व्यसन मुळात लागतेच कसे हे पहाणे योग्य ठरेल. ती माणसाची कुठूनही गरज नसते. तंबाखू असो की दारू असो, ती मानवी जीवनातील गरज नाही. पण तरीही माणसे नशेच्या जाळ्यात फ़सत असतात. अनेकदा अनावधानाने माणूस त्यात ओढला जातो आणि लक्षात येण्यापुर्वीच नशेचा गु्लाम होऊन जातो. इतरांचे सोडून द्या मी माझ्याच एका मित्राची गोष्ट इथे सांगतो. कालपरवा मरण पावलेला राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून जग ओळखत होते. जेव्हा तो सुपरस्टार झालेला नव्हता तेव्हा म्हणजे पडद्यावर तो झळकला नव्हता, तेव्हापासून मी त्याला ओळखत होतो म्हणायला हरकत नाही.
तेव्हा म्हणजे १९६५ सालात मी स्वत: आर्किटेक्चरचा विद्यार्थी होतो. बांद्रा येथील स्कुल ऑफ़ आर्टमध्ये प्रथम वर्षासाठी मी प्रवेश घेतला होता. वय होते अवघे अठरा वर्षे. नुकतीच शाळा संपलेली. फ़ुल पॅन्ट पहिल्यांदाच अंगावर चढली होती. तिथे आम्ही सगळे असेच शाळेतून आलेले नवशिके होतो. जे लगेच मित्र झाले त्यात दिलीप नावाचा एक आमच्यातला वयाने थोरला होता. आम्ही मधल्या सुट्टीत चहा वडा वगैरे खायला थोड्या अंतरावरच्या एका हॉटेलमध्ये जायचो. मग येताना दिलीप सिगरेट ओढायचा. आम्ही बाकीचे त्याला मोठा शुरवीर समजत असू. कारण व्यसन वाईट असते हे मनावर पक्के कोरलेले होते. घरी कळले तर अशी भितीसुद्धा होती. अर्थात तशी भिती दिलीपलाही होती. तोही घरच्यांना चोरूनच व्यसन करत होता. पण पकडले जाण्याचे भय त्याला वाटत नसे म्हणून तो आमच्यापेक्षा शुरवीर होता. अशा त्या सुट्टीच्या वेळात परत कॉलेजमध्ये येताना एका इमारतीपाशी एक तरूण आम्हाला दिसत असे. कधीकधी दिलीप त्याच्याकडे जाऊन सिगरेट शिलगावून घ्यायचा. त्यामुळे त्या तरूणाची माहिती आम्हाला कळली होती. त्याचे नाव जतीन खन्ना असे होते. दिल्लीहून मुंबईत सिनेमाचा हिरो व्हायला आलेला तोही एक वेडा होता. जिथे कुंपणाच्या भिंतीला टेकून तो सिगरेट ओढत असे. त्याच इमारतीमध्ये तो पेईंग गेस्ट म्हणुन रहात होता. सिगरेटमुळे दिलीपचा त्याचा परिचय झाला. पुढे काही महिन्यांनी तो दिसेनासा झाला. त्या काळात आम्हाला शुकवारी पहिल्याच दिवशी नवा चित्रपट बघायचा छंद होता. दुसर्या वर्षाला असताना ‘राज’ नावाचा चित्रपट बघायला गेलो होतो. त्याची सुरूवात झाल्यावर थोड्याच वेळात दिलीप किंचाळलाच, तोरश्या हा तर आपला जतीन. त्याने पडद्याकडे बोट दाखवले होते. तेव्हा बारकाईने पहाता राजेश खन्ना म्हणून झळकलेला तो नवा हिरो आमच्या नाक्यावरचा सिगरेट फ़ुंकणारा जतीन असल्याचे मलाही लक्षात आले.
मुद्दा राजेश खन्नाचा नाही. त्याच्यापेक्षा आमच्या टोळक्यात दिलीप हाच हिरो होता. कारण एकूण त्या नव्या वर्गात तोच एक धाडसी सिगरेट ओढणारा होता. आमच्या इतरांच्या मनात त्याच्याबद्दल चमत्कारिक आदर होता. सिगरेट ओढतो म्हणून. असे आमच्या मनात यावेच कशाला? तो जे काही करत होता, ती त्याच्या पालकांची फ़सवणूक होती. अधिक त्याच्याच आरोग्याला ते व्यसन घातक होते. मग आम्हाला त्याच्याबद्दल घृणा वाटण्यापेक्षा आदर का वाटावा? तेव्हा असा प्रश्न कधीच मनात आला नव्हता. पण पुढल्या वर्गातली मुले दिसू लागली आणि त्यातले अनेकजण सिगरेटी फ़ुंकताना दिसायचे. मग त्यांचे चुकूनमाकून आमच्याही वर्गाकडून अनुकरण सुरू झाले. बरे आम्हाला शिकवणारे जे प्राध्यापक होते किंवा वर्ग घेणारे होते, त्यापैकी कोणी पोरांना सिगरेटी फ़ुंकताना पाहिले, तर दमदाटी वगैरे केल्याचे आठवत नाही. मला त्याचेही आश्चर्य वाटले होते. कदाचीत अन्य मुलांना कॉलेजमध्ये आलो म्हणजे सिगरेट फ़ुंकणे हा अधिकार वाटला असेल. पुढल्या काळात कधीतरी त्या जुन्या आठवणी चाळवल्या, मग त्याचा अर्थ लावायचा मनातल्या मनात प्रयत्नही झाला होता. ज्याला आपण वाईट गोष्ट समजत होतो, जे पाप असल्याची धारणा मनात होती, तीच गोष्ट म्हणजे व्यसन दिलीप करत होता आणि आपण तर त्याला चांगला मित्र का मानत होतो? त्याचा आपल्याला तिटकारा का आला नव्हता? उलट त्याच्याबद्दल आदर का वाटावा?
दिलीप वा त्याच्यासारखे जे अन्य विद्यार्थी सिगरेटचे व्यसन करत होते, त्यांच्याबद्दल आम्हा इतरांच्या मनात वेगळेच अनाकलनीय कुतूहल होते. आम्हाला ते लोक धाडसी वाटत होते. म्हणजे मर्द वा्टत होते. अशी जी काही चमत्कारिक धारणा अनावधानाने मनात घुसू्न बसते, तीच खरी समस्या असते. सिनेमातले हिरो किंवा रुबाबदार दिसणारी माणसे जे करतात त्याचे आकर्षण त्याला कारणीभूत असते. तेव्हाच्या चित्रपटातला स्टायलिश धुर सोडणारा खलनायक प्राण किंवा शम्मीकपूर; नव्या जाणीवा होणार्या तरुणाला भुरळ घालणारा होता. आज त्यांची जागा पब किंवा बारमध्ये जाणार्या अभिनेत्यांनी घेतली आहे. इथे भुरळ शब्दाचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे. जे यशस्वी असतात किंवा समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेले असतात, त्यांचे अनुकरण इतर सामान्यजन करत असतात. हे अनुकरण जसेच्या तसे नसते. ज्याचे अनुकरण सामान्य माणसे करत असतात, त्याच्या कृतीमधील सोप्या वाटतील तेवढ्याच गोष्टींचे अनुकरण होत असते. सलमानखान कुठल्या तरूणीला गुंडांच्या तावडीतून जीवावर उदार होऊन सोडवतो, तसाच इतर कुणा मुलीची गंमत म्हणुन छेडही काढत असतो. त्यात छेड काढणे सोपे असते. त्याचे अधिक अनुकरण होते. पण जीव धोक्यात घालून कुणाला वाचवण्याचे अनुकरण मात्र क्वचीतच होते. मग ज्या दिखावू गोष्टी असतात त्या अनुकरणासाठी सोप्या असतात. त्या सोप्या सहजसाध्य अनुकरणाला प्रवृत्त होण्याला मी भुरळ म्हणतो. शाहरुखच्या कपडे, शैली वा केशभूषेची नक्कल सोपी असते. त्याच्याप्रमाणे सिगरेट फ़ुंकणे सोपे असते. त्याच अनुकरणातून अशी व्यसने कधी जडतात, त्याचा पत्ताच लागत नाही. दिलीप किंवा अन्य अनेकजण त्याचेच बळी होते व असतात. पण अशा अनुकरणकर्त्याच्या गोतावळ्यातील अन्य लोकही वहावत जातात.
हे सिनेमाच्य हिरोमुळेच होते असे मानायचे कारण नाही. वयात येत असतानाच्या कालखंडात जुन्या समजुती मागे पडत असतात आणि नव्या जाणीवा जागृत होत असतात. तेव्हा पालकांच्या छत्रछायेखाली काढलेल्या आयुष्यापासून मुक्त होण्याची आकांक्षा प्रभावी असते. परावलंबी जिवनातून मुक्त होण्याच्या त्या उत्कंठेतुन पालकांच्या अधिकाराला झुगारण्याची उबळ प्रभावी होत असते. अशा अनेक घटकांचा परिणाम किशोरावस्थेतून तरूणाईकडे वाटचाल करताना होत असतो. व्यसनांची घुसखोरी तिथेच सुरू होत असते. गरज नसलेल्या गोष्टी किंवा सवयी त्याच काळात लागत असतात. घरच्यांना, पालकांना चोरून मुले अशा गोष्टी करू लागतात. त्याचे आणखी एक कारण असते. ज्या गोष्टी वर्ज्य किंवा वाईट म्हणुन पालक सांगत असतात, पण स्वत: पालक मात्र करत असतात, तेव्हा त्या गोष्टी पाप किंवा गैर नव्हेत, तर मोठेपणातला अधिकार आहेत अशीही एक चुकीची समजूत कोवळ्य़ा वयापासून मनात घर करत असते. त्यामुळे मग मोठे होण्याच्या वयात, "मोठे होणे" म्हणजे अशा गैरलागू गोष्टी करण्याचे वय अशीही समजूत कार्यरत होत असते. व्यसनाच्या सापळ्यात सापडण्याचे तेही एक कारण आहे. अशा उनाड वा उडाणटप्पू बेपर्वा जीवनाचे वेगळे आकर्षण त्या वयात असतेच. त्यालाच तर वयात येणे म्हणतात ना? जाणीवांचे एक तुफ़ान अनुभवास येत असते, जे जुन्या समजुती व धाक-वचक उध्वस्त करायला पुरेसे असते.
"आज काही तुफ़ानी करू या" अशी एक जाहीरात सध्या वाहिन्यांवरून झळकत असते. त्या जाहीरातीचे आवाहन कुणासाठी आहे ते लक्षात घेतले तर माणूस अकारण व्यसनाच्या तावडीत कसा ओढला जातो, त्याचा थोडा अंदाज येऊ शकेल. कशाला काही तुफ़ानी करायचे आहे? त्याची गरज काय आहे? तुफ़ानी म्हणजे काय? तर जे सर्वसाधारण नाही, जे काहीतरी लोकांना चकीत करणारे वा तोंडात बोट घालायला भाग पाड्णारे असेल, असेच काहीतरी. पण असे लोकांना चकीत वा थक्क कशाला करायचे आहे? त्यात कुठला धोका आहे काय? मुद्दा साधा आहे. आपण इतरांसारखे सामान्य नाही तर काही विशेष आहोत, असे दाखवण्य़ाची उर्मी त्यामागे असते. आणि मग त्यासाठी जी उत्सुकता असते, अनिवार उत्कंठा असते, ती त्या वयात बेभान व बेफ़ाम करणारी असते, समोरचे दिसणारेही न बघता पुढे झोकून देण्याची मस्ती अंगात व मनात संचारलेली असते. त्याच मस्तीला अशा तुफ़ानी जाहिराती भुरळ घालत असतात, खुणावत असतात. कधी जाहिराती नाही तर प्रसंग वा अनुभव भुरळ घालत असतात. त्याचे रुपांतर व्यसनात कधी होऊन जाते, ते कळण्यापुर्वी माणुस व्यसनाधीन झालेला असतो. ( क्रमश:)
भाग ( ३३७ ) २६/७/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा