सांगण्यासारखे व लिहिण्या्सारखे अनु्भव खुप आहेत. कारण मी शिक्षण क्षेत्रातला किंवा मानसशास्त्रातला कोणी जाणकार नाही. पण पालक म्हणून आपल्या मुलीसाठी काय चांगले व काय अपायकारक याचा डोळसपणे विचार करणारा एक पालक म्हणून मी जगण्याचा प्रयत्न केला. दुसर्यांना शहाणपण शिकवणे् खुप सोपे असते. पण जे आपण इतरांना सुविचार म्हणून सांगत असतो, त्याचा आपल्याच जीवनात अवलंब करणे खुप कठीण काम असते. मी लोक काय म्हणतात किंवा जग कुठल्या दिशेने चालले आहे, त्यापेक्षा माझ्या मुलीचा कल कुठल्या बाजूला आहे, त्याचा अधिक विचार केला. नुसता विचारच केला नाही, तर तिला काय शक्य आहे, काय पेलवू शकेल, याचाही गंभीर विचार करूनच वागत गेलो. त्यामुळेच मी माझ्या मुलीसाठी काही विचारपुर्वक केले, असे म्हणण्यापेक्षा तिनेच माझ्याकडून काय करून घेतले, त्याचा अनुभव माझ्या गाठीशी अधिक आहे. म्हणुनच एक उत्तम पालक बनण्याच्या माझ्या प्रयत्नात माझ्यापेक्षा माझ्या मुलीचे योगदान अधिक आहे; असेच मी म्हणू शकतो. माझ्याकडे डोळस वृत्ती असली तरी त्या डोळस वृत्तीला दिशा देण्याचे काम त्या इवल्या बालिकेने केले, यात शंकाच नाही. आणि खरे सांगायचे तर बहूतेक बालकांपाशी ती गुणवत्ता जन्मजात असते. दुर्दैव इतकेच असते, की पालक त्याकडे बघायलाच तयार नसतात. त्यामुळे मुलांकडून मिळणारे मार्गदर्शनाला ते मुकतात आणि स्वत:च्या मुलांनाही शिकण्यापासून वंचित ठेवतात. म्हणूनच जे इथे शालेय शिक्षणाच्या दृष्टीने मांडले, ते माझे विचार असण्यापेक्षा माझे अनुभव आहेत. प्रत्येक पालक त्याच अनुभवातून जात असतो. फ़रक असेल तर त्या अनुभवाकडे बघण्यतला वा त्याकडे पाठ फ़िरवण्यातला. बहुतेक पालक त्याकडे पाठ फ़िरवतात. तिथेच त्यांच्यासह मुलांना भेडसावणार्या समस्या सुरू होतात.
म्हणूनच म्हटले, की सांगण्यासारखे व लिहिण्यासारखे खुप आहे. पण त्यात पुनरुक्तीची शक्यता आधिक आहे. जेव्हा माझ्या मुलीच्या शिक्षणात लक्षणीय फ़रक दिसला, तेव्हा अनेक मित्रांच्या आग्रहाखातर मी तो अनुभव पुस्तक रुपाने लिहून काढला आहे. त्याच्या नावातच त्या अनुभवाचे सार आहे. "कोरी पाटी" असे नाव मी पुस्तकाला दिले, कारण आपल्या मुलाच्या शिक्षणात पालकाची पाटी कोरी असावी असे माझे ठाम मत आहे. आपल्या बालपणीच्या अनुभवावर आधारीत आपण आपल्या मुलाचे संगोपन करायला जातो, तिथे समस्येची सुरूवात होत असते. ती टाळायची असेल तर आधी आपण आपले मुल म्हणजे काय आणि आपण पालक झालो म्हणजे काय; ते डोळसपणे समजून घेण्याची गरज आहे. तेवढे प्रामाणिकपणे आपण स्वत:कडे बघू शकतो काय? आपल्या बालपणीच्या खोड्या, व्रात्यपणा किंवा आळशीपणा विसरून, आपण आपल्या मुलाला उपदेश करू बघतो. त्यातच खोटेपणा असेल, तर आपण स्वत:कडे प्रामाणिकपणे बघू शकतो का? नसेल तर आपण मुलांच्या बाबतीतही प्रामाणिक असू शकत नाही. मग प्रामाणिक वागणार तरी कसे? आणि ज्या मुलांना आपण उपदेश करता असतो, ती बुद्दू नसतात, तर बारकाईने आपल्या पालकांचे निरिक्षण करत असतात. जर पालक त्याला अप्रामाणिक वाटला तर त्याचा उपदेश ते बाळ कशाला गंभीरपणे घेईल? म्हणूनच मुलांच्या शिक्षणात बालक पालक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे व प्रामाणिकपणाचे असावे लागतात. त्याचाच सर्वात मोठा प्रभाव बालकाच्या व्यक्तीमत्व विकासावर पडत असतो. त्याची सुरूवात दहावी किंवा व्यक्तीमत्व विकासाच्या वर्गात घातल्यावर होत नसते, तर अगदी पहिल्या इयत्तेत मुल जाते, तेव्हापासून त्याच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण सुरू होत असते. शिक्षण म्हणजेच अजाण मुलाला जाणता माणूस बनवण्याचा प्रयास असतो. त्यातले अनेक बारकावे आणि तपशीलवार अनुभव मी पुस्तकात वर्णन केले आहेत. ज्यांची मुले आज दोन अडिच वर्षापासून आठ्दहा वर्षापर्यंतच्या वयोगटात असतील त्या पालकांना माझ्या त्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल.
माझा स्वत:चा अनुभव असा आहे, की पाचवी सहावीपर्यंतच्या काळात म्हणजे मुलाचे वय अकरा बारा वर्षे होण्याच्या मुदतीपर्यंतच त्याला अभ्यासाची गोडी लावता येते. अगदि सहजगत्या त्याला स्वत:च अभ्यास करण्यास प्रवृत्त करता येते. पालकाने तेवढी काळजी घेतली तर पुढल्या काळात मुलांना स्वाध्यायाची सवय लागते आणि ट्यूशन, शिकवण्या यांची गरज भासत नाही. शिकणे, आत्मसात करणे, कुठल्याही माहिती वा विषयाचे आकलन करणे; हा त्याचा स्वभावच बनून जातो. एकदा तेवढी मजल मारली, मग भाषा, विषय, परिक्षा, अभ्यास यांची चिंता मुलांना उरत नाही. मात्र तोच कालखंड चुकला मग मुलांना मारून मुटकून अभ्यासात गुंतवता येत नाही. म्हणूनच ज्यांना खरेच आपल्या मुलांना समजून घ्यायचे आहे, स्वत:ला पालक म्हणुन समजून घ्यायचे आहे, किंवा मुलाची बौद्धिक जोपासना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी कोरी पाटी हे पुस्तक पाठ्यपुस्तक ठरावे. कारण ते कुणा शैक्षणिक जाणकाराचे उपदेश नाहीत, तर भाऊ तोरसेकर नामक एका पालकाचे डोळस पालक म्हणुन ग्रथित केलेले अनुभव आहेत.
पुस्तकाच्या वाचनानंतर काही मित्र परिचित लोकांच्या आग्रहाखातर मी एक अभ्यास शिबीरही घेतले होते. पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे ते शिबीर यशस्वीही झाले. त्यात आलेल्या बहूतेक मुलांना नकळत अभ्यासाची गोडी जरूर लागली. पण मी पुन्हा तसे शिबीर घेऊ शकलो नाही. कारण ३५ मोकाट मुलांना संभाळतांना मी अजिबात थकून गेलो. काही परिचितांनी व आधीच्या शिबीरातल्या पालकांनी आग्रह खुप केला. पण मी अशा शिबीराचा मोह टाळला. कारण त्यात मला स्वत:ला अखंड वेळ गुंतून पडावे लागते. त्या मुलांचा आत्मविश्वास मिळवावा लागतो. तेव्हाच ती मुले सहजगत्या अभ्यासाला लागतात. पण त्या बालकांचा अंगातला उत्साह व उर्जा जेवढी दांडगी असते, तेवढा मी तंदुरुस्त राहिलेलो नाही. म्हणुनच त्या मोहात मला पडता येत नाही. पण तो मुद्दा नाही. सहज वि्षय निघाला म्हणुन इथे थोडे पालक म्हणुन माझे जे व्यक्तीगत अनुभव आहेत ते मांडले. त्यातले काही मोजके पुस्तकातून घेतले आहेत, तर काही अनुभव पुस्तक लिहून झाल्यानंतरचे आहेत. मुलांचे व माणसांचे निरिक्षण हा माझा स्वभाव बनला आहे. त्यामुळेच इथे कथी नेमके अनुभव मी कथन करु शकलो. पण पुस्तकाची पुनरावृत्ती नको म्हणून तो विषय इथेच थांबवणे योग्य ठरेल. ज्यांना या विषयातले मा्झे अनुभव खरेच उपयुक्त वाटत असतील त्यांनी "कोरी पाटी" पुस्तक घेऊन वाचावे. त्यातले अनुभव अभ्यासावे, पण त्याचेही निव्वळ आंधळे अनुकरण करू नये. स्वत:चे मुल समजून घेण्यासाठी त्याचा वापर करावा. प्रत्येक मुल व त्याची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते. ती त्याच्या जन्मदात्या पालकांना जेवढी उत्तमरित्या ओळखता येते, तेवढी अन्य को्णीच समजू शकत नाही.
म्हणूनच पालक हा उत्तम शिक्षक आहे असे मी मानतो. माझे पुस्तक अशा प्रामाणिक पालकांसाठी दिशादर्शक आहे. त्यात पालकाला जागवण्याचा हेतू आहे. कारण पालक जागृत झाला तर मुलांचे भवितव्य उज्ज्वल आहे, असेच मला प्रामाणिकपणे वाटते. तुम्ही जेवढा आपल्या मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करत जाल, तेवढे मुल तुम्हाला त्याला शिकवण्याचे नवनवे मार्ग दाखवत असते, सुचित करत असते. कदाचीत काही पालक माझ्यापेक्षा उत्तम व नवे सोपे मार्ग या कामासाठी त्यांच्या निरिक्षणातून शोधून काढू शकतील. काही पालक तर माझ्यापेक्षा चिकित्सक व चौकस असतील व अधिक बारकाईने मुलांना समजून घेतील, अशीही मला आशा वाटते. मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम शाळा, उत्तम सोयीसुविधा वा इंग्रजी माध्यम यांच्यापेक्षा उत्तम पालक आवश्यक असतो. आणि उत्तम पालक म्हणजे मुलावर अधिक पैसे खर्च करणारा नव्हे; तर आपल्या मुलाला समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देणारा व त्या नवजात बालकाचे नवे व्यक्तीमत्व घडवण्यास हातभार लावणारा पालक असेच मला वाटते. अनेक पालक वाचकांनी माझ्या पुस्तकविषयी फ़ोनवर विचारणा केली. त्याच्या माहितीसाठी प्रकाशकांचा फ़ोन व पत्ता खालीलप्रमाणे आहे. तिथे संपर्क साधून इच्छूक पुस्तक मागवू शकतात. उद्यापासून आपण जरा वेगळ्या विषयाकडे वळूया. ( पुस्तकासाठी संपर्क- रोहिणी माळकर; ३/३१, खिमजी नागजी चाळ, सेनापती बापट मार्ग. लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०० ०१३ मोबाईल ९८७०२५३१७०). ( क्रमश:)
भाग ( ३२४ ) १३/७/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा