शनिवार, १२ एप्रिल, २०१४

मोदीलाट किती खरी किती खोटी?   मार्क ट्वेन नावाचा एक पाश्चात्य विचारवंत लेखक होता. त्याने सत्यापेक्षा असत्याच्या बाबतीत केलेले विधान जगप्रसिद्ध आहे. तो म्हणतो, ‘खोटे तीन प्रकारचे असते. एक सर्वसाधारण खोटे, दुसरे धडधडीत खोटे आणि तिसरे खोटे म्हणजे आकडेवारी’. त्याच्या या विधानातली गंमत समजून घेण्य़ाची गरज आहे. साधे सरळ खोटे म्हणजे काय? तर आपण नित्यजीवनात, व्यवहारात कुणाला दुखवू नये किंवा अडचणी सोप्या व्हाव्या म्हणून सत्य बोलायचे टाळतो; तेच साधे असत्य. जे निरुपद्रवी असते, ज्यातून कोणाची हानी होत नाही किंवा कुणाला इजा पोहोचत नाही. त्यापेक्षा धडधडीत असत्य म्हणजे जाणिवपुर्वक खोटे बोलणे. ज्यापासून कुणाला इजा होऊ शकते वा हानी होऊ शकते, हे माहित असूनही वा मुद्दाम हानी होण्यासाठीच खोटे बोलले जाते, त्याला धडधडीत खोटे म्हणतात. पण त्याहीपेक्षा भयंकर खोटे म्हणजे आकडेवारी. असे ट्वेन का म्हणतो? तर आकडेवारीत खरे आणि खोट्याची अतिशय बेमालून भेसळ केलेली असते आणि त्यात फ़सलेल्यांनाही त्यांचाच फ़ायदा झाला आहे, असे पटवून देता येते. म्हणूनच घातक खोटे म्हणजे आकडेवारी, असे त्याने म्हटले आहे. असे त्याने का म्हणावे आणि आपल्या जीवनाचा त्याच्याशी संबंध काय?

   सध्या निवडणूकीचा उत्सव सुरू आहे. मागल्या दोनतीन महिन्यांपासून सतत आपल्या डोक्यावर आकडेवारी मारली जात आहे. कधी विविध भागातल्या मतदारांच्या मतचाचण्य़ांचे नमूने घेऊन आगामी लोकसभा निवडणूकीचा निकाल कसा लागेल, किंवा त्यात कोणाचा जोर आहे, त्याविषयी जाणकार व राजकीय अभ्यासक आपल्या ज्ञानात भर घालत असतात. मन लावून आपण असले कार्यक्रम ऐकले, तर त्यांनी सांगितले तसेच निकाल लागणार असे आपल्यालाही वाटू लागते. पण मग चर्चेत भाग घेणारा दुसरा कुणीतरी त्यावर अविश्वास दाखवत असतो आणि आपल्याला त्याचीही बाजू पटते. मग यातले खरे काय आणि खोटे काय, त्याविषयी आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. कोणी जुन्या काही निवडणूकांचे संदर्भ वा आकडे सादर करून त्याचे दावे करतो; तर कोणी नव्या चाचणीचे आकडे फ़ेकून त्याच्या उलटे दावे करीत असतो. दोन्हीकडले युक्तीवाद वास्तविक वाटावेत, यासाठी आकडे खेळवले जात असतात. मात्र हे आकडे कसे मांडावेत आणि कुठल्या संदर्भाने तपासावेत, हे सामान्य प्रेक्षक वा वाचकाला ठाऊक नसते. सहाजिकच त्यातून फ़सगत त्याच सामान्य माणसाची होते. कारण समोर खरे निकाल मतमोजणीनंतर येतात, तेव्हा सगळेच आकडे विस्कटून गेलेले असतात. तेव्हा कोणी आधीच्या युक्तीवाद वा आकड्यांचा उल्लेखही करीत नाही. यावेळच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला व मोहिमेला भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी खुपच आधीपासून सुरूवात केल्याने गेले चारपाच महिने असा आकड्यांचा खेळ जोरात सुरू आहे. मात्र त्यातून सामान्य माणसाचे प्रबोधन होण्यापेक्षा गोंधळच उडालेला आहे.

   गुरूवारी तिसर्‍या फ़ेरीचे मतदान पार पडले. त्यामुळे १०३ मतदारसंघातल्या उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंदीस्त झाले आहे. तोपर्यंत जे आकडे आले त्याचा मग विविध वाहिन्यांवर दिवसभर खेळ चालू होता. पण त्यासंबंधाने बोलणार्‍या व विश्लेषण करणार्‍यांना त्यातले कितपत कळत होते, याचीच शंका यावी. कारण जितके जाणकार तितकी मते प्रदर्शित होत राहिली. यातून सामान्य माणसासाठी मार्ग कुठला? सामान्य नागरिकाने निवडणूकीचे आकडे कसे समजून घ्यावे? त्यातली गुंतागुंत कशी सोडवावी? तर त्याच्या विविध पद्धती आहेत. त्याचा खुलासा हे विश्लेषणकर्ते सहसा देत नाहीत. त्यामुळे अधिकच वाद होतात आणि जास्तच गोंधळ उडतो. सामान्य माणसाच्या ज्ञानात भर घालण्यासाठीच प्रयास करायचा असेल, तर त्यालाही आकड्यातून आपले निष्कर्ष काढता आले पाहिजेत. त्याचा उपाय म्हणजे निवडणूकीचे आकडे व त्याचा राजकीय इतिहास, अधिक तात्कालीन निकाल यांचा उहापोह आवश्यक आहे. म्हणजे नेमके काय? तर सध्या सार्वत्रिक चर्चा वा प्रतिवाद एकाच गोष्टीचा होतो आहे. ती गोष्ट म्हणजे या निवडणूकीत मोदींच्या लोकप्रियतेची लाट आहे किंवा नाही. पण लाट असेल तर ती ओळखावी कशी, याचे मार्गदर्शन कुठल्या वाहिनी वा जाणकाराने केलेले नाही. लाट म्हणजे तरी काय?

   यापुर्वी चार निवडणूका अशा होत्या, की ज्यांचे वर्णन लाट असे करण्यात आले. १९७१ आणि १९८० अशा दोन निवडणूकांना इंदिरा लाट असे संबोधले गेले. तर १९७७ च्यावेळी इंदिरा विरोधी वा जनता लाट असे म्हटले गेले. १९८४ची निवडणूक राजीव लाट म्हटली गेली. त्याचा अर्थ असा, की समोर कुठला उमेदवार वा पक्ष आहे, त्याचे तारतम्य न राखता लोकांनी भरभरून एकाच पक्षाला मते दिली व कौल दिला. त्यासाठी बाकीच्या पक्षांना पालापाचोळा म्हणावे तसे दूर फ़ेकले. अशा लाटेत मोठमोठे अन्य पक्षाचे नेतेही भुस्कटासारखे पराभूत झालेले आहेत. १९७१ व १९८४ साली वाजपेयी तर १९७७ सालात इंदिराजी आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले. ज्या पक्षाची वा नेत्याची लाट होती, त्या पक्षाच्या उमेदवाराचा विचारही न करता लोकांनी त्याला विजयी केले. मोदींची खरेच लाट असेल, तर तसेच व्हायला हवे. म्हणजेच भाजपाच्या निशाणीवर मतदाराने कुणालाही निवडून द्यायला हवे. तशी परिस्थिती आहे काय? सध्यातरी कुठलीच मतचाचणी त्याची ग्वाही देत नाही. पण अशावेळी जे मतदान होते, ती खरी चुणूक असते. जेव्हा निवडणूक लाटेची असते, तेव्हा मतदार उत्साहाने घराबाहेर पडून एका बाजूला कौल देतो आणि त्या लाटेची प्रचिती वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीतून येत असते. असा मतदार उदासिन घरात बसून रहात नाही. तो कुणाला तरी सत्तेवर आणायला उत्साहाने बाहेर पडतो किंवा सत्तेवर असेल त्याला संपवायला बाहेर पडतो. त्याची साक्ष अकस्मात मतदान वाढण्यातून मिळते. यावेळी तसे होणार आहे काय? खरेच कोणाची लाट आहे काय?

   सोमवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दोन फ़ेर्‍यामध्ये अवघ्या बारा जागी मतदान झाले. तिसर्‍या दिवशी म्हणजे गुरूवारी अकरा राज्यातल्या ९१ जागी मतदान पार पडले. म्हणजेच २० टक्के जागांसाठी लोकांनी आपला कौल दिलेला आहे. त्यापैकी पहिल्या बारा जागी सत्तर टक्केहून अधिक मतदान झालेले आहे. त्याला उत्साहाचे मतदान नक्कीच म्हणता येईल. पण गुरूवारी ज्या ९१ जागी मतदान झाले, त्याने मागल्या खेपेस झालेल्या मतदानापेक्षा पुढला पल्ला गाठला आहे काय? आणि गाठला असेल, तर किती प्रमाणात मुसंडी मारली, याला महत्व आहे. उदाहरणार्थ दिल्लीत पाचवर्षापुर्वी पन्नास टक्क्याहून कमी मतदान झालेले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी साठीचा पल्ला गाठून पलिकडे गेल्याच्या बातम्या आहेत. त्याखेरीज इतरत्रच्या अनेक मतदारसंघात मतदान वाढल्याचे संकेत (हा लेख लिहीताना) मिळालेले होते. पण नेमके आकडे हाती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. किती पुढला पल्ला गाठला गेला पाहिजे? त्यासाठी मग जुना इतिहास बघावा लागतो. आजवरच्या पंधरा लोकसभा निवड्णूकीत फ़क्त दोनदाच मतदारांनी साठीचा टप्पा ओलांडला होता. १९७७ सालात इंदिराजींवर आणिबाणीच्या कारणास्तव नाराज असलेल्या मतदाराने ६२ टक्केहून अधिक मतदान केले होते. त्यात जनता पक्ष बहूमत मिळवून शकला आणि प्रथमच देशात बिगर कॉग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवर आला होता. त्यानंतर सात वर्षांनी इंदिराजींची हत्या झाली आणि सहानुभूतीची अशी लाट उसळली, की ६४ हून अधिक टक्के लोकांनी मतदानात भाग घेतला. मग मोठीच उलथापालथ राजकारणात घडलेली होती. अगदी अननुभवी पंतप्रधान राजीव गांधी यांना लोकांनी अभूतपुर्व ४०० जागांचे अफ़ाट बहूमत दिलेले होते. या दोन निवडणूका वगळता साठीचा पल्ला मतदाराने कधीच ओलांडलेला नाही. १९७१ आणि १९८० अशा दोन निवडणूकात इंदिराजींनी दोन तृतियांश बहूमत संपादन केले, तेव्हा मतदान साठीच्या जवळ आलेले होते. त्यालाही एकप्रकारे लाटच म्हणावे लागेल.

   इथे लाटेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तराजूची दोन्ही पारडी कमी अधिक समतोल असतात आणि त्यात एक कांदा बटाटा अधिक पडला, की ते पारडे खाली जाते, त्या एका नगाला लाट म्हणतात. जेव्हा दोन्ही बाजूंचे पारडे समतोल असते, तेव्हा ज्या बाजूला अखेरचा झुकाव मिळतो, तिथे निर्णय फ़िरतात. जर चारपाच टक्के अधिकचा मतदार अगत्याने घराबाहेर पडून एका बाजूला झुकतो, तर तो अनेक जागी पारडी फ़िरवतो आणि त्याच पक्षाला अधिक जागा मिळून जातात. मग विश्लेषक त्या पक्षाची वा नेत्याची लाट असल्याची ग्वाही देतात. पण प्रत्यक्षात काय स्थिती असते? इथेच दिलेल्या एका कोष्टकात मागल्या लोकसभा निवडणूकांचे आकडे दिलेले आहेत. त्यात जेव्हा विरोधकांची एकजूट झाली आणि कॉग्रेस विरोधातल्या मतांची विभागणी टळली; तेव्हा मते कायम असून कॉग्रेसला कमी जागा मिळालेल्या दिसतील. दुसरीकडे मर्यादित जागी केंद्रीत झालेल्या मतांवर भाजपा कमीच जागा लढवतो, परंतू कमी टक्क्यातही अधिक जागा जिंकतो असे आढळून येईल. आताही भाजपापेक्षा कॉग्रेस अधिक जागी लढते आहे. पण थोडा झुकाव मोदींमुळे भाजपाला मिळू शकला, तरी म्हणून त्याला मोठे यश मिळू शकेल. मागल्या दोन निवडणूकात कॉग्रेसची मते फ़ारशी वाढलेली नाहीत. पण मित्रपक्षांच्या मदतीने कमी जागा लढवून त्या पक्षाने अधिक यश संपादन केलेले दिसेल. मात्र आजवर कुठल्याही अन्य पक्षाने देशव्यापी निवडणूकीत कॉग्रेसला मतांच्या टक्केवारीत मागे टाकलेले नाही. १९९८ सालात भाजपा व कॉग्रेस दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी जवळपास सारखी होत आली होती. पण जागा अधिक मिळवतानाही कॉग्रेसने आपल्याच पुर्वीच्या मतांच्या तुलनेत किती लोकप्रियता गमावलेली आहे, त्याची साक्ष या कोष्टकातून मिळू शकेल.

   मागल्या वर्षभरात मोदींनी कॉग्रेस व युपीए सरकार विरोधात प्रचाराची आघाडी उघडून तीच टक्केवारी वाढवण्याचे डावपेच योजले होते. आज मतचाचण्यात त्यांची लोकप्रियता व भाजपाला मिळू शकणारी मतांची वाढलेली टक्केवारी खरी असेल, तर त्याला लाटच म्हणावे लागेल. कारण चाचण्या मोदींच्या भाजपाला ३५ टक्केहून अधिक मते दाखवत आहेत. त्याचा अर्थ त्या पक्षाला बहूमतापर्यंत ती टक्केवारी पोहोचवू शकेल. कारण भाजपा सर्व ५४३ जागांवर लढणार नाही. जिथे त्याचे वर्चस्व आहे, अशाच जागी ते ३५ टक्के वाटायचे म्हटल्यास तीच टक्केवारी तुलनेने ४० टक्के परिणाम घडवू शकते. त्यामुळेच भाजपाच्या वा मोदींच्या यशाचे गणित वा लाटेचे स्वप्न साकार होणे एकूण मतदानाची टक्केवारी वाढण्यावर अवलंबून आहे. जर सहा आठ टक्के मतदानात भाजपा वाढ घडवून आणू शकला, तर मोदींच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या वाट्याला वैध मतांपैकी निर्णायक टक्केवारी येऊ शकते. तीच टक्केवारी मोदींना पंतप्रधान पदावर बसवू शकेल. जर पहिल्या फ़ेरीपासून शेवटच्या फ़ेरीपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी साठी ओलांडून पुढे घालवण्यात भाजपाने यश मिळवले, तर त्याने बहूमताचा पल्ला गाठला असे ठामपणे मोजणीच्या आधीच म्हणता येईल. त्यासाठी कुणा राजकीय जाणकाराकडे सल्ला घेण्य़ाची गरज नाही. गु्रूवारी तिसर्‍या फ़ेरीचे मतदान झाले, तेव्हा उत्तरेतील वा अनेक राज्यात सुर्यास्तापर्यंत पन्नाशीचा पल्ला मतदानाच्या टक्केवारीने गाठल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. (वेळेची मर्यादा असल्याने मला शेवटची टक्केवारी तपासता आलेली नाही. पण त्याला महत्व नाही). ती आकडेवारी प्रत्येक वाचक स्वत:च बघून आपापला अंदाज येत्या १६ मेपुर्वी घेऊ शकतो.

   ज्या मोदी लाटेची वा युपीए सरकारच्या नाकर्तेपणाला जनता वैतागल्याची विश्लेषणे आपण मागले वर्षभर ऐकत आहोत, त्याच्या विरोधात जनमताची लाट असेल, तर त्याचे प्रतिबिंब मतदानातून स्पष्टपणे पडायला हवे. ते पडायचा निकष म्हणजे मागल्या खेपेपेक्षा लक्षणिय अशी मतदानात वाढ व्हायला पाहिजे. ती वाढ म्हणजे किमान साठी ओलांडून एकूण सरासरी मतदानाने ६२ ते ६५ टक्के इतकी मजल मारायला हवी. पुढल्या महिनाभरात अनेक मतदानाच्या फ़ेर्‍या व्हायच्या आहेत. १३ मे २०१४ रोजी संपुर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदान संपून अखेरचे आकडे समोर येतील. तेव्हा प्रत्येक नागरिकाला स्वत:च राजकीय भाकित करता येईल. चारच महिन्यापुर्वी विधानसभांच्या निवडणूका पार पडल्या, तेव्हा त्यात राजस्थान व मध्यप्रदेशात दहा बारा टक्के मतदानात वाढ झाली आणि प्रचंड उलथापालथ घडली होती. पण कुठल्याही जाणकाराने मतदानातल्या अफ़ाट वाढीचा अर्थ उलथापालथ आहे, असे भाकित केले नव्हते. इथेच आकडेवारी किती फ़सगत करू शकते त्याची प्रचिती येते. पण नि:पक्षपाती नजरेने आकडे अभ्यासले, तर मागल्या निवडणूकांचे निकाल व त्यामधले आकडे कोणालाही निष्कर्ष काढायला मदत करू शकतात. तेव्हा इतर कुणाचे पांडित्य ऐकण्यापेक्षा मित्रांनो, तुम्हीच आकड्यांकडून तुमचे भाकित करा आणि ठरवा देशात मोदींची लाट आहे किंवा नाही. तुमचे भाकित १६ मे २०१४ च्या संध्याकाळी खरे की चुकले, ते तुम्हालाच ताडून बघता येईन ना?
==============================
१९५२ ते २००९ कालखंडातील पंधरा लोकसभा
लौकरच सोळाव्या लोकसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुसंडीने सर्वांनाच त्या निवडणूकीच्या निकालाबद्दल कमालीची उत्सुकता वाटू लागली आहे. मतचाचण्या, अंदाज, आडाखे यांना ऊत आलेला आहे. अशावेळी ज्या सामान्य माणसाला मागल्या पंधरा लोकसभा निवडणुकीचा इतिहास जाणून घ्यायची इच्छा असेल व त्यामागचे राजकारण समजून घ्यावेसे वाटत असेल; त्यांच्यासाठी. आज तुल्यबळ वाटणार्‍या कॉग्रेस व भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे आकडे इथे दिलेत.निवडणूक                    कॉग्रेसची टक्केवारी       मिळालेल्या जागा     भाजपाची टक्केवारी   जागा

पहिली लोकसभा १९५२         ४४.९९%                    ३६४          ३.०६%             ३
दुसरी लोकसभा १९५७         ४७.७८%                    ३७१          ५.९७%             ४
तिसरी लोकसभा १९६२         ४४.७२%                    ३६१          ६.४४%             १४
चौथी लोकसभा  १९६७         ४०.७८%                    २८३          ९.३१%             ३५
पाचवी लोकसभा १९७१         ४३.६८%                    ३५२          ७.३५%            २२
सहावी लोकसभा १९७७         ३४.५२%                   १५४          --------------------------
सातवी लोकसभा १९८०         ४२.६९%                    ३५३          ---------------------------
आठवी लोकसभा १९८४         ४९.१९%                    ४०४           ७.७४%             २
नववी लोकसभा १९८९          ३९.५३%                    १९७           ११.३६%            ८५
दहावी लोकसभा १९९१          ३६.२६%                     २३२          २०.११%            १२०
अकरावी लोकसभा १९९६        २८.८०%                     १४०          २०.२९%            १६०
बारावी लोकसभा १९९८         २५.८२%                    १४१           २५.५९%            १८२
तेरावी लोकसभा १९९९         २८.३०%                      ११४           २३.७५%            १८२    
चौदावी लोकसभा २००४        २६.५३%                    १४६           २२.१६%             १३८
पधरावी लोकसभा २००९        २८.५५%                   २०६           १८.८०%            ११६

२ टिप्पण्या:

  1. नुसती लाट नाही सुनामी.... कळेल लवकरच!

    उत्तर द्याहटवा
  2. आपले भाकित 100% खरे झाले आहे. आणि ओक यांनी लिहाल्या प्रमाणे खरोखरच त्सुनामी आली होती. त्यात ममता व जयललिता सोडून सगळे वाहून गेले. असेच एक विश्लेषण म्हणता येणार नाही पण भाकित कल्याण मतदार संघातून उभ्या राहिलेल्या आनंद परांजपे यांनी केले होते. या मतदार संघात यावेळी सगळ्यात कमी म्हणजे फक्त 42% मतदान झाले. पण हे ते विसरले 2009 मधे फक्त 32% मतदान झाले होते. म्हणजे या वेळेस 10% मतदान वाढले आणि ते पडले.

    उत्तर द्याहटवा