सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

इतिहासातले ते अजोड उदाहरण

सामर्थ्य आहे चळवळीचे (२)

  महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खुप जुनी आहे आणि त्या परंपरेने या देशाची व समाजाची अस्मिता जागवण्याचे सातत्याने काम केलेले आहे. विशेषत: ज्या ज्या कालखंडात स्थानिक समाजामध्ये निराशा व दुबळेपणाची भावना सोकावली आणि परचक्र आले, तेव्हा सामाजिक पुरूषार्थाला ग्लानी आलेली होती. त्यावेळी हा समाज लढण्याची वा प्रतिकाराची कुवत गमावून बसला होता. त्या त्या काळात संतांनी अध्यात्माच्या मार्गाने अस्मिता जगवण्याचे बहूमोलाचे काम केलेले आहे. सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि प्रेषित महंमदाच्या निर्वाणानंतर इस्लामी धर्मप्रसारकांच्या झुंडीच्या झुंडी हातात तलवार घेऊन शस्त्रबळाने अनेक धर्मसंस्कृती जमीनदोस्त करीत सरसावल्या, त्याच काळात हिंदुस्तान वगळता अन्य देश इस्लामी आक्रमणाला शरण गेले. आपले अस्तित्व व अस्मिता हरवून बसले. त्याच काळात इस्लामसह ख्रिस्ती आक्रमणाला समर्थपणे तोंड देऊन आपली अस्मिता व संस्कृती जपू शकलेला जगाच्या पाठीवरचा एकच समाज आहे, त्याचे नाव हिदूधर्म आणि एकच देश आहे त्याचे नाव हिंदूस्तान. त्याच श्रेय प्रामुख्याने सामाजिक पुरूषार्थ किवा लढवय्येपणापेक्षाही जास्त, इथल्या संत परंपरेला आहे. कारण राजकीय सत्ता व त्यांचा पुरूषार्थ धर्म रक्षणात तोकडे पडले; तेव्हा ती जबाबदारी हत्याराशिवाय समर्थपणे पार पाडली, ती इथल्या संतांनी. मुर्तीपूजेच्या संस्कृतीमध्ये देवळांचे व मंदिरांचे महत्व इतके मोठे असताना आणि तीच धर्मस्थाने सत्तेच्या व तलवारीच्या बळावर जमीनदोस्त केली जात असताना, त्याच भोवती केंद्रीत झालेली धर्माची अस्मिता वेगळी संतांनीच अबाधित राखली. जे काम तेव्हा पराभूत मनोवृत्तीच्या लढवय्यांना करता आले नाही आणि धर्मसंस्कृतीला वाचवता आले नाही, त्या कालखंडात हिंदूस्तानी समाजाच्या श्रद्धा व अस्मिता मंदिराच्या बाहेर सुरक्षित व अभेद्य राखण्याचे काम संतांनी केले. अशी ही तेरा चौदा शतकांची संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्याच संत परंपरेतून प्रामुख्याने महाराष्ट्रातच अध्यात्माच्या मार्गाने नव्या भारतीय अस्मितेचा स्फ़ुल्लींग फ़ुलला. त्यांनीच अध्यात्मातून अस्मिता, अभिमान व झुंजार वृत्तीला जिवित ठेवले आणि पुनरुज्जीवित केले. त्या परंपरेतला शेवटचा दुवा समर्थ रामदास स्वामी असावेत हा योगायोग म्हणता येणार नाही.

   एका बाजूला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादींची सोशिक व सहिष्णूतेचे पाठ देणारी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. जिने वारकरी संप्रदाय निर्माण केला. जेव्हा आपला पिढीजात धर्म परकीय सत्ताधार्‍यांच्या जुलूमामुळे उघडपणे पाळण्याचे भय होते, तेव्हा नुसत्या वार्‍या व भजन प्रवचनाने या संतांनी आपल्या धर्माचे सामुहिकीकरण करण्याचे संघटनात्मक कार्य हाती घेतले होते. एकप्रकारे तेच सामाजिक व तितकेच राजकीय कार्य होते. कारण परचक्रामुळे आपल्याच धर्म संस्कृतीला राजाश्रय सोडाच संरक्षण मिळेनासे झाले होते आणि पुजारी वर्गाने समाजाचे सांस्कृतिक धार्मिक नेतृत्व करण्याकडे पाठ फ़िरवली होती. पर्यायाने समाजाच्या विविध घटकांमध्ये जातीपातीच्या वितुष्टातून विस्कळीतपणा येऊन, त्याच्या एकजीव असण्यालाच सुरुंग लागला होता. अशा विस्कळीत सांस्कृतिक समाजाचे लचके तोडले जात होते. त्याला उत्तर द्यायला ही संतांची परंपरा सामाजिक गरज म्हणून निर्माण झाली. पण त्या वारकरी संप्रदायातील संत आणि समर्थ रामदास स्वामी यात मोठाच फ़रक आहे. वारकरी संप्रदायात समर्थ रामदास आढळत नाहीत. ते संन्याशी व शस्त्रबळाचे उपासक असल्यासारखे दिसतात. त्यांनी अध्यात्माचे धडे दिलेले असले तरी त्यातली राजकीय व लढावू शिकवण मोलाची होती, आधीच्या संतांनी आणि वारकरी संप्रदायाने जगवलेल्या अस्मितेला जोजावत सामर्थ्यशाली बनवण्याचे पाठ समर्थांच्या शिकवणीत दिसतात. त्याच कालखंडात नव्याने क्षात्रधर्माचा व लढवय्या वर्गाचा उदय होऊ लागला होता. शिवरायांच्या रुपाने जाणता राजा व श्रीमान योगी उदयास येत होता. व्यक्तीगत महत्वाकांक्षा व राजलालसा याच्या पलिकडे जाऊन समाज व राष्ट्रधर्माचा विचार करू शकणारा राजा उदयास येत होता. सत्ता व धनदौलत मिळवण्यात बाकीचे राजे सरदार गर्क असताना राष्ट्राचा उद्धार करायला कटीबद्ध झालेला नवा राजा नवे साम्राज्य निर्माण करायला पुढे सरसावला होता. असे दोन महात्मे महापुरूष नेमक्या एकाच काळात महाराष्ट्राने बघितले. त्यांनी परस्पर पुरक काम करताना बघितले. त्यांच्या त्याच कामातून परचक्राला थोपवणारी पहिली ताकद अवघ्या हिंदूस्तानात फ़क्त महाराष्ट्राय्त उदयास आली. शेकडो वर्षे राजयोग भोगणारे व पिढीजात सत्ता भोगून आळसावलेले अमीरउमराव, सरदार राजे परचक्राला शरण जात असताना शिवरायांनी हिंदुस्तानचे नवे सामाज्य उभारण्याचे स्वप्न बघितले आणि त्याचा पायासुद्धा घातला. तोच नेमका समर्थ रामदास स्वामींचा कालखंड असावा हा योगायोग मानता येणार नाही. दोघांच्या कार्यातला समान दुवाही समजून घेण्यासारखा आहे. पण दुर्दैव असे, की त्यांच्यातले संबंध व नाते शोधण्याचेच वादविवाद रंगवले जातात.

   एका बाजूला समर्थ रामदास स्वामी जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांचीच थोरवी हिरीरीने मांडणारे असतात आणि दुसर्‍या बाजूने आपल्या जातीचा म्हणूनच शिवरायांना बघणारे जन्माने त्यांना मराठा म्हणून त्यांच्या ऐतिहासिक अपूर्व कार्याचा संकोच जातीपुरता मर्यादित करू बघतात. त्यातून समर्थ हे शिवरायांचे गुरू होते किंवा नव्हते, यावरून विवाद रंगवला जातो. तर दुसरीकडे त्याच दोघांना एकमेकांचे शत्रू म्हणूनही पेश करण्याचा आक्रस्ताळेपणा रंगतो. दोघांनी केलेले काम देशाच्या व समाजाच्या पुनरुत्थानाचे आहे, याकडे मग सोयीस्कर दुर्लक्ष होते. एक आपल्या अध्यात्मिक बुद्धीमत्तेतून भारतीय समाजातील पुरूषार्थ जागवण्याचे अविरत कार्य करीत होता आणि दुसर्‍याच्या राष्ट्र उभारणीच्या स्वप्नाला पुरक अशी कामगिरी बजावत होता. शिवराय संसारी जीवनात व राजकीय सत्तेच्या क्षेत्रात असूनही अध्यात्मिक होते आणि समर्थ रामदास अध्यात्माच्या क्षेत्रात असूनही राजकीय लढ्याला प्रोत्साहन उत्तेजन देण्याच्या कामात गर्क होते. हे दोघे कधी कुठे भेटले किंवा त्यांचे परस्परांशी कसे संबंध होते; हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. असायलाही हरकत नाही. पण त्या दोघाचे मार्ग व काम परस्परांना छेद देणारे अजिबात नव्हते, ही महत्वाची बाब आहे. त्याकडे पाठ फ़िरवून इतिहासाचेही खरे व योग्य आकलन होऊ शकणार नाही. कारण दोघांनाही एका विशिष्ठ परिस्थितीने जन्माला घातले होते आणि घडवले होते. त्यांचे जीवनकार्यच परस्पर पुरक होते, ही वस्तुस्थिती कुठलाही इतिहास नाकारू शकणार नाही. मग त्यातल्या एकाने दुसर्‍याला गुरू मानलेला असो किंवा दुसर्‍याने पहिल्याला अनुग्रह दिलेला असो वा नसो. दोघांची भेटही झालेली नसेल, म्हणून बिघडत नाही. पण त्यांनी महाराष्ट्र व भारतीय इतिहासामध्ये बजावलेली कामगिरी विलक्षण परस्पर पुरक आहे. म्हणूनच इतिहासातले ते अजोड उदाहरण मानावे लागेल. मग ते सत्य कोणाला आवडणारे असो किंवा नसो.

   दोघांमधले विलक्षण साम्य नजरेत भरणारे आहे. कारण दोघांनीही आधीच्या संत वा राजकीय परंपरांना छेद देऊन आपला मार्ग चोखाळला आहे, शिवाजी राजांकडे सरदारी वा सरंजामी होती. पिढीजात चालत आलेली चाकरी झुगारण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला. आयती मिळालेली जहागिरी उपभोगण्यापेक्षा त्यांनी स्वयंभू स्वतंत्र अस्मितेचा आणि रयतेचा राजा होऊन त्यांनी रयतेला तिच्या अस्मितेसाठी लढायला उभे केले. सामान्य घरातून तळागाळातून लढवय्ये उभे करून त्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. म्हणजेच जहागिरीची मळलेली वाट सोडून शिवराय वेगळी वाट चालत गेले. दुसरीकडे समर्थ रामदास यांनी गोसावी किंवा संत म्हणून राजकारणाकडे पाठ फ़िरवली नाही. संत असून वारकरी संप्रदायाचा भजन पूजनाचा मंत्र लोकांना देण्यापेक्षा परकीय सत्तेला डिवचणार्‍या धार्मिक स्वयंभूत्वाची शिकवण अध्यात्मातून देण्याचा नवाच मार्ग चोखळला. देव देव्हार्‍यात नाही, अशी शिकवण देऊन हिंदू अस्मिता जगवणार्‍या संतांच्या परंपरेतल्या समाजाला त्यांनी देवळे उभारण्याकडे वळवले. त्यातून उजळमाथ्याने व अभिमानाने आपल्या धर्माचा हुंकार करण्यास उभे करण्याचा पवित्रा घेतला, समाजाला आपल्या धर्मासाठी व अस्मितेसाठी लढायची उमेद व प्रेरणा रहात्या गावात मिळावी, म्हणून गावागावात मंदिरे उभारण्याचा सपाटा लावला. आपली अस्मिता देवळात म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतिक गावागावात उभे करून त्याच्या संरक्षणार्थ उभे रहाण्याचे आवाहनच समर्थांनी चालविले होते. त्यातून जी लढण्याची व प्रतिकाराला पुढे येण्याची चालना निर्माण झाली, ती स्वराज्याच्या उभारणीसाठी लढवय्ये निर्माण व्हायला हातभार लावणारी होती. थोडक्यात आपापल्या भिन्न मार्गाने दोघे महापुरूष भारतीय समाजाची व अस्मितेची नव्याने उभारणी करायचे परस्पर पुरक काम एकाच वेळी करताना दिसतात. त्यांच्या कामात परस्पर विरोध नव्हता किंवा विरोधाभासही दिसत नाही. (अपूर्ण)

५ टिप्पण्या:

  1. समर्थाचे धर्मकारण हे छत्रपतीच्या राजकारणाला पूरकच होते. संपूर्ण भारतभर प्रवास केल्यानंतर समर्थ हे चाफळच्या खोऱ्यात स्थिरावले व हरिकथा निरुपणा बरोबरच राजकारणही केले . आणि सर्वात मह्वत्वाचे म्हणजे 'शिवरायाचे आठवावे रूप ,शिवरायाचे आठवावे प्रताप शिवरायाचे आठवावे साक्षेप भूमंडळी ,शिवरायाचे कैसे बोलणे ,शिवरायाचे कैसे चालणे ,शिवरायाचे सलगी देणे कैसे आसे . छत्रपतिनाएवढे बरकाइने जाणणारा माणूस शिवरायांना भेटला नसेल हे अशक्य वाटते .'

    उत्तर द्याहटवा
  2. समर्थ आणि सत्य --
    आम्ही मराठवाड्यात राहतो
    मराठवाडा हैदराबाद संस्थाना चा भाग होते .
    इथे फक्त आणि फक्त निजामशाही होती--
    इथे शेकडो वर्ष मुसलमानी शासन होते ....
    अशा वेळी .. रामदास स्वामिनी..हिंदुना शक्तीपूजन शिकवले
    शक्तीपुजक देव कोणता --- मारुती
    म्हणून त्यांनी गाव-गावात मारुती मंदिर स्थापन केले
    त्यांनी स्वतः स्थापन केलेले ११ मारुती याच भागात आहेत
    जेथे आपल्या शिवरायांची शिवशाही नव्हती ......
    त्यांनी शिष्यगण तयार केले ज्यांनी गावोगाव मारुती मंदिरे स्थापले (आज आपल्या जवळपास सर्व गावात असलेली मारुती मंदिरे रामदास कालीन आहेत ).....
    त्याचा परिणाम -- समर्थांचा वावर ज्या आजच्या मराठवाड्यात होता तेथील मुसलमानांची संख्या आणि आजच्या हैदराबाद-निजामाबाद भागातील मुसलमानांच्या संख्येचा अभ्यास करावा.. किती फरक आहे...

    उत्तर द्याहटवा
  3. जगाच्या इतिहासात सर्वात जास्त कलह, युद्धे, वंशसहार धर्मामुळे झालेले आहेत. धर्मामुळे माणूस माणसापासून दूर जातो. कांही जणांना तर माणसापेक्षा प्राणी जवळचे वाटायला लागतात.

    उत्तर द्याहटवा