मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

नवा संरक्षणमंत्री: आहे ‘मनोहर’ तरीकॅच-२२ नावाचे एक इंग्रजी पुस्तक खुप गाजलेले आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहीलेले ते अत्यंत विनोदी पुस्तक आहे. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक व त्यातून विनोद निर्मिती, असा तो एकुण प्रकार आहे. युद्ध ज्याला अजिबात आवडलेले नाही आणि सक्तीच्या भरतीमुळे जो युद्धात ओढला गेलेला इसम आहे, त्याचा वैताग अशा विनोदबुद्धीने त्या पुस्तकात व्यक्त झालेला आहे. त्यातला एकजण म्हणतो, त्याच्याच हत्येचे कुटील कारस्थान या युद्धाचे मुळ कारण आहे. बाकी त्या युद्धामागे अन्य काही दुसरा हेतू नाही. ही अतिशयोक्ती नाही काय? सक्तीने भरती झालेल्या एका कुणा नगण्य सैनिकाला मारण्यासाठी असे जागतिक युद्ध होऊ शकते काय? पण ज्या इसमाचे पात्र असा दावा करताना रंगवले आहे, त्याचे सर्व युक्तीवाद तितक्या टोकाला जाणारे आहेत. कित्येक वर्षापुर्वी वाचलेल्या त्या पुस्तकाची  गेल्या आठवड्यात आठवण झाली, त्याचे श्रेय सेक्युलर राजकीय विश्लेषक व समाजवादी पत्रकार प्रकाश बाळ यांनाच द्यावे लागेल. कारण दैनिक ‘दिव्य मराठी’त त्यांनी लिहीलेल्या एका व्यत्यासपुर्ण लेखामुळे त्या पुस्तकातले विनोद नव्याने आठवले. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या लेखाचे शिर्षक आहे, ‘परामर्श: मोदी विरोधकांना ही उमज पडेल?’ त्यातले अनेक युक्तीवाद व तपशील, उदाहरणे बघितली तर जगातली प्रत्येक गोष्ट केवळ रा. स्व. संघाच्या इच्छेनुसारच घडत असते आणि जे काही घडते त्यामागे संघाचे कारस्थानच असते, इतकाच निष्कर्ष निघू शकतो.

विश्वहिंदू परिषदेचा घरवापसीचा कार्यक्रम असो, किंवा पर्रीकर यांनी भारतीय सुरक्षेविषयी व्यक्त केलेली मते असोत, त्या सर्वच गोष्टींची एकत्र गोळाबेरीज करून प्रकाश बाळ यांनी, अशा तमाम घटनांमागे संघाने शिजवलेले एक कारस्थान असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अर्थात असे परामर्ष घेऊन शेवटी आधीच ठरलेला निष्कर्ष काढणार्‍यांना आजकाल सेक्युलर म्हणून ओळखले जाते. संघाच्या स्थापनेपुर्वीच फ़्रान्सची राज्यक्रांती झाली. त्यामागेही संघाचा हात असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला तर आपण नवल मानण्याचे कारण नाही. ही आता एक मानसिकता झालेली आहे. म्हणूनच कोणीही संघवाला, भाजपावाला किंवा हिंदूत्ववादी काहीही बोलला, तर त्यामागे पुर्वनियोजित कारस्थान असते, या समजूतीमधून अशा लोकांना बाहेर काढणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. कारण तसे ब्रह्मदेव करायला गेला, तरी त्याच्याही मागे संघाचे कारस्थान असल्याचे पुरावे असे बाळबुद्धीचे सेक्युलर देऊ शकतात. प्रजासत्ताकदिनाच्या अगोदर हिंदी ‘विवेक’च्या एका समारंभात भाषण करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही महत्वाच्या गोष्टीचा उहापोह केला होता. बाळ यांनी त्यांच्यासह प्रकाश वर्मा या अन्य मंत्र्याचे विधान जोडून विस्तृत विवेचन केलेले आहे. वास्तविक त्यांनी कुठलेच विवेचन केलेले नाही. संघाशी संबंधित विविध व्यक्तींच्या वेग्वेगळ्या विधानांची जंत्री आपल्या लेखात मांडली असून त्याच्या आधारे देशातील धर्मनिरपेक्षता संपवायचे ते कारस्थान असल्याचा नुसता दावा केला आहे. तो दावा म्हणजेच बाळ यांचा निष्कर्ष अहे. थोडक्यात सगळा दावाच निराधार व निरर्थक आहे. त्यापैकी एका मंत्र्याचे विधान त्यंनी हास्यास्पद म्हटले आहे आणि दुसर्‍या म्हणजे पर्रीकर यांच्या विधानाला अतिरेकी स्वरूपाचे मानून ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे विश्लेषणही केले जाऊ शकेल असे बाळ म्हणतात. मात्र त्यापैकी काहीच त्यांनी या लेखातून केलेले नाही. पण या निमीत्ताने सेक्युलर मंडळी भाजपाच्या यशाने किती भांबावून गेली,त त्याचे प्रदर्शन मात्र मांडले आहे.

 पर्रीकर यांचे विधान अतिरेकी कशासाठी मानायचे? कुठलीही गोष्ट नुसतीच मानायची आणि नंतर त्याचे विश्लेषण करायचे, हा अशा लोकांचा खाक्या झाला आहे. म्हणूनच त्यांना वास्तवाचा आधारही लागत नाही. ही मंडळी आपल्या भ्रामक जगात वावरत असताता आणि कल्पनाविश्वात जसे भास होतील, त्यालाच वास्तव समजून विश्लेषण म्हणून ठोकून देत असतात. जिथे विश्लेषण करणे शक्य नाही, तिथे मग हास्यास्पद म्हणायचे किंवा अतिरेकी मानायचे, हा सोपा मार्ग होऊन बसला आहे. अन्यथा प्रकाश बाळ किंवा तत्सम अर्धवटरावांनी पर्रीकर यांचे विधान खोडून काढण्याचे कष्ट घेतले असते. आपली जी ‘बाळ’बुद्धी आहे तिला थोडाफ़ार ताण देऊन पर्रीकरांना दोषी ठरवले असते. पण बाळ त्यापैकी काहीच करत नाही. तेच कशाला या संदर्भात पर्रीकर यांच्या विधानावर गदारोळ उठवणार्‍या कोणीच तो विषय समजून घेतला नाही किंवा त्याचे विश्लेषण करायचा प्रयासही केलेला नाही. मात्र अरंभीच्या गदारोळानंतर त्यांचेच कान त्यांच्यापैकी कु्णा शहाण्याने उपटलेले असावेत. म्हणून दोनतीन दिवसातच पर्रीकरांच्या खळबळजनक आरोपाविषयी सगळीकडे सन्नाटा पसरला. कारण बाळबुद्धीने त्या विधानाचे विश्लेषण होत गेले असते आणि अधिकाधिक खोल चर्चा झाली असती, तर त्यातून संघाचे नव्हेतर सेक्युलरांचे देशद्रोही कारस्थान उघडे पडायची वेळ आली असती. सहासात महिन्यापुर्वी तशीच वेळ आली होती. पण घाईगर्दी करून त्यावर सेक्युलर पडदा पाडला गेला होता.

आपल्या या लेखामध्ये प्रकाश बाळ यांनी पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा उल्लेख केला आहे. तसाच, त्यांच्याशी संबंधित दोन संस्थांचा उल्लेख केलेला आहे. अशा संस्थांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल बाळ कमालीचे अस्वस्थ दिसतात. पण तशाच पाकिस्तानी संस्थांबद्दल मात्र प्रकाश बाळ मौन धारण करतात. अजित डोवाल यांच्यासह त्यांचे पुत्र विवेकानंद फ़ौडेशन या संस्थेत होते आणि तिचा संघाशी संबंध आहे. एवढ्याने बाळ विचलीत झाले आहेत. पण त्यांचेच सेक्युलर सगेसोयरे तशाच रिजनल पीस इस्टीट्युट नामक संस्थेशी लागेबांधे ठेवून आहेत, याबद्दल प्रकाश बाळ अनभिज्ञ कशाला असतात? याच संस्थेच्या एका परिषदेसाठी दिलीप पाडगावकर, बरखा दत्त, सिद्धार्थ वरदराजन, मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शिद असे एकाहून एक दिग्गज सेक्युलर पाकिस्तानात गेलेले होते. त्याविषयी बाळ यांनी कधी विश्लेषण केले आहे काय? त्या संस्थेचे धागेदोरे वा गोत्र शोधायचा प्रयास केला आहे काय? सहासात महिन्यापुर्वी वेदप्रताप वैदिक नावाच्या इसमाने सईद हाफ़ीज नामक जिहादी घातपात्याला भेटुन खळबळ माजवली. तेव्हा प्रकाश बाळ कुठल्या बिळात दडी मारून बसले होते? त्यांना त्या संस्था वा तिच्या परिषदेला इथून गेलेल्यांचे वर्तन तपासून बघायची गरज कशाला वाटली नव्हती? आज पर्रीकर या भारतीय संरक्षणमंत्र्याचे विधान अतिरेकी ठरवण्याचा उतावळेपणा करणर्‍या असल्या शहाण्यांना पाकिस्तानशी जवळीक साधलेल्या भारतीय सेक्युलर विद्वानांच्या विधानांचे विश्लेषण करायची बुद्धी कशाला होत नाही? उलट त्याच सेक्युलर अतिरेकाने भारतीय नागरिकांची व देशाची सुरक्षा धोक्यात आलेली असताना, त्यावर पर्रीकरांनी बोट ठेवल्यानंतर बाळ शेपटीवर पाय पडल्यासारखे खवळतात कशाला? बाळपासून देशभरच्या सेक्युलरांना पर्रीकरांचे विधान झोंबले, कारण खाई त्याला खवखवे.

संरक्षणमंत्र्यानी कुठलेही अतिरेकी विधान केलेले नाही. उलट त्यांनी अतिशय संयमी विधान केलेले आहे. जे उघड आहे, तेही सांगताना पर्रीकर यांनी दाखवलेला संयमच प्रकाश बाळ व इतर सेक्युलरांना झोंबलेला आहे. आजवर कुठला राजकारणी जे सत्य खुलेआम बोलायला धजावत नव्हता, ते सौम्य शब्दात का होईना, पर्रीकर बोलले आहेत. काही पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोडी केल्या, असे पर्रीकर म्हणतात, त्याचा साधसरळ अर्थ असा, की या सत्ताधीशांनी देशाच्या सुरक्षेला दगाफ़टका केला असा आहे. कुठल्याही देशाच्या सुरक्षेमध्ये जितका हेरखाते व गुप्तचरांचा हिस्सा असतो, त्याच्या अनेकपटीने शत्रू गोटात कार्यरत असलेल्या हस्तकांचा हिस्सा असतो. जितके तुमचे हेरखाते सजग व तल्लख, तितके कमी रक्त सांडून सुरक्षा राखता येत असते. १९७१ सालच्या बांगला युद्धात भारताने दैदिप्यमान यश मिळवले, त्यामागे सैनिकी शक्तीपेक्षाही नेमकी मोक्याची माहिती देणार्‍या भारतीय गुप्तचरांचे कष्ट अधिक उपयुक्त ठरले होते. अशा हेरांना वा शत्रू गोटातील हस्तकांना असेट म्हटले जाते. ते जितके भक्कम व मोक्याच्या जागी असतात, तितके तुम्हाला सैन्यबळ कमी वापरावे लागत असते. तेव्हा अल्पावधीत भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभूत केले व शरणागत केले होते. उलट आज मुठभर पाक जिहादी व घातपाती यांना अतिशय सज्ज आसलेली भारतीय सेना रोखू शकलेली नाही. कारण आज पाकच्या गोटात भारताचे असेट तितके भक्कम नाहीत. पण भारतात मात्र पकिस्तानचे असेट मोक्याच्या जागी बसलेले आहेत. आणि मुंबईच्या विवेक साप्ताहिकाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी अप्रत्यक्षपणे त्याच पाकिस्तानी ‘भारतीय’ असेटकडे अंगुलीनिर्देश केलेला होता. मग असे असेट आहेत, त्यांना दरदरून घाम फ़ुटला तर नवल कुठले? कोण आहेत असे भारतातले पकिस्तानी असेट? ४८

वेदप्रताप वैदिक प्रकरणाने अशा असेटचा मुखवटा टरटरा फ़ाडून टाकलेला आहे. ज्या परिषदेला उपस्थित रहायला वैदिक पाकिस्तानात गेले होते, ती परिषद भरवणार्‍या संस्थेचा बोलविता धनी पाकिस्तानी हेरसंस्था आय एस आय आहे. त्याच संस्थेचे नाव रिजनल पीस इस्टीट्यूट असे आहे. ज्या संस्थेचे दोन संचालक असद दुर्रानी व अहसान उल हक हे माजी आय एस आय प्रमुख आहेत. अशा संस्थेचा एकमेव भारतीय संचालक मणिशंकर अय्यर असतो. त्याविषयी बाळ यांना कधीच चिंता कशाला वाटलेली नाही? गेल्या दोन दशकापासून भारतात कुठेही स्फ़ोट घातपात वा अपहरणाची घटना घडल्यावर ज्या आय एस आय याच पाक संस्थेकडे बोट दाखवले जाते. तिच्याशी संबंधित असलेल्या दोघा व्यक्तींशी मणिशंकर अय्यर यांची जवळीक बाळसारख्यांना खटकत नाही. पण भारतात इथल्या सुरक्षेसाठी संरक्षणमंत्र्यांनी वर्मावर बोट ठेवले, मग बाळ यांना ते अतिरेकी विधान वाटते. किती अजब गोष्ट आहे ना? ज्या गुप्तचरांनी मायदेशच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावले आहेत, त्यांच्या विषयी असे सेक्युलर शंका घेणार आणि ज्यांनी केवळ भारतीय निरपराध नागरिकांच्या हत्येचेच कट शिजवण्यात हयात खर्ची घातली, त्यांच्याशी सलगी करणार्‍याविषयी बाळसारखे विद्वान अवाक्षर बोलणार नाहीत. त्याचे विश्लेषण करणार नाहीत. किती चमत्कारीक असते ना सेक्युलर ‘बाळ’बुद्धी?

पर्रीकर यांनी आपल्या भाषणातून देशाच्या सुरक्षेसाठी शत्रू गोटातली माहिती मिळवणार्‍या हस्तक व हेरांच्या कमतरतेची चिंता व्यक्त केली. पण त्यामुळे शत्रूचे आपल्या गोटातील हस्तक चिंतातूर झालेले दिसतात. अन्यथा बाळपासून तमाम सेक्युलर गोटात इतकी खळबळ कशाला माजली असती? पर्रीकर यांनी ‘डीप असेट’ म्हणजे शत्रू गोटातील आपल्या हस्तकांची कमतरता जाणवते, त्याची खंत व्यक्त केली. कारण तसे हस्तक मोक्याच्या जागी असते तर पाकिस्तानी सेनेला वा त्यांच्या अघोषित युद्धाला भारतीय सेनेने केव्हाच मोडीत काढले असते. पण उलटच घडते बाहे. कारण भारतातच पाकिस्तानचे असेट म्हणजे हस्तक मोक्याच्या जागी बसले अहेत. त्याचे पुरावे फ़ार कुठे शोधण्याची गरज नाही. अय्यर यांच्यासोबत पाकिस्तानला गेलेल्या पत्रकार बुद्धीमंतांची नावे व कर्तबगारी तपासली, तरी ते कसे नेहमी पाककडे झुकलेले असतात, त्याची साक्ष मिळेल. जेव्हा जेव्हा भारताने पाकिस्तान विरोधत कठोर भूमिका घेतली आहे, तेव्हा जणू पाक नागरिक असल्याप्रमा्णे यातले सर्वजण ठामपणे भारताच्या कठोरपणाला सौम्य करायला झटलेले दिसतील. शांतता हवी, बोलणी करा, लढाईने प्रश्न सुटत नाहीत, असा ओरडा करणार्‍यात यातले बहुतेक पत्रकार संपादक आघाडीवर दिसतील, पाकच्या जिहादी वा घातपाती धोरणावर कधी टिका करताना ते दिसणार नाहीत. आणि नेमक्या त्यांनाच पाकची अशी संस्था पाहुणचार देऊन चर्चेची आमंत्रणे कशाला देत असते? की भारताने आक्रमक धोरण घेतल्यावर यांनी त्यात कसा खोडा घालावा, त्याचे प्रशिक्षण द्यायला अशी आमंत्रणे दिली जातात काय?

नसेल तर याच लोकांनी दोन वर्षापुर्वी तेव्हाचे भारतीय लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या एका विधानावर काहूर कशाला माजवले होते? काश्मिरमध्ये राजकीय पक्षामध्ये लष्कराचे काही हेर घुसून आपल्याला हवे तसे घडवून आणतात, त्यासाठी लागणारा पैसा भारतीय सेनादलाने पुरवलेला असतो, असे सिंग म्हणाले होते. त्यात गैर काय होते? आय एस आयच्या पैशावर चंगळ करायला पाकिस्तानात जाणारेच तेव्हा काश्मिरात भारतीय सेनादलाच्या पैशाचा वापर राजकीय कारवायांसाठी होत असल्याची तक्रार करत होते. किती अजब युक्तीवाद आहे ना? पाक सेनेने अशा भारतीय राजकारणी व बुद्धीमंतांना मौजमजा करायला सेनेचा पैसा खर्च केलेला चालतो. मात्र तेच भारतीय सेनेने काश्मिरमध्ये केल्यावर या चंगळखोरांच्या पोटात दुखू लागते. प्रकाश बाळ यांच्यासारख्यांना तेव्हा उलट्या कशाला होत नाहीत? इथे कोण कोण पाकिस्तानचे हितसंबंध भारतात राहून जपतात, त्याचा अंदाज येऊ शकेल. हे असले आपले ‘मूल्यवान मित्र’ जमवायला पाकिस्तानला कित्येक वर्षे लागली आहेत. भारताचेही असे ‘मूल्यवान मित्र’ पुर्वी पकिस्तानात होते. पण त्यांना तोडून टाकायला मध्यंतरीच्या सत्ताधार्‍यांनीच भाग पाडले. त्याच त्रुटीवर पर्रीकरांनी बोट ठेवले आहे. आपल्याकडे भले मोठे सैन्यबळ असेल. पण त्यांना नेमक्या हल्ल्यासाठी उपयुक्त माहिती मिळवून देणारे हस्तक पाकिस्तानात नाहीत, हेच पर्रीकर म्हणाले, तर त्यात अतिरेक कुठला झाला? उलट भारतात नेमके कुठे हल्ले करावे आणि कुठे गाफ़ीलपणा आहे, त्याची माहिती देणारे मूल्यवान मित्र पाकिस्तानपाशी आहेत. म्हणूनच मोजक्या घातपात्यांना त्याच ठिकाणी पाठवून पाक भारताला हैराण करतो आहे. त्यात पर्रीकर मोडता घालू बघतात, त्याचे बाळसारख्यांना दु:ख कशाला होते?

ज्यांनी पाक हेरखात्याचा पाहुणचार घेतला, त्याच्या अतिरेकी वा अव्यवहारी वागण्याने बाळ विचलीत होत नाहीत. सेक्युलर शहाणे त्याबद्दल अशा मूल्यवान पाक मित्रांना प्रश्न विचारत नाहीत. मात्र त्या दुखण्यावर बोट ठेवले, म्हणून पर्रीकरांनाच जाब विचारला जातो आहे. कारण मागल्या दहा वर्षात असे पाकिस्तानचे ‘मूल्यवान मित्र’ भारतात उजळमाथ्याने वावरण्याइतके सोकावले आहेत. वर्षभरापुर्वी अमेरिकेत एका काश्मिरी संस्थाचालकावर खटला भरण्यात आला व त्याची रवानगी तुरूंगात झाली. तो काश्मिरी फ़ुटीरांना चिथावाणी देण्याचे उद्योग तिथे बसून करत होता. त्यानेही भरवलेल्या अनेक परिषदांना नेमक्या अशाच सेक्युलर भारतीय विद्वानांना आमंत्रण दिले जायचे. त्याच्या संस्थेला आय एस आय पाच ते सात लाख डॉलर्सची आर्थिक मदत करत असल्याचे सिद्ध झाले. अशा आमंत्रितांमध्ये पाडगावकर यांचे नाव होतेच. कोणी त्याबद्दल या विद्वानाला जाब विचारला आहे काय? पाडगावकर यांचा पाकधार्जिणेपणा यातून उघड व्हायला हरकत नाही. तरीही त्यांनाच युपीए सरकारने काश्मिर विषयात मध्यस्थ म्हणून नेमण्याची तत्परता दाखवली होती. म्हणजे अमेरिकेत फ़ुटीर काश्मिरवाद्याने आय एस आयच्या मदतीने परि्षदा घेतल्या त्यातला भागिदारच भारताच्या वतीने फ़ुटिरांशी बोलणी करणार. मग त्यापेक्षा युपीए सरकारने थेट आय एस आयच्या प्रमुखलाच मध्यस्थ करायला काय हरकत होती? परंतु याबद्दल बाळसारख्या सेक्युलर विद्वानांना प्रश्न पडत नाहीत. उलट जिथे म्हणून पाकिस्तान वा देशाच्या शत्रूंना शह दिला जाण्याची शक्यता निर्माण होते, तिथे असे विद्वान खडबडून जागे होतात आणि सवाल विचारू लागतात. भारतीय जवानाचे मुंडके पाक सैनिकांनी कापून नेल्यावर क्षोभ माजला असताना कॉग्रेसचे संरक्षणमंत्री ए. के. अन्थोनी यांनी मुंडके कापणार्‍याच्या अंगावर पाकिस्तानी गणवेश असल्याचे विधान केले होते. त्यांना बाळसारख्यांनी कधी अतिरेकी म्हटले आहे काय? इथेच अशा सेक्युलर शहाण्यांची बौधिक दिवाळखोरी स्पष्ट होते. त्यांना देश, समाज वा राष्ट्राच्या सुरक्षेपेक्षा आपला संघद्वेष बहुमोल वाटू लगला आहे. त्यासाठी असे विद्वान देशालाही बुडवायला मागेपुढे बघणार नाहीत.

मात्र इतका खुलेआम पाकधार्जिणेपणा चालला असतानाही त्यांना आजवर कोणी जाब विचारला नव्हता. जो कोणी अशा पापाचा पाढा वाचायला जाईल, त्याच्यावर हिंदूत्व किंवा संघाच्या संबंधांचे शिंतोडे उडवले जाणार; ही नित्याची बाब झाली होती. म्हणूनच जाणतेही अशा राजरोस चाललेल्या घातपाती युक्तीवाद व आत्मघाती बुद्धीवा्दाला आव्हान द्यायला बिचकत होते. मनोहर पर्रीकर यांनी कुणाचीही तमा न बाळगता थेट वर्मावर बोट ठेवले आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी शत्रू गोटात पुरेसे हस्तक नाहीत. मोक्याच्या जागी उपयुक्त ठरणारी महिती देणारे ‘मूल्यवान मित्र नाहीत अशी नाराजी पर्रीकरांनी व्यक्त केल्यावर इथल्या पाकच्या मूल्यवान मित्रांचे धाबे दणाणले तर नवल नाही. कारण पाकिस्तानातले वा शत्रू देशातले असे भारताचे ‘मित्र’ इथल्या शत्रूच्या हस्तकांची नेमकी माहिती व पुरावे देण्याचा धोका संभवतो ना? पर्रीकर अतिरेकी बोललेले नाहीत. त्यांनी आपल्या या सूचक विधानातून आपण देशाच्या सुरक्षेला ‘मूल्यवान मित्रां’च्या सहाय्याने अधिक मजबूत करणार असे सांगत आहेत. त्याचा दुसरा अर्थ असा, की असे जे कोणी पाकिस्तानचे ‘मूल्यवान मित्र’ उजळमाथ्याने भारतात वावरत आहेत, त्यांच्या विरोधातले सज्जड पुरावे गोळा करण्याचा मानसच नव्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मग चोराच्या मनात चांदणे चमकले, तर नवल कुठले? इथले पाकिस्तानचे मित्र जसे त्यांचे हस्तक असतात, त्यांचे लांगेबांधे आपले तिथले मित्र आपल्याला देऊ शकतात. नव्हे, तेच तर त्यांचे काम असते. तशी माहिती जमवायला सुरूवात झाली असेल, तर पाकच्या इथल्या मित्रांना पर्रीकर अतिरेकी वाटल्यास नवल काय? जेव्हा कुठल्याही देशात शत्रूचे मित्र इतक्या उजळमाथ्याने समाजात मिरवू शकतात व प्रतिष्ठीत असतात, त्या देशाची सुरक्षा व्यवस्था डबघाईला गेलेली असते. तिथे शत्रू देश कसाबसारखे आठदहा जिहादी सैनिक पाठवूनही उच्छाद माजवू शकतो. युपीएच्या कालखंडात भारतात पाकचे जिहादी हल्ले कशामुळे बोकाळले, त्याचे उत्तर यात सामावले आहे. पर्रीकरांनी तिकडे सूचक निर्देश केला आहे. त्यांनी त्रुटी दाखवली आणि इथले सेक्युलर रंगेहाथ पकडले गेल्यासारखे भयभीत होऊन गेलेत. पण बाळबुद्धीच्या सेक्युलर शहाण्यांना त्या बाळबोध गोष्टीही उमजायला अनेक जन्म घ्यावे लागतील. कारण भारताचा नवा संरक्षणमंत्री ‘मनोहर’ दिसला तरी भलताच कठोर आहे ना?

साप्ताहिक विवेक (२/२/२०१५)


1 टिप्पणी:

  1. भाऊ, तुमचा लेख वाचून मी तो मूळ लेख शोधला. (http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-on-indian-security-and-politics-by-prakash-bal-4884082-NOR.html)
    सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांचा तुम्ही समाचार घेतला आहेच. पण डॉ॰ कोनराड एल्स्ट यांचा 'धर्मोपदेशक' असा उल्लेख करून बाळोबांनी जो घोळ घातला आहे, तो ही उजागर करावा असे मला वाटले. डॉ॰ एल्स्ट हे बेल्जियन मूळ असलेले पौर्वात्य व भारतीय विषयांचे अभ्यासक आहेत (orientalist and Indologist). त्यांना धर्मोपदेशक म्हणणे हे फारच बाळबोध आहे.

    उत्तर द्याहटवा