ तोही कुत्रा विनाविलंब वीजेचे खांब घालण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन टाकतो.

   यातला विनोद बाजूला ठेवला, तर घटना व गोष्टीकडे आपापल्या मतलबानुसार कसे बघितले जाते, त्याचे उत्तर मिळते. दिल्लीच्या मतदाराने केजरीवाल वा त्यांच्या पक्षाला आपल्या हेतूने मतदान केले असेल, कोणी पाणी, वीजेच्या दरात कपात किंवा कोणी झोपडीला मान्यता, नोकरीत कायम होण्याच्या आशेवर ‘आप’ला मतदान केले असेल. रिक्षावाल्यांनी आपली अरेरावी कायम रहावी आणि वाहतुक पोलिसांचा ससेमिरा संपावा, म्हणून मते दिली असतील तर कोणी भ्रष्टाचारातून मुक्ती म्हणून कौल दिला असेल. पण निकालानंतर त्याची मिमांसा करणारे आपापल्या स्वार्थानुसार त्याचा अर्थ लावत नाहीत काय? देशातून भ्रष्टाचार हटावा म्हणून, किंवा भाजपासह नरेंद्र मोदींचा विजयरथ रोखला जावा म्हणून, दिल्लीकरांनी केजरीवाल यांना कौल दिला आहे काय? नसेल तर मग त्याचा तसा अर्थ लावणारे आणि राजू श्रीवास्तवच्या विनोदातील खांबासाठी आग्रही असलेले कुत्रे; यांच्यात नेमका किती फ़रक मानायचा? कुणाला दिल्लीच्या निकालाचा अर्थ लावणार्‍यांची कुत्रा म्हणून केलेली ही अवहेलना वाटेल. पण तसा अजिबात हेतू नाही. पण दोन्हीकडल्या हेतूतले साम्य अधिक ठळकपणे समोर यावे; म्हणून काहीसा भडक वाटणारा हा किस्सा इथे मांडला. तितके नेमक्या शब्दात या दोन्हीतले साम्य दाखवणारे दुसरे उदाहरण नाही. केजरीवाल यांचे दिल्लीच्या निकालानंतरचे अवास्तव कौतुक आणि अतिशयोक्ती मांडण्यासाठी हा थोडा जुना इतिहास व तुलना केली इतकेच. कारण त्याच निकालाचा आधार घेऊन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीचे आडाखे बांधण्याचा उद्योग सुरू झालेला आहे. एकूण दिल्लीच्या निकालाची मिमांसा नेमकी करण्यापेक्षा तिचा विपरित अर्थ लावला जात आहे. त्यातला विपर्यास व दिशाभूल करण्याचा हेतू स्पष्ट व्हावा, म्हणुनच हा विषय इतका सविस्तर मांडला आहे. तसे निवडणूक इतिहासाचे कित्येक दाखले देता येतील, केजरीवाल यांच्या यशासारखे हंगामी, तात्कालीन व प्रासंगिक यश अनेकांनी अनेकदा संपादन केलेले आहे. मात्र नंतरच्या राजकारणात त्यांचा मागमूसही शिल्लक उरलेला नाही. पण तात्कालीन राजकारणाला व घटनाक्रमाला कलाटणी देण्यासाठी अशा घटनांचा कसा विपर्यास केला जातो, त्याचे आधीच स्पष्टीकरण व्हावे म्हणून हा सगळा उहापोह.

   मुद्दा इतकाच, की केजरीवाल यांच्या यशाचा देशव्यापी मोठाच परिणाम होईल अशी जी हवा निर्माण केली जाते आहे; त्यातले सत्य समोर यावे आणि डोळसपणे उपांत्य फ़ेरी मानल्या गेलेल्या ताज्या विधानसभा निवडणूकांच्या निकालाची वास्तववादी कारणमिमांसा करता यावी. जितका हा झंजावात देशभर पसरण्याचा गाजावाजा चालू आहे, तितका तो झंजावात नसून दिल्लीपुरता त्याचा प्रभाव असेल. उलट दिल्लीपलिकडे असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या निकालांनी लोकसभेच्या निवडणूकीबद्दल बरेच काही सांगून ठेवले आहे. ते काय आहे हे तपासण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आजवरच्या निवडणूकीच्या ऐतिहासिक निकालांच्या कसोटीवर हे ताजे निकाल तपासून बघण्याची गरज आहे. लोक मते देतात म्हणजे काय? लोकांचे मत मुळात तयार कसे होते? लोक मते बनवतात कसे? कुठलाही परस्पर संपर्क वा बौद्धिक देवाणघेवाण होत नसताना जनमत वळण घेतेच कसे? त्याचे निकष काय असतात? वेळोवेळी निकष कसे बदलतात? पक्ष, उमेदवार, परिस्थिती, अपेक्षा, गरजा, समस्या यानुसार मत कसे घडत जाते? हे मत सार्वत्रिक कशामुळे होते? कुणाच्या बाजूने वा विरोधात झुकाव उदयास कसा येतो? असे अनेक मुद्दे तपासावे लागतात. तेव्हाच येऊ घातलेल्या निवडणूकीविषयी नेमके अंदाज बांधणे शक्य असते. यापैकी काहीही न करता आपापल्या मतलबाचे युक्तीवाद सिद्ध करण्यासाठी सोयीस्कर मुद्दे व तपशील वापरले; मग दिशाभूल करता येते. पण अंदाज मात्र पुरते फ़सतात. तोच धोका टाळण्यासाठी आधी नमनाला घडाभर तेल म्हणतात, तशी ही प्रदिर्घ प्रस्तावना करावी लागली. आगामी निवडणूकीत नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे व ऐतिहासिक आव्हान असल्याचे त्याच पक्षाचे बुद्धीमान नेते जयराम रमेश का म्हणतात, तेच कोडे उलगडण्याचा हा एकूण प्रयास आहे. (अपुर्ण)

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

दिल्लीतली ‘आप’त्ती


   आज जसा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या यशावर कौतुकाचा वर्षाव चालू आहे, तसाच अठ्ठावीस वर्षापुर्वी डॉ. दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडी पक्षाचा मुंबईत कौतुक सोहळा चालू होता. त्यांच्या यशाची जी कारणे होती; त्याचा कोणी शोध घेतला नाही, की त्यांच्या संघटनात्मक बळाचा कोणी विचार करायला तयार नव्हते. तेव्हा वाहिन्यांचा सुळसुळाट आजच्यासारखा नव्हता. पण जी छापील माध्यमे होती, त्यांनी आजच्या केजरीवाल यांच्याप्रमाणेच सामंतांना डोक्यावर घेतलेले होते. त्याला अर्थातच सामंतांचे यश कारण नव्हते, किंवा त्यांनी ज्या कॉग्रेसप्रणीत राजीव लाटेला रोखले, त्यालाही महत्व नव्हते. पत्रकारांना भावले होते ते वेगळेच काही होते. सामंत यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या लागोपाठच्या निवडणूकीत शिवसेनेला तिच्या बालेकिल्ल्यातच गारद करून टाकले होते. त्यामुळेच तात्कालीन सेक्युलर पत्रकार माध्यमांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या होत्या. सामंतांच्या त्या झंजावातामध्ये शिवसेना कशी वाहून गेली, त्याचा आनंद त्या पत्रकार विश्लेषकांच्या पोटात मावत नव्हता. म्हणूनच तो वृत्तपत्रातून दुथडी भरून वाहत होता. ज्या गिरणगावात दोन दशकांपुर्वी शिवसेनेचा उदय झाला आणि पुढल्या काळात तिथून तथाकथित डाव्या विचारांच्या पक्षाचे उच्चाटन झाले. गिरणगाव शिवसेनेचा बालेकिल्ला झाला, त्याने विचलित झालेल्यांना तिथे तितक्याच हाणामारीची कुवत दाखवणार्‍या सामंतप्रणित कामगार आघाडीच्या विजयाने उकळ्या फ़ुटलेल्या होत्या. त्यात डिसेंबर १९८४ अखेरीस सामंतांनी मध्य दक्षीण मुंबई मतदारसंघातून लोकसभेपर्यंत मजल मारली होती आणि दोनच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्याच भागातून त्यांचे तीन आमदार विधानसभेत निवडून आलेले होते. शिवाय अनेक मतदारसंघात त्यांनी शिवसेनेला मागे टाकून दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली होती. सहाजिकच शिवसेना संपली; याचाच माध्यमातील अनेकांना आनंद झालेला होता. थोडक्यात या पत्रकार विश्लेषकांचा आनंद वा त्यांचे मतप्रदर्शन वस्तुस्थितीचे वर्णन करणारे नव्हते, तर त्यांच्या आकसाचे प्रतिबिंब त्यात पडलेले होते. याचा साधा अर्थ इतकाच होता, की पत्रकार व सामंतांचे कौतुक करणारी माध्यमे तेव्हा मिमांसा करण्यापेक्षा दिशाभूल करीत होती. लागोपाठ दोन निवडणूकात शिवसेनेचा दारूण पराभव करून सामंतांच्या कामगार आघाडीने सेनेच्या बालेकिल्ल्यातच मोठे यश मिळवले असेल, तर त्याला दिशाभूल का म्हणायचे? हा पत्रकार विश्लेषकांवर अन्यायच नाही काय?

   आधी आपण त्या अठ्ठावीस वर्षापुर्वीच्या राजकीय विश्लेषणाचे तथ्य तपासून बघुया. तेव्हाची लोकसभा निवडणूक झाली, ती इंदिरा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झाली होती. ३१ आक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांना त्यांच्या पंतप्रधान निवासातच त्यांच्याच दोन विश्वासू शीख अंगरक्षकांनी अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारलेले होते. त्या भयंकर घटनेने अवघा देश हबकला होता. सहाजिकच विनाविलंब त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र राजीव गांधी यांना राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी शपथ देऊन पंतप्रधान पदावर बसवले होते. दिल्लीत तर भीषण दंगल उसळली होती. कॉग्रेसच्या नेत्यांच्याच पुढाकाराने वस्तीवस्तीत शीखांचा राजरोस नरसंहार सलग तीन दिवस चालू होता. राजीव गांधी त्यावर म्हणाले, की मोठा जुना वृक्ष उन्मळून पडला मग धरणीला हादरे बसतातच. पण त्यांच्या त्या भयंकर चिथावणीखोर विधानातील हिंसेचे प्रोत्साहन कोणाला दिसले नाही. त्यांनी तात्काळ लोकसभेच्या निवडणूकांची घोषणा केली आणि त्याच सहानुभूतीवर स्वार होऊन चारशे जागा जिंकल्या होत्या. पुढली निदान दोनचार वर्षे तरी कोणी त्या नरसंहार वा दंगलीबद्दल अवाक्षर काढले नाही. ती लाट तशीच महाराष्ट्रातही दिसली होती आणि त्यात सर्वच कॉग्रेस विरोधक वाहून गेलेले होते. पण त्याच लाटेवर मात करून मुंबईत दत्ता सामंत लोकसभेत निवडून आलेले होते. ४८ पैकी राज्यातल्या ४३ जागा कॉग्रेसने जिंकल्या होत्या. अपवाद होता मुंबईत डॉ. सामंत, कोकणात मधू दंडवते, बारामतीमध्ये शरद पवार आणि औरंगाबादेत डोणगावकर पाटिल इतकाच. एक जागी उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान रोखले गेले होते. त्यापैकी सामंतांचे यश त्यांच्या दिर्घकालीन गिरणी संपाचे होते. १९८२ सालात त्यांनी आरंभलेल्या गिरणी संपाने अवघा गिरणगाव देशोधडीला लागला होता. त्याला कॉग्रेसचे सरकार जबाबदार असल्याच्या भावनेने इंदिरा हत्येनंतरही इथला मतदार सामंतांच्याच मागे राहिला आणि मुंबईच्या अन्य जागीही सामंतांचे उमेदवार चांगली टक्कर देऊ शकले. त्यांच्या तुलनेत अन्य विरोधी पक्ष खुपच मागे पडले होते. त्याच गिरणगावात असलेल्या मध्य दक्षीण व उत्तर अशा दोन्ही जागी भाजपाच्या मदतीने उभे असलेले शिवसेनेचे वामनराव महाडीक व मनोहर जोशी कुठल्या कुठे फ़ेकले गेले होते. त्यात दत्ता सामंत यांचे कर्तृत्व नगण्य आणि गिरणी कामगारांचा कॉग्रेसवरचा राग प्रभावी ठरला होता. शिवसेनेचा पारंपारिक मतदारही सामंतांच्या मागे गेला होता. कारण तेव्हा राजकीय भूमिका बाजूला पडून गिरणगावाच्या अस्मितेचा विषय पटलावर पुढे होता. मग दोनच महिन्यात विधानसभेची निवडणूक आली आणि तिथेही गिरणी कारगाराच्या न्याय हक्काची लढाई सुरू झाली. त्यात सामंतांकडे स्थानिक उमेदवारही नव्हते. त्यांना बाहेरचे उमेदवार आयात करून गिरणगावात उभे करावे लागले. कुर्ल्यातले शरद खातू व विक्रोळी घाटकोपरच्या कॉग्रेस नगरसेविका विनिता सामंत यांना परळ व वरळीतून कामगार आघाडीच्या उमेदवार म्हणून उभे करण्यात आले. शिवडी मतदारसंघात लालनिशाण पक्षाचे कार्यकर्ते दादू अत्याळकर आघाडीचे उमेदवार झाले आणि विधानसभेत जाऊन पोहोचले. ती सुद्धा राजकारणापेक्षा जनक्षोभाची किमया होती. पण या दोन्ही लढतीमध्ये तिथल्या पारंपारिक बालेकिल्ल्यात शिवसेना भूईसपाट झाली होती.

   लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गिरणगावात सामंतांनी घडवलेला चमत्कार स्थानिक उमेदवार नसतानाचा होता. त्याची मिमांसा म्हणूनच गिरणीसंपाच्या पार्श्वभूमीवर करण्याची गरज होती. तो शिवसेनेचा पराभव असण्यापेक्षा कॉग्रेसला धडा शिकवण्याच्या नादात व्यक्त झालेल्या प्रक्षोभाचे परिणाम होते. पण त्याची मिमांसा शिवसेना संपली, अशीच करण्यात आली. अशा प्रचाराला खुद्द सेनेतीलच काही जुनेजाणते कार्यकर्ते व दुय्यम नेतेही बळी पडले होते. त्यांनी आपल्या जागा व बालेकिल्ले जपण्य़ासाठी पक्षांतर करण्याची मजल मारली होती. १९६८च्या पहिल्या फ़ेरीतील सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक घाटकोपरचे पां. रा. कदम यांनी कॉग्रेसची वाट धरली; तर भांडुपचे नगरसेवक रा. वि. पडवळ यांनी सामंतांच्या आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. सेनेचे बहुतांश नेतेही गडबडले होते. कारण पुढल्या दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणूका होऊ घातल्या होत्या. त्यात सेनेचा फ़ज्जा उडाला, तर सेना खरोखरच संपणार होती. पण १९७७च्या जनता लाटेला झेलूनही टिकलेल्या शिवसेनाप्रमुखांना सामंत लाटेची फ़िकीर नव्हती. सेनेच्या अनेक नेत्यांनी पालिकेसाठी अन्य पक्षांशी जागावाटपाचा प्रयास चालविला होता. अन्य पक्षांशी बोलणी करून बघितली होती. ती फ़िसकटली आणि अनेक सेनानेते अस्वस्थ होते. अशावेळी सेनाप्रमुखांनी पालिकेच्या सर्वच जागा स्वबळावर लढवायचा पवित्रा घेतला. प्रत्येक वॉर्डातले शाखाप्रमुख थेट उमेदवार म्हणून घोषित करून टाकले. दुसरीकडे गिरणी कामगारांच्या न्यायासाठी पालिका निवडणूकीत उडी घेतलेल्या सामंतांच्या कामगार आघाडीकडे अवघ्या मुंबईतून उमेदवारी मिळवण्यासाठी झुंबड उडाली होती. थोडक्यात सेना संपली याबद्दल कुणाही राजकीय अभ्यासक वा पत्रकारांच्या मनात शंका उरलेली नव्हती. सामंतांनी आपल्या दंडेलीने सेनेचा काटा काढल्याने सेनेचे छुपे शत्रू आणि विरोधक कमालीचे सुखावले होते. आज दिल्लीच्या निकालांनंतर जशी भाजपा मोदींच्या अपयशाची ग्वाही दिली जाते आहे, त्यापेक्षा तेव्हाचा गवगवा थोडाही वेगळा नव्हता. पण अवघ्या चार महिन्यात डॉ, दत्ता सामंतांच्या गिरणी कामगार न्यायाची हवा निघाली होती. कारण महापालिकेत गिरणीसंपाला न्याय कसा मिळू शकतो, असा प्रश्न कामगारांनाही पडू लागला होता. तितकेच नाही, इंदिरा हत्येची सहानुभूतीही संपली होती. तेव्हाचे मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी तर तमाम विरोधी पक्षांना कचरा कुंडीत फ़ेकून द्यायचे आवाहन मतदाराला करणारी पोस्टर्स, मुंबईभर लावली होती. पण प्रत्यक्षात त्याच महापालिका निवडणूकीने शिवसेनला राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. (अपुर्ण)

रविवार, २९ डिसेंबर, २०१३

मोदींसाठी ‘आप’त्ती, की इष्टापत्ती?

==================================================
दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (कंसात जिंकलेल्या जागा)
२००८:  कॉग्रेस ४०.३१% (४३), भाजपा ३६.३४% (२३), बसपा १४.०५ %(२),   
२०१३:  कॉग्रेस २५% (८),     भाजपा ३४% (३२),   आप ३०% (२८) 
==================================================


   नुकत्याच चार महत्वाच्या विधानसभा निवडणूका झाल्या आणि त्याचे निकालही आलेले आहेत. त्यात सर्वत्र कॉग्रेसचा सफ़ाया झाला आणि तीन राज्यात भाजपाने जबरदस्त मुसंडी मारलेली आहे. मात्र त्याचे प्रतिबिंब दिल्ली या शहरी राज्यात पडू शकले नाही. तरीही तिथे पहिल्या क्रमांकाच्या जागा व मते मिळवण्यापर्यंत भाजपाने मजल मारलेली आहे. येत्या म्हणजे २०१४ सालाच्या पुर्वार्धात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीची ही उपांत्य फ़ेरी असे वारंवार संबोधले जात होते. त्यामुळेच त्यात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अपुर्व मेहनत घेतली. त्याचा परिणाम तिथल्या मतदानाच्या टक्केवारीवर झालेला दिसला. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक मतदानाचे विक्रम साजरे झाले आणि त्याच लाटेत कॉग्रेस पुरती वाहून गेली. दिल्लीतही कमी प्रमाणात, पण मतदानात वाढ झाली. ह्या मतदारांच्या उत्साहाचे कारण एका बाजूला नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला आशावाद आहे; तसेच दुसरीकडे कॉग्रेसविषयी निर्माण झालेली कमालीची नाराजी आहे. हे उघड व स्पष्ट असताना मोदींच्या लोकप्रियतेची लाट नाकारण्यात धन्यता मानण्य़ाचा अट्टाहास माध्यमांपासून सेक्युलर अभ्यासकांपर्यंत पुर्वीसारखाच चालू आहे. आपले अंदाज व भाकिते साफ़ फ़सल्यावर याच लोकांनी मग बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, त्याप्रमाणे दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांनी नवखा असून मिळवलेल्या यशाचे देव्हारे माजवण्यात पुढाकार घेतला तर नवल नाही. त्यातला दुटप्पीपण लपूनही रहात नाही.

   एका बाजूला दिल्लीतल्या ‘आप’चे यश अनपेक्षित असेच आहे. पण ज्या कारणास्तव ते व तेवढे यश त्या पक्षाला मिळालेले आहे, त्याच निकषावर देशात मोदीही मोठे यश मिळवू शकतात, हे नाकारण्याचे तर्कट चालू आहे. दिल्लीत या पक्षाकडे पुर्वापार संघटनात्मक ढाचा नव्हता, की पुर्वपुण्याई नव्हती. तरीही त्या पक्षाकडे लोकप्रिय चेहर्‍याचा व जनमानसात आशेचा किरण जागवणारा नेता होता. केवळ तेवढ्याच बळावर त्याने इतके मोठे यश मिळवले आणि कॉग्रेसपेक्षा अधिक मते व जागा जिंकल्या. मग देशात आज जे मोदींच्या लोकप्रियतेचे वारे वहात आहेत; त्याचेच प्रतिबिंब तीन राज्यात पडून भाजपाला इतके मोठे यश मिळाले, हे निखळ सत्य आहे. किंबहूना त्याच निकषावर देशातल्या कॉग्रेसविरोधी प्रक्षोभाचे प्रतिक बनलेल्या मोदींना लोक पंतप्रधान करायला उतावळे झालेले आहेत. मग आजवर जिथे भाजपाचे संघटनात्मक बळ नव्हते; तिथेही त्या लाटेचा परिणाम दिसू शकतो. जो नियम संतप्त मतदार केजरीवाल यांना मते देण्यासाठी लावतो, त्याच निकषावर देशाच्या कानाकोपर्‍यातला मतदार भाजपाच्या संघटनात्मक बाजूची पर्वा न करता मोदींसाठी त्या पक्षाला बहूमत देऊ शकतो. कारण त्या मतदाराला मोदी जितके आवडतात व विश्वासार्ह वाटतात; त्यापेक्षाही कॉग्रेसच्या तावडीतून सुटायची घाई झालेली आहे. अशावेळी तो मतदार कॉग्रेसला नक्की पराभूत करणारा व पर्यायी सरकार देऊ शकेल, अशा नेत्याचा शोध मतदार घेत असतो. दिल्लीत भाजपाने असा नेता लोकांसमोर आणण्यात विलंब केला. त्यामुळे त्याचे बहूमत हुकले. देशाच्या पातळीवर तसे घडणे शक्य नाही. पण ज्यांना मोदी व भाजपाच्या नावाचेच वावडे आहे; त्यांना मोदी बहूमत मिळवून पंतप्रधान होऊ शकतात, हे मानायची सुद्धा भिती वाटते, त्यांना मग मोदींच्या अपयशासाठी नवनवे तर्क शोधावे लागणारच ना? त्यातूनच मग ही मंडळी केजरीवाल नावाच्या काडीला धरून आपले तर्क बुडणार नाहीत, अशी खुळी आशा बाळगत आहेत आणि त्यावर अतिशयोक्त युक्तीवादही करू लागली आहेत. वास्तवात केजरीवाल व त्यांच्या यशामुळे बदललेल्या राजकीय समिकरणाचे मांडले जाणारे युक्तीवाद, त्यांनाही पटलेले नाहीत. म्हणून तर वाहिन्यांवरल्या चर्चेतून भाजपाच्या गळी ते उतरवण्याचा उतावळेपणा सुरू झाला आहे. पण त्यातला फ़ोलपणा अजिबात लपत नाही.

   कुठलेही संघटन पाठीशी नसताना आम आदमी पक्षाला अनेक राज्यात अचानक जागा व यश मिळू शकतात. पण किमान चारशे मतदारसंघात भाजपाकडे लढण्याइतकी संघटना असूनही मोदींच्या लोकप्रियतेचा त्याला लाभ मिळू शकत नाही, हा कुठला युक्तीवाद आहे? पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीतील ‘आप’च्या यशाचे नेमके विश्लेषण कोणीही केलेले नाही. बारकाईने बघितले, तर केजरीवाल यांच्या यशामागे जितके कॉग्रेसचे अपयश आहे; त्यापेक्षा अधिक नुकसान त्या पक्षाने मायावती यांच्या बसपाचे केले आहे. मागल्या निवडणूकीत तिसर्‍या क्रमांकाची मते व दोन आमदार असलेला बसपा, यावेळी पुरता नामशेष झालेला आहे. त्याची सर्वच मते ‘आप’ने खाल्लेली आहेत. कॉग्रेसचाही मोठा हिस्सा त्याने खाल्ला आहे. पण भाजपाच्या मताचा किंचित हिस्सा त्याला बळकावता आला. याचा अर्थच सरळ असा, की संसदेच्या निवडणूकीत ‘आप’वाले उतरले; तर ते कॉग्रेसची मते काही प्रमाणातखाऊ शकतील. पण भाजपाच्या विरोधात लढून कॉग्रेसच्या वळचणीला जाणार्‍या पक्षांचा सर्वाधिक लचका तोडणार आहेत. म्हणजे उत्तरप्रदेशात मायावती, मुलायम, बिहारमध्ये लालू, पास्वान, नितीश, तर कर्नाटकात देवेगौडा वा महाराष्ट्र व बंगालमध्ये डावे पक्ष आहेत; अशा सेक्युलर नाटके करणार्‍यांचे लचके ‘आप’ तोडणार आहे. त्या पक्षाच्या लोकसभा निवडणूकीत उतरण्याने भाजपाला मोठाच धक्का बसेल; असा दावा शुद्ध मुर्खपणाचा आहे. कारण दिल्लीतही त्याला तसे करता आलेले नाही. मग अन्य राज्यात तरी त्या पक्षाच्या मैदानात येण्याचा धोका भाजपाला कशाला असेल? तेच सत्य लपवण्यासाठी तथाकथित सेक्युलर पत्रकार, प्राध्यापक, विश्लेषकांनी दिल्लीच्या निकाल व आकडेवारीचे सत्यस्वरूप लपवण्याचा आटापिटा चालविला आहे. गेले पंधरा दिवस असे भासवले जात आहे, की केजरीवाल यांनी मोदींचा विजयरथ रोखला आहे. पण वास्तवात त्याच पक्षाने आपले बस्तान देशाच्या राजधानीत बसवताना (तिसर्‍या आघाडीत राहून कॉग्रेसशी चुंबाचुंबी करणार्‍या बहूजन समाज पक्षाला) मायावतींच्या सेक्युलर नाटकाला संपवले आहे. तेच हा पक्ष देशात जिथे जिथे निवडणूकीत उतरणार तिथे होणार आहे. त्यामुळेच भाजपा वा मोदींना रोखण्यासाठी सेक्युलरांनी केजरीवाल यांना घोड्यावर बसवले असेल; तर मोदींसारखा समाधानी माणुस दुसरा कोणी असू शकत नाही. कारण ‘आप’ सेक्युलर पक्ष व नेत्यांची मते खाऊन मोदींचे बहूमत मिळवण्याचे काम अधिक सोपे करणार आहे.

   २०१३ची अखेर मोदींच्या मोहिमेला प्रतिसाद देणारी झाली आहे आणि ज्याला गेले सहा महिने उपांत्य फ़ेरी संबोधले जात होते; ती मोदींनी जिंकली आहे. पण ते कबुल केल्यास मोदीच अंतिम फ़ेरी आगामी मे महिन्यात सहज जिंकतील, हेसुद्धा मान्य करावे लागेल. तेच टाळण्यासाठी मग तीन राज्यातील भाजपाच्या अपुर्व यशाला झाकायचे उद्योग सुरू झाले. त्यातूनच मग नवख्या ‘आप’ पक्षाच्या यशाचा डंका पिटला जात आहे. त्यामुळे मोदींचे काहीही बिघडत नाही. याच २०१३च्या आरंभी जयपूरमध्ये राहुल गांधी यांच्यासाठी कॉग्रेसमध्ये उपाध्यक्षपद निर्माण करून त्यांना पक्षाची धुरा तिथे सोपवण्यात आली. तेव्हा त्यांनी वाचून दाखवलेल्या भाषणाचे केजरीवाल यांच्याप्रमाणेच अतिशयोक्त कौतुक झाले होते. तेवढेच नाही तर राहुलच्या भाषणाच्या तुलनेत मोदींचे दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधले भाषण फ़िके व अर्थहीन असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. अकरा महिन्यानंतर ८ डिसेंबरला त्याचे परिणाम समोर आले. तसेच आजच्या केजरीवाल यांच्या कौतुकाचे परिणाम मे महिन्यात समोर येतील. ते काय असू शकतात, त्याचे उत्तर दिल्लीच्या निकालात दडलेले आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी मोदींचा विजयरथ अडवलेला नाही किंवा त्यात किंचितही बाधा आणलेली नाही. तिथले केजरीवाल यांचे यश खरेतर मागल्या दोन वर्षात सातत्याने झालेल्या विविध आंदोलनांचा एकत्रित परिणाम आहे. त्यात मोदींचा अजिबात सहभाग नव्हता आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यात दाखवलेल्या उदासिनतेचा परिणाम होता. अखेरच्या क्षणी मोदींनी दिल्लीत जोर लावला नसता, तर केजरीवाल स्वत:चे बहूमत आणु शकले असते. इतकी त्यांची व्यक्तीगत लोकप्रियता दिल्लीत होती. त्यामुळे त्यांच्याच बहूमताला मोदींनी अपशकून केला, असे म्हणता येईल. मात्र आता केजरीवाल दिल्लीच्या यशावर स्वार होऊन देशाच्या अन्य भागात जाणार असतील; तर तिथे त्यांना कुठला मतदार मिळू शकतो, त्याचे चित्र दिल्लीने स्पष्टपणे समोर आणलेले आहे. दिल्लीत कॉग्रेसवर नाराज असलेला मतदार संपुर्णपणे केजरीवाल यांच्या वाट्याला आला. कारण भाजपा तिथल्या आंदोलनात मागे होता. देशाच्या अन्य भागात तशी स्थिती नाही. देशाच्या अन्य राज्यात कॉग्रेस विरोधी रोषाचे नेतृत्व भाजपाने समर्थपणे केलेले आहे. त्यामुळेच कॉग्रेसच्या विरुद्ध जाणारी मते पर्याय म्हणून भाजपा म्हणजे मोदींनाच मिळणार आहेत. मग केजरीवाल कुठली मते मिळवू शकतात?

 केजरीवाल हे कॉग्रेस इतकाच भाजपाला पर्याय म्हणून पुढे आलेले आहेत आणि त्यांनी जनमानसातील आपला तोच चेहरा जपण्याचा आटापिटा चालविला आहे. त्यामुळे अशी जी मते आहेत तीच त्यांच्या ‘आप’ पक्षाला मिळू शकतात. अशी भरपूर मते आपल्या देशाच्या विविध राज्यात आहेत, ज्यांचा तिसर्‍या आघाडीवाल्यांनी मोठाच भ्रमनिरास केलेला आहे. लालू, पासवान. नितीशकुमार, मायावती, मुलायम, देवेगौडा, डावे पक्ष, तेलगू देसम, अनेक प्रादेशिक पक्ष यांनी नेहमी कॉग्रेस विरोधी निवडणूका लढवल्या. पण प्रत्यक्षात त्यांनी आपला कॉग्रेस विरोध जपला नाही. सेक्युलर नाटक करून कसोटीच्या क्षणी त्यांनी कॉग्रेसच्या पारड्यात वजन टाकून आपल्या पाठीराख्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे. त्या मतदाराला त्यांनी त्यासाठी कधी विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळेच तो मतदार अशा कॉग्रेस व भाजपा विरोधी खर्‍या पर्यायाच्या शोधात कायम राहिला आहे. केजरीवाल यांचे सध्या तरी तेच लक्ष्य आहे. त्यामुळेच त्यांनी दिल्लीत सत्ता हाती घेताना कॉग्रेसचा उघड पाठींबा घेतला नाही किंवा तिच्याशी बोलणीही केलेली नाहीत. उलट पाठींबा दिला असतानाही कॉग्रेसवर विषारी टिका चालविली आहे. त्यामुळे त्यांचे खरे लक्ष त्याच तिसर्‍या आघाडी वा तिसर्‍या शक्तीची मते आपल्या खात्यात ओढण्याकडे आहे. जे त्यांनी दिल्लीत मायावतींचा बसपा संपवून साधले आहे. अशा पक्ष वा नेत्याच्या विजयाने मोदींचा रथ रोखला गेला, म्हणून तेच पक्ष खुश असतील; तर मोदींनी अस्वस्थ होण्याचे कारण काय? नेपोलीयन म्हणतो, ‘तुमचा शत्रू आत्महत्या करीत असेल तर त्यात हस्तक्षेप करू नका’. मोदी नेमके त्याचे पालन करीत आहेत. केजरीवाल यांना प्रोत्साहन देणार्‍या सेक्युलर पक्षांवर किंवा केजरीवाल यांनी भाजपावर केलेल्या टिकेची, म्हणूनच मोदी दखलही घेत नाहीत. कारण २०१४च्या लढाईत मोदींसाठी आम आदमी पक्ष ही ‘आप’त्ती नसून इष्टापत्तीच ठरणार आहे. जे सेक्युलर पक्ष उद्या कॉग्रेसच्या गोटात हमखास जाण्याची शक्यता होती, त्याची मते व जागा कमी होऊन मतविभागणीचा लाभ भाजपाला मिळू शकतो आणि पर्यायाने कॉग्रेसच्या युपीएची दुर्बळता त्यामुळे वाढणार आहे, त्याची चिंता मोदींनी कशाला करावी? उलट त्यामुळे एकट्या भाजपालाच थेट बहूमताचा पल्ला गाठायला केजरीवाल मोठा हातभार लावणार आहेत. २०१४ च्या मध्यास हा भारतीय राजकारणात घडणारा सर्वात मोठा चमत्कार असणार आहे. केजरीवाल हा ज्या बुडत्यांना काडीचा आधार वाटतो आहे, ती काडी बुडणार नाही. पण तिच्या आशेवर असलेल्यांना मात्र तीच काडी आगामी लोकसभा निवडणूकीत अलगद बुडवणार आहे.



शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

कान उघडा ऐका नीट


  शनिवारी अखेरीस दिल्लीला ‘आप’ले सरकार मिळाले. अण्णांच्या लोकपाल आंदोलनातून उदयास आलेल्या अरविंद केजरीवाल व अन्य तरूण नेत्यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टी या पक्षाने अवघ्या सव्वा वर्षात लोकात मिसळू्न काम केले आणि दुसर्‍या क्रमांकाची मते व जागा मिळवून सत्ताही काबीज केली. अर्थात त्यांच्या हाती आलेली सत्ता निर्विवाद नाही. कारण त्यांना बहूमत मिळालेले नाही आणि पहिल्या क्रमांकावरच्या भाजपालाही बहुमत हुकलेले आहे. पण परिस्थितीने केजरीवाल यांना पाठींबा द्यायची नामुष्की कॉग्रेस पक्षावर आली. परिणामी पाठींबा न घेताच केजरीवाल यांनी अल्पमताचे सरकार स्थापन केलेले आहे. मात्र संख्येसाठी त्यांनी कॉग्रेसवर दुगाण्या झाडायचे थांबवलेले नाही किंवा सरकार टिकवण्यासाठी आटापिटा चालविलेला नाही. सहाजिकच अनेक सेक्युलर विचारवंतांना आता केजरीवाल यांच्यात मोदी लाटेवर मात करू शकणारा महान पराक्रमी योद्धा दिसू लागला आहे. परिणामी त्याच केजरीवालाचे अतोनात कौतुक सुरू झाले आहे. शपथविधीनंतर सर्वच वाहिन्यांवर ‘आप’क्रांतीचे कौतुक दुथडी भरून वहात होते. त्यापासून मराठी वाहिन्यांना अलिप्त कसे रहाता येईल? त्यांनीही त्या वहात्या यमुनेत आपापल्या वाहिन्या धुवून पवित्र करून घेण्याची संधी साधली. पण चर्चा कुठलीही असली तरी पॅनेलचे कलाकार नेहमीचेच यशस्वी. त्यापैकी एबीपी माझा नावाच्या वाहिनीकडे बघताना नेहमी लोकांचे कान बंद असतात आणि डोळेही झाकलेले असतात. सहाजिकच तिथे काय होते, दाखवले जाते, बोलले जा्ते त्याचा ऐकणार्‍यांना थांगपत्ता नसतो. आयोजनच असे असल्यावर वाहिनीवर बोलणार्‍या व ते प्रक्षेपित करणार्‍यांना तरी त्यातले काही समजण्याचा संबंध कशाला येईल? त्यामुळेच मग अधूनमधून कोणीतरी संपादक राजीव खांडेकर व ‘नांगर’ प्रसन्ना जोशींना ‘उघडा कान एका नीट’ असे ओरडून सांगावे लागत असते. कारण त्यांच्या चर्चा बघण्यासाठी योजतात व ऐकायच्या नसतात, असेच वाटते. तसे नसते तर शनिवारी केजरीवालांच्या आरत्या ओवाळताना त्या दोघांनी आपल्या चर्चेत आमंत्रित केलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी व प्रताप आसबे यांनी आजवर केजरीवालांच्या संघर्षाबद्दल जी मुक्ताफ़ळे उधळली होती; त्याचा निदान जाब तरी विचारला असता. नेमक्या दोन वर्षापुर्वी आम आदमी पक्षाची स्थापना झालेली नव्हती आणि केजरीवाल अण्णांच्या सोबत लोकपालचे आंदोलन चालवित होते, तेव्हा याच सेक्युलर ॠषीमुनींनी कोणती भाकिते केली होती?

   आज सप्तर्षी व आसबे यांना केजरीवाल व त्यांची सहकारी मंडळी मोदींची रथयात्रा कशी अडवणार, त्याचे कौतुक आहे आणि त्यामध्ये त्यांना १९७७च्या आणिबाणी विरोधात उठलेल्या वादळाची आठवण झालेली आहे. पण जेव्हा याच राजकारणाचा पाया केजरीवाल घालत होते, तेव्हा त्यांच्यावर हीच मंडळी काय काय आरोप करीत होती?  बरोबर दोन वर्षापुर्वी म्हणजे २०१२ च्या जानेवारी महिन्याच्या ‘सत्याग्रही विचारधारा’ नामक आपल्या मासिकात लिहिलेल्या संपादकीय लेखात समाजवादी विचारवंत ( त्यात कुमारचा काही दोष नाही. समाजवाद्यांमध्ये जो माणूस कामाचा राहिला नाही व अडगळीत फ़ेकून दिलेला असतो, त्याला ज्येष्ठ विचारवंत म्हणायची प्रथा परंपरा आहे. हल्ली भाजपाही त्याच परंपरेत जाऊन अडवाणींना ‘मार्गदर्शक’ म्हणत असतो) डॉ. कुमार सप्तर्षी काय म्हणत होते? आज ‘लोकपाल’ केजरीवाल आम आदमी पक्षाच्या माध्यमातून मोदींना अडचण होणार म्हणूनच सुखावलेले सप्तर्षी, दोन वर्षापुर्वी कोणती भिती व्यक्त करत होते? त्यांच्याच नेमक्या शब्दात बघा.....

 भाजप, व्यापारी व अण्णाः

   भाजप सातत्याने काहीतरी खुसपट काढून संसदेतून बाहेर निघून जातो. सतत सभात्याग करणे म्हणजे संसदेवर थुंकण्यासारखे आहे. संसदेविषयी इतकी तुच्छता यापूर्वी देशात कधीही दिसली नव्हती. ‘सत्तेवर आम्ही येवू शकलो नाही, तर आम्ही संसदीय लोकशाहीचा डावच मोडून टाकू‘ असा पण भाजपने केलेला दिसतो. विरोधी पक्षाने सरकारच्या चुकीच्या धोरणांना अवश्य विरोध करावा, ते त्यांचे कर्तव्यच आहे; पण संसदेमधील कामकाजात सतत अडथळे आणणे हे त्यांना शोभत नाही. अण्णांचे आंदोलन, किरकोळ व्यापारात परकीय गुंतवणूक करायला झालेला बनियांचा जबर विरोध आणि भाजपने संसदेला तमाशा बनवून टाकणे या तिन्ही बाबींमध्ये काहीतरी आंतरिक धागा आहे असा आम्हाला रास्त संशय येऊ लागला.

   भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची तुतारी फुंकून हा योग्य विषय अण्णांनी हाती घेतला होता. त्यामुळे प्रारंभीच्या काळात आमचा त्यांच्या उद्दिष्टांना पाठिंबा होता. फक्त अण्णांच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असे वाटत असे. ते मी वाहिन्यांवर जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलून दाखवत असे. उदा. ‘‘अण्णा, आपण सत्याग्रही आहोत. आपण कुणाशी वैरत्व राखू नये. आपल्या मनात क्रोध नसावा‘’ वगैरे गोष्टी बोललो. सत्याग्रही पध्दतीच्या जनआंदोलनात फक्त ‘प्रतिपक्षी’ असतो; वैरी कधीच नसतो हे सांगितले. सत्याग्रही जनआंदोलनात वैराला स्थान नाही ही आमची पक्की धारणा आहे. आयुष्यभर अनेक जनआंदोलने केल्यामुळे, तो अनुभव गाठीशी असल्यामुळे कोणत्याही जनआंदोलनाच्या नेत्याच्या वाणी व कृतीमधून जे व्यक्त होते, त्यावरून ते सत्याग्रही आंदोलन यशस्वी होणार की नाही; याचा अंदाज आम्हाला येतो. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मला काही दोष दिसू लागले. म्हणून मी जाहीररीत्या, हळुवारपणे काही सूचना केल्या. कशाचाही उपयोग झाला नाही. अण्णांच्या डोक्यातील भ्रमाचा फुगा हवेत उंच जाऊ लागला. अखेरीस आमची खात्री झाली की अण्णांना भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपाल नकोय, तर कॉंग्रेसविरोधी जनमत तयार करण्याकरिता लोकपाल हे निमित्त त्यांना वापरायचे आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात काम करण्याचा प्रत्येकाला मुलभूत हक्क आहे. याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. तथापि ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार सत्याग्रही चारित्र्यात बसत नाही. नंतर एकेक गोष्टी उलगडू लागल्या.

   अण्णा-टीम प्रत्येक वेळी सरकारविषयी द्वेष पसरविण्याच्या हेतूने बोलणी फिसकटवित आहेत, हे लक्षात आले. अण्णा कॉंग्रेस पक्षावर व त्यांच्या नेत्यांवर खालच्या पातळीवरील टीका करून आपली प्रतिष्ठा कमी करून घेऊ लागले. कधी पंतप्रधानांवर टीकेचा आसूड ओढ, तर राहुल गांधींना शिव्या दे, तर कधी सोनिया गांधींना दूषण दे असा प्रकार त्यांनी सुरू केला. अण्णांजवळ वैचारिक श्रीमंती नसल्याने थोड्याच वेळात त्यांचे विचार संपतात. मग ते पुनरूक्ती करीत राहतात किंवा मूळ प्रकृतीनुसार एकेरीवर उतरतात. हे मला फार पूर्वीपासून ठाऊक होते. वयोमानानुसार त्यांच्यामध्ये मानसिक शांती आली असेल असा माझा उगाचच समज होता. भाजप केवळ परिस्थितीचा लाभ उठवित आहे. अण्णा नावाचे अस्त्र कॉंग्रेसवर फेकणे एवढाच त्यांचा हेतू दिसतो. त्यांना अँटीकॉंग्रेसिझम नावाच्या तत्त्वज्ञानाचे आदर्श (आयकॉन) म्हणून अण्णांचा हुतात्मा करावयाचा आहे, त्यांनतर अण्णांची जागोजागी देवळे बांधायची आणि तिथून हिंदूराष्ट्राचा प्रसाद वाटायचा हा भाजपचा डावपेच लक्षात येऊ लागला. अण्णांमध्ये ग्रामीण शहाणपण ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे ते भाजपच्या अखेरच्या डावाला कधीच बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तथापि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णांचा कॉंग्रेस विरोधासाठी मुक्त वापर करायचा भाजपचा डाव यशस्वी होत आहे हे लक्षात आले. अण्णांचे दोन दोष भाजपने नेमके हेरले आहेत. अण्णांच्या मनाची कवाडे त्यांच्या पायावर डोके ठेवले तरच खुली होतात, हा पहिला दोष. कॅमेरा पाहिला की अण्णा कितीही भडक विधान करू शकतात हा दुसरा दोष या दोन दोन दोषांवर भाजपचा खेळ उभा आहे.

   दोन वर्षापुर्वी या सेक्युलर समाजवादी डॉक्टरांचे निदान होते, की अण्णाटीमचे केजरीवाल हे भाजपाचे एजंट वा हस्तक आहेत आणि म्हणूनच त्यांच्यापासून भारताच्या संविधानाला व घटनात्मक राजकीय व्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे. आज दोन वर्षे पुर्ण होत असताना तेच डॉक्टर छातीठोकपणे देशाला भाजपाच्या जातीयवादाला मोदीप्रणीत भाजपाच्या जातियवादापासून वाचण्याचा ‘रामबाण’ उपाय म्हणून केजरीवालांची जडीबुट्टी उपयुक्त असल्याची ग्वाही देत आहेत. ह्याला समाजवाद्यांची सेक्युलर शोकांतिका म्हणायचे की दिवाळखोरी, हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात सामान्य जनतेला अशा निर्बुद्धांच्या विद्वत्तेशी कधीच कर्तव्य नसते. सामान्य माणूस व्यवहारी जीवन जगत असतो आणि अनुभवाने आपले तत्वज्ञान निर्माण करीत असतो, वापरत असतो. विचारवंतांना मग सामान्य माणसाच्या कृतीशी आपले फ़सले्ले तत्त्वज्ञान जुळवून घ्यावे लागत असते. कारण आपण शहाणे आहोत व मुर्ख नाही; हेच बुद्धीमंतांना सतत सिद्ध करण्याची खाज असते. परिणामी लोकांच्या दुर्बळ स्मरणशक्तीचा लाभ उठवून हे बुद्धीमंत, आपलीच थुंकी गिळत असतात किंवा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा जादूटोणा करून आपल्या बुद्धीमत्तेचे प्रमाणपत्र पुन्हापुन्हा स्वत:लाच देत असतात. म्हणूनच शनिवारी आसबे, खांडेकर, सप्तर्षी यांच्या चर्चेची कींव करावीशी वाटली.

   दीड दोन वर्षापुर्वी आपापल्या लेखातून व वाहिन्यांच्या चर्चेतून हीच मंडळी किमान डझनभर वेळा तरी ‘अण्णा टिमची विश्वासार्हता घसरते आहे’ अशा विषयावर सांगोपांग चर्चा करून केजरीवाल व अण्णांच्या लोकपाल आंदोलनावर दुगाण्य़ा झाडत होती. जोपर्यंत केजरीवाल यांनी दिल्लीत सातत्याने चालविलेल्या लढे व आंदोलनातून तिथल्या निवडणुकीत यश मिळवून दाखवले नव्हते, तोपर्यंत यांना केजरीवालची महत्ता कळली नव्हती. आणि आजही कळलेली नाही. त्यामुळेच आपली आधीची फ़सलेली विधाने व निदाने झाकण्यासाठी आता त्याच दिल्लीपुरत्या केजरीवालांचे देशव्यापी चित्र रंगवण्याचा अतिरेक त्यांच्याकडून चाललेला आहे. केजरीवाल व ‘आप’चा देशाभरचा प्रभाव यांना आज दिसत असेल व जाणवत असेल; तर मग त्यांनाच गेल्या दोन वर्षात केजरीवाल यांच्या दिल्लीत वाढत गेलेल्या प्रभावाचा थांगपत्ता कशाला लागला नव्हता? त्यांनी सत्तेवर येण्याची गोष्ट सोडून द्या. पण दिल्लीतला केजरीवाल यांचा लढा जनतेचा लढा आहे, एवढेही या विद्वानांच्या लक्षात कशाला आलेले नव्हते? अण्णा वा केजरीवाल यांच्या विश्वासार्हतेवर हे शहाणे प्रश्नचिन्ह कशाला लावत होते? कारण अशा विद्वानांना कशातलेच काही कळत नसते आणि जनभावनेशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो. हाती प्रसार माध्यमे व साधने आहेत म्हणून रेटून व सातत्याने बिनबुडाचे खोटे बोलायचे आणि उलटले मग आपण त्या गावचेच नाही, असला शहाजोगपणा करण्याची आत्मसात केलेली कला, हेच त्याच्या विद्वत्तेचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण मानता येईल.

(ज्यांना डॉ. सप्तर्षी यांच्या त्या प्रदिर्घ लेखाचे तेव्हाच मी केलेले पोस्टमार्टेम तपासण्याचे अगत्य असेल, त्यांनी मार्चे-एप्रिल २०१२ काळात माझ्या उलटतपासणी ब्लॉगवरील अर्धा डझन लेख बघावेत)
http://bhautorsekar.blogspot.in/

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला ‘शुभेच्छा’



  नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूकीत चारपैकी तीन विधानसभा निवडणूकीत भाजपाने मोठेच यश मिळवले, हे आकड्यातुनच आपण बघू शकतो. त्यापैकी सर्वात छोटे व एका महानगरापुरते मर्यादित राज्य असलेल्या राजधानी दिल्लीच्या विधानसभेत भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले. या सर्वच राज्यांमध्ये प्रचारासाठी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला होता आणि आक्रमक प्रचार केला होता. तेव्हा मोदी भाजपाला कितपत यश मिळवून देतील, याची चर्चा चालली होती. प्रत्येक वाहिनी व माध्यमातून मोदींमुळे कदाचित तिथे भाजपाला अपयश मिळण्याची भाकितेही केली जात होती. पण चारपैकी तीन राज्यात भाजपाने नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर श्रेयाची वेळ आल्यावर मात्र कुणालाच मोदी आठवलेला नाही. उलट यात मोदींचा करिष्मा नसून भाजपाचे स्थानिक नेते वा मुख्यमंत्री कसे प्रभावी होते; त्याचे विश्लेषण व कारणे शोधण्यात तमाम माध्यमे गर्क झाली. उलट दिल्लीत भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले, तर त्याचे खापर मात्र मोदींच्या माथ्यावर फ़ोडण्यासाठी पत्रकारांमध्ये शर्यत सुरू आहे. तेवढेच नाही, तर भाजपापेक्षाही कमी यश मिळवलेल्या नवख्या आम आदमी पक्ष व त्याचे नेते संस्थापक अरविंद केजरीवाल, यांचे कौतुक करताना अन्य तीन राज्यात भाजपाने प्रचंड यश मिळवल्याचे कोणालाही आठवेनासे झाले आहे. खरे तर त्याबद्दल तक्रार करण्याची गरज नाही. गेल्या दोन दशकात सेक्युलर पत्रकारीतेचा अनुभव घेणार्‍या लोकांना आता असल्या विश्लेषणाची व बातम्या चर्चेची सवय अंगवळणी पडलेली आहे. तेव्हा केजरीवाल यांचे अवास्तव कौतुक चालले आहे, असे मी अजिबात म्हणणार नाही. केजरीवाल हे आगामी लोकसभा निवडणूकीत मोदींना कसे झोपवतील, तेही ऐकायला मोठी मजा येते आहे. अवघ्या काही दिवसात केजरीवाल यांना घाबरून युरोप अमेरिकेतील भलेबुरे पक्षही तिथे केजरीवाल यांना वचकू लागल्याच्या बातम्या कानावर आल्या; तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. उलट एक मोदी समर्थक म्हणून मला तेच ऐकायला आवडते आहे. कारण अशा स्वप्नरंजनानेच मोदी यांना लढण्याची हिंमत मिळते आणि ते अधिक त्वेषाने कामाला लागतात, असा इतिहास आहे. त्यामुळेच मोदींच्या पराभवाचे असे माध्यमातील स्वप्नरंजन त्यांच्या यशासाठी अत्यावश्यक आहे, असे माझे अनुभवी मत आहे.

   माझे अनुभवी मत म्हणजे काय? तसे गेल्या दहा बारा वर्षातले असे अनुभव खुप आहेत. पण त्यातल्या त्यात अलिकडचा म्हणजे अवघ्या अकरा महिन्यापुर्वीचा एक अनुभव इथे पुराव्यासहित मांडतो. मोदींच्या विरोधातली कुठलीही खोटीनाटी वा नगण्य माहिती हाती लागली वा तशी नुसती आशा दिसली, तरी आपले सेक्युलर पत्रकार व माध्यमे किती भारावून वहावत जातात, ते वेगळे सांगायला नको. याच वर्षाच्या आरंभी १४ जानेवारी रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे कॉग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर झालेले होते. तिथे अधिकृतरित्या पक्षाची अधिकारसुत्रे मातेकडून पुत्राला सोपवण्याचा सोहळा पार पडला होता. त्याच चिंतन शिबीरात नवे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे भगव्या दहशतवादाचा आरोप करून तोंडघशी पडले होते, हे अनेकांना आठवत असेल. तिथेच राहुल गांधी यांनी आपले मन मोकळे करताना आपला कौटुबिक वारसा सांगण्यापासून भावनेला हात घालणारे प्रदिर्घ भाषण करून दाखवले होते. अर्थात तेही त्यांनी लिहून आणलेले वा कोणाकडून लिहून घेतलेले व वाचून दाखवलेले होते. पण त्या भाषणाने सभोवती जमलेले कार्यकर्ते व निष्ठावान कॉग्रेसजन भारावून गेलेले होते. बहुतेकांचे डोळे पाणावलेले होते. व्यासपिठावर बसलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहीत बहुतेक ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांनी उभे राहून नव्या उपाध्यक्ष युवराजाना सलामी दिली होती. मुजरा नाही, तरी गळाभेट करून आपल्या निष्ठांचे जाहिर प्रदर्शन केलेले होते. ज्यांना गळाभेट करण्याइतके जवळपास फ़िरकता येत नाही, त्यांनी डोळे ओले करून आपल्या निष्ठा व्यक्त केल्या होत्या. त्यात केवळ घराण्याला निष्ठा वाहिलेले कॉग्रेसजन होते असे मानायचे कारण नाही. तितक्याच संख्येने तमाम सेक्युलर पत्रकार माध्यमेही भारावून गेलेली होती. त्या एका ‘वाचलेल्या’ भावनापुर्ण भाषणामुळे आता देशातली कॉग्रेसची सत्ताच नव्हे, तर मोदींनी बुडवू घातलेला सेक्युलॅरिझमही बुडताबुडता ‘वाचवला’ जाणार होता. यामुळे बहुतांश माध्यमे निश्चिंत होऊन गेली होती. आणि आपला जीव भांड्यात पडल्याचे जाहिरपणे सांगण्याची आपल्याला ‘लाज’ वाटत नाही अशी जाहिरात करायचीही त्यांना लाज वाटलेली नव्हती. यालाच भारावून जाणे म्हणतात. आणि एकदा भारावून गेले, मग सारासार बुद्धीला तिलांजली दिली जात असते. अशी बुद्धीला तिलांजली देणारे केवळ तिथे जमा झालेले कॉग्रेसजनच नव्हते. म्हणूनच आज अकरा महिन्यानंतर कोणी तेव्हा भारावलेल्या कॉग्रेसजनांना राहुलच्या अपयशासाठी जाब विचारणार असेल, त्याने आधी आपल्याही तशाच भारवण्याचा आधी जबाब दिला पाहिजे. कारण राहुलच्या व पर्यायाने कॉग्रेसच्या अशा दिवाळखोरीला तसे भारावणारे कॉग्रेस नेते जबाबदार असतील, तर तितकेच त्यांना अंधारात ठेवताना आपली बुद्धी गहाण टाकणारे पत्रकार व सेक्युलर बुद्धीमंतही त्या अपयशाचे भागिदार आहेत. त्यांनाही आजच्या कॉग्रेसी अपयशाची जबाबदारी उचलावीच लागेल.

   तुमच्यापैकी कोणी कायबीईन लोकमतची थोरली भगिनी सीएनएन कायबीईन बघत असेल तर त्यावरच्या दोन महान सेक्युलर महिला पल्लवी घोष व सागरिका घोष तुम्हाला नक्कीच ठाऊक असतील. या दोघी गेला आठवडाभर आपल्या वाहिनीवरून कुठल्याही कॉग्रेस नेत्याला राहुलच्या अपयशाची कारणे विचारत आहेत. त्याचवेळी राहुलच्या अपात्रतेचा जाब विचारत आहेत. तशीच एनडीटीव्हीची बरखा दत्त तेच करते आहे. पण अकरा महिन्यांपुर्वी या तिघीजणी काय अकलेचे तारे तोडत होत्या? आज कोणाला त्याची आठवण तरी आहे काय? आपापल्या वाहिन्यांवर राहुलच्या महान भाषणाचे गोडवे गावून झाल्यावरही त्यांच्या तोंडातली लाळ संपलेली नव्हती, म्हणून त्यांनी ती फ़ेसबुक आणि ट्विटरवर सांडून ठेवलेली होती. त्या लाळघोटेपणाचे अकरा महिन्यात सुककेले सांडगे कोणाला बघायचे असतील, तर त्यांनी याच लेखात टाकलेले त्याचे चित्ररूप बघा्वे आणि वाचावे.

   पल्लवी घोष: ‘राहुलचे हेलावून सोडणारे भाषण, विशेषत: त्याचा शेवटचा भाग अप्रतिम, हे कबूल करायची मला लाज वाटत नाही.’
   पल्लवी घोष: ‘(श्रीराम कॉलेजमधील) मोदींचे भाषण खुप राजकीय होते, (विद्यार्थ्यांसमोर) अशा भाषणासाठी ही जागा योग्य होती काय असा प्रश्न पडतो.’

   सागरिका घोष: ‘राहुलचे आजचे भाषण आजवरचे सर्वात उत्तम. व्यवस्था परिवर्तन, समावेशकता, त्याचा आवाज व त्यातील भावनिक स्पर्श छान. त्यामागे जयराम रमेश असतील का?’
   सागरिका घोष:  ‘श्रीराम कॉलेजमध्ये आपण मोदींना कापूस, मीठ, केळी, आयुर्वेद, शिक्षक यावर बोलताना ऐकले. पण देशासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्याविषयीच्या त्यांच्या कल्पना काय आहेत?’

   बरखा दत्त: ‘राहुल गांधींच्या भाषणातील भावनात्मक भाग मनाला खुप भावला. विशेषत सत्ता हे जहर असल्याचा संदर्भ हृदयस्पर्शी होता’
   बरखा दत्त: ‘श्रीराम कॉलेजातील मोदींचे भाषण म्हणजे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्याची तुतारीच होती. प्रश्न इतकाच, की त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला भाजपा इतका कशाला कचरतो आहे?’

   आपणच अकरा महिन्यांपुर्वी उधळलेली मुक्ताफ़ळे किंवा गाळलेली लाळ या तीन विदुषींना आज आठवते तरी आहे काय? पण अशा लाळेचा पुर आणणार्‍यांनी बिचार्‍या राहुल गांधींना पुरते नाकातोंडात पाणी जाऊन बुडवले आहे. असल्या लाळघोट्यांच्या नादाला न लागता चौकात उभे राहून बोंबलणार्‍या केजरीवालांचे कान देऊन ऐकावे; असे राहुलना वाटू लागले आहे. आणि या विदूषी वा त्यांच्याप्रमाणेच अकरा महिन्यापुर्वी चाटूगिरी करण्यात गर्क असलेल्यांना आता राहुलकडे बघायचीही गरज वाटेनाशी झाली आहे. त्यांनी बुडवण्यासाठी नवी शिकार शोधली आहे. अकरा महिन्यापुर्वी जितके अवास्तव कौतुक, लाळघोटेगिरी राहुलच्या बाबतीत चालू होती, त्याहीपेक्षा अधिक आज केजरीवाल यांच्या बाबतीत चालू आहे. त्यामुळे अशा सेक्युलर माध्यमांचे व त्यातल्या पत्रकारांचे पुढले सावज, लक्ष्य कोण असणार आहे, ते वेगळे सांगायला हवे काय? त्यांनी असली चाटुकारी केली नसती, तर नुकत्याच संपलेल्या विधानसभांच्या प्रचारार राहुलने ‘मेरी दादीको मारा, मेरे पापाको मारा’ असली मुक्ताफ़ळे कशा उधळली असती? राहुलही जनसामान्यांना भेडसावणार्‍या समस्यांवर व त्याचे उपाय सांगण्याविषयीच बोलले असते आणि त्यांच्या पक्षाला निदान काही प्रमाणात जास्त जागा मिळू शकल्या असत्या. पण अशा चाटूकार भारावणार्‍या भाटांनी आजवर मोठमोठ्या सम्राटांना बघता बघता बुडवले आहे. तिथे राहुल गांधींची काय कथा? अशा परोपजिवी बांडगुळांना फ़स्त करण्यासाठी कुठले तरी एक सशक्त झाड आवश्यक असते. त्यामुळेच त्यांनी आता केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आम आदमी पक्षाला हरभर्‍याच्या झाडावर चढवले, तर त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी मोदींचे दिल्ली वा इतरत्रचे लोकांच्या मनाला जाऊन भिडणारे भाषण नाकारण्याने वा त्याचे परिणाम झाकून ठेवल्याने चार विधानसभा निवडणूकीच्या निकालावर परिणाम झाला नाही. आताही तीन राज्यातले मोदींचे यश व मतदाना्वर पडलेला प्रभाव झाकून ठेवल्याने येत्या लोकसभा निवडणूकी्त मोदींचे कुठलेही नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही. चिंताच करायची असेल, तर अशी मंडळी आज ज्यांचे तोंड फ़ाटेस्तोवर कौतुक करीत आहेत, त्यांनी करावे. दिल्लीच्या निकालांनी भारावलेल्यांच्या गदारोळात केजरिवाल मग्न झालेले दिसतात आणि पुढल्या गर्जनाही करू लागले आहेत. त्यांना शुभेच्छा.