पुन्हा पुन्हा तीच तीच गोष्ट करीत रहाणे आणि काही वेगळे घडेल अशी अपेक्षा बाळगणे हा मुर्खपणाचा कळस असतो. -अल्बर्ट आईनस्टाईन
एक महान वैज्ञानिक विचारवंत असे का म्हणतो? ज्याने आयुष्यभर शेकडो प्रयोग केले आणि प्रत्येकवेळी नवा प्रयोग अपेशी होताना धीर सो्डला नाही, असा हा शास्त्रज्ञ आहे. म्हणजेच त्याने फ़सत चुकत अनेक नव्या वाटा शोधालेल्या आहेतच ना? मग त्याने असे का म्हणावे? त्यानेही एकमागून एक प्रयोग फ़सत असताना चिकाटी सोडली नाही. तर नवी उमेद बाळगून पुन्हा नवा प्रयोग केला. तोही फ़सला तर पुन्हा नवा प्रयोग केलाच होता ना? म्हणून तर त्याला निसर्गाची अनेक रहस्ये उलगडता आली. नवनवे सिद्धांत मांडता आले. मग तेच तेच करण्याबद्दल त्यानेच नाराजी का दाखवावी? तर त्यामागे हेतू महत्वाचा असतो. आपल्याला नुसता प्रयोग करायचा आहे, की त्यातून काही साध्य करायचे आहे? साध्य ठरलेले असेल तर प्रयोग फ़सला म्हणून बिघडत नाही. कारण जिथे प्रयोग फ़सतो तिथे त्यात कुठे चुकले त्याचा शोध घेतला जात असतो. आधीच्या प्रयोगात जी चुक झाली, त्याची पुनरावृत्ती नव्या प्रयोगात होणार नाही याची काळजी घेतली जात असते. त्यालाच प्रयोगशीलता म्हणतात. पण कुठे चुकले त्याकडे ढुंकूनही न बघता जर कोणी, तीच तीच चुक पुन्हा पुन्हा करत असेल तर त्याला प्रयोगशीलता म्हणत नाहीत. उलट त्यालाच मुर्खपणा म्हणतात. चुकणे हा अजिबात गुन्हा नसतो. पण तीच तीच चुक सातत्याने करतच रहाणे, हा मात्र अक्षम्य गुन्हा असतो. आणि असा गुन्हा माणूस केव्हा करतो? जेव्हा त्याला काहीही साध्य करायचे नसते, तर आपण काही करता आहोत असा देखावा निर्माण करायचा असतो. म्हणूनच परिणाम काय साधायचा याच्याबद्दल त्याला कर्तव्य नसते की फ़िकीर नसते. त्यामुळेच अशी माणसे परिणामांची पर्वा न करता चुकांही पुनरावृत्ती करीत असतात.
गुटखाबंदी हा असाच एक मुर्खपणा आहे. त्यातून काहीही साध्य केले जाणार नाही कारण ज्यांनी ती बंदी लागू करण्याचा पवित्रा घेतलेला आहे, त्यांना ती बंदी यशस्वी व्हावी अशी इच्छाच नाही. तशी इच्छा असती तर त्यांना सुप्रिया सुळे यांनी एका समारंभात जाहिरपणे त्याची मागणी करण्यापर्यंत वाट बघितली नसती. तशी प्रामाणिक इच्छा असती तर त्यांनी गुटख्यातून किती महसूल जमा होतो, त्याचा हिशोब मांडून निर्णय घेतला नसता. पण इथे नेमके तेच घडलेले आहे. अशाच प्रकारे दहा वर्षापुर्वी गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि तो न्यायकक्षेच्या खडकावर जाऊन फ़ुटला होता. त्यानंतर दहा वर्षाचा कालावधी नव्या बंदीसाठी का लागला? तेच सरकार आणि तेच म्होरके सत्तेत कायम आहेत. मग आधीची गुटखाबंदी का फ़सली त्याचे आत्मपरिक्षण त्यांनी केले होते काय? केले असते तर यापुर्वीच राज्यात गुटखाबंदी होऊन गेली असती. पण तसे होऊ शकले नाही. कोणीतरी आग्रह धरला म्हणुन त्याच्या समाधानासाठी तेव्हा बंदी घालण्यात आली आणि ती न्यायालयात टिकली नाही; तर पुन्हा सत्ताधार्यांनी त्याकडे वळूनही पाहिले नाही. पुन्हा सुप्रिया सुळे यांनी त्या्ची मागणी करीपर्यंत आपली आधीची गुटखाबंदी फ़सली याचेही सरकारला स्मरण नव्हते. कारण तसे काहीही करायची या सत्ताधार्यांना इच्छाच नव्हती आणि आजही तशी प्रामाणिक इच्छा आहे असे वाटत नाही.
इच्छा असेल तर माणूस त्या हेतूने कार्यरत होत असतो. एक सोपे ज्वलंत उदाहरण घेऊ. महिन्याभरापुर्वी मुंबईत मंत्रालयाला आग लागली होती. त्या आगीत सापडलेले अनेकजण होते. त्यातून स्वत:चा जीव वाचवावा असे वाटणारे होते त्यांनी अग्नीशमन दलाच्या आगमनाची प्रतिक्षा केली नाही. कदाचीत मरण्याची शक्यता असूनही त्यांनी थेट पाचव्या सहाव्या मजल्याच्या खिडकीतून उड्या मारण्यासाठी तयारी केली होती. त्यासाठी ते खिडकीतून बाहेर पडून सज्जावर उभे राहिले होते. वेळीच शिड्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नसत्या तर त्यांचाही जीव गेलाच असता. पण ती वेळ आली नाही. त्यांची जगण्याची दुर्दम्य इच्छाच त्यांना जीवावरचा धोका पत्करायला भाग पाडून गेली होती ना? कदाचित त्यांनी शोधलेला मार्ग त्यांनाच धोक्यात घालून गेला असता. पण त्यांचा हेतू शुद्ध व प्रामाणिक होता. त्यांना आगीत घुसमटून मरायचे नव्हते. पण जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मेलो तरी बेहत्तर अशी तयारी त्यांनी ठेवली होती. त्याला हेतू म्हणतात. हेतू जगण्याचा पण उचललेले पाऊल मात्र जीवावरच बेतणारे होते. आयुष्यात आपण अनेक धाडसी निर्णय घेतो तेव्हा त्यातल्या प्रत्येक पावलात यशस्वी होऊ अशी कोणी खात्री देऊ शकत नाही. कुठलाही हेतू शंभर टक्के यशस्वी होईल याचीही हमी देता येत नसते. पण प्रयत्नामागचा हेतू शुद्ध व प्रामाणिक असला पाहिजे. गुटखाबंदीमागे कुठला शुद्ध हेतू आहे? कुठला हेतू असायला हवा असतो?
गुटखाबंदी वा दारूबंदी अशा निर्णयामागे लोकांना व्यसनमुक्त करणे हाच एकमेव हेतू असू शकतो. आणि तो हेतू वगळता अन्य कुठलाही हेतू असूच शकत नाही. पण आजचे सत्ताधीश त्याच हेतूने या निर्णयाप्रत आलेले आहेत काय? असते तर त्यांनी अशा बंदीचे दुरगामी परिणाम काय होतील त्याचाही आधीच अंदाज केला असता. पण त्याचा मागमुसही दिसत नाही. बुधवारची बातमी आहे की तोपर्यंत सरकारकडून प्रशासनाला कुठलेही आदेश देण्यात आलेले नव्हते. पण प्रशासन मात्र आपल्यापरी्ने गुटखाबंदीच्या तयारीला लागले होते. कधीपासून बंदी होणार तेही प्रशासनाला ठाऊक नसावे काय? ज्यांनी एका दिवशी बंदी लागू होताच तिचा कडेकोट अंमल करायचा आहे, त्याच यंत्रणेला बंदी कधीपासून लागू होणार त्याचा थांगपत्ता नसावा, हे कशाचे लक्षण आहे? कंपन्यांनी बनवलेला गुटखा लोकांनी खाऊ नये एवढ्यापुरती ही बंदी असेल तर त्यामागे व्यसनमुक्तीचा हेतू नाही हे स्पष्टच होऊन जाते. कारण गुटखाबंदीचा सुगावा लागल्यापासून अनेक व्यसनी लोक ह्ळूहळू अन्य पर्यायांखडे वळू लागले आहेत. त्याप्रमाणे त्यांचे पुरवठेदार म्हणजे टपरीवाले, दुकानदारही अन्य पर्याय शोधू लागले आहेत. मग जी बंदी लागू होणार तिचा हेतू काय? तर कंपन्यांचे गुटखा उत्पादन बंद करणे एवढाच राहून जातो ना? बाकी लोकांनी गुटखा वा तत्सम अन्य व्यसने चालू ठेवली तरी सरकारला त्याबद्दल कर्तव्य नाही असेच दिसते. की कंपन्यांना गुटखा उत्पादनाचे व्यसन लागले आहे, त्यापासून त्यांना मुक्त करायचा हेतू अशा बंदीमागे आहे? बाकी लोकांनी व्यसन करून मरण्याला सरकारची मान्यता आहे काय?
यालाच आईनस्टाईन मुर्खपणा म्हणतो. कारन आजवर कुठलीही बंदी कधीच यशस्वी झालेली नाही. आणि इथे आपल्या देशातच नव्हेतर जगाच्या पाठीवर कुठल्याही देशातली कुठलीही बंदी यशस्वी होऊ शकलेली नाही. पण स्वत:ला सरकार म्हणवून घेणारे बंदी लावतच असतात आणि तोच तोच मुर्खपणा करतच असतात. महाराष्ट्रात घातलेली गुटखाबंदी त्याच मुर्खपणाचा नवा अवतार आहे. कारण त्यातून काहीच साध्य होण्याची चिन्हे नाहीत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे सरकारलाही काहीच साध्य करायची इच्छा दिसत नाही. या मुर्खपणाचे खरे कारण आहे, ते व्यसनमुक्ती विषयी असलेले अज्ञान हेच आहे. बंदी घालून माणसे व्यसनमुक्त होतात, असा जो भ्रम आहे त्याच्या आहारी गेले, मग असे मुर्खपणाचे निर्णय घेतले जात असतात. सत्ता हाती आहे मग आपण लोकांच्या गळ्यात काहीही बांधू शकतो, या भ्रमाचा तो दुष्परिणाम आहे. तंबाखू सेवनाचे एकूणच समाजाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही आजची खरी भेडसावणारी समस्या आहे. तिच्यावरचा उपाय म्हणुन लोकांना व्यसनमुक्त करणे अगत्याचे झाले आहे. त्यात कुणावर खटले भरणे, कुणाकडला बंदीयुक्त माल जप्त करणे, अशा मालाचे उत्पादन थांबवणे वा त्यांचे परवाने रद्दबातल करणे इत्यादी अत्यंत दुय्यम बाबी आहेत. त्यापैकी कुणालाही शिक्षा झाली नाही वा त्यांच्यावर खट्ले भरले गेले नाहीत म्हणुन बिघडत नाही. कारण तो अशा बंदीमागचा खरा शुद्ध हेतूच असू शकत नाही. खरा हेतू व उद्दीष्ट समाजाचे सार्वजनिक आरोग्य जपायचे आहे. तंबाखू सेवनाने जे कर्करोगाचे प्रमाण समाजात वाढत चालले आहे, त्याला पायबंद घालणे हेच अशा बंदीमागचे खरे उद्दीष्ट आहे. त्यामुळे माणसांपासून गुटखा दुर ठेवणे हा त्यातला एक उपाय आहे. पण त्याचा उपयोग अतिशय क्षुल्लक आहे. त्यापेक्षा सामान्य माणसाला गुटख्यापासून दुर ठेवण्याला प्राधान्य असायला हवे. कारण व्यसनमुक्त समाजाचे उद्दीष्ट त्याच मार्गाने अधिक यशस्वी होऊ शकेल. पण त्याचा विचारही अशा बंदी वा कायद्यामध्ये होताना दिसत नाही. हेच त्याच्या अपयशाचे खरे गमक आहे. म्हणूनच आईनस्टाईन त्याला मुर्खपणा म्हणतो. ( क्रमश:)
भाग ( ३३२ ) २१/७/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा