बुधवार, २१ जानेवारी, २०१५

कुठली कुठली मराठी बोलीभाषा?


गेल्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे बहुधा २९/३० डिसेंबरला एबीपी माझा वाहिनीतर्फ़े एक एव्हेन्ट योजली होती. ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’. त्यासाठी महाराष्ट्राच्या पाच प्रमुख मंत्र्यांना आमंत्रित केले होते. त्यांनी अर्ध्या वेळेत आपली व्हिजन मांडावी आणि मग निमंत्रित पाहुण्यांनी त्यांना मोजके प्रश्न विचारून स्पष्टीकरण घ्यावे, असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. पन्नास साठ निमंत्रितांच्या गर्दीत मीसुद्धा एक होतो. सर्वांनाच अल्पावधीत प्रश्न विचारण्याची संधी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे शक्य तो तिथे गप्प बसणेच मी पसंत केले. शिवाय प्रश्न विचारणार्‍यातच अनेकजण स्वत:चीच व्हिजन मांडणारे निघाल्याने, मंत्र्यांचीच गोची झालेली दिसत होती. आणखी एक भाग असा, की बहुतेक मंत्र्यांना बहुधा विषय उमगलेला नसावा. कारण एक सलग भाषण ठोकण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मंत्री आपापल्या खात्याच्या  ‘प्रोव्हीजन’बद्दलच बोलत होते.

असो, त्यात एक मंत्री होते शिक्षणखाते संभाळणारे विनोद तावडे. त्यांनीही मराठी भाषा, मराठी शाळा व भाषा संवर्धन यावर आपली कल्पना मांडली. त्यात मराठीच्या ६० बोलींचे संवर्धन करण्याची छान कल्पना त्यांनी मांडली. मला त्यांना कुठला प्रश्न विचारणे साधले नाही. पण आवरल्यावर निघताना त्यांनी अगत्याने कोपर्‍यात असलेल्या माझ्याकडे येऊन विचारणा केली. तशी ती माझी व तावडे यांची पहिलीच भेट. बोली संवर्धनाच्या कल्पनेविषयी मी त्यांचे तात्काळ अभिनंदन केले होते. पण माझ्या माहितीप्रमाणे ९२ बोलीभाषा मराठीत असल्याचे सांगून, त्यांच्या चुकीवर बोट ठेवण्याचा आगावूपणा मी तिथेच केला. तावडे यांनीही हुज्जत न करता, त्यांना तसे प्रा. कोथापल्ले यांच्याकडून कळल्याचे स्पष्टीकरण केले. अर्थात तावडे यांचा ६० मराठी बोली असल्याचा दावा जितका चुकीचा होता, तितकाच माझा ९२ बोली असल्याचा दावाही चुकीचाच होता. कित्येक वर्षापुर्वी वाचलेले पुस्तक मला पुरेसे लक्षात नसल्याने मी ९२ ह्या आकड्याचा आग्रही होतो. त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. कारण मी ज्या आधारावर तसा दावा केला होता, त्यात ७२ मराठी बोलींची नोंद आहे.

अर्थात तिथेच मी त्या पुस्तकाविषयी नामदार तावडे यांना सांगितले होते. फ़ार वर्षापुर्वी एका इंग्रज साहेबाने मराठी बोली भाषांचे संकलन केले होते. त्यात त्याने मूळ पुणेरी प्रमाण मराठी भाषेचा एक उतारा घेऊन, त्याचे उच्चारानुसार देवनागरी लिपीत लिहीलेले पुस्तक माझ्या हाती लागले होते. हे ऐकताच तावडे यांनी त्याची प्रत अगत्यपुर्वक मागितली आणि मी त्याची झेरॉक्स त्यांना देण्याचे मान्य केले आहे. माझ्या अडगळीत हे पुस्तक हाती लागण्यात इतका काळ गेला. पण ते सापडल्यावर माझा आगावूपणा लक्षात आला. कारण त्यात ७२ बोलींची नोंद आहे. दुर्दैव असे, की एक रुपया मूल्य असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन किती साली झाले, त्याची नोंद त्यावर आढळत नाही. पण किंमत बघता १९६० च्या दशकात त्याचे प्रकाशन झालेले असावे. मराठी संशोधन मंडळातर्फ़े त्याचे प्रकाशन झालेले असून ‘मराठी संशोधनपत्रिका वर्ष ११ मध्ये प्रसिद्ध’ अशी पुस्ती त्याच्या मुखपृष्ठावर आहे.

शिक्षणमंत्र्यांना त्याचा उपयोग करता येईल व मराठी बोलीभाषांचे संवर्धन काता येईल, यासाठी त्याची झेरॉक्स प्रत त्यांना लौकरच देणार आहे. पण इथे माझ्या फ़ेसबुक मित्रांसाठी त्यातली एक बोली प्रतिदिन नित्यनेमाने टाकायचा विचार आहे. म्हणजे असे, की प्रमाण मराठी अशी जी बोली मानली जाते, त्या पुणे जिल्हा मराठी बोलीचा तेवढा परिच्छेद अधिक वेगळ्या बोली भाषेतील त्याचे उच्चारानुसार देवनागरीतले स्वरूप टाकणार आहे. फ़क्त ती मराठीची बोली कुठली असावी, त्याचा अंदाज मित्रांना करण्यासाठी एक दिवस द्यावा, असा विचार आहे. म्हणजे दुसर्‍या दिवसाच्या पोस्टमध्ये आदल्या दिवसाच्या मराठी बोलीचे नाव दिले जाईल. किती लोकांना मराठीच्या बोली ओळखता येतात, त्याचा गमतीशीर खेळ यातून होऊ शकेल.

पियर्सन नावाच्या कुणा इंग्रज साहेबाने या बोलींचे संग्रहण केलेले असावे. कारण पुस्तकाच्या आरंभी मुखपृष्ठावरच म्हटले आहे, ‘पियर्सन संग्रहीत मराठी बोलींचे नमूने’. मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा याचे संग्रहण झाले, तेव्हाची प्रमाण मराठी पुणेरी बोलीही आजच्या प्रचलित पुणेरी बोलीपेक्षा खुपच जुनाट वाटणारी आहे. ती पुढीलप्रमाणे:-

मराठी (प्रमाण)  पुणे जिल्हा

कोणे एके मनुष्यास दोन पुत्र होते. त्यातील धाकटा बापास म्हणाला, बाबा, जो मालमत्तेचा वाटा मला यावयाचा तो दे. मग त्यानें त्यांस संपत्ति वाटून दिली. मग थोडक्या दिवसांनी धाकटा पुत्र सर्व जमा करून दूर देशांत गेला. आणि तेथें उधळेपणानें वागून आपली संपत्ति उडविली. मग त्यानें सर्व खर्चिल्यावर त्या देशांत मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे त्याला अडचण पडूं लागली. तेव्हा तो त्या देशांतील एका गृहस्थाजवळ जाऊन राहिला. त्यानें तर त्याला डुकरे चारावयास आपल्या शेतांत पाठविलें.

खालची काल २२ जानेवारीला पोस्ट केलेली जी मराठी बोली होती ती बुलडाणा जिल्हा अशी उपरोक्त पुस्तकात नोंद आहे.
क्रमांक (१)  बुलडाणा जिल्हा


कोणा एका माणसास दोन मुलगे होते । त्यापैकी धाकटा बापास म्हणाला, बाबा माझ्या हिशाची जिनगी मलाद्या । म्हणून बापानें आपली जिनगी दोघांमध्यें वांतून दिली । थोड्याच दिवसांनी धाकटा मुलगा आपली सर्व जिनगी घेऊन देशांतरास गेला: व तेथें त्यानें चैनबाजी-मध्यें आपली सर्व जिनगी उडविली । त्याचा सर्व पैसा या रितीनें खर्च झाल्यावर त्या देशांत मोठा दुष्काळ पडला । व त्यामुळे त्यांस फ़ार ददात पडूं लागलीं । नंतर तो एका गृहस्था-कडे जाऊन राहिला । त्या गृहस्थानें ह्याला आपल्या शेतांत डुकरें राखण्यास ठेविलें ।

===============================

क्रमांक (२)  विजापुरी बोली   (विजापूर जिल्हा) (२३ जानेवारी २०१५)

कुनि योक मानसाला दोन ल्योक होते । त्यातला ल्हानगा बापास म्हंटला, बाबा, माजे वाटनीचा माल मला दे । मग त्येन वाटनी करून दिलि । मग थोडक्या दिवसांनि दाकटा ल्योक समदि माल गोळा करून गेवून-श्यानि दूर मुलकास गेला । तत उदळेपण करून समदि जिंदगी हाळ केला । मग समदि जिंदगी हाळ केल्यावर मोटा दुकूळ पडला । त्या-मुळ त्यासनि अडचन होवू लागली । तवा तकडच योक मानसा-जवळ चाकरी राहिला । त्येन त्यासनि डुकर राकायला आपले सेताला लावून दिला ।

===============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा