शनिवार, २४ मे, २०१४

नरेंद्र मोदी नावाचा अपवाद

 आता मोदी जिंकले आहेत आणि त्यांच्याच प्रभावाने भाजपाने अभूतपुर्व यश संपादन केले आहे. व्हायचे ते होऊन गेल्यावर त्याची मिमांसा अनेकप्रकारे होऊ शकते. पण जेव्हा तशी शक्यताच इथल्या राजकीय पंडीतांना वाटत नव्हती आणि तशा शक्यतेची केवळ टिंगलच केली जायची; तेव्हा मोदींमुळे भाजपा इतके मोठे यश कसे मिळवू शकेल, याची मिमांसा करायचे धाडस मी अनेक लेखातून केलेले होते. तेव्हा ‘पोलिटीकली इनकरेक्ट’ मत व्यक्त करण्याचे धाडस ही मला खरी पत्रकारिता वाटली होती. आजही अनेक पंडीतांना मोदींच्या विजयाचे नेमके विश्लेषण करणे अशक्य झाले आहे, कारण झाले तेच त्यांच्या बुद्धीला पटवून घेणे अवघड होऊन बसले आहे. तेव्हा मी शक्यता व्यक्त करताना माझ्यापाशी दिव्यदृष्टी वगैरे काहीही नव्हते. अनुभव, भूतकाळाचे व वर्तमानाचे वास्तव यांची सांगड घालण्याची विवेकबुद्धी तेवढी शाबुत होती. म्हणून उलगडणार्‍या भविष्याच्या वा घडणार्‍या इतिहासाचे नेमके वर्णन करू शकलो. आज कॉग्रेसच्या पराभवाचे वाली कोण, अशी चर्चा करणार्‍यांना सोनिया, राहुलवर खापर फ़ोडायचे आहे. पण ते फ़ोडताना दोष कुठले द्यायचे, त्याचाच पत्ता नाही. कारण आता पंतप्रधान पदापर्यंत झेप घेतलेल्या मोदींचे कौतुक सगळेच करणार आहेत. पण सवाल एका व्यक्तीच्या यशाचा नसून त्याच्या हातून या खंडप्राय देशाच्या भवितव्याचे स्वप्न साकार होण्याचा आहे. सव्वाशे कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षाच्या पुर्तीचा विषय मोठा आहे. मोदींच्या नुसत्या कौतुकाने ते उद्दीष्ट साध्य होईल असे नक्कीच म्हणता येणार नाही. त्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीत कुठल्या गोष्टी देशासाठी उपकारक असतील व कुठल्या अडचणी त्यांना येऊ शकतील, त्याचा उहापोह आवश्यक आहे.

   पहिली बाब अशी की देशात जे सत्तांतर घडले आहे त्यासाठी मोदींनी अथक प्रयास केले, हे कोणालाही मान्य करावे लागेल. पण तेच सत्तांतर सामान्य नागरिकाने घडवले आहे. त्याला कुणाचा चेहरा आवडत नव्हता किंवा कुणाची धोरणे नावडत होती, इतक्यापुरते हे सत्तांतर मर्यादित नाही. विविध कारणासाठी कॉग्रेस, युपीए वा मनमोहन, सोनिया व राहुल यांच्या विरोधातला हा कौल नाही. म्हणूनच तो कौल मोदींना सर्वोच्चपदी बसलेले बघण्यासाठी दिलेला कौल नाही. जनतेने आपल्या आशा व आकांक्षांना मोदी जाणतात, याच जाणिवेतून दिलेला हा कौल आहे. म्हणजेच मोदी हे सत्तांतराचे प्रतिक भासवले जाते आहे, त्यात तथ्य नाही. जनतेने त्यांच्याकडून राष्ट्रीय सामाजिक जीवनात मोठेच स्थित्यंतर व्हावे, अशी अपेक्षा बाळगून दिलेला हा कौल आहे. म्हणजेच त्यांना मतदान करणार्‍या निदान कोट्यवधी मतदाराने त्यांच्याकडे स्थित्यंतराची अपेक्षा बाळगली आहे. ती पुर्ण करण्यात मोदी कितपत मजल मारतात, ह्याची आता चर्चा आवश्यक आहे. आधीच्या सत्ताधार्‍यांचे दोष मोदी ठळकपणे दाखवत होते आणि त्याच दोषांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात ग्रासलेपणा आलेला होता. त्यातून जनतेला मुक्ती हवी होती. त्यासाठी मोदींनी काय करावे, किंवा ते काय करू शकतात, त्याचे महत्व अधिक आहे. त्याची प्रचिती नजीकच्या काळात येईलच. पण त्याविषयी काय काय भाकिते करता येतील? मोदी खरेच जनतेच्या अपेक्षांना लायक ठरून दाखवू शकतील काय? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल, तर त्याचे पुरावे कोणते?

   निकालानंतर सगळेच विजयाचे श्रेय मोदींना देत आहेत आणि त्या विजयाची वर्णने मोदीलाट अशी होत आहे. पण विजयाच्या पहिल्या क्षणापासून विजयाचे सर्व श्रेय मोदींनी पक्षाचे कार्यकर्ते व अनेक पिढ्या पक्षासाठी राबलेल्या सर्वांच्या झोळीत टाकण्याचा विवेक दाखवला आहे. तिथेच त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागते. सांघिक खेळात वा प्रयत्नात विजय मिळवल्यानंतर त्याचे पारितोषिक घ्यायला संघनायक पुढे जातो, पण यश त्याचे एकट्याचे नसते संघातल्या तमाम लोकांचे असते. त्याची जाणिव त्याच्या शब्दातून व कृतीतून दिसावी लागते. मोदींनी त्याची चुणूक दाखवली आहे. एकीकडे पक्षाच्या यशाचे श्रेय कार्यकर्त्याला देताना, मत नाकारणार्‍या उर्वरीत जनतेलाही आपल्या विजयात सामील करून घेण्य़ाचा समंजसपणा त्यांनी विनाविलंब प्रकट केला आहे. प्रचारात प्रतिस्पर्ध्यांवर कडवी टिका केल्यावर निकाल आले आणि मोदींची भाषा एकदम बदलली आहे. आजवरच्या सत्ताधीशांनी काहीच केले नाही, असे आपण म्हणत नाही. प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने, शक्तीने व कृतीने देशासाठी प्रयत्न केले; असे मोदी म्हणाले. अगदी गुजरातचा निरोप घेताना त्यांनी गुजरात मॉडेलचे श्रेय विरोधी पक्ष व सरकारी कर्मचार्‍यांना देण्य़ात कंजूषी केली नाही. देशाच्या सर्वमान्य नेतृत्व करण्यातली ही पहिली पायरी आहे. विजयाच्या अत्युच्च शिखरावर असताना उद्दामपणा, उद्धटपणा व यशाची मस्ती डोक्यात जाऊ न देण्य़ाचा संयम त्यांनी तात्काळ प्रदर्शित केला आहे. ज्याच्यावर सर्वांना सोबत घेऊन न जाणारा नेता, अशी टिका अनेक वर्षे होत राहिली त्यानेच इतके मोठे यश मिळवल्यावर टिकेकडे पाठ फ़िरवून विरोधकांनाही देशकल्याणासाठी सोबत घेण्याची भूमिका मांडावी, यातून भविष्यातल्या वाटचालीची लक्षणे शोधता येतात.

   हा नरेंद्र मोदी वा त्याच्यातला अजब माणुस ओळखता आला, तरच त्याची खेळी, चाल, राजकारण वा धोरणांचा कयास बांधता येऊ शकेल. पहिली गोष्ट म्हणजे मोदी यांच्यापाशी जबरदस्त इच्छाशक्ती आहे. नैराश्य त्यांच्या जवळपास फ़िरकत नाही. कितीही प्रतिकुल परिस्थितीत आशेचा किरण शोधण्याची दुर्दम्य सकारात्मकता आहे. त्यांच्या हाडीमाशी खिळलेला कार्यकर्ता मोदींच्या व्यक्तीमत्वाचे वास्तविक स्वरूप आहे. सत्ता, अधिकारपदे वा अन्य कुठल्याही सुविधा साधनांपेक्षा त्यांना स्वत:मध्ये सामावलेला कार्यकर्ता अधिक प्रभावी वाटतो. त्यांनी अंगावर जबाबदार्‍या येऊन पडल्या, तसे आपल्यतले नेतृत्वगुण विकसित केले. पण कार्यकर्त्याचा स्वभाव मात्र त्यांना सोडून गेला नाही, की मोदींना त्यातून आपली सुटका करून घेता आली नाही. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी हा अपवाद आहे. त्याची तुलना आपण कुठल्याही अन्य राजकीय नेत्याशी करू शकत नाही. जशी ती संघातल्या अन्य प्रचारक स्वयंसेवकाशी होऊ शकत नाही, तशी त्यांची तुलना कुठल्याही पक्षातल्या अव्वल राजकीय नेत्याशीही होऊ शकत नाही. कारण कार्यकर्ता, नेता, स्वयंसेवक, आयोजक अशा अनेक छटांनी हे व्यक्तीमत्व साकारलेले आहे. जी छटा तुम्हाला ठराविक प्रसंगात दिसते, तसे मोदी तुम्हाला भासतात. पण प्रसंग बदलला, मग त्यांच्यातल्या भलत्याच व्यक्तीमत्वाची छटा आपल्या अनुभवास येते. मग आधीचा मोदी व नंतरचा मोदी अशी तुलना करताना आपली तारांबळ होऊन जाते. तो मोदींचा गुन्हा नसून आपला दृष्टीदोष आहे. गतवर्षी दिल्लीत पंतप्रधानांनी आमंत्रित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहिलेले मोदी, उत्तराखंडात त्सुनामी आल्यावर एखाद्या संघ स्वयंसेवकाप्रमाणे तिकडे धावले होते. तेव्हा आपण आता एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत, याचेही भान त्यांना रोखू शकले नव्हते. अर्थात त्यांनी उपलब्ध असलेल्या गुजरातच्या शासकीय यंत्रणेचा वापर त्यात करून घेतला. इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे शासकीय निर्णय घेऊन त्यापासून स्वत:ला अलिप्त केले नव्हते.

   तेव्हा कॉग्रेसच्या अनेक नेत्यासह माध्यमातल्या काही मोजक्या मंडळींनी ‘राम्बो’ अशा शब्दात मोदींची टवाळी केली होती. ज्या संकटात हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग अडकून पडले असताना पर्यटकांच्या आधी स्वत:सकट आपल्या कुटुंबाची सुटका करून घेण्यास अधिकार वापरत होते. तिथेच सुखरूप जागी असलेला गुजरातचा मुख्यमंत्री संकटस्थानी आपले गुजराती पर्यटक अडकलेत त्यांच्या चिंतेने संकटाच्या खाईत धाव घेत होता. हा भारतीय राजकारणातला विरोधाभास आहे. त्यानेच नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेवर जादू केली आहे. प्रसंग, परिस्थिती, समस्या वा संकट यांचे विवेचन आवश्यकच असते. याखेरीज त्यावर मात करता येत नाही. पण त्यांना जाऊन भिडणेही तितकेच गरजेच असते, तरच त्यावर मात करता येते. तिथेच न थांबता अशा संकट समस्यांच्या अनुभवातून धडा घेऊन भविष्यात अंगावर येऊ शकणार्‍या संकटाची चाहुल घेऊन आधीच त्यावरचे उपाय शोधण्याला नेतृत्वाची कसोटी म्हणता येईल. संकटाला जनता सामोरी जातच असते. पण तिला त्यापासून सुरक्षित राखणे हे सत्तधीशाचे काम नव्हे; तर जबाबदारी असते. लोकांना असाच सत्ताधीश हवा असतो. मोदी सतत आपल्या भाषणातून मला चौकीदार व्हायचे आहे असे सांगत होते, त्याचा इतका साधासरळ अर्थ आहे. जो बुद्धीमंतांना कळला नाही, पण सामान्य जनतेला नेमका उमगला होता. सत्ता उपभोगणारा नव्हे तर सत्ता राबवणारा राज्यकर्ता ही जनतेची अपेक्षा असते. मोदींनी मागल्या बारा वर्षात कार्यकर्त्यापासून राज्यकर्ता होताना त्याचाच आदर्श गुजरातमध्ये सादर केला. ज्याची दुमदुमी देशाच्या कानाकोपर्‍यात गेली. तिचे परिणाम आज दिसत आहेत.

   पण गुजरात एक राज्य होते आणि भारत हा खंडप्राय देश आहे. त्याचा कारभार मुख्यमंत्री असल्याप्रमाणे चालविता येणार नाही, असाही एक आक्षेप आहे. त्यात तथ्य जरूर आहे. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की मोदी हा हार मानणारा नेता नाही. संकटाशी झुंजण्याची जिद्द असलेला व दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारा नेता आहे. या देशातली सव्वाशे कोटी जनता हेच सर्वात मोठे भांडवल किंवा साधनसंपत्ती असल्याचा विश्वास बाळगणार्‍या नेत्याबद्दल म्हणूनच जनतेला अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आपल्या हाती अधिकार आहे तो वापरण्यासाठी आहे आणि तो वापरताना जनतेच्या हिताला प्राधान्य असायला हवे, याची खुणगाठ मनाशी बांधलेला हा नेता आहे. त्याचवेळी तो मनस्वी कार्यकर्ता आहे. त्यामुळेच आपण देशाचे भाग्यविधाते नसून सव्वासे कोटी भारतीयांचे फ़क्त म्होरके आहोत. त्यामुळेच त्या करोडो लोकांना सोबत घेऊन आपण जगाला थक्क करणारा चमत्कार घडवू शकतो, असा विश्वास मनाशी बाळगून मोदींनी वर्षभरापुर्वी ही लढाई लढली व त्यात यश संपादन केले. मात्र युद्ध संपलेले नाही. खर्‍या लढाया आता पुढेच लढायच्या आहेत आणि त्यात आपले सहकारी, आपला पक्ष पुरेसा नाही, सर्व समाजघटक, सर्व राजकीय विचारधारा व संपुर्ण देशच एकदिलाने एकमुखाने या विकासकार्यात सोबत घेण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला आहे. इंदिराजींनंतर तीन दशकांनी खर्‍या अर्थाने देशाचा विश्वास संपादन करणारे नेतृत्व देशाच्या नशीबी आलेले आहे. त्याच्यावर टिकेचे आसूड ओढत बसण्याप्रमाणेच त्याचे निरर्थक कौतुक करण्यात वेळ दवडणे, हा कर्मदरिद्रीपणाच असेल. आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार्‍या मोदींना येऊ घातलेल्या तमाम जबाबदार्‍या व कर्तव्याचे भान कायम राहो, इतकीच त्यांच्याकडून अपेक्षा. देशभरच्या कोट्यवधी जनतेनेच दिलेल्या शुभेच्छांवर स्वार होऊन इतकी मोठी मजल मारणार्‍याला, या क्षणी व्यक्तीगत शुभेच्छा देण्याची मला गरज वाटत नाही.

1 टिप्पणी:

  1. भाऊ उत्तम लेख. मोदींना खरेच व्यक्तिगत शुभेच्छा देण्याची गरज नाही. त्यातर त्यांना अगोदरच मतदानाद्वारे मिळाल्या आहेत. ह्या सर्वांचा पाठिंबा अणि आशीर्वादच त्यांच्याकडून उत्तम काम करुण घेईल यांत मलातरी तिळमात्र शंका नाही.

    उत्तर द्याहटवा