गुरूवार शुक्रवारी दोन मोठ्या घटना वाहिन्यांवर धुमाकूळ घालत होत्या. एक होती दुर ईशान्येकडील आसाममधली तर दुसरी होती उत्तरेकडील देशातील सर्वात मोठ्या राज्यातली. आसामची राजधानी गुवाहाटी येथे एका पबमधून रात्री उशिरा बाहेर पडलेल्या एका किशोरवयीन मुलीला, काही गुंडांच्या टोळीने भर रस्त्यावर विवस्त्र करण्याचा प्रकार केला. तो वीसपंचवीस मिनीटे चालू होता. ती मुलगी गयावया करत असताना व मदतीचा धावा करत असताना, रस्त्यावरून जाणारा कोणीही माईचा लाल तिच्या मदतीला धावून गेला नाही. गुंडांच्या काळजाला पाझर फ़ुटण्याचे काही कारणच नव्हते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की हे सर्व घडत असताना कोणी पत्रकार व त्याचा कॅमेरामन त्याचे चित्रण करत होता. त्यांनीच नंतर त्याचा गवगवा केला. त्यामुळेच ही बातमी देशाच्या कानाकोपर्यात पोहोचली आणि प्रत्येक वाहिनीवर विद्वत्तेचे महापुर आले. अर्थात त्यातल्या प्रत्येकाने आपण गुवाहाटीपासून दुर आहोत याची आधी खातरजमा करून घेतली असणार यात शंका नाही. जेव्हा अशा घटना घडत असतात तेव्हा जे बिळात दडी मारून बसतात, त्यांना शहाणे म्हणतात. तेच नंतर अशा प्रसंगी काय करायला हवे त्यावर प्रवचने झोडत असतात. शुक्रवारी अशाच उंदराची प्रत्येक वाहिनीवर धावपळ चालू होती. महिलांच्या सुरक्षेपासून त्यांच्या स्वातंत्र्यापर्यंत आणि कायद्यातल्या त्रुटीपासून तो राबवणार्या पोलिसांच्या मानसिकतेपर्यंत सर्वांगिण चर्चा छान रंगल्या होत्या. पण त्यातला कोणी एकतरी प्रत्यक्ष अशी घटना समोर घडत असेल, तेव्हा त्यात हस्तक्षेप करणार आहे काय? की मध्यमवर्गिय भेदरट मानसिकतेतून येणार्या पलायनवादाचा आश्रय घेऊन बिळात दडून बसेल? अनुभव तरी तसाच आहे. दहा वर्षापुर्वीच्या मुंबईतील अशाच एका प्रसंगाची साक्ष मी आमिरच्या संबंधात विवेचन करताना मांडली होती. समोर घडणारा बलात्कार टाईम्सचा पत्रकार अंबरिश निमूट बघत बसला आणि दुसर्या दिवशी त्याने त्याची बातमी छापून खळबळ उडवून दिली, त्याचा दाखला मी महिन्यापुर्वीच दिलेला आहे. त्याचीच गुवाहाटीच्या घटनेनंतर पुनरावृत्ती झाली नाही काय?
बोरीवली लोकलमध्ये होणारा बलात्कार बघणार्या अंबरिश मिश्राकडे कॅमेरा नव्हता. अन्यथा त्यानेही त्याचे चित्रण केले असते. आता माध्यमात खुप श्रीमंती व सुविधा आलेल्या आहेत. म्हणूनच गुवाहाटीच्या आविष्कार स्वातंत्र्यवाद्यांनी समोर घडले त्याचे छानपैकी चित्रण केले. त्याला स्वातंत्र्याची लढाई म्हणतात. आमचे बहुतांश पत्रकार विचार व अविष्कार स्वातंत्र्याचे स्वत:ला योद्धे मानतात व तशा आवेशात वावरत असतात. त्यांच्यातला लढवय्या काय लायकीचा असतो, त्याची साक्षच या घटनेने दिली आहे. समोर एका मुलीची विटंबना चालू होती, तिच्या अब्रूचे वस्त्रहरण चालू होते. रस्त्यावर शेकडो लोक वावरत होते. आणि तिथेच आमचे हे अविष्कार स्वातंत्र्य योद्धे त्याचे चित्रण करत होते. कौरवांच्या दरबारात अशीच द्रौपदीची विटंबना झाली होती. तिने टाहो फ़ोडून त्याच महाविद्वान बुद्धीमंत द्रोणाचार्य, भीष्माचार्यांना सवाल केला होता. जे आधीच गुलाम वा दास झाले आहेत त्यांना आपली पत्नी पणाला लावता येते काय? नसेल तर तिच्यावर कौरवांचा अधिकार प्रस्थापित होऊ शकत नव्हता. पण त्या प्रश्नाचेही उत्तर देण्य़ाची हिंमत ते विद्वान गमावून बसले होते व तिचे वस्त्रहरण निमूटपणे बघत बसले होते. त्यापेक्षा आजचे आमचे अविष्कार स्वातंत्र्य योद्धे तसूभर कमी लायकीचे विद्वान आहेत काय? ते अन्याय बघत बसतात. आणि अन्याय अत्याचार होत असल्याचे पुरावे चित्रित करतात. त्या चित्रणाला व पुरावे गोळा करण्यालाच पुरुषार्थ समजतात. नव्हे त्या नंपुसकतेला योद्धा म्हणुन सन्मान मिळावा, म्हणुन आटापिटा करत असतात. शुक्रवारी सर्वच वाहिन्यांवरची शिरा ताणून चाललेली चर्चा, त्याच नपुसकतेचा थाटामाटातला समारंभ होता. त्यापैकी कुणाही पत्रकाराने संपादकाने चित्रण करीत बसलेल्या व त्या मुलीची अब्रू वाचवायला पुढाकार न घेणार्या, आपल्या व्यवसायबंधूंचा धिक्कार केल्याचे मला दिसले नाही, ऐकू आले नाही. प्रत्येक पत्रकार वा त्यांच्या चर्चेत सहभागी झालेला शहाणा घटनास्थळी नसलेल्या पोलिसांना व सरकारला गुन्हेगार ठरवणारे युक्तीवाद मात्र तावातावाने करीत होता. प्रत्येकजण आपल्या आधुनिक कायद्याच्या राज्यात कायदा कसा निकामी आहे, याची साक्ष देऊन त्याच कायद्याचे राज्य भक्कम व्हायला हवे याचाच आग्रह धरत होता.
दुसरी बातमी त्याच नपुसकतेचे वस्त्रहरण करणारी आहे. उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील आसरा या गावात खाप पंचायतीने चाळीस वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली स्त्रीयांना घराबाहेर पडून बाजारात जाण्यावर निर्बंध घातल्याची ती बातमी होती. ती बंदी वा निर्बंध गावातल्या जाणत्यांनी एकत्र येऊन सामुदायिक निर्णयाने घातले आहेत. त्यांनी असे का करावे? त्यांनी कायदा हाती घेतला का? ते असे निर्बंध घालणारे कोण? देशात घटना आहे, कायदा आहे, तो पायदळी तुडवून हे कोण निर्बंध घालणारा अशीही चर्चा त्याच दिवशी चालू होती. या गावकर्यांनी केवळ मुली व महिलांवर निर्बंध घातलेले नाहीत. त्यांनी गावातल्या तरुण व पुरूषांवरही कानाला मोबाईल लावून गाणी वाजवत फ़िरण्यावर निर्बंध घातले आहेत. ते अर्थातच जुनाट मनोवृत्तीचे लोक आहेत, असेच आजचे पोपटपंची करणरे विद्वान म्हणणार. आणि तेच वाहिन्यांवरून ऐकायला मिळत होते. तात्पुरता आसरा गावचा मुद्दा व निर्बंध बाजूला ठेवूया. समजा जे गुवाहाटीमध्ये घडले तेच आसरा गावात घडले असते, तर कुठला कायदा मदतीला धावणार होता? गुवाहाटीमधल्या त्या मुलीला कायद्याने स्वातंत्र्य जरूर दिले. पण त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना जो प्रसंग ओढवला, तेव्हा तो कायदा कुठे होता? त्या कायद्याचे समर्थक योद्धे कुठे होते? जेव्हा त्या कायद्याच्या संरक्षणाची गरज होती, तेव्हा कायदा धावून येणार नसेल तर त्याने दिलेले स्वातंत्र्य म्हणजे विषाची परिक्षाच नाही काय? गुवाहाटीच्या त्या मुलीच्या वाट्याला आले त्याला स्वातंत्र्य म्हणायचे असेल तर किती पालक वा मुली स्वातंत्र्य हवे म्हणतील?
जो कायदा तुम्हाला संरक्षण देत नाही आणि सुरक्षित असल्याचे सांगून गाफ़ील ठेवतो, तो हल्लेखोरापेक्षा घातक असतो. चर्चेचा मुद्दा आसरा गावच्या खाप पंचायतीने घातलेल्या निर्बंधांचा असायचे काहीही कारण नव्हते. त्यापेक्षाही गंभीर मामला आहे तो गुवाहाटीमध्ये भर रस्त्यावर असा प्रकार चालू असताना आसपास वावरणार्या शेकडो नागरिकांच्या निष्क्रियतेचा. त्यापैकी कोणालाही त्या मुलीला गुंडांच्या तावडीतून सोडवण्याची इच्छा होत नाही, धाडस होत नाही, हीच खरी गंभीर बाब आहे. ही मानसिक बधीरता, ही संवेदनशून्यताच आजची भीषण समस्या झालेली आहे. आणि ती रस्त्यावरच्या सामान्य माणसापुरती मर्यादीत नाही. मंत्रालयाला छोटी आग लागली ती लगेच अग्नीशमन दलाला सुचना दिली असती तर तासाभरात आवाक्यात आली असती. पण अग्नीशमन दलाला सूचना देण्याची इच्छाही मंत्र्यांना झाली नाही, की कुणा अधिकार्याला झाली. तीच निष्क्रियता सर्वत्र दिसते, जाणवते. तीच आजची सर्वात भयंकर आपत्ती बनली आहे. जे दिसेल ते भीषण असेल तर त्यापासून पळावे, पण त्यात हस्तक्षेप करण्याचा मुर्खपणा करू नये, अशी जी शहाणपणाची मानसिकता तयार झाली आहे त्याचेच आपण आज बळी झालो आहोत. जितक्या निर्धास्तपणे कसाबची टोळी मुंबईत येऊन लोकांची कत्तल करत होती, तेवढ्याच निर्भय मनाने गुवाहाटीतले ते गुंड त्या मुलीची भर रस्त्यात बेअब्रू करत होते.
त्या निष्क्रियतेपासून संरक्षण कोण देणार आहे? वाहिन्यांवर तोंडाची वाफ़ दवडतात, त्यापैकी कोणी ती सुरक्षा देणार आहे? तेच गुंडांपासून आपल्या आविष्कार स्वातंत्र्याची सुरक्षा व्हावी म्हणुन वाडगा घेऊन फ़िरत असतात. रोम जळत असताना निरो नावाचा तिथला सम्राट फ़िडल वाजवत होता म्हणतात. आमचे मंत्रालयात बसणारे सत्ताधीश मंत्रालयच पेटले असताना वेगळे काय करीत होते? अशी कायदाव्यवस्था आणि कायद्याचे राज्य असल्यावर खाप पंचायतीने काय करावे? दंगलीच्या काळात, गुन्हा घडताना आपापल्या बिळात दडी मारून बसणार्या व सर्वत्र शांतता आली मग वाहिन्यांवरून पोपटपंची करणार्यांवर कोणी विश्वास ठेवायचा? मोठ्या आलिशान सुसज्ज नव्या इमारतीचे आश्वासन देऊन झोपडपट्टी रहिवाशांना बेघर व्हायची पाळी येते तशी आजच्या जनतेची स्थिती आहे. तो बिल्डर नवी इमारत बांधत नाही आणि होती ती झोपडीही हातची गेल्याने देशोधडीला लागायची वेळ येते. मग त्याकडे बघून अन्य झोपडीवासी ती पुनर्बांधणी नको, आपली आहे ती झोपडी बरी म्हणतात, तशीच खाप पंचायतीची अवस्था नाही काय? आधुनिकता व कायद्याच्या समर्थकांनी आधी कायद्याचे धाडस व कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे. मग कोणीही खाप पंचायतींना दाद देणार नाही. आणि तशी खातरजमा होत नाही तोवर कोणी या कौरवांच्या आश्रित विद्वान द्रोणाचार्य भीष्माचार्यांवर विश्वास ठेवणार नाहीत. ( क्रमश:)
भाग ( ३२६ ) १५/७/१२
सडेतोड व तर्कशुद्ध लिखाण ! लोक कायदा हातात केव्हा घेतात किंवा लोक कायद्याला केव्हा भीत नाहीसे होतात ? निष्क्रियता ,मानसिक बधिरता ह्याबाबतचे विश्लेषण एकदम योग्यच आहे .पण ह्या बधीर पणाला आता मुंबईत "मुंबई स्पिरीट" म्हणू लागले आहेत.
उत्तर द्याहटवा