गुरुवार, १८ जून, २०१५

उपदव्यापी मुलगा

गीता सांगण्याची वेळ आली, तरी कृष्णलीला चालूच


मुख्यमंत्री ना. शरद पवार महाराष्ट्रातच मुख्यमंत्रीपदावर रहाणार आहेत! त्यांनी खसदारपदाचा राजिनामा दिला असून त्यामुळे संशयाला जागा नाही. ना. पवारांविषयी वारंवार लिहीण्याची आमच्यावर पाळी येते. एखादा मुलगा सारखा कुठेतरी उपदव्याप करीत असतो! कुठे डोक्याला खोक पाडून घेतो, कुठे स्कुटर चालू करून आपटतो. कुठे भाजून घेतो, किंवा काहीच नाही तर घरात क्रिकेट खेळताना सिक्सर मारून काच तरी फ़ोडतो! स्वत:च पंच बनुन सिक्सरचा सिग्नल देतो. ना. पवारांचाही नुसता उपदव्याप सुरू असतो. दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री होते तेव्हा सारखे महाराष्ट्रात यायचे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले तर सारखे दिल्लीला जातात, याला काय म्हणावे? ना. पवार दिल्लीत संरक्षणमंत्री होण्यासाठी जाताना म्हणाले होते की, मी महाराष्ट्रात यापुढे परतणार नाही आणि जरी परतलोच तरी कोणत्याही अधिकारपदावर येणार नाही! पण नंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर कॉग्रेसश्रेष्ठींच्या आज्ञेचे कारण सांगून आलेच! महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था ठाकठीक करून गॅंगस्टरीझम उखडून टाकून, पक्षसंघटना मजबूत बांधून व आगामी सार्वत्रिक निवडणूकीत महाराष्ट्रात कॉग्रेसला विजयी करून १९९५ साली दिल्लीला परत जाईन! पण यापैकी कोणतेही उद्दीष्ट साध्य न करताही स्वत:च पंच बनून ‘यशस्वी’ झाल्याचे जाहिर करून दिल्लीला निघाले होते. उगीच उपदव्याप कृष्णानेही केले, पण कृष्णाने बालपणी असल्या खोड्या केल्या, तर ना. पवार वयाच्या ५४ व्या वर्षीही ‘कृष्णलीला’च करीत आहेत! अलिकडे ते लोणावळ्यजवळ कार्ले येथे बालाजी तांबे यांच्या निसर्गोपचार केंद्रात मानसिक संतुलन साधण्यासाठी गेले. पण निसर्गोपचार केंद्रातही ५४ वर्षाचा ‘उपदव्यापी मुलगा’ स्वस्थ बसला नाही! त्यांनी तिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीत काय बोलणे झाले याबाबत आजतागायत उलटसुलट चर्चा चालू आहे. जेथे जाई तेथे, राजकारण सांगाती! सतत उलटसुलट चर्चेमुळे ना. पवारांची बातमी दिल्याशिवाय वृत्तपत्रंचा अंक काढणे अशक्य होऊन जाते, आणि त्यांच्याबद्दल न लिहीणेही अशक्य होऊन जाते! लोण्याचा गोळा चोरून व मटकावून बालकृष्ण जसा निष्पाप चेहर्‍याने यशोदेसमोर उभा रहायचा, तसे ना. पवारही निष्पाप निरागस हास्य करीत उभे ठाकतात. ना. पवार कार्ले येथे मानसिक संतुलनासाठी गेले, पण ‘मानसिक संतुलन’ त्यांना जन्मत:च प्राप्त झालेले आहे. बहुधा त्यांनीच बालाजी तांबे यांना मानसिक संतुलन शिकवले असावे.

संरक्षणमंत्र्यांचे विमान! त्याबद्दलही चर्चा!

कृष्णलीला कितीही संगितल्या तरी संपत नाहीत, असे म्हणतात. याबाबत आम्हाला ना. पवारांमुळे खात्री पटली आहे. ना. पवार केंद्रात संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांचे खास विमान वारंवार पुण्यनगरी पुण्यात अवतीर्ण होत असे. मध्यंतरी त्यांनी आम्हाला प्रदिर्घ मुलाखत दिली तेव्हा त्यांच्या याच विमानातून आम्ही ‘दिल्ली-पुणे’ प्रवास केला व त्या दीड तासात मुलाखत पुर्ण केली. आमचे नशीब थोर असल्यामुळे या विमानात दोन शर्मा नव्हते! सगळे पुण्याचेच ‘फ़ुकटे’ होते! आम्ही ‘फ़ुकटे’ म्हटल्याबद्दल आमच्यावर रागावण्याचे कारण नाही! ना. पवार तसे जाहिरपणे म्हणाले. तेव्हा त्याचीही चर्चा करतो. ना. पवारांचा प्रभाव असा की, या मुलाखतीमुळे ‘नवाकाळ’चा खप ५० हजारांनी वाढला! मुलाखतीबद्दल उदंड चर्चा झाली, यात काही नवल नाही. पण आम्ही ना. पवारांची प्रदिर्घ मुलाखत का घेतली? हाही चर्चेचा विषय होऊन संशय निर्माण केला गेला आणि पवारांसारखे ‘मानसिक संतुलन’ नसल्याने आम्ही व्यग्र झालो होतो.

राज्य कॉग्रेसचे आणि माहिती भाजपाला!

आजवर अनेक संरक्षणमंत्री होऊन गेले. कृष्ण मेननसारखे सर्वात वादग्रस्त संरक्षणमंत्री झाले. पण त्यांच्या ‘विमान प्रवासा’ची कधी चर्चा झाली नाही. ना. पवार संरक्षणमंत्री झाल्यावर मात्र चमत्कार झाला! ते वाराणसीहून पुण्याला त्यांच्या खास विमानाने आले, तेव्हा त्यांच्या विमानात दाऊद इब्राहिमच्या गॅंगस्टरांशी संबंधित दोन शर्मा होते, अशा गोपिनाथ मुंडे यांच्या आरोपाने प्रचंड खळबळ माजली. ना. पवारांनी खुलासा केला की, ‘माझ्या विमानात दोन शर्मा होते याची मला काहीच माहिती नाही!’ कॉग्रेसचे राज्य कसे चालते ते पहा. राज्य कॉग्रेसचे, पण ना. पवारांच्या विमानातून कोण येतात जातात याची माहिती भाजपाला! हे दोन शर्मा नुकतेच दिल्लीहून मुंबईला आले व पकडले गेले, तेव्हा ना. पवारांच्याच विमानातून आले नाहीत, हे नशीब म्हणायचे! महापौर आर. आर. सिंग आणि आमदार दुबे मुंबईतच होते, हे कदाचित कारण असावे! ना. पवारांच्या वारणसी-पुणे विमान प्रवासात दोन शर्मा कसे आले होते? महापौर आर. आर. सिंग यांनी त्यांना आणले होते! महापौरांची अब्रु गेली, पण नंतर शब्द फ़िरवून खुर्ची बचावली. आजही ना. पवारांना नक्की माहिती नाही, ते म्हणाले की, ‘माझ्या विमानातून अनेकजण येतात जातात (भाजपाचे) अण्णा जोशीही पुण्याला येतात जातात! नाहीतरी पुण्याच्या लोकांना फ़ुकटे म्हणतातच!’ म्हणजे ना. पवार थट्टेतच बोलले, तरी त्यातून प्रचंड चर्चा सुरू झाली! एखाद्या मुलाने मोठा दगड नदीत फ़ेकावा माशांची धावपळ व हवेचे बुडबुडे पहात बसावे, तशा ना. पवारांच्या लीला सुरू असतात.

शंकररावांबरोबर जुंपली

ना. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून दिल्लीत वारंवार जातात, पण गृहमंत्री ना. शंकरराव चव्हाण मात्र क्वचितच दिल्लीहून मुंबईला येतात. शंकरराव मुंबईत आले की, माजी मुख्यमंत्री सुधारकराव यांना भेटतातच. दोघे भेटले की वृत्तपत्रात चर्चा सुरू होते ती शरद पवारांची! ना. शंकरराव म्हणाले की. ‘केंद्र सरकार भक्कम आहे. कुणाही मुख्यमंत्र्याला सल्ल्यासाठी दिल्लीत बोलावण्याची गरज नाही. जर तसे कुणी भासवित असेल, तर ते खोटे आहे.’ यावर ना. पवारांनी तसेच सणसणीत उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘पंतप्रधानांवरील अविश्वास ठराव व संसदीय पक्षाची बैठक या दोन्ही वेळी मला पंतप्रधानांनीच बोलावले होते! शिवाय दिल्लीत महाराष्ट्राची अनेक कामे असतात. मी यावेळी दिल्लीत दाभोळचा उर्जा प्रकल्प आणि कापूस एकाधिकार योजनेला मुदतवाढ यासाठी प्रयत्न केले. कापूस एकाधिकार योजनेसाठी आणखी एक वर्षाची मुदत वाढवली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची तड दिल्लीत लावावीच लागते. पक्षाचीही कामे असतात. फ़क्त मंत्रीपदाची कामे करण्याइतका भाग्यवान मी नाही!’ म्हणजे शंकरराव महाराष्ट्राचे व पक्षाचे काही काम करीत नाहीत आणि मी मात्र दिवसरात्र महाराष्ट्राचे आणि पक्षाचे काम करण्यासाठी आटापिटा करीत असतो असा उलटा तडाखा देवून ना. पवार मोकळे झाले.

ना. पवार दिल्लीला जाणार ही बातमी त्यांनीच पसरवली. आमदार पदाची शपथ नागपूर अधिवेशनात घेतली तरी चालेल असे अकारण सांगून ती बातमी त्यांनी टांगतीच ठेवली. खासदारपदाचा राजिनामा देवून आल्यावर ना. पवार म्हणाले की, आता मी दिल्लीत आलो तर महराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण होईल. ही गोष्ट पक्षाला हितावह नाही, असे मला अनेक सहकार्‍यांनी सांगितले. तेव्हा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून दिल्लीत येण्याची मला इच्चा नाही.’ ना. पवारांनी नविन ते काय सांगितले? ‘नवाकाळ’ने यापुर्वीच बातमी दिली की, ना. पवारांना दिल्लीत यायचे असेल तर सुधाकररावांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे लागेल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे व यामुळे ना. पवार दिल्लीला जाणार नाहीत! ‘नवाकाळ’ची बातमी तंतोतंत खरी ठरली इतकेच. पण आपण महाराष्ट्राच्या काळजीमुळे महाराष्ट्रात राहिलो असे सांगून ना. पवार नामानिराळे झाले.

कृष्णलीला संपवा! विकासाची गीता सांगा

त्यांनी फ़लोद्यानासाठी कितीही जमिन खरेदी करण्यास मुभा देण्याचे पाऊल टाकले आहे. फ़लोद्यानासाठी घेतलेल्या जमिनीला सिलींग कयदा लागू होणार नाही, असे नविन धोरण जाहिर केले आहे. त्यामुळे भांडवलदार, व्यापारी, स्मगलर आणि खुद्द सत्ताधारी यांना वाटेल तेवढी जमिन विकत घेता येईल. त्यानुसार मुंबईचे उद्योगपती राहुल बजाज व अजित गुलाबचंद आणि ना. पवारांचे अनुयायी सुरेश कलमाडी हे श्रीगोंदा तालुक्यात विक्रीला काढलेली १००० हजार हेक्टर जमीन खरेदी करण्यास निघाले. तथापि कोर्टाने मनाई हुकूम दिला आहे. एक शिष्टमंडळ ना. पवारांकडे गेले तेव्हा ना. पवारांनी खुलासा केला की, ‘१००० हजार हेक्टर जमीन विकण्यात येत आहे याची मला माहितीच नाही. तुम्ही रामराव आदिक किंवा विलासराव देशमुख यांना विचारा.’ त्यांनी आणखी एका सभेत सांगितले की, ही योजना लोकांना नको असेल तर रद्द करता येईल. कसेही टाकले तरी मांजराचे पिल्लू पायावरच उभे रहाते! एकंदरीत सगळे उपदव्याप सुरूच आहेत. महाराष्ट्राची बांधणी करण्याशी या उपदव्यापांचा काहीही संबंध नाही. ना. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रात फ़क्त दोनच वर्षे मुख्यमंत्री होते. पण त्यांनी महाराष्ट्राला असे धोरण दिले की, त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’च बहाल केला असे म्हटले जाते. त्यांनी तळागाळाच्या उद्धाराचा कार्यक्रम दिला. त्यांनी अवघा महाराष्ट्र जातीधर्मविरहित एकवटला. विकासाच्या जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांना आवाहन केले. तमाम मराठी माणसांना यशवंतरावांबद्दल आदर आहे. या उलट शरद पवारांकडे कल्याणकारी धोरण नाही व क्रांतीकारक कार्यक्रम नाही. प्रचंड काळापैसा असलेल्या मुठभर वर्गाचे हितसंबंध ते साधत आहेत. रोज नवी कोलांटी उडी मारत असल्याने त्यांच्या शब्दावर कुणाचाच विश्वास नाही. त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात टोकाची मते आहेत. त्यांचे नाव घेताच शिव्यांचा वर्षाव करणारे आहेत. कुणालाच आदर नाही. पण ‘दिल्लीच्या तख्तावर उद्या बसणारा महाराष्ट्राचा पहिला बहुजनसमाजाचा नेता’ असे दृष्य पहाणारेही आहेत. आणि ते ना. पवारांना सर्व गुन्हे माफ़ही करतात. महाराष्ट्राचे ना. पवार आणि फ़क्त तेच दिल्लीच्या तख्तावर बसतील ही मराठी माणसाच्या मनाची ग्वाही! त्यामुळे शरद पवारांना तोंडाने शिव्या देणार्‍याचा हातही मत त्यांनाच देऊन येतो आणि येईल. पण ना. पवार पंतप्रधान होतील आणि यावेळी त्यांचे पाय खेचता काम नये, असे म्हणणरा हदयाचा हुंकारही हरपणार आहे. ना पवारांनी आता अंत पाहू नये. ना. पवार काय करतील ते सांगता येत नाही. ते ‘अनप्रेडीक्टेबल’ आहेत. हे कौतुक आता शोभादायक नाही. कृष्णलीला पुरे झाल्या. आता समतेचा आणि सुबत्तेचा मार्ग सांगा! वैचारिक पायावर धोरणांची आणि निर्धाराच्या पायावर कार्यक्रमाची ‘गीता’ सांगण्याचे ना. पवारांचे वय आहे! ना. पवार आता व्रात्यपणा पुरे झाला! ती वेळ संपली! नाहीतर महाराष्ट्राची फ़ार मोठी हानी करालच. पण स्वत:ची त्याहून मोठी हानी होईल!


 (दै. ‘नवाकाळ’ संपादकीय, रविवार ५ सप्टेंबर १९९३)

1 टिप्पणी: