शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

पुरोगामी चळवळीचे स्वयंसेवी अपहरण

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

 

(लेखांक तिसरा)

१९८० च्या जनता पक्षाच्या पराभवानंतर पुर्वाश्रमीच्या जनसंघीयात चुळबुळ सुरू झाली होती. तशीच कुठल्याही राजकीय ‘वंशातून’ न आलेल्या जनता पक्षातील तरूणांमध्येही अस्वस्थता होती. ते बिगर कॉग्रेसी राजकारणासाठी जनता पक्षाकडे ओढले गेले होते. त्यांना सोबत घेऊन जनता पक्षाचा वारसा पुढे न्यायचा चंग पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी बांधला. त्यातून मग भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. त्याचे नेतृत्व पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांकडे असले तरी त्यात नवे रक्त भरपूर आलेले होते. दिल्लीचे सिकंदर बख्त पुर्वीचे कॉग्रेसजन होते, तर सुषमा स्वराज जुन्या समाजवादी! अशा लोकांना बिगर कॉग्रेसी राजकारणात स्वारस्य होते आणि त्यांना सोबत घेण्याचे भान जुन्या समाजवाद्यांना उरले नाही. त्याचा लाभ भाजपाने उठवला. त्यासाठीच त्यांनी गांधीवादी समाजवाद स्विकारला होता. पण इंदिरा हत्या व राजीव लाटेने राजकारणच उलटले आणि पहिल्या प्रयत्नात भाजपा १९८४ सालात भूईसपाट झाला. तिथून मग संघाने नव्याने राजकीय उभारणीचा पवित्रा घेतला आणि त्यात बंदिस्त संघटनात्मक पक्ष मोडून लोकांचा पक्ष व्हायचे ठरवले. शेठजी भटजींचा चेहरा सोडून सर्वसामान्य तळागाळातल्या समाजघटकांचा पक्ष व्हायचे प्रयत्न सुरू केले. आजवर असा पिछडा वर्ग ही पुरोगाम्यांची मक्तेदारी होती. योगायोग असा, की आपला हा मतदारसंघ वा प्रभावक्षेत्र जपण्यापेक्षा पुरोगाम्यांनी त्याच वर्गाकडे याच काळात पाठ फ़िरवली होती. किंबहूना १९८० पर्यंतचे राजकारण बघितले तर पुरोगामी पक्षातले दुय्यम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा भरणा तळागाळातून आलेला दिसेल. पण पुढल्या काळात डाव्या पक्ष चळवळी व संघटना, यात सुशिक्षित व सुखवस्तू घटकातून आलेल्यांचा भरणा दिसतो. उलट संघाने पद्धतशीरपणे आपल्या विविध संघटनातून मागास व पिछडे नेतृत्व पुढे आणायचा वसा घेतला. गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, सुर्यभान वहाडणे असे नवे नेतृत्व याच काळात उभे करण्यात आले. उलट पुरोगाम्यांकडे तसे लोकांना जाऊन भिडणारे नेतृत्व संपत होते आणि नवे सुखवस्तु पुस्तकी नेतृत्व सुत्रे हाती घेत चालले होते. प्रामुख्याने याच काळात लोकांची आंदोलने, चळवळी वा लढे याकडे पुरोगामी पाठ फ़िरवत गेले. खरे लढे उभारण्याचे कष्ट उपसण्यापेक्षा माध्यमातून अफ़ाट प्रसिद्दी मिळवून लढ्याचा देखावा उभा करण्याकडे पुरोगाम्यांचा कल झुकलेला दिसेल. परिणामी झुंजार लढाऊ तरूण पुरोगामी चळवळीपासून दुरावत गेला आणि त्याच दरम्यान झुंजण्याची संधी देणार्‍या आक्रमक होऊ लागलेल्या (शिवसेना व) भाजपाने ती संधी तरूणांना उपलब्ध करून दिली. १९८०-९० हा काळ बघितला, तर त्यात आज नावाजलेले अनेक पुरोगामी चेहरे उदयास येताना दिसतील. परिवर्तनाच्या चळवळी म्हणून त्यांचा प्रचंड बोलबाला माध्यमातून होत राहिला. पण प्रत्यक्षात जनतेच्या समस्या, प्रश्न व त्याचे उपाय यांना जाऊन भिडणारे लढे किंवा त्यातील सामान्य लोकांचा सहभाग संपत चाललेला दिसेल. मागल्या दोन दशकात तर पुरोगामी चळवळ ही निव्वळ माध्यमांच्या लेख, बातम्या व चर्चेत शिल्लक उरलेली दिसेल. बाकी प्रत्यक्ष जमिनीवर पुरोगामी नामोनिशाण उरलेले नाही. 

शरद पवार हे १९७८ नंतर पुरोगामी राजकारणाचे महाराष्ट्रातील एकमुखी नेतृत्व झाले होते आणि त्यांच्यामागून धावणार्‍या बाकीच्या पक्षांचे वेगळे अस्तित्व असले तरी त्यांची ओळखच संपत चालली होती. मात्र त्याच काळात एकामागून एक माध्यमे ही पुरोगामी चळवळीचे आखाडे बनत गेली. १९८० नंतरच्या काळात पुरोगामी विचारांच्या काही लोकांनी मोहिम उघडल्याप्रमाणे माध्यमात शिरकाव करून घेतला आणि तो पुरोगामी राजकारणाचा आखडा बनवून टाकला. दुसरीकडे एका पुरोगामी गटाने राजकीय संघटना व लढ्यांकडे पाठ फ़िरवून एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संघटनाचा मार्ग चोखाळला आणि देश-परदेशातून मिळणार्‍या निधीवर लोक आंदोलनाचे नवे दालन उघडले. मग त्यांची एक संयुक्त आघाडी पुरोगामी लढा पुढे नेऊ लागली. म्हणजे पुरोगामी स्वयंसेवी संघटनेने आंदोलन उभे करायचे आणि त्याचा पसारा माध्यमातल्या पुरोगाम्यांनी भ्रामक स्वरूपात उभा करायचा. नर्मदा बचाव किंवा निर्भय बनो, अशा आंदोलनाचे स्वरूप तपासून बघितले, तर त्याची प्रचिती येऊ शकेल. परदेशी निधी मिळवणे व त्यासाठी पोषक अशा विषयांपुरते पुरोगामी आंदोलन संकुचित होत गेले. कम्युनिस्ट वा समाजवाद्यांची १९५० नंतरची आंदोलने बघितली तर ती लोकांच्या जीवनातील थेट समस्येला भिडणारी होती. त्याचा पसाराही प्रचंड होता. पण त्यांना जितकी प्रसिद्दी मिळाली नसेल, तितकी निर्भय बनो किंवा नर्मदा बचाव आंदोलनाला मिळाली. पण फ़लित काय आहे? म्होरके होते त्यांच्या नावाचा गाजावाजा होण्यापेक्षा त्यातून पुरोगामी विचार वा आंदोलन किती पुढे सरकू शकले? कामगार, कष्टकरी वा शेतकरी अशा समाज घटकांपासून पुरोगाम्यांची याच काळात नाळ तुटत गेली. दुसरीकडे भाजपा वा संघाच्या मंडळींनी अत्यंत कष्टप्रद मार्गाने अशा नवनव्या समाजघटकात आपले बस्तान बसवण्याचे प्रयत्न केले. विखूरलेले समाज घटक गोळा करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक न्यायाची लढाई त्याच भाजपाच्या नव्या नेतृत्वाने हाती घेण्याचा सपाटा लावला होता. थोडक्यात पुरोगामी मंडळी आपला पारंपारिक परिसर सोडत चालली होती आणि भाजपा तीच पोकळी भरून काढणारे संघटन करण्यासाठी कष्ट उपसत होता. पण कोणाला पर्वा होती? माध्यमातून भाजपाशी वा तथाकथित प्रतिगामी राजकारणाची लढाई तुंबळ चाललेली होती. भाजपाने हिंदूत्व किंवा आणखी कुठलाही विषय घेवो, त्याच्या विरोधात जबरदस्त आघाडी माध्यमे लढवत होती. पण जमिनीवर पुरोगामी राजकारणाचे नामोनिशाण पुसले जात होते आणि त्याची कोणाला फ़िकीर नव्हती. कुठलेही मोठे वर्तमानपत्र वा आजच्या जमान्यात वृत्तवाहिनी घ्या, त्याच्याकडे पुरोगामी प्रवक्तेपण असल्याचा भास होईल. 

गुजरात दंगलीनंतर अन्य काय झाले वा मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले हा विषय बाजूला ठेवला, तर आणखी काय त्यातून साध्य झाले? तीस्ता सेटलवाड नावाची एक महिला मुस्लिमांना न्याय देणारी म्हणून जगापुढे आली. करोडो रुपये तिला जगातून मिळवता आले. त्यात अफ़रातफ़र केली म्हणून आता तिच्यामागे ससेमिरा लागला आहे. पण त्यातले सत्यही तपासण्याची तसदी कुठल्या माध्यमाने पत्रकाराने घेतलेली नाही. अटकेच्या भयाने कोर्टाच्या पायर्‍या झिजवणार्‍या तीस्ताला सवाल कोणी विचारायचे? जिने केलेला कुठलाही आरोप विनापुरावा पत्रकार छापत होते व प्रक्षेपित करत होते, तिच्या विरोधातले पुरावे समोर आले असताना, एकाही माध्यमात त्याची साधी चर्चा होऊ शकत नाही, ही आजच्या पुरोगामी चळवळीची शोकांतिका आहे. कोणीही गुन्हे करावेत, लूटमार करावी. त्याच्या छातीवर पुरोगामीत्वाचा बिल्ला असला, मग त्याच्याविषयी माध्यमे चिडीचूप होऊन जातात. कारण आता माध्यमेच पुरोगामी झालीत आणि पुरोगामी म्हणवून घेणार्‍याने काहीही गुन्हा केला तरी त्या पापावर पांघरूण घालणे, हेच पुरोगामी कार्य शिल्लक उरले आहे. अर्थात तो विषय भिन्न आहे. मुद्दा असा, की तीस्ता वा मेधा पाटकर यांनी पुरोगामी म्हणून मिरवताना त्या चळवळीला काय योगदान दिले? पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या रुपाने जी एनजीओ नावाची चळवळ उभी राहिली, तिने पुरोगामी चळवळीतला कार्यकर्ताच संपवून टाकला. आता पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या संघटना या मुळात कुठल्या तरी परदेशी वा देशी निधीच्या आश्रयाने चालणारी दुकाने होऊन बसली आहेत. तिथे काम करणारा कार्यकर्ता स्वयंसेवक म्हटला जातो. पण व्यवहारात तो संस्थेचा वा संघटनेचा पगारी सेवक झालेला आहे. वैचारिक पोपटपंची कार्यकर्त्यासारखी करणारा हा पगारी सेवक विचारांनी भारावून आंदोलनात आलेला नाही किंवा त्यासाठी पदरमोड करणारा राहिलेला नाही. अशा शेकडो एनजीओ मागल्या दोनतीन दशकात पुढे आल्या व त्यांनी अवघी पुरोगामी चळवळ पोखरून टाकली आहे. नोकरी करून, घरचे खाऊन संघटनेसाठी राबणारा ध्येयवादी कार्यकर्ता, ही पुरोगामी चळवळीची खरीखुरी शक्ती होती. तीच आता नष्टप्राय झाली आहे. तिचा जीवनरस अशा स्वयंसेवी संघटनांनी शोषून घेतला आहे. हे घडत असतानाच्याच काळात प्रासंगिक राजकारण आणि जनतेशी पुरोगामी संघटनांचा असलेला संबंध क्षीण होत गेला. अर्थात पुरोगामी हाताशी नसले म्हणून लोकांना आपल्या समस्या दुर्लक्षित करता येत नाहीत. सोडवणारा कुठल्या पक्ष विचारसरणीचा आहे, याच्याशी सामान्य माणसाला कर्तव्य नसते. त्याला भेडसावणार्‍या प्रश्नाची उकल हवी असते. ती करू शकणार्‍याचे स्वागत सामान्य जनता करीत असते. इथे तेच झाले, पुरोगामी चळवळी व संघटनांनी वार्‍यावर सोडलेल्या सामान्य जनतेला व तिच्या समस्यांना भाजपा वा शिवसेना अशांनी साथ दिली. पुरोगाम्यांनी मोकळी केलेली जागा असे तथाकथित ‘प्रतिगामी’ व्यापत गेले.

थोडक्यात वा स्पष्टच शब्दात सांगायचे तर तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांतून उभ्या राहिलेल्या पुरोगामी चळवळीला उच्चभ्रू व सुखवस्तु वर्गातून आलेल्यांनी व्यापले आणि तिचे कुपोषण करत संपवून टाकले, असे म्हणता येईल. कारण पुरोगामी आंदोलन व चळवळ अथवा त्यांच्या संघटना हे खर्‍याखुर्‍या जीवनात भेडसावणार्‍या समस्या व प्रश्नातून उभ्या राहिलेल्या होत्या. गिरणी कामगार वा कष्टकरी विभागातून या संघटनांचा उदय होत गेला आणि तिथेच त्यांचा पाया विस्तारत गेला. पण १९८० नंतरच्या काळात तिथले मुळचे निष्ठावान कार्यकर्ते विचारांची बांधिलकी म्हणून वरून येणार्‍या आदेशाचे पालन करत होते. पण जे काही करायचे त्याचा त्यांच्याच परिसराशी अजिबात संबंध राहिला नव्हता. नर्मदा आंदोलन हे त्या परिसरातील होते, पण त्याला तिथलाच मतदार साथ देत नव्हता. त्याची परिक्षाही घ्यायचा विचार कोणी केला नाही. चाचपणीही झाली नाही. कारण आंदोलनाच्या म्होरक्यांना ठाऊक होते, की आपले आंदोलन जनतेतून आलेले नाही, तर माध्यमकेंद्री आहे. तसेच निर्भय बनो आंदोलनाचे म्हणता येईल. काल्पनिक विषय व प्रश्न घेऊन पुरोगामी चळवळ त्यात इतकी गुरफ़टत गेली, की तिला चेहराच उरला नाही. मात्र दुष्काळ, पाणीप्रश्न, नागरी प्रश्न, सामाजिक विषमता असले खरे भेडसावणारे प्रश्न प्रतिगामी म्हटले जाणारे भाजपा शिवसेना उचलून धरत होते. पर्यायाने त्यांचा लोकसंपर्क वाढत विस्तारत होता. दुसरीकडे लोकजीवनापासून दुरावत चाललेली पुरोगामी चळवळ आपलाच अवकाश संकुचित करून घेत होती. त्याला कोण जबाबदार होता? भाजपा वा अन्य कुणावर तुमच्या नालायकीचे खापर फ़ोडता येणार नाही. दुसरीकडे तीस्ता सेटलवाड यांच्या उचापती बघता येतील. त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळाली व त्यांनीही आपल्या नाटकासाठी पुरोगामी म्हणवणार्‍यांना ओलिस ठेवले होते. पण त्यांच्या प्रत्येक उचापतीतून अधिकाधिक हिंदू लोकसंख्या दुखावत दुरावत चालली होती. दोन समाजातले वितुष्ट संपवण्यात आणि सौहार्द निर्माण करण्यात पुरोगाम्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. पण पदोपदी असे दिसेल, की हिंदू मुस्लिमातील तेढ वाढेल व त्यातून हिंदू समाजात पुरोगाम्यांविषयी तिरस्काराची भावना प्रबळ होईल, असेच तीस्ताचे डावपेच चालू होते. यामागून पुरोगामी म्हणवून घेणारे फ़रफ़टत होते. जणू त्यांचा अजेंडा असे स्वयंसेवी म्हणून काम करणारेच ठरवित होते. कम्युनिस्ट सोशलीस्ट वा तत्सम पक्षांचा आपला असा काही अजेंडाच उरला नव्हता. त्याचेच प्रतिबिंब मग राजकीय बलाबलात पडत गेले. क्रमाक्रमाने पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांचे नामोनिशाण राजकीय अवकाशातून पुसट होत गेले. या स्वयंसेवी म्हणवणार्‍या संघटना वा पुरोगामी पत्रकारांनी राजकीय पक्ष व गटांवर आपला अजेंडा लादून आत्मघात करायला भाग पाडत नेले. 

१९९९ सालात महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. तेव्हा कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातून विस्तव जात नव्हता. त्यांना एकत्र आणून त्याच्या भरीला पुरोगामी पक्षांना बसवण्याचे काम इथल्या पत्रकारांनी केले नाही काय? युतीला लोकांनी बहुमत दिलेले नसेल, पण एकत्रित लढलेल्या शिवसेना भाजपाला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांनाच सत्तेपासून वंचित ठेवताना सेक्युलर मते अधिक व जागाही अधिक, असा अजब सिद्धांत पत्रकार संपादकांनी आणला. त्यामध्ये परस्पर विरोधात लढलेल्या पक्षांना सत्तेसाठी एकत्र बसवायचे काम याच राजकारणबाह्य पुरोगाम्यांनी केले आणि तिथून मग पुरोगामी पक्षच नष्टप्राय होत गेले. तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी यांना पुरोगामी पक्ष ठरवून त्यांना जीवदान पुरोगामी पक्षांच्या मोजक्या आमदारांमुळे मिळाले. पण त्याला दुष्परिणाम पुढल्या पाच वर्षांनी दिसला, राज्याच्या कुठल्या तरी कोपर्‍यात बिगर कॉग्रेसी राजकारणाचा झेंडा घेऊन टिकलेले हेच पुरोगामी पक्ष पुरते नामोहरम होऊन गेले. जनता दल, रिपब्लिकन, कम्युनिस्ट वा शेकाप यांचे आज काय शिल्लक उरले आहे? मुळात तेच बिगरकॉग्रेसी राजकारणाचे अध्वर्यु होते. ती जागा त्यांनी सोडली वा त्यांना माध्यमातले पुरोगामी व स्वयंसेवी लोकांनी सोडायला भाग पाडले आणि कॉग्रेसच्या दावणीला आणुन बांधले. मग स्थानिक पातळीवर त्यांची मतदाराला गरज उरली नाही. तिथे खरा कॉग्रेस विरोधक म्हणून भाजपा शिवसेना जागा व्यापत गेले. तर कित्येक वर्षे तिथे पुरोगामी झेंडा घेऊन पाय रोवून उभे असलेले पुरोगामी कार्यकर्ते उध्वस्त होऊन गेले. पर्यायाने त्यांचे पक्ष व राजकारण उध्वस्त होऊन गेले. त्याचे खापर भाजपावर फ़ोडता येणार नाही, तर उच्चभ्रू व पुस्तकी पुरोगाम्यांवर फ़ोडावे लागेल. ज्यांनी आपल्या पोथीनिष्ठेसाठी खर्‍या पुरोगामी कार्यकर्ता व संघटनांचा हकनाक बळी दिला. त्यांचा खरा लोकाभिमुख अजेंडा हिरवून घेतला आणि आपला काल्पनिक भ्रामक सेक्युलर अजेंडा त्यांच्या माथी मारून स्थानिक पातळीवर पुरोगामी संघटनांचे निर्दालन करून टाकले. माध्यमातील पुरोगामी व बाहेरचे विचारवंत पुरोगामी यांनी आखाड्यातले व मैदानातले खरे पुरोगामी कार्यकर्ते यांना असे निकामी करून टाकले, की पुरोगामी शब्दाकडे सामान्य जनता चमत्कारीक नजरेने बघू लागली. 


थोडक्यात १९८० नंतरच्या काळात स्वयंसेवी संस्था-संघटना व माध्यमातले छुपे पुरोगामी यांनी एकूणच पुरोगामी राजकारणाचे अपहरण केले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मग कॉग्रेस वा अन्य कोणी माध्यमाचा वा स्वयंसेवी संघटनांचा छुपा वापर करून पुरोगाम्यांना कळसुत्री बाहुल्यांप्रमाणे खेळवू लागले. प्रदिर्घकाळ ठामपणे कॉग्रेस विरोधात आपले अस्तित्व टिकवून असलेल्या मार्क्सवादी व त्यांच्या डाव्या आघाडीला २००४ सालात अशाच पद्धतीने राजकारणबाह्य पुरोगाम्यांनी कॉग्रेसच्या दावणीला आणुन बांधले. त्यातून नामशेष होऊ घातलेल्या कॉग्रेसला नव्याने जीवदान मिळाले. पण तीच डावी आघाडी बंगालचा आपला बालेकिल्ला गमावून बसली. १९६७ पासून बंगालमध्ये डाव्यांनी आपले पक्के बस्तान बसवले. त्याला २००९ व पुढे २०१४ मध्ये इतका मोठा हादरा कशामुळे बसला? ममताचा करिष्मा हे सोपे उत्तर आहे. भाजपा विरोधासाठी काहीही करणे म्हणजे पुरोगामी हा निरर्थक सिद्धांत डाव्यांच्या पराभवाचे खरे कारण आहे. यातली शोकांतिकाही समजून घ्यावी लागेल. २००४ सालात डावी आघाडी ज्या मनमोहन सरकारच्या समर्थनाला उभी राहिली, त्यात तस्लिमुद्दीन नावाचा एक मंत्री लालुंच्या राष्ट्रीय जनता दलाचा होता आणि त्याच्यावर मार्क्सवादी नेत्याच्या खुनाचा आरोप होता. पण तरीही पुरोगामी सरकार म्हणून त्याच्या पाठीशी डाव्यांनी उभे रहाणे हा किती हास्यास्पद पकार असेल? तिथल्या स्थानिक डाव्या कार्यकर्त्यांना आपल्या परिसरात तोंड दाखवायला जागा राहिल काय? यातूनच मग बिहारमध्ये कम्युनिस्ट पक्ष पुरता नामशेष होऊन गेला. ज्यांची मू्ळ ओळख कॉग्रेसचे विरोधक अशी होती व बिगरकॉग्रेसी मतदार त्यांच्या पाठीशी होता, त्याला अन्य पर्याय शोधायला अशा राजकारणाने भाग पाडले आणि तीच जागा व्यापत व तीच मते बळकावत भाजपा विस्तारत गेला. त्याला प्रामुख्याने जबाबदार असेल तर पुरोगामी पक्ष व संघटनांमधील पुस्तकी नेतृत्व, संघटनाबाह्य हस्तक्षेप व माध्यमातल्या तोतया पुरोगाम्यांनी मोडून काढलेले आंदोलनात्मक डाव्या पुरोगामी चळवळीचे स्वरूप!  (अपुर्ण)

1 टिप्पणी: