सोमवार, ९ जुलै, २०१२

मुले परिक्षेला घाबरतात तरी कशामुळे?


   शाळा अभ्यास म्हणजे परिक्षा आणि परिक्षा म्हणजे मार्कांची मोठी टक्केवारी, हे आजचे समिकरण बनले आहे. कदाचित तसे समिकरण जाणिवपुर्वक बनवले गेले आहे. पालक मुद्दाम आपल्या मुलाचे नुकसान करणार नाहीत. पण जगात जे चालत असते, पालक त्याच्या सहजगत्या त्याच्या आहारी जात असतो. त्यातूनच ही भीषण परिस्थिती आलेली आहे. इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी किंवा केजी अशा वर्गात जी कोवळी मुले घातली जातात. त्यावेळी त्या अजाण बालकांना शिकणे म्हणजे काय ते माहित नसते तर परिक्षा म्हणजे काय ते कसे ठाऊक असेल? मग त्यांनी दिलेली उत्तरे किंवा त्यातून त्यांनी मिळवलेले मार्क्स, यांची तुलना करणे अमानुष प्रकार आहे. आपण त्यातून त्या कोवळ्य़ा जीवांचा निरागसपणाच मारून टाकत असतो. त्याच्याकडून त्याचे बालपण हिरावून घेत असतो.

   एक गंमतीशीर घटना मला आठवते. मुंबईच्या एका नावाजलेल्या शाळेत अडीच वर्षाच्या एका बालिकेची शाळाप्रवेशासाठी मुलाखत घेण्यात आली होती. म्हणजे देणगी वगैरे द्यायचीच होतीच. पण मुल किती हुशार वा स्मार्ट आहे, त्याची ती चाचणी होती. मुलाखत घेणार्‍या शिक्षिकेच्या टेबलावर एक पोलिसाचे रुप असलेला बाहूला होता. त्या बालिकेला ते काय आहे असे विचारण्यात आले. तिने उलट उत्तर दिले, तुम्हाला इतके साधे सोपे माहित नाही? त्यावर शिक्षिकेने नाही असे उत्तर दिल्यावर बालीका म्हणाली, मग तुम्हाला कळत नाही ते मला कशाला विचारता? तर शिक्षिका म्हणाली खरे उत्तर दिले मग चॉकलेट मिळेल. त्यावर बालिका म्हणाली, आधी चॉकलेट द्या मग सांगते. शिक्षिकेने तिच्यापुढे शरणागती पत्करली. चॉकलेट मि्ळताच ती चिमुरडी उत्तरली, हे तर झुरळ आहे. एवढेसुद्धा तुम्हाला कळत नाही?

   आता त्या बालिकेचे काय करायचे? योगायोगाने प्रवेशासाठी मुलाखत घेणार्‍या शिक्षिका माझ्या परिचयाच्या होत्या. संध्याकाळी गंमत म्हणुन त्यांनी मला तो किस्सा सांगितला. मात्र बालिकेला प्रवेश देण्याचा त्यांचा मानस नव्हता. मी तासभर त्यांच्याही हुज्जत करून त्यांना ती बालिका किती हुशार आहे ते पटवून दिले. त्यांनीही तिला प्रवेश देण्याविषयीचे आपले मत बदलले. पण मुद्दा तिच्या प्रवेशापुरता नव्हताच व नाही. अशा किती मुलांचा बळी जातो? त्या वयात जर तिने कधी पोलिस बघितलाच नसेल किंवा त्यासंबंधी तिला काही माहितीच नसेल, तर तिचे उत्तर चुक कसे ठरवले जाते? शेवटी प्रश्न विचारणार्‍याची चुक होती. जे मुलाने कधी ऐकले नाही, बघितले नाही, किंवा त्याला त्यासंबंधाने कधी शिकवलेलेच नाही, त्याबद्दल प्रश्न विचारणे, ही चुक नाही काय? पण होते असे, की प्रश्न चुकीचा विचारला जातो आणि उत्तर चुकले म्हणुन मुलाला शिक्षा फ़र्मावली जाते. हा धडधडीत अन्याय नाही काय? विज्ञान शाखेचे प्रश्न वाणिज्य शाखेतल्या विद्यार्थ्याला विचारले, तर चुक कोण असते? तसेच इथे झालेले नव्हते काय? मी तीच चुक त्या शिक्षिकेच्या नजरेस आणुन दिली. नुसती आणुन दिली नाही, तर चुक मान्य होईपर्यंत मी वाद घातला. दुसर्‍या दिवशी त्यांनी त्या बालिकेला प्रवेश दिल्याचे सांगितल्यावर मला आपण हुज्जत केल्याचे खुप समाधान झाले. कारण त्या वादाने निदान एका शिक्षिकेचा तरी दृष्टीकोन बदलला होता.

   जे मुल अजून शिकते आहे, जग जाणून घ्यायचा प्रयत्न करते आहे, त्याला त्याच्या आकलनापलिकडचे प्रश्न विचारणे हाच अन्याय आहे. नव्हे ती गंभीर चुक आहे. पण दुर्दैवाने आपली व प्रामुख्याने सुखवस्तू घरातली मुलेच अशा अन्यायाने अधिक भरडली जाता असतात. कारण पालकांना नावाजलेल्या शाळेचे मोठे आकर्षण असते. जणू अमुक एका शाळेत घातले, मग आपले आधीच हुशार असलेले मुल अधिकच हुशार होऊन जाईल, असा त्यामागे भ्रम असतो. किंवा दुसरीकडे ज्या पालकांना स्वत:च्या अपुर्‍या शिक्षणाविषयी मोठा न्युनगंड असतो, त्यांना नावाजलेल्या शाळेत मुल घातले, मग तिथल्या हुशार मुलांच्या संगतीत आपले मुल आपोआप हुशार होईल असा भ्रम असतो. यात बिचारी निरागस मुले नकळत भरडली जातात. त्याच्या आयुष्य व भविष्याबद्दल महत्वाचे निर्णय होत असतात. पण त्यांचे मत कोणीच घेत  नसतो. मग अशा शाळांमध्ये शिक्षण म्हणून जे काही चालते, तो मुलांवर मोठाच अत्याचार असतो. ज्या मुलांमध्ये उपजतच उत्तम आकलनशक्ती असते, त्यांच्या तुलनेत बाकिची मुले मागे पडल्यासारखी भासू लागतात. तेव्हा शिक्षक अन्य मुलांना त्या मोजक्या मुलांच्या गतीने पळवायचा प्रयत्न करतात, जमले नाही मग त्या संथ वाटणार्‍या मुलाला वर्गातच जे ऐकावे लागते, त्यातून त्याचा मुखभंग होत असतो. अशी मुले वर्गात व शिकण्यात दबावाखाली येऊ लागतात. शाळेत असे दडपण असते, तर घरात पालक अन्य मुलांशी आपल्या मुलाला मिळणार्‍या गुणांची तुलना करून दबाव आणत असतात. त्याचा एकत्रित परिणाम मुलाच्या उपजत वृत्ती कोमेजण्यात होतो. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला जमणार नाही, असा ग्रह त्या मुलांच्या मनात घर करू लागतो. तिथूनच त्याच्यातली शिकण्याची उर्मी मरू लागते. अशी मुले नापास होणार नाहीत. पण ती स्पर्धेपासून दुर रहाण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागतात.

   एका वर्गात जर साठ्सत्तर मुले असतील तर त्यातली दहाबारा मुले नेहमी एकमेकांशी पहिला येण्यासाठी स्पर्धा करताना दिसतील. बाकीच्या पंच्चावन्न साठ मुलांपैकी दहापंधरा मुले आळशी असतात. पण त्या दोन्हीच्या मधली निदान चाळीस पंचेचाळिस मुले तरी तेवढीच हुशार व बुद्धीमान असतात, की पहिल्या दहाबारा मुलांशी स्पर्धा करू शकतील. पण त्यांची स्पर्धेत उतरण्याची इच्छा परिस्थिती, पालक व शिक्षकांच्या वागणुकीमुळे मारली जात असते. मग अशी मुले स्वत:साठी एक सुरक्षित कोश तयार करून घेतात. ती चांगल्या गुणांनी उत्तिर्ण होण्याची सीमारेषा स्वत:साठी आखून घेतात. त्याच्या खाली जात नाहीत, की वर येण्याला उत्सुक नसतात. कबड्डीच्या खेळामध्ये जशी एक मधली रेषा असते व तिथे असले मग समोरचे सात खेळाडू असूनही भिती नसते तशीच ही सुरक्षा रेषा मुले स्वत:साठी शिक्षणात आखून घेतात. त्याच्या पुढे गेले तर पालकांच्या व इतरांच्या अपेक्षा वाढतील व अधिक मेहनत करावी लागेल. त्यापेक्षा त्या अपेक्षांपासून दुर रहाण्याचा या मुलांचा प्रयत्न असतो. त्यांची कुवत व क्षमता कमी नसते किंवा गुणवत्ता कमी नसते. पण अपेक्षांचे ओझे वाहून नेण्याचे मानसिक धैर्य त्या मुलांकडे नसते. जर पालक वा अन्य कोणाच्या अपेक्षांचे ओझे वा अधिक गुण मिळवण्याचे दडपण त्यांच्यावर आणले गेले नाही, तर तीसुद्धा मुले स्पर्धेमध्ये उतरू शकतात. पण तसे करताना त्यांना एका गोष्टीची भीती सतावत असते. समजा एकदा मेहनत करून चांगले मार्क्स मिळवले आणि दुसर्‍या खेपेस तेवढा पल्ला गाठता आला नाही, तर पालकांची निराशा होते. पालक टोचून बोलू लागतात. त्यापेक्षा पालकांनी आपल्याकडून अपेक्षाच बाळगू नयेत अशी सुरक्षित जागा ही मुले शोधून बसलेली असतात.

   मार्क ट्वेन शिक्षणात शाळेचा व्यत्यय नको म्हणतो, त्याचा अर्थ असा सोपा सरळ आहे. आपण मुलांना शिकवत असतो, तेव्हा त्याला शिकायला मदत करण्यापेक्षा त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करत असतो. त्यालाच ट्वेन व्यत्यय म्हणतो. इथे लक्षात येईल, की आपण मुलांच्या शिकण्यात ज्या मोठमोठ्या अपेक्षा बाळगतो व बोलून दाखवत असतो, किंवा अन्य मुलांच्या गुणवत्तेशी त्याची तुलना करता असतो, त्यातून त्याच्यावर नकळत दडपण आणत असतो. त्याच्या डोक्यावर अपेक्षांचे ओझे चढवत असतो. अभ्यास बाजूला ठेवा, त्याला अपेक्षांचे ओझे पेलण्याची कुवत आहे काय, याचा कोणीच विचार करत नाही. अभ्यास दुय्यम असतो. अभ्यासाचे ओझे मुलांना जेवढे नसते, तेवढे अपेक्षांचे ओझे असह्य असते. मी हे अनुभवाने सांगू शकतो. कारण मी कधीच माझ्या मुलीला अमूक इतके मार्क्स मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा केली नाही, की बोलून दाखवली नाही. मात्र तिने जी उत्तरे लिहिली किंवा सांगितली त्यापैकी तिला उत्तम मार्क्स मिळावेत ही अपेक्षा सतत केली व बोलून दाखवली होती. ज्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल, तो सोडून द्यावा. चुकीचे उत्तर देऊ नये. आपल्याला उत्तर आले नाही तर तो गुन्हा नाही. पण खात्री नसलेले चुकीचे उत्तर ठोकून देणे, मात्र चालणार नाही असे मी तिच्या कानीकपाळी ओरडत राहिलो. त्यामुळेच तिला अधिक मार्क्स मिळवायचे दडपण कधीच नव्हते. पण जे उत्तर दिले ते चुकीचे असता कामा नये ही खुणगाठ तिने कायमची मनाशी बांधली. किती शिकायचे व किती अभ्यास करायचा त्याचे स्वातंत्र्य मी मुलीला दिले होते. पण जे शिकायचे ते आपण आत्मसात केले पाहिजे, यावर माझा भर होता. म्हणुनच तिला शिकणे आवडत गेले. अभ्यास कधीच ओझे वाटले नाही, की त्याचा कंटाळा आला नाही. याबाबतीत किती पालक आपण निर्दोष आहोत असे छातीठोकपणे सांगू शकतील?   ( क्रमश:)
  भाग ( ३२० )   ९/७/१२

२ टिप्पण्या:

  1. भाऊ, मी छातीठोकपणे सांगू शकतो की याबाबतीत निर्दोष आहे. परंतू याबाबतीत मी माझ्या आईवडीलांना मार्क देइन कारण त्यांनी कधीही माझ्यावर मार्क किंवा अभ्यासासाठी दबाव टाकला नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ खरंच मुलीवर असा जोर कधीच केला नाही.

    उत्तर द्याहटवा