शनिवार, २६ एप्रिल, २०१४

कॉग्रेसचे आत्मघातकी डावपेच, बुडत्याचा पाय खोलातच की हो



  जवळपास साडेतीनशे लोकसभा मतदारसंघातील मतदान संपले असून उर्वरीत १९४ जागीचे मतदान पुढल्या तीन फ़ेर्‍यांमध्ये पार पडायचे आहे. पण जितके मतदान झाले व ज्या भागात मतदानाची टक्केवारी झाली; तिचा आढावा घेऊन मोठ्या राजकीय पक्षांनी निकालाचे काही आडाखे बांधलेले आहेत. त्याच आडाख्यानुसार आता पुढल्या १९४ जागांसाठी प्रचार व निकालानंतरच्या रणनितीची आखणी चालू झालेली आहे. शुक्रवारी पंजाबमध्ये झालेल्या अनेक सभातून भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी वापरलेली भाषा आणि कॉग्रेसच्या गोटातून आलेल्या बातम्या यांची सांगड घालणे रंजक ठरेल. भाजपा व मोदी यांनी आपण बाजी मारलीच आहे, अशा थाटात बोलायला सुरूवात केलेली आहे. तर कॉग्रेसने मनोमन पराभव मान्य करीत पुढल्या राजकीय स्थितीत काय डावपेच खेळायचे, त्याची आखणी सुरू केलेली दिसते. त्यात मग मोदी यांनी काय म्हटले? झालेल्या मतदानानुसार कॉग्रेस भूईसपाट होणार हे निश्चीत झाले आहे. त्यामुळेच उर्वरीत जागच्या मतदारांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आजचे सरकार जाणार यात शंका नाही. पण येणारे सरकार स्थीर व खंबीर व्हावे, ही उरलेल्या मतदारांची जबाबदारी आहे. असे मोदी म्हणतात, तेव्हा ते भाजपा व एनडीएला स्पष्ट नव्हेतर भरघोस बहूमत देण्यासाठी मतदाराला आवाहन करीत असतात. दुसरीकडे कॉग्रेस गोटात मोदींना पराभूत करणे शक्य नसेल, तर निदान त्यांना एकपक्षीय बहूमताला वंचित ठेवायची रणनिती योजलेली आहे. वेळ आली तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसर्‍या आघाडीला पाठींबा देण्याची तयारी कॉग्रेस करीत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. त्याचा अर्थ असा आहे, की उरलेल्या दोनशेपेक्षा थोड्या कमी मतदारसंघात मुस्लिमांनी एकगठ्ठा मते आपल्यालाच द्यावीत किंवा जिथे बलवान कॉग्रेस उमेदवार नसेल, तिथे तिसर्‍या आघाडीत जाऊ शकेल अशा पक्षाला द्यावीत; अशी कॉग्रेसची रणनिती ठरलेली दिसते.

   याचा अर्थ असा, की आपण भाजपाला लोकसभेतला मोठा पक्ष होण्यापासून रोखू शकत नाही हे कॉग्रेसने मान्य केलेले असून; आता त्या सत्ताधारी पक्षाची रणनिती केवळ भाजपाला बहूमतापासून रोखण्यापुरती मर्यादीत झालेली आहे. किंबहूना पहिल्या दिवसापासूनच कॉग्रेसने आळशीपणा केला आणि रणांगणात उतरण्याची वेळ आली, तरी कॉग्रेस लढायला सज्ज झालेलीच नव्हती. मोदींनी प्रचाराचा झंजावात उभा केला आणि मतदानाच्या पहिल्या फ़ेरीत त्याचे काही परिणाम ठळकपणे दिसले. त्यानंतरच कॉग्रेसने आक्रमक व्हायला सुरूवात केली. पण तेव्हा खुप उशीर झालेला होता. वास्तविक मोदींच्या आक्रमक प्रचाराचा प्रभाव जनमानसावर पडत असल्याचे संकेत विविध चाचण्यातून पुढे आलेले होते. पण त्याचा अभ्यास करण्यापेक्षा कॉग्रेसने चाचण्य़ांचे निष्कर्ष नाकारण्यात धन्यता मानली. आता अर्धेअधिक मतदान संपल्यावर चक्क पराभवच मान्य केलेला आहे. यालाच नकारात्मक राजकारण म्हणतात. आणि ही नकारात्मकता आजची नाही. किंबहूना दहा वर्षापुर्वी त्याच नकारात्मकतेवर स्वार होऊन कॉग्रेसने सत्ता मिळवली होती. सत्ता हाती आल्यावर सकारात्मक राजकारण करून पुन्हा पक्षाचा प्रभाव वाढवता आला असता. पण सत्ता मिळाल्यापासून कॉग्रेस नकारात्मकच विचार करीत राहिली व उदासिन भाजपा नेतृत्वामुळे त्या कॉग्रेसी नकारात्मक राजकारणाला फ़ायदा मिळत राहिला. आज त्याचेच दुष्परिणाम कॉग्रेसला भोगावे लागत आहेत. कारण भाजपाचे उदासिन नेतृत्व बाजूला पडून उमदे आक्रमक नेतृत्व पुढे आले आहे. अशा आक्रमक विरोधकाला प्रतिसाद देण्याची कुवतच त्यामुळे कॉग्रेसमध्ये उरलेली नाही.

   मग आधीच्याच चुका नव्याने करण्याकडे कॉग्रेसचा कल दिसतो आहे. चार महिन्यांपुर्वी विधानसभांच्या निवडणूका झाल्यावर कॉग्रेसने सपाटून मार खाल्लेला होता. त्यानंतर पक्षाची तात्काळ नव्याने बांधणी सुरू करण्यापेक्षा पुन्हा नकारात्मक पवित्रा घेतला गेला. दिल्ली विधानसभेत भाजपा मोठा पक्ष झाला, तरी त्याचे बहूमत हुकले होते. तर त्याला सत्तेपासून दुर ठेवण्याच्या अट्टाहासाने आम आदमी पक्षाला न मागताच पाठींबा देण्याचे डावपेच खेळले गेले. त्यातून त्याच पक्षाची प्रतिमा उंचावली आणि कॉग्रेसचा दिल्लीतला पाया अधिकच खणला गेला. चार महिन्यात आम आदमी पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे मतदार मोठ्या संख्येने भाजपाकडे गेलेला आहे. पण जो मुस्लिम मतदार विधानसभेच्या वेळी कॉग्रेसशी निष्ठावान राहिला होता, तो आता भाजपाला रोखण्यासाठी केजरीवाल यांच्याकडे झुकला आहे. मुळात कॉग्रेसने बाहेरून पाठींबा देत केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवण्याची काय गरज होती? कुणालाच बहूमत नाही आणि भाजपा सरकार बनवू शकला नसता; तर विधानसभा निलंबित राहिली असती. तेवढेच नाही, केजरीवाल यांना आपल्या प्रतिमेचे उदात्तीकरणही करून घेण्याची संधी मिळाली नसती. मोदींना डिवचण्यासाठी व भाजपाला रोखण्यासाठी दिल्लीत कॉग्रेसने स्वत:च्या पायावर असा धोंडा मारून घेतला. आता पुन्हा लोकसभेच्या निकालानंतर तसलेच डावपेच खेळण्याची सुत्रांकडून आलेली बातमी म्हणजे बुडत्याचा पाय खोलात म्हणावे; अशीच स्थिती आहे. मोदींच्या भाजपाप्रणीत एनडीए आघाडीला फ़ारतर २५० च्या आसपास जागा मिळाल्या, तर उर्वरीत पक्षांना सेक्युलर म्हणून एकत्र करून त्यांचे नेतृत्व करायचे किंवा त्यांच्यापैकी कोणा नेत्याला बाहेरून-आतून पाठींबा देऊन बिगर भाजपा सत्ता आणायचा हा बेत आहे. अशी सत्ता फ़ार काळ टिकत नाही आणि मध्यावधी निवडणूका घ्याव्या लागल्या, तर लोकांचा कल स्पष्टपणे मोदींना मोठे बहूमत देण्याकडे वळू शकतो. त्याला मग मोदींच्या गुणवत्तेपेक्षा कॉग्रेसची नकारात्मकता कारणीभूत असेल. मुळातच अशा नकारात्मक राजकारणाने मागल्या पाच वर्षात कॉग्रेसची अधिक दुर्दशा झालेली आहे. त्यात हे धोरण म्हणजे बुडत्याचा पाय खोलात म्हणावे तसेच नाही काय? त्यातून मग कॉग्रेस इतर प्रादेशिक पक्षांच्या पायरीवर येऊन उभा राहिल.      

   कॉग्रेसने गेल्या दहा वर्षात आपलेच एकपक्षीय बहूमत असल्यासारखी सत्ता राबवली. पण त्याच्याकडे हुकूमी बहूमत नव्हते. त्यामुळेच पेचप्रसंग ओढवला तर मुलायम, मायावती किंवा तत्सम पक्षांच्या मनधरण्या कराव्या लागत होत्या. जेव्हा नेतृत्वच इतके बेछूट वागत होते, तर पक्षाचा सामान्य कार्यकर्ताही बेफ़िकीर राहिला तर नवल नाही. हा सगळा प्रकार खपून गेला; कारण विरोधातल्या भाजपा नेतृत्वाला परिस्थितीचा आक्रमक होऊन लाभ घेता आला नाही. अफ़ाट भ्रष्टाचार, गैरकारभार, अनागोंदी, अराजक, घोटाळे राजरोस चालू असूनही भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व जनतेला दिलासा देऊ शकले नाही. त्याच काळात अण्णा हजारे व रामदेव बाबा यांच्यासारख्यांना सत्ताधार्‍यांच्या विरोधात आघाड्या उघडाव्या लागल्या. त्यांनी निर्माण केलेल्या प्रक्षोभावरही दिल्लीतल्या भाजपा नेतृत्वाला स्वार होणे साधले नाही. त्याचाच स्थानिक पातळीवरचा लाभ नवा पक्ष काढून केजरीवाल उठवू शकले. पण राष्ट्रीय पातळीवर ती जबाबदारी मोदींनी उचलली. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करणार्‍या मोदींनी मात्र मागल्या तीन वर्षात केंद्र सरकार व सत्ताधारी यांना आपल्या टिकास्त्राचे लक्ष्य बनवले होते. त्यातून त्यांनी आपला मनसुबा जाहिर केला होता. परिणामी भाजपात संघटनात्मक पातळीवर काम करणारा कार्यकर्ता आळस झटकून कामाला लागला. मरगळलेल्या संघटनेला प्रेरणा द्यायला मोदी पुढे आले. खरे सांगायचे, तर तसा मनसुबा सोनियांनी कॉग्रेसची सुत्रे हाती घेतल्यावर व्यक्त केला होता. पण त्यात त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत. आज तमाम कॉग्रेसवाले व माध्यमे पंचमढी कॉग्रेस अधिवेशन विसरून गेलेत. १९९८ साली पक्षाध्यक्ष झाल्यावर पंचमढी येथे पक्ष अधिवेशनात पुन्हा तळागाळापासून काम करून पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा निर्धार सोनियांनी जाहिर केलेला होता. मात्र त्याच्या पुढे काहीच केले नाही.

   दहा वर्षापुर्वी कॉग्रेसची मरगळ आणि तीन राज्यात मिळालेले विधानसभेतील यश, यांचा लाभ उठवण्यासाठी प्रमोद महाजन यांच्यासारख्या भाजपा चाणक्यांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणूकांचा डाव खेळला. तेव्हा पंचमढीचा निर्धार गुंडाळून ठेवत सोनियांनी भाजपा विरोधात सेक्युलर आघाडी निर्माण करण्याची खेळी केली. ती यशस्वी होऊन पुन्हा कॉग्रेस सत्तेत आली. पण त्यासाठी गुंडाळलेला पंचमढीचा प्रस्ताव कायमचा अडगळीत गेला. तेव्हा दिडशेपेक्षा कमी जागा असतानाही कॉग्रेसच्या हाती सत्ता आली आणि मग भाजपा सत्तेवर येण्याचा बागुलबुवा दाखवून मुस्लिमांना व सेक्युलर पक्षांना खेळवण्याचे राजकारण सुरू झाले. पण सत्तेचा लाभ घेऊन पक्षाची संघटना नव्याने बांधण्याचा विचारही झाला नाही. जोपर्यंत जेटली, अडवाणी व सुषमा यासारखे दुबळे नेतृत्व भाजपाचे म्होरके आहेत; तोपर्यंत सुरक्षित असल्याची हमीच सोनियांना वाटत होती. त्याच कारणास्तव २००९मध्ये डाव्यांनी साथ सोडली; तरी कॉग्रेस अधिक जागी निवडून आली. कारण त्यांच्यासमोर राजकीय आव्हानच नव्हते. त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीतूनही आपण बघू शकतो. प्रत्यक्षात कमी मतदानातून मतदाराने विरोधकांवर नाराजी व्यक्त केली होती. कॉग्रेसला कौल दिला नव्हता. इतके दुबळे सरकार चालवूनही लोकांनी पुन्हा सत्ता दिल्यावर कॉग्रेस अधिकच बेताल होत गेली आणि अराजकच उभे राहिले. मात्र सकारात्मक राजकारणाचा विचारही डोक्याला शिवला नाही. २०१४ सालात मोदीसारखे आक्रमक आव्हान समोरे येऊन उभे राहिल, ही अपेक्षाच केलेली नव्हती. त्याचेच परिणाम आता कॉग्रेसला भोगावे लागत आहेत. कारण सेक्युलर पक्षांना व मुस्लिमांना मोदी वा भाजपाचा बागुलबुवा दाखवून फ़सवणे शक्य असले; तरी सामान्य मतदाराला फ़सवता येत नाही. तो पर्याय मोदींच्या रुपाने समोर आल्यावर जनतेने त्याला प्रतिसाद दिला आणि त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या वाढत्या टक्केवारीत पडताना दिसले. तेव्हा कुठे कॉग्रेसला खडबडून जाग आली आहे. पण उपाय मात्र सापडलेला नाही. म्हणूनच आता आपण सत्ता व जागा मिळवायचा विचारही झालेला नाही. त्यापेक्षा मोदींना रोखण्याचाच नकारात्मक विचार सुरू आहे. जो आत्मघातकी डाव दिल्लीत केजरीवाल यांना पाठींबा देऊन खेळला गेला, आता लोकसभेतही मोदी विरोधी सेक्युलर गोळाबेरीज; त्याच आत्मघातकी राजकारणाचा पुढला डाव आहे. त्यातून मोदी वा त्यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाचे फ़ारसे नुकसान व्हायची शक्यता नाही. पण आधीच विश्वासार्हता व लोकप्रियता गमावून बसलेल्या कॉग्रेसच्या बुडत्याला असला डाव अधिकच गाळात घेऊन जाणार आहे. गुजरातमध्ये वाघेला व झडापिया अशा मोदी विरोधकांना हाती धरून काय साधले होते? शेवटी केशूभाई पटेलही विरोधात जाऊन मोदींनी विजय संपादन केला आणि गुजरातमध्ये त्यांना कोणी प्रतिस्पर्धीच शिल्लक उरला नाही. सेक्युलर सर्वच पक्षांना एकत्र करून कॉग्रेस मोदींना तीच संधी पुन्हा देत नाही काय? मोदी हा देशातील एकमेव शक्तीशाली नेता असल्याचे कॉग्रेसच सिद्ध करणार असेल, तर बुडत्याचा पाय खोलात नाही तर दुसरे काय म्हणायचे?

३ टिप्पण्या:

  1. आजच्या परिस्थितीचं खुपच उत्तम विश्लेषण.

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ अत्यंत समर्पक विश्लेषण...
    रोज टीव्ही पाहताना पेपर मधून वाचताना जे जाणवते थे नेमक्या शब्दात मांडण्याचूी हातोटी एकदम प्रभावी.

    उत्तर द्याहटवा