बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

आत्महत्या: कोणाची जबाबदारी?

प्रमोद नवलकर हे शिवसेनेचे नेते, मंत्री होते आणि त्याच्याही आधीपासून उत्तम लेखक व पत्रकार होते. दैनिक ‘नवशक्ती’मधून त्यांनी प्रदिर्घकाळ ‘भटक्याची भ्रमंती’ हा स्तंभ लिहीला होता. त्या एक स्तंभलेखासाठी अनेकजण ते दैनिक विकत घ्यायचे. जेव्हा शिवसेनेतर्फ़े नवलकर प्रथमच १९६८ सालात मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, तेव्हा संपादकांनी त्यांचे अभिनंदन करताना ‘भटक्या’ कोण त्याचा खुलासा केला होता. अशा नवलकरांनी लिहिलेल्या एका लेखाची सध्या आठवण येते. बोरीबंदर स्थानकाबाहेर एक भिकारी त्यांनी नित्यनेमाने बघितला होता. थंडीच्या काळात कुडकुडत तिथे जीव मूठीत धरून जगणार्‍या त्या गरीबाला कोणी कधी उबदार पांघरूण दिले नव्हते. एका हिवाळ्यात त्याच थंडीने त्याचा बळी घेतला. त्या दिवशी त्याचे बेवारस प्रेत तिथेच पडले होते आणि पोलिसही शासनाचा प्रतिनिधी म्हणून तिथे पंचनामा करीत होते. मात्र त्या दिवशी नवलकरांना त्याचा चेहरा बघता आला नाही. कारण त्या मृतदेहावर पोलिसांनी शुभ्र चादर पांघरली होती. त्यावर आपला स्तंभ लिहिताना नवलकरांनी मारलेला ताशेरा आठवतो.

मेल्यानंतर त्याच्या मृतदेहावर पांघरूण घालायला शासन यंत्रणा हजर झाली. तीच यंत्रणा आदल्या रात्री वा काही दिवस आधी तीच चादर त्याच्या कुडकुडणार्‍या गारठलेल्या देहावर पांघरूण घालायला आली असती, तर तो मेला नसता. सरकार मृतांची काळजी घेते आणि जिवंतपणी मात्र त्यांच्या यातना, वेदनांकडे डोळेझाक करते. जगणार्‍यासाठी सरकार आहे की मरणार्‍यांसाठी?

असा सवाल नवलकरांनी त्या स्तंभातून विचारला होता. आज तीस वर्षे उलटून गेल्यावरही त्या प्रश्नाचे उत्तर कोणी दिलेले नाही. या प्रदिर्घकाळात अनेक सरकारे आली गेली. नवलकरही एका सरकारमध्ये मंत्री होऊन गेले. अर्धा डझन मुख्यमंत्री बदलले. पण नवलकरांच्या त्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेले नाही. खरे सांगायचे तर त्या प्रश्नाची दखलही अजून सरकारने वा प्रशासनाने घेतलेली नाही. किंबहूना मेलेल्यांचे सरकार, अशीच आजही सरकारची अवस्था आहे. तिथे मेलात तर तुमची दखल घेतली जाते. जिवंत असताना कितीही टाहो फ़ोडा, तुमच्याकडे कोणी ढुंकून बघत नाही. खोटे वाटत असेल तर आजच्या किंवा कालच्या सरकारकडे बघा. त्याचा कारभार बघा. आत्महत्या करणार्‍यासाठी सरकार धावते आणि जो उद्यापरवा आत्महत्या करणार आहे, त्याची या सरकारला फ़िकीरच नाही. मरणार्‍याला आजच्या सरकारी कारभारात मोल आहे आणि जगणारा कवडीमोल आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो, ही आता बातमी राहिलेली नाही, ती नित्याची बाब बनली आहे. त्याने आत्महत्या करू नये, यासाठी सरकारपाशी कुठली उपाययोजना नाही. पण त्याने आत्महत्या केलीच, तर त्याच्यासाठी भरपाई व अनुदान म्हणून सरकारने ठराविक रकमेची तरतुद करून ठेवलेली आहे. अर्थात आत्महत्या केली आणि लगेच भरपाई मिळाली, असे होत नाही. तुम्हाला आपल्या कोणीतरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याचे सिद्ध करावे लागते.

मुद्दा भरपाईचा नाही, तर एका माणसाच्या आत्महत्येचा आहे. तो माणुस स्वत:ला कशाला मारून घेतो? त्याला जगण्याचा अर्थ उमगला नाही, हेच त्यातले सत्य असते आणि अशा कोणी आत्महत्या केल्यावर जी भरपाई मिळते, त्यातून त्याचे उध्वस्त कुटुंब पुन्हा उभे राहू शकते काय? सवाल एका मृत्यूपुरता नसतो, तर एका उध्वस्त कुटुंबाचा असतो. त्या कुटुंबाचे आयुष्य कायमचे विस्कटून जाते. त्यापासून त्या कुटुंबाला व पर्यायाने अशा आत्महत्याप्रवण माणसाला परावृत्त करणे आवश्यक आहे. त्याची मरू घातलेली जगण्याची इच्छा जगवण्याला प्राधान्य असायला हवे. समाज म्हणून आपले आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या सरकारचे काम त्या माणसाला आत्महत्येपासून परावृत्त करणे हेच आहे. ते काम करायला कोण तयार आहे? निदान सरकार तरी त्यासाठी तयार दिसत नाही. शेतकरी असो किंवा एखादा वैफ़ल्यग्रस्त विद्यार्थी, तरूण वा प्रेमभंग झालेली व्यक्ती. कोणीही आत्महत्या करतात, तेव्हा त्यांना एकाकीपणा वा नैराश्याने ग्रासलेले असते. आपण जगण्यासाठी लढू शकत नाही, लढायची शक्तीच गमावून बसल्याची असहाय्य भावनाच त्याच्यावर शिरजोर झालेली असते. त्याला अशा वैफ़ल्यापासून परावृत्त करायला पैसे, कर्जफ़ेड वा साधनसुविधा मदत देऊ शकत नाहीत. कारण जगण्याची इच्छा गमावलेल्याला त्या इच्छेची व दुर्दम्य आशावादाची गरज असते. त्याच्यातली ती जगण्याची म्हणजे पर्यायाने झुंजण्याची इच्छा जागवण्याला प्राधान्य असायला हवे. ते काम भावनाशून्य सरकारकडून होऊ शकत नाही. ते काम भोवतालच्या समाजाचे आहे. तुमचे आमचे हे काम आहे. कारण त्याच्या आसपास आपण वावरत असतो, सरकार त्याच्यापासून मैलोगणती दूर असते. म्हणून ही आपली जबाबदारी असते.

असा कोणी आत्महत्या करू शकतो, त्याची चाहुल सरकारी यंत्रणेला लागू शकत नाही. पण आसपास असल्याने आपल्याला नक्कीच लागू शकते. म्हणूनच आत्महत्येच्या प्रकरणात पहिला हस्तक्षेप तुम्हीआम्हीच करू शकतो. पण आपण तिकडे बघायला तयार नसतो. कानात बोळे घालून आपण त्याच्या अव्यक्त आक्रोशाला आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. आपले डोळे मिटून, काणाडोळा करून आपण नजर अन्यत्र वळवतो. आपला काय संबंध, म्हणून हात झटकतो. मात्र आपण पाप करतोय ही धारणा आपली पाठ सोडत नाही. कारण त्याला तशा कृत्यापासून रोखण्यात आपण असमर्थ ठरलो, किंवा त्यासाठी काहीच केले नाही, याची बोचणी मनात कायम घर करून रहाते. इथे लक्षात येते, की शेतकरी वा अशा कुठल्या आत्महत्येला सरकार नव्हेतर भोवतालचा समाज अधिक जबाबदार असतो. जिथे ती आत्महत्या होते, तिथून पुढे सरकारची जबाबदारी असेल. पण जोपर्यंत त्या व्यक्तीने आत्महत्या केलेली नाही, तिथपर्यंत त्याला तशा कडेलोटाच्या शिखरावरून मागे आणायची जबाबदारी भोवतालच्या प्रत्येकाची असते. प्रामुख्याने ज्याला कोणाला असा वैफ़ल्यग्रस्त निराश माणूस भलताच विचार करत असल्याची चाहुल लागलेली असते, त्याचेच आत्महत्या थोपवणे ही प्राथमिक कर्तव्य असते. कारण असा माणूस एका धोक्याच्या क्षणी तसा आत्मघातकी निर्णय घेत असतो. तेवढा क्षण कोणी त्यात हस्तक्षेप केला, तर एक आत्महत्या टाळली जाऊ शकेल. त्यातून नुसती एक आत्महत्या थोपवली जात नाही, एका जीवाला नवी संजीवनी देण्याचे महान पुण्य आपल्या गाठीशी जमा होत असते. कारण आत्महत्या करणार्‍याचेही तसे काही पक्के उद्दीष्ट नसते. एका गाफ़ील क्षणी ती व्यक्ती तशा कडेलोटावर येऊन उभी राहिलेली असते. तिथून एक पाऊल त्याला मागे आणले, तरी त्याचीच विचारशक्ती त्याला मुर्खपणा करू देत नसते.

आपण या दिशेने काय करू शकतो? कोण कोण यात पुढाकार घेऊ शकतो? कोणकोणते मार्ग त्यासाठी उपलब्ध आहेत? काही गोष्टी तुम्ही करू शकत नसाल, पण नुसते त्याविषयी इतरांशी बोललात, तरी आत्महत्येला पायबंद घालण्याचे पुण्य मिळवू शकाल. मनात इच्छा हवी आणि कर्तव्याची भावना असायला हवी. कितीजण सहमत आहेत या भूमिकेशी? कितीजण त्यामध्ये फ़ावल्या वेळात सहभागी व्हायला तयार आहेत?

मतप्रदर्शन करा, लाईक करा, शेअर करा, सदस्य व्हा

गुरू सावंत 8007778433
अमृत श्रोत्री 7507029299
https://www.facebook.com/groups/895591703807411/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा