शुक्रवार, २ मे, २०१४

नेहरूला आमचा ‘चाचा’ कोणी केले?   भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची दूरदर्शनला दिलेली मुलाखत संपुर्ण दाखवण्याऐवजी तिथे बसलेल्या सोनियानिष्ठांनी त्यातही काटछाट करून नसती आपत्ती ओढवून घेतली, असे म्हणायला हवे. कारण त्यामुळे सत्ताधारी सोनिया व कॉग्रेस यांच्या विरोधातले मोठे कोलितच मोदींच्या हाती देण्यात आले. मोदी हा किती धुर्त राजकारणी आहेत, त्याची साक्ष यातून मिळू शकते. कोणी मोदी हा संत असल्याचे मानू नये. जीवघेण्या सत्तेच्या राजकारणातला तो एक खेळाडू आहे. म्हणूनच आपले पत्ते झाकून दुसर्‍यांना मात देण्याच खेळ मोदीही खेळत असतात. सहाजिकच दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीचे संपुर्ण चित्रण त्यांनी आधीच आपल्याकडे घेऊन ठेवलेले होते. त्यात काटछाट करून प्रसारण झाल्यानंतरही मोदींनी त्याबाबत कुठली जाहिर तक्रार केली नाही. पण त्यात जो भाग वगळला गेलेला होता, त्याचीच कुठल्या तरी वृत्तपत्राने बातमी बनवली आणि त्यातून नवे वादळ उभे राहिले. प्रियंका मुलीसारखी असल्याने तिचे आरोप वा टिका आपण गंभीरपणे घेत नाही, असे मोदींनी त्या मुलाखतीत म्हटल्याची बातमी झळकली. पुढे अमेठीत प्रचारासाठी फ़िरणार्‍या प्रियंकाकडे कुणा पत्रकाराने कॅमेरासमोर मोदींच्या त्याच प्रसिद्ध विधानावर प्रतिक्रिया मागितली. त्यांनीही संतापून आपण ‘राजीव गांधींची बेटी आहोत आणि आपला पिता देशासाठी शहीद झाला’ अशी तडाखेबंद प्रतिक्रिया दिली. लगेच अर्थमंत्री चिदंबरम यांच्यासारख्या उच्चशिक्षीत व्यक्तीनेही प्रियंकाचे कौतुक करीत प्रतिक्रिया दिली. प्रियंकाला आपल्या पित्याविषयी अभिमान असून त्याची अन्य कुणाशी तुलना करणे तिला आवडणारे नाही, अशी मुक्ताफ़ळे उधळली. पण यापैकी कोणालाही मुळात मोदी काय बोलले, त्याची काळजीपुर्वक तपासणी करायची बुद्धी सुचली नाही. तिथेच धुर्त मोदींनी त्यांच्यावर मात केली.

   पहिली गोष्ट म्हणजे प्रियंकाच्या कुठल्याही मुक्ताफ़ळांना मोदींनी थेट उत्तर दिले नाही. त्याऐवजी त्यांनी दुरदर्शनला दिलेल्या मुलाखतीचे चित्रणच सीडीच्या रुपाने वितरीत केले. त्यात त्यांनी प्रियंका ही सोनियांची बेटी व राहुलची भगिनी म्हणून प्रचार करते आहे, त्यामुळेच कुटुंबासाठी तिची चाललेली धावपळ क्षम्य मानायला हवी, असा मनाचा मोठेपणा दाखवलेला स्पष्टपणे उघड होतो. दुसरी बाब म्हणजे त्यांनी प्रियंकाला आपली बेटी वा बेटीसारखी असेही म्हटलेले नाही. तर तिच्या पित्याशी स्वत:ची मोदींनी तुलना करण्याचा प्रश्नच कुठे येतो? मग प्रियंकाने इतके हातपाय आपटण्याचे कारणच काय? ती संतप्त प्रतिक्रिया कशाविषयी आहे? मोदी तिला ‘सोनियाची बेटी’ म्हणाले हा प्रियंकाला आपल्या पित्याचा अपमान वाटतो काय? कारण मुलाखतीत मोदींनी तसाच प्रियंकाचा उल्लेख केलेला आहे. प्रियंकाने त्यावर प्रक्षुब्ध होण्याचे कारणच काय? की आपण राजीव गांधींची बेटी आहोत आणि आपल्याला ‘सोनियाची बेटी’ संबोधणे प्रियंकाला अपमानास्पद वाटले आहे? चीड कसली आहे? सोनियांना आपली जन्मदाती संबोधण्याची चीड कशाला? ज्यांनी ‘बेटी जैसी’ हे न बोललेले शब्द प्रसिद्ध करून त्यावर काहूर माजवले, त्यांना वास्तविक चित्रण बघून-ऐकून प्रियंकाच्या संतापाची शंका कशाला आलेली नाही? एक तर प्रियंकाने मूळ मुलाखत बघितलेली नसावी आणि ऐकीव गोष्टीवर प्रतिक्रिया दिलेली असावी. दुसरी गोष्ट आपण काहीही बरळले, तरी कौतुकच होणार याची खात्री असलेले शेफ़ारलेले मूल जसे बकवास करते, तशीच मुक्ताफ़ळे प्रियंकाने उधळलेली असावी. याखेरीज अन्य काही संभवत नाही. पण मग एक गंभीर प्रश्न शिल्लक उरतोच. मोदी जे बोललेले नाहीत किंवा जे बोलले; तेच प्रसारीत झालेले नाही. तर असले शब्द त्यांच्या तोंडी घालून हा वाद कोणी कशाला पेटवून द्यावा? मोदींच्या हाती कोणी कशाला कोलीत द्यावे?

   ज्याचा राजकीय लाभ मोदींना मिळू शकतो असा उलटणारा डाव कोणी खेळला आहे? त्यात आयते कॉग्रेसजन व प्रियंका फ़सतील, असा खेळ कोणीतरी मुद्दाम केलेला असू शकतो. कारण काटछाट केलेली मुलाखत दूरदर्शनवर प्रसारीत झाल्यानंतरही मोदींनी त्याबद्दल जराही तक्रार केलेली नव्हती. त्या मुलाखतीविषयी वादंग होईपर्यंत भाजपाकडूनही तक्रार नव्हती. त्यावर प्रियंकाला ‘बेटी जैसी’ संबोधल्याचे छापून आल्यावरही मोदींकडून खुलासा झाला नव्हता. पुढे प्रियंका व चिदंबरम यासारख्या कडव्या प्रतिक्रिया येईपर्यंत मोदी गोटातील मौन शंकास्पद वाटते. मुलाखतीतली काटछाट भले सत्ताधारी कॉग्रेसच्या कुणा आगावू माणसाने दुरदर्शनमध्ये हस्तक्षेपाने केलेली असेल. पण तेवढ्यावर न थांबता त्याच मुलाखतीसाठी मोदींना अधिक अडाचणीत आणायला आपल्या खास गोटातल्या पत्रकाराला हाताशी धरून प्रियंकाला ‘बेटी जैसी’ संबोधल्याची वावडी कोणी उडवलेली असेल? तेव्हा मोदींनी मूळ चित्रणाची प्रत राखल्याचे भान असले कारस्थान करणार्‍याला नसावे. सगळी फ़सगत तिथेच झाली. कारण आता हा वाद उफ़ाळल्यावर जे मोदींचे शब्द लपवले व कापले गेले होते, त्याचेच अन्य वाहिन्यांनी शेकडो वेळा प्रसारण केलेले आहे. त्यामुळे प्रियंका कशी उद्धट व अहंकारी आहे आणि मोदी किती सभ्य आहेत, त्याचेच प्रदर्शन ठळकपणे मांडले गेले. शिव्या दिल्या तरी तिला माफ़ आहेत; असे मोदी म्हणत आहेत आणि प्रियंका मात्र त्यांच्यासाठी अपमानकारक शब्दांचा वापर करीत असल्याचे जनमानसावर ठसवले गेले. हा सगळा योगायोग मानता येत नाही. उलट त्यातून सोनियाची बेटी संबोधण्याचा या मुलीला इतका राग कशाला यावा; असाही प्रश्न जनतेच्या मनात रुजवला गेला आहे. की राजकन्येला कोणी फ़ालतू चहाविक्या मुलगी संबोधतो, याचा संताप अनावर होऊन आलेली ती प्रतिक्रिया आहे? कॉग्रेस अधिवेशनाच्या जागी अशीच ‘एक चायवाला’ शब्दाची तुच्छ प्रतिक्रिया मणिशंकर अय्यर यांनी दिलेली आठवते? तेव्हा अय्यरच्या चेहर्‍यावरची तुच्छता आणि पित्याच्या अभिमान सांगतानाची प्रियंकाची चर्या, सारखीच नव्हती काय?

   मी मात्र प्रियंकाला उद्धट वा अहंकारी गटात टाकण्यापुर्वी एक संधी देऊ इच्छितो. तिच्या अशा प्रक्षोभाची अन्यही कारणे असू शकतात. म्हणूनच ती कारणे शोधायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. नरेंद्र मोदी आमच्याच पिढीचे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात लगेच दोनचार वर्षात जन्माला आलेल्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. आमची ती पिढी लहानाची मोठी झाली, तेव्हा आमच्यावर ‘राष्ट्रीय संस्कार’ झाले. तेव्हा सोनिया गांधींनी भारताची सुन व्हायचे स्वप्नही बघितलेले नव्हते. मग प्रियंका-राहुल यांच्या जन्माची तरी शक्यता त्या काळात कशी असेल? तिचे पिता राजीव गांधीही आमचेच समकालीन व आमच्या पिढीचे प्रतिनिधी. त्या आमच्या पिढीला देशभर कंठशोष करून शाळेत एक स्मरण मेंदूत ठसवले गेलेले होते. प्रत्येक १४ नोव्हेंबर उजाडला, की बालदिन शाळांमध्ये सक्तीने साजरा केला जायचा आणि आमचा चुलता पंडीत जवाहरलाल नेहरू असल्याचे आम्हाला स्मरणात ठेवायला भाग पाडले जात होते. त्यात मी होतो, तसेच नरेंद्र मोदी नावाचा गुजरातच्या वडनगर गावातला एक शाळकरी मुलगाही होता. अशा रितीने जे संस्कारातून आम्हाला ‘चाचा नेहरू’ वाट्याला आले, त्यातून इंदिरा गांधी नावाची एक चुलत बहीण आम्हाला मिळालेली होती. परिणामी तिचे दोन सुपुत्र, राजीव आणि संजय हे आमचे भाचे होतात. पुढे तेही मोठे झाले, वयाने वाढले आणि त्यांनाही मुले झाली, तर त्या मुलांना आम्ही त्याच नात्याने नातवंडे म्हणू शकतो. मुले नक्कीच म्हणू शकत नाही. म्हणजेच प्रियंकाशी नातेच सांगायचे असेल, तर मला किंवा माझ्या पिढीतल्या मोदींना प्रियंका नातीसारखी आहे, असे म्हणणे भाग नाही काय? बेटी जैसी न म्हणता त्यांनी ‘पोती जैसी’ अशा शब्दांचा वापर करायला हवा. नात्याची समज मोदींना राहिलेली नसल्याने बहुधा प्रियंकाला संताप आलेला असेल. आपला पिता राजीव गांधी याला भाचा समजण्याऐवजी मोदी भावाप्रमाणे संबोधतात, याचाही रास्त संताप प्रियंकाला आलेला असू शकतो. त्यामुळेच तिच्या रागाचे कारण आपण समजून घेतले पाहिजे.

   मोदी व आमच्या पिढीचा ‘चाचा’ नेहरू नावाचा कोणी या देशात जन्माला आला होता आणि त्यानेच सुरू केलेल्या राजघराण्यात आपला जन्म झाला; याचाच इतिहास प्रियंकाला माहित नाही काय?  पित्याचा किंवा त्याच्या हौतात्म्याचा इतका गर्व प्रियंकाला वाटतो, त्याला आमच्यासारख्या चाचाच्या भतीजंनी वर्षानुवर्षे मतदानाने राजघराण्यावर केलेली मेहरबानी कारणीभूत आहे, याचा विसर त्यांना कसा पडला? आमच्यासारख्या भतीजांनी ‘चाचा’कडेच पाठ फ़िरवली असती, तर दादी व पापा, असले शब्द लोकांसमोर उधळण्यासाठी प्रियंकाच्या शब्दकोषात सापडले नसते. समोर कॅमेरे आहेत आणि आपण बरळू ते थेट प्रक्षेपित होण्याची मस्ती, प्रियंकाला मस्तवाल करून गेली आहे. पण जो समाज कोणालाही कर्तृत्वाने ‘चाचा’ म्हणून स्विकारतो, तोच प्रक्षुब्ध झाला; तर सगळ्या नात्यांना तिलांजली देऊन सत्ताभ्रष्ट करू शकतो, असा या खंडप्राय देशाचा इतिहास आहे. प्रियंका-राहुलच्या राजघराण्यापेक्षाही शेकडो वर्षाची जुनी राजेशाहीची परंपरा असलेली अनेक घराणी व त्यांचे वारस आजही हयात आणि अस्तित्वात आहेत. त्यांच्याही पुर्वजांनी मोठे पराक्रम केलेत आणि हौतात्म्यही पत्करलेले आहे. तेव्हा असल्या वल्गना करीत फ़िरणार्‍यांचा इतिहासही प्रियंकाच्या भाटांनी जरा अभ्यासायला हरकत नसावी. आणि या राजकन्येला इतकाच नात्याचा तिटकारा असेल किंवा पावित्र्याची चाड असेल तर आधी अमेठी सोडुन दिल्ली गाठावी आणि सापडेल तिथे सलमान खुर्शीदचे थोबाड फ़ोडून काढावे. वर्षभरापुर्वी त्याच दिवट्याने काय मुक्ताफ़ळे उधळली होती? तेव्हा प्रियंका झोपा काढत होत्या, की आपल्या पतीराजांसाठी कुठल्या मोकळ्या जमीनी शोधत फ़िरत होत्या? राहुल या भावासाठी प्रियंका बोलतेय, म्हटल्याचा इतका राग आहे? मग सलमान खुर्शीद या भावासाठी प्रियंका बोलतेय, म्हटल्यास काय होईल?

   वर्षभरापुर्वी सोनियांची तब्येत बिघडलेली होती. अन्न सुरक्षा विधेयकावर संसदेत उशीरापर्यंत चर्चा चाललेली असताना त्यांना गुदमरल्यासारखे होऊ लागले. म्हणून थेट संसदेतून इस्पितळात न्यावे लागले होते. त्याविषयी दुसर्‍या दिवशीही बातम्या चालू होत्या. कुणा पत्रकाराने कॅमेरासमोर परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांना विचारलेले होते, त्यात त्या भल्या माणसाने सोनिया देशाचीच माता असल्याचे ठोकून दिलेले होते. प्रत्येक कॉग्रेसजन आणि भारतीयाची सोनिया माता असल्याचे बोलणार्‍या खुर्शीदबद्दल तेव्हाच प्रतिक्रिया द्यायला प्रियंकाला कोणी रोखले होते? की त्यांच्या कुटुंबाची नाती व त्यांचे घरोबे केवळ निवडणूका व राजकीय लाभाच्याच वेळी जागी होतात? रायबरेली व अमेठी म्हणजे आमचा परिवार आहे; असे आग्रहाने रोज बोलणार्‍या प्रियंकाला तिथले तमाम लोक आपल्या पित्याची अवलाद वाटते काय? तेव्हा पित्याविषयीचा अभिमान कुठे जातो? मते मागताना कोणाची बेटी वा बहीण त्याचे भान नसते आणि तो मुखवटा उतरला; मग त्या केवळ राजीव गांधींच्याच बेटी असतात काय? असायला अजिबात हरकत नाही. पण मग त्यांनी मोदी किंवा आमच्या पिढीच्या माथी मारलेल्या ‘चाचा’ नामक चुलत्याचे भूत उतरवावे. त्यासाठी आधी माफ़ी मागावी. कारण आमच्या बापाच्या जोडीला भलताच कोणी सक्तीने आणून बसवला गेला, त्याचा तरी अपमान आम्ही कशाला निमूट मान्य करावा? जर प्रियंकाला आपल्याच जन्मदात्याखेरीज दुसर्‍या कोणाला पित्याच्या पंक्तीला बसवणारे सार्वजनिक नाते वा तसे शब्द इतके विचलीत करणार असतील, तर तिच्या पणजोबाला आमच्या बापाचा भाऊ बनवणारी सक्तीही आमच्या स्वाभिमानाला इजा करणारी असते. ज्याचा वारसा राजेशाही उपभोगताना हवा असतो, त्याच्याही जुन्या शब्दाची माफ़ी मागण्याचे औदार्य दाखवायचे धाडस असायला हवे. भाट बडव्यांसमोर पोरकटपणा करून मिरवणे सोपे असले, तरी काळाच्या कसोटीवर असला पोरखेळ टिकत नसतो. कारण इतिहास व काळ अतिशय कठोर न्यायाधीश असतात. ते सेक्युलर वा जातीयवादी यासारखा पक्षपात करीत नाहीत.

1 टिप्पणी:

  1. भाऊ आपण खरेच नाठाळाच्या माथी काठी हाणली आहे. उत्तम लेख !

    प्रत्युत्तर द्याहटवा