जे कायदे अंमलात आणले जाऊ शकत नाहीत, असे कायदे संमत करण्याइतके कायद्याचे राज्य व कायद्याचा सन्मान संपवण्यासाठीचे दुसरे विघातक कृत्य नाही. -अल्बर्ट आईनस्टाईन
गुटखा बंदीच्या निमित्ताने खुप चर्चा होणार आहे आणि त्याचे फ़ायदे व तोटे याचे वाद घातले जाणार आहेत. त्यामध्ये जी मंडळी व्यसनमुक्तीसाठीच काम करतात, त्यांचा उत्साह समजण्यासारखा आहे. कारण ते आपल्या परीने लोकांना व्यसनमुक्त करायला दिवसरात्र धडपडत असतात. सहाजिकच कायद्यानेच व्यसनी पदार्थावर बंदी घातली तर त्यांना आनंद होणे स्वाभाविकच आहे. आपले हात मजबूत झाले असेही त्यांना वाटले तर चुक नाही. त्यात तथ्यसुद्धा आहे. कारण जेव्हा अशा अंमली पदार्थावर बंदी घातली जाते, तेव्हा त्यापासून दुर असणार्या लोकांना त्यात पडायचा मोह सहसा होत नाही. जिथे कायदा बडगा उगारण्याचा धोका असतो, अशा गोष्टीपासून सामान्य माणसे आपोआपच दुर असतात. पण जे व्यसनाधीन झालेले आहेत, त्यांना कायद्याची बंधने रोखू शकत नसतात. म्हणूनच कायद्याने व्यसनमुक्ती होत नसते. अमेरिकेचे उदाहरण त्यासाठी प्रसिद्ध आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी तिथे दारुबंदीचा मोठा प्रयोग झाला. व्होलस्टेड नामक रिपब्लिकन संसदसदस्याने हे विधेयक अमेरिकन संसदेत आणले होते. त्यावर बोलताना दुसर्या एका सदस्याने म्हटले होते, की हा कायदा रातोरात संपुर्ण अमेरिकेलाच गुन्हेगार ठरवणारा आहे. म्हणूनच तो यशस्वी होणार नाही. असे त्याने का म्हणावे, त्याचा आपण नव्वद वर्षे उलटून गेल्यावर तरी विचार करणार आहोत की नाही? कारण ते अमेरिकन संसदेतील विधेयक व त्यावरील उपरोक्त आक्षेप, तब्बल नव्वद वर्षे जुने आहेत. आणि जे शब्द त्या सदस्याने वापरले ते शब्दश: खरे ठरले होते. कारण त्या एका कायद्याने अमेरिकेतील कायद्याचा दबदबाच संपवून टाकला. कायदा मोडण्याची वा पायदळी तुडवण्य़ाची कुणाला लाजच वाटेनाशी झाली.
अमेरिकन दारुबंदी कायद्याला ते विधेयक मांडणार्या व्होलस्टेड याच्या नावानेच ओळखले जाते. १९१९ साली त्या विधेयकाच्या संमत होण्याने सर्वांगिण दारूबंदी जारी करण्यात आली. पण ती कुणालाच मंजूर नव्हती. मद्यप्राशन हा तिथल्या जनतेला व सामान्य माणसाला गुन्हाच वाटत नव्हता. सहाजिकच त्यावर घातलेल्या कायदेशीर बंदीचा सन्मान करण्याची कुणा अमेरिकनाला गरजच वाटत नव्हती. मग उघडपणे कुठे दारूचे उत्पादन होऊ शकत नसले तरी चोरट्या मार्गाने दारूचे उत्पादन चालू होते व विक्री-वितरण चालू होती. त्यात गुन्हेगारापासून कायदा प्रशासनाचे अधिकारी, पोलिस व न्याययंत्रणाही सहभागी होती. थोडक्यात प्रत्येकजण दारूबंदी मोडायला आघाडीवर होता. त्या एका कायद्याने अमेरिकेत भ्रष्टाचाराचा भीषण मोठा महाकाय राक्षस निर्माण केला. अल कापोन नावाचा एक माफ़िया गुंड शिकागो शहराचा अनिभिषिक्त सम्राट होऊन बसला होता. तिथले प्रशासन, कायदा, पोलिस सर्वकाही त्याच्या मुठीत गेले होते. कारण तोच त्या परिसरातील चोरट्या दारूचा बादशहा झाला होता. त्याला पकडण्याची वा त्याची गुन्हेगारी संपवण्याची कुणालाच इच्छा नव्हती. सामान्य माणसाला तर असे गुंड माफ़िया परमेश्वर वाटू लागले होते. कारण जे कायद्याने साध्य होत नव्हते ते गुंडामुळे त्यांना साध्य झालेले होते. असे गुंड लोकांना हिरो वाटू लागले होते. विचित्र असेल, पण तीच वस्तूस्थिती होती. दारूबंदीचा कायदा अत्यंत कठोर होता. पण त्याची अंमलबजावणी करायची इच्छा कोणालाच नव्हती. कारण तो कायदाच गैरलागू व अन्यायकारक आहे अशी लोकभावना होती. म्हणूनच कायदा धाब्यावर बसवून लोकांच्या मागण्या व इच्छा पुर्ण करणारे गुंड गुन्हेगार लोकांना प्रेषित वाटू लागले होते.
कुठलीही बंदी वा निर्बंध लादतांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्या नियम वा कायद्याने ज्याचा निषेध केला जात आहे, ती बाब चुकीची, गैरलागू अनैतिक वा गुन्हा आहे अशी जनतेचीही धारणा असायला हवी. तसे नसेल तर कायदा व नियम कागदावर रहातात, त्यांची सक्ती केली जाऊ शकते. पण त्यांना कायद्याचे पावित्र्य वा सन्मान मिळू शकत नाही. त्याला नैतिक अधिष्ठान मिळू शकत नाही. अमेरिकन दारूबंदीचे असेच झाले होते. तिथे मद्यपान सरसकट केले जाते आणि पिढ्यानुपिढ्या ते चालू आहे. एक कायद्याने त्याला बंदी घातली म्हणून ते अनैतिक ठरवता येणार नव्हते. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज होती. उलट तिथली मनोवृत्ती मद्यपान हा जन्मसिद्ध हक्क आहे अशीच होती. मग त्यावर आलेल्या बंदीला कोण आदर करणार? उलट सक्तीमुळे लोकांना ती दारूबंदी म्हणजे आपल्यावर आपल्याच सरकारने चालविलेला अत्याचार वाटला. म्हणूनच जे तो कायदा धाब्यावर बसवून चोरटी व बेकायदा दारू आणत होते, उत्पादन करत होते व पुरवत होते, त्याच्याविषयी जनमानसात वचकपुर्ण आदराची भावना निर्माण केली होती. एका बाजूला सामान्य माणसाचा त्या दारूबंदीला पाठींबा नव्हता तर दुसर्या बाजूला, ज्या प्रशासन वा पोलिसांनी त्या बंदीचा अंमल करायचा होता, त्यांनाही बंदी अयोग्यच वाटत होती. मग संसदेत बसलेले मुठभर लोक ती बंदी कशी यशस्वी करणार होते? थोडक्यात जो कायदा राबवता येणार नव्हता किंवा अंमलात आणणेच अशक्य होते, असा कायदा अमेरिकन संसदेने संमत केला होता. त्याचा परिणाम काय झाला? संपुर्ण अमेरिकेत कायद्याचा दबदबाच संपत गेला. गुंड व गुन्हेगार व त्यांच्या संघटीत टोळ्या शिरजोर होत गेल्या. एकप्रकारे अमेरिकाभर माफ़ीया नावाचे अराजक निर्माण झाले. म्हणजे दारूबंदी होणे दुर राहिले उलट काळाबाजार, काळापैसा व कायदा पायदळी तुडवणारी शिरजोर संघटित गुन्हेगारी मात्र त्या कायद्यामुळे कायमची अमेरिकेच्या मानगुटीवर बसली. जी आज जगभर माफ़ीया म्हणून ओळखली जाते.
असे का झाले त्याचे उत्तर शोधण्याची गरज नवनवे कायदे करणार्यांना वाटू नये, हे नवल म्हणायचे की ढोंगबाजी म्हणायची? आज एका रात्रीत महाराष्ट्रभर गुटखाबंदी लागू करायला निघालेल्या राज्य सरकारला ही बंदी यशस्वी होईल, असे कशाच्या आधारे वाटते आहे? जो कायदा कागदावर संमत करण्यात आला आहे तेवढ्याने ही बंदी लागू होऊ शकत नाही, की यशस्वी होऊ शकत नाही. अगदी त्या कायद्याची सक्ती असली तरी तो यशस्वी होऊ शकत नाही, कारण तो कायदा तेवढ्याच कठोरपणे राबवणारी कुठलीही यंत्रणा आज या सरकारकडे नाही, याची प्रत्येकाला खात्री आहे. अगदी ज्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत बसून तो मसूदा संमत केला, त्यांनाही त्याच्या अपयशाची पुर्ण खात्रीच आहे. कारण आजवर असे शेकडो कायदे झाले व तसेच धू्ळ खात पडले आहेत. अगदी कालपरवाचीच गोष्ट घ्या. १९४५ सालचा औषधविषयक कायदा आहे, त्यानुसार पाश्चात्य वैद्यकशास्त्रानुसार जाणकार असलेल्या डॉक्टरने दिलेल्या चिठ्ठीच्या आधारे काही जालीम औषधे विकायचे बंधन आहे. पण त्याचे अजिबात पालन होत नाही. त्यातच गर्भपाताची औषधे यतात. तेव्हा वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येला पायबंद घालण्य़ासाठी तेवढ्याच औषधांबाबत कठोर नियमन करण्याची घोषणा औषध आयुक्तांनी करताच औषध विक्रेत्यांच्या संघटनेने संपावर जाण्याची धमकी दिली. ती धमकी काय आहे? तीचा अर्थ काय होता? आम्ही कायदा इतकी वर्षे मोडत आलो आणि यापुढे तो पाळण्य़ाचा अट्टाहास चालणार नाही. म्हणजे हे औषधविक्रेते राजरोस कायदा मोडायचा त्यांना अधिकार असल्याच्या भाषेत बोलत होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना दालनात बोलावून त्यांना संप मागे घ्यायला लावला. याला कायद्याचा असर म्हणायचा काय?
ही बाब एकाच कायद्याच्या बाबतीतली इथे सांगितली. असे शेकडो कायदे आहेत, ज्यांना कोणीच दाद देत नाही. मंत्रालयाला आग लागली तेव्हा खुद्द राज्याच्या शासनकर्त्यांनीच अग्नीशमन कायदा पायदळी तुडवला होता ना? मग तेच शासनकर्ते कुठल्या तोंडाने सामान्य जनतेला वा कर्मचार्यांना कायद्याचा सन्मान करायला सक्ती करू शकतील? त्यामुळेच कायदे खुप बनवले जातात. त्यातले काही खुप कठोरही बनवले जातात. पण त्याची कोणाला फ़िकीर नसते. कारण त्या कायद्याचा अंमल होणारच नाही याची आता प्रत्येकाला खात्री पटलेली आहे. मात्र अशा नवनव्या कायद्यांमुळे व बंदी निर्बंधांमुळे काही लोकांचा अमाप फ़ायदा होत असतो. अशी मंडळी कुठल्याही बंदी वा निर्बंधाचे बाहू पसरून स्वागत करत असतात. कारण मग त्या लोकांना असे कुठलेही कायदे मोडण्याच्या खास परवानग्या देण्याचे अधिकार प्राप्त होत असतात. त्याची किंमत वसूल करता येत असते. त्यातून त्यांचे व्यक्तीगत उत्पन्न वाढत असते. मग कायदा अंमलात असतो आणि कायदे मोडणेही रितसर चालू असते. त्यातूनच लोकांचा कायद्यावरील विश्वास उडवला जात असतो. आणि तेच सत्य वैज्ञानिक आईनस्टाईन याने मोजक्या शब्दात सांगितलेले आहे. आजच्या गुटखाबंदीने काय साध्य होणार आहे? ( क्रमश:)
भाग ( ३२८ ) १७/७/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा