रविवार, १५ जून, २०१४

मोदी ‘सेक्युलर’ होऊ लागल्याच्या खाणाखुणा



   १९९१ सालची गोष्ट आहे. विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार लालकृष्ण अडवाणी यांच्या अटकेमुळे पराभूत झाले होते आणि त्यांच्या जागी आलेल्या चंद्रशेखर सरकारला दिलेला पाठींबा राजीव गांधींनी काढून घेतल्याने लोकसभाच बरखास्त करण्याचा प्रसंग ओढवला होता. त्यातून आलेल्या मध्यावधी लोकसभा निवडणूकांची मोठी प्रचारसभा शिवाजी पार्कवर शिवसेना भाजपा युतीने योजलेली होती. काळाची गल्लत होऊ नये म्हणून एक तपशील इथे मुद्दाम नमूद करतो. तोपर्यंत बाबरी मशीद शाबुत होती. त्या घटनाक्रमाने सिंग समाजवाद्यांना मोठा हिरो वाटू लागला होता. कारण त्याच्याच आशीर्वादाने लालुप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये अडवाणींना अटक करून रथयात्रा रोखलेली वा संपवलेली होती. परिणामी भाजपाचे नाक कापले गेले आणि आता जनता दलाच्या पाठींब्याशिवाय पुन्हा भाजपा इतके मोठे यश लोकसभेत मिळवू शकणार नाही; याची तमाम समाजवाद्यांना खात्रीच होती. याचे कारण असे, की आधीच्या १९८४ च्या निवडणूकीत भाजपा म्हणून प्रथमच लढताना त्या पक्षाचा पुरता सफ़ाया झालेला होता. राजीव लाटेत वा इंदिरा हत्येच्या वावटळीत भाजपाला दोनच जागा कशाबशा मिळवता आलेल्या होत्या. पुढल्या बोफ़ोर्स राजकारणात जुना जनता पक्ष व अन्य सेक्युलर पक्षांनी सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दल नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता. तेव्हा व्ही. पी. सिंग यांची हवा पसरली होती. पण यशाची खात्री नसल्याने जनता दलाला भाजपाशी हातमिळवणी करावी लागली होती. तेव्हाही पुन्हा भाजपाने नव्या जनता दलात विसर्जित होण्याची कल्पना चर्चेत होती. पण त्यावेळी फ़ुल फ़ॉर्मात असलेल्या अडवाणी यांनी त्याला साफ़ नकार दिला होता. होईल तर जनता दलाशी आघाडी वा जागावाटप; असा हट्ट अडवाणी धरून बसले होते. त्यापुढे मग जनता दलाला शरण जावे लागले आणि जागांचा समझोता होऊन १९८९ च्या निवडणूकात राजीव कॉग्रेसच्या विरोधात एकास एक उमेदवार उभे करण्यात विरोधकांना यश मिळाले. त्याचा मोठा लाभ दोन्ही बाजूंना मिळाला. जनता दलाचे दिडशेहून अधिक खासदार आले तर भाजपानेही विक्रमी ८९ सदस्य लोकसभेत निवडून आणले. त्यामुळेच जनता दल व भाजपा अशा दोघांना आपल्यामुळेच दुसर्‍याला जास्त लाभ मिळाला, असे वाटणे स्वाभाविक होते. सहाजिकच ती लोकसभा विसर्जित झाल्यावर नव्या लढतीमध्ये भाजपाला स्वबळावर पुर्वीइतके मोठे यश मिळणार नाही, असे सेक्युलर व समाजवाद्यांना वाटले तर गैर मानता येणार नाही. पण म्हणून वस्तुस्थिती तशी नव्हती. सरकार ज्या कारणास्तव पडले, त्या कारणासाठी लोकांनी जनता दलाला मते दिलेली नव्हती.

   राजीव गांधी यांच्या प्रचंड बहूमताच्या सरकारने जे अनेक घोटाळे व गोंधळ करून ठेवले होते, त्याचा निचरा करण्यासाठी लोकांनी जनता दल व सिंग यांना कौल दिला होता. पण त्यांनी अकारण भाजपाच्या रथयात्रेचे भांडवल करून लोकांच्या आकांक्षेवर पाणी ओतले होते. त्यामुळे पुन्हा कॉग्रेस सत्तेवर येण्याची परिस्थिती तयार करण्याचे पाप जनता दलाकडून झाले होते. भाजपा सत्तेत सहभागी नव्हता, तर त्याने बाहेरून जनता दलाला पाठींबा दिलेला होता. अशावेळी त्याच्या अध्यक्ष अडवाणींच्या एका रथयात्रेतून काही भयंकर घडण्याच्या नुसत्या कल्पनेसाठी सरकार पाडायची वेळ ज्यांनी आणली, त्यांच्यावरच लोकाचा राग वळणे भाग होते. त्यामुळेच त्यातून आलेल्या मध्यावधी निवडणूकीचा तोटा शेवटी जनता दलाच्याच माथी जाणार होता. त्याचाच दुसरा भाग म्हणून त्याचा लाभ भाजपाला मिळू शकत होता. कारण सत्तेत भागिदारी न मागता भाजपाने बाहेरून सिंग सरकारला पाठींबा दिलेला होता. पण त्यांच्याच पाठींब्यावर चालणार्‍या सरकारने भाजपाचीच राजकीय गळचेपी केल्यास पाठींबा काढून घेणे तर्कशुद्ध होते. म्हणूनच मतदाराचा कोप भाजपाच्या वाट्याला नव्हेतर जनता दलाच्याच वाट्याला येण्याची राजकीय शक्यता होती. पण हे सत्य बघायचा विवेक ज्यांच्यापाशी नसतो, त्यांचा कपाळमोक्ष अपेक्षितच असतो. अशी तेव्हाची म्हणजे १९९१ च्या मध्यावधी लोकसभा निवडणूकपुर्व राजकीय स्थिती होती. त्याचसाठी शिवाजी पार्कवर युतीची ती अंतिम प्रचारसभा योजलेली होती. त्यातली भाषणे संपली आणि काही पत्रकार मित्रांसमवेत मी निघालो. येताना आमच्या राजकीय गप्पा चालू होत्या. सोबतचे दोन्ही पत्रकार एका नामवंत दैनिकाचे वार्ताहर होते. त्यापैकी एक आता वाहिन्यांच्या क्षेत्रात उच्चपदस्थ आहे आणि दुसरा अन्य एका नावाजलेल्या दैनिकाचा राजकीय संपादक आहे. दोघेही समाजवादी गोतावळ्यातले असल्याने, सभेतील भाषणांची टवाळी करीत होते, हे वेगळे सांगायला नको. त्यांच्या मते भाजपाची तेजी तेव्हाच संपलेली होती. पण माझे मत वेगळे होते. याच घटनाक्रमाने जनता दलाचा अवतार संपायला आला आणि भाजपाला नवी उभारी देण्याचे पाप समाजवादी मानसिकतेने पार पाडले, असा माझा दावा होता.

   आज तेवीस वर्षे उलटून गेल्यावर जनता दल नावाचा प्रकार कुठल्या कुठे अनेक तुकड्यात विखरून गेला आहे आणि त्यांची बेरीज एकत्र केली, तरी दोन डझन भरू नये, इतकी संसदेतील त्यांची संख्या रोडावलेली आहे. उलट त्या सभेपुर्वी भाजपाच्या नावावर असलेला ८९ खासदारांचा विक्रम कुठल्या कुठे केविलवाणा वाटावा, इतका भाजपा मोठा होऊन गेला आहे. तेव्हाच्या तिपटीपेक्षाही अधिक जागा मिळवून भाजपाने सर्वच राजकीय पक्षांना खुजे व छोटे करून टाकले आहे. त्याची सुरूवात १९९० च्या रथयात्रा रोखण्याच्या मुर्खपणातून झाली होती. त्याच तर्कदुष्टतेचे पर्यवसान दोन दशकांनी नरेंद्र मोदी रोखण्यापर्यंत घसरत खाली येण्यात झाले. पण आजही त्या समाजवादी पत्रकाराचा आवेश थोडाही कमी झालेला नाही. मोदींच्या अभूतपुर्व विजयासंबंधी एका चर्चेत सहभागी झालो, त्यात याच पत्रकाराचा उत्साह चकीत करणारा होता. कधीकधी मला अशा बुद्धीमंतांचे नवल वाटते. अशा समाजवाद्यांपैकी अनेकजण पुढल्या काळात कॉग्रेसवासी झाले. आणि त्यांच्या आहारी गेलेल्या कॉग्रेसलाही त्यांनी आधीच्या जनता दलाप्रमाणेच आज नामशेष करून सोडले आहे. डॉ. रत्नाकर महाजन, हुसेन दलवाई वा डॉ. भालचंद्र मुणगेकर ही आपल्याला परिचीत म्हणावीत अशी काही नावे. जनता पक्षापासून त्यांचा राजकीय प्रवास बघितला, तर येत्या काही वर्षात ही मंडळी भाजपातही दाखल होतील; याविषयी माझ्या मनात शंका नाही. आजवर ज्या भाजपाला जातीयवादी वा सांप्रदायिक म्हणून हिणवण्यात हयात खर्ची पडली आहे, तोच भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली कसा सेक्युलर व सर्वसमावेशक होत गेला; त्याचे तर्कशुद्ध विवेचन आपल्याला दोनतीन वर्षांनी याच लोकांकडून ऐकायला मिळणार आहे. काही तत्सम पत्रकारांकडून आता त्याची सुरूवातही झालेली आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे कुठल्याही सरकारच्या वाटचालीचे दर्शक असते. सोमवारी हे भाषण झाल्यावर ते मोदी सरकारचे असून त्यात संघाच्या धोरण व उद्दीष्टांचा कुठे लवलेश नाही, म्हणुन हे कसे उत्तम स्वागतार्ह आहे, असले कौतुकाचे शब्द विनाविलंब समोर आलेले आहेत. आज ते सामान्य पत्रकार वा पाठीराख्यांकडून आलेले आहेत. काही काळानंतर नेत्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू होईल. त्यात नवे काहीच नाही. सेक्युलर व सांप्रदायिक वा हिंदूत्ववादी अशी व्यवहारी विभागणी कधीच नसते. सोयीनुसार तत्वे व विचारात बदल होत असतात.

   लोकसभा निवडणूकीचे पहिले मतदान होण्यापुर्वी आयबीएन वाहिनीवर राजदीपने मतचाचण्यांचा कार्यक्रम सादर केला होता. त्यात बोलताना ‘हिंदू’ या इंग्रजी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी सेक्युलर शब्दाची व्यवहारी व्याख्या कथन केलेली होती. आंध्रातील तेलंगणा समिती, तेलगू देसम व जगन रेड्डी कॉग्रेसच्या नेत्यांशी आपली चर्चा झाली आणि त्यापैकी प्रत्येकाने मोदींच्या भाजपा समवेत जाण्यास ठाम नकार दिला असल्याचे साईनाथ यांनी स्पष्ट केले. पण मोदींनी लोकसभेत २००हून अधिक जागा जिंकल्या तर काय? या साईनाथ यांच्या प्रश्नावर त्या सर्वच पक्षाच्या नेत्यांचे एकच उत्तर होते. २०० जागा मतदार ज्या पक्षाला देईल, तो सेक्युलर पक्षच असला पाहिजे. राजकीय व्याख्या या अशा गरज व सोयीनुसार बदलत असतात. मोदींनी २०० जागाच नव्हेतर लोकसभेत थेट बहूमतच मिळवल्यानंतर राजकीय वास्तव एकदम बदलून गेले आहे. त्याचे थोडेथोडे परिणाम आतापासूनच दिसायला लागले आहेत. जयललिता वा नविन पटनाईक यांनी बाहेरून आवश्यकतेनुसार मोदी सरकारला पाठींबा द्याय़ची भाषा सुरू केली आहे. तर आजवर मोदींमुळे देशाचा विनाश होई,ल असे भाकित छातीठोकपणे करणार्‍या विचारवंताची भाषाही सौम्य होऊ लागली आहे. कालपर्यंत खुद्द मोदीच हाफ़चड्डीवाले म्हणून त्यांची हेटाळणी चालायची. आता मोदी सौम्य असून त्यांना संघाने कारभार नीट करू दिला पाहिजे, असली चमत्कारिक भाषा कानावर पडू लागली आहे. अवघ्या एक महिना आधी मोदी साधी गुजरात दंगलीसाठी माफ़ी मागत नाहीत, म्हणुन कट्टर हिंदूत्ववादी होते. आता त्या माफ़ीचा उल्लेखही कुठे कानावर येत नाही. माफ़ीचा विषय सगळेच सेक्युलर अकस्मात विसरून गेलेत. गेली बारा वर्षे त्याच माफ़ी शब्दाचा अहोरात्र नामजप करणार्‍यांना, आता त्याची गरजही का वाटू नये? ह्याला तथाकथित सेक्युलर मंडळी भाजपालाही सेक्युलर ठरवण्याच्या दिशेने चालू लागल्याचे प्रमाण मानावे काय?

   जे यश भाजपा किंवा संघाला रामजन्मभूमी वा बाबरी प्रकरणातून मिळू शकले नाही, त्याच्या अनेकपटीने मोठे यश नरेंद्र मोदी यांनी केवळ राष्ट्रीय विकास व प्रगतीचा मंत्रजाप करून मिळवले आहे. पण त्याहीपेक्षा त्यांच्या यशाला त्यांचे विरोधक मोठा हातभार लावून गेलेत. शत्रूच आत्महत्या करायला निघाला, तर आपण नुसते मैदानात ठाम उभे राहूनही विजयी होऊ शकतो, हेच मोदींच्या यशाचे खरे रहस्य आहे. एकदा आपल्या सेक्युलर प्रतिस्पर्ध्यांना निकालात काढल्यावर मोदींचे पुढले ध्येय कुणाचीही व कसलीही माफ़ी न मागता आपल्यावर सेक्युलर झाल्याच्या अक्षता टाकून घेण्याचे असेल. त्याला फ़ार मोठा काळ लागणार नाही, पाच वर्षानंतर येणार्‍या निवडणूकांपुर्वीच इथल्या बुद्धीमंतांकडून मोदी कसे सेक्युलर आहेत आणि त्यांना संघामुळे चांगले काम करता येत नसल्याच्या तक्रारी ऐकायची वेळ आपल्यावर येणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरच्या प्रतिक्रिया त्याची सुरूवात आहे. पुढल्या एकदोन वर्षात अनेक विधानसभा निवडणूका व्हायच्या आहेत. त्यामध्ये मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपाने मोठे यश संपादन केले आणि कॉग्रेससहीत प्रादेशिक दुबळ्या पक्षांना निकालात काढत बलवान एकमेव राष्ट्रीय पक्ष होण्यापर्यंत मजल मारली, की मोदीच सेक्युकर असल्याचा डंका पिटणारे बुद्धीमंत वेगाने वाढत जातील. त्यावेळी रा. स्व. संघालाही शंका येऊ लागेल, की नरेंद्र मोदी हा आपला प्रचारक स्वयंसेवक होता, की डाव्या चळवळीतला कोणी खंदा ‘चळवळ्या’ कार्यकर्ता आहे? त्याची मिमांसा सोपी व सरळ आहे. कोणी सेक्युलर वा सांप्रदायिक नसतो, ज्याच्याकडून भरपेट दक्षिणा मिळते, त्या यजमानाला हवे ते वरदान देणारे बुद्धीमंत आपल्या देशात शेकडो वर्षापासून अस्तित्वात आहेत. पुर्वीच्या काळात त्यांना महामहोपाध्याय संबोधले जायचे, आता त्यांना सेक्युलर विचारवंत म्हटले जाते. बाकी व्यवहार व कार्यपद्धती जशीच्या तशी आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरच्या प्रतिक्रिया निवांत बघितल्या वा ऐकल्या असतील, तर त्यात मोदी सेक्युलर होऊ लागल्याच्या खाणाखुणा तुम्हाला सहज सापडू शकतील.

1 टिप्पणी:

  1. भाऊ तुमचे म्हणने १६ आणे करे आहे. परवा २६ जूनला आयबीएन लोकमत वर आजचा सवाल हा कार्यक्रम होता. त्यावर मोदी सरकारच्या एक महिन्याच्या कामगिरीवर सवाल होता. त्या वेळेस काँग्रेसचे प्रवक्ता सावंत आणि 'आप' चा प्रवक्ता रवी श्रीवास्तव हे होते. अँकर अलका होती आणि निखिल वागळेला चर्चेसाठी बोलावले होते. भाजपवर कायम टिका करणारे वागळे एवढे बदलले दिसलेकी आणि त्यांनी मोदींची एवढी प्रशंषा केली की अलका सहित सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. काँग्रेस आणि आप वरच वागळे यांनी टिका केली. ते सगळे पाहून हसावे की रडावे अशी माझी परिस्थिती झाली होती. शिवसेना-भाजपला कायमच शिव्या घालणारे वागळे कसे बदलले हे आता आपल्या या लेखावरून कळुन आले. की यामागे आणखी दुसरेच कारण आहे जसे मुकेश अंबानी यांनी Vicom 18 ला खरेदी केले आहे कारण कायबीएन लोकमत त्यांचीच वाहिनी आहे. भाऊ याची उलट तपासणी तुम्ही केलीच पाहिजे.
    धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा