गुरुवार, ५ जुलै, २०१२

अजितदादांसाठी एका वाचकाच्या सदिच्छा


   गेले काही दिवस मी मंत्रालयातल्या आगीसंबंधाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषत: या आगीच्या घुसमटीत सापडलेल्या मंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकार्‍यांचे जे निवेदन व अनुभव नंतर वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले; त्याची उलटतपासणी मी घेतली. त्यावर वाचकांच्या अक्षरश: शेकडो फ़ोनवरील प्रतिक्रिया मला मिळाल्या. ज्यांना शंका असेल त्यांच्यासाठी फ़ोन करणार्‍यांचे मोबाईलनंबरही मी टिपून ठेवले आहेत. मात्र इतके स्पष्ट लिहूनही कुणा मंत्र्याच्या जनसंपर्क अधिकार्‍याने माझ्या शंका खोडून काढण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी सिद्धपुरूष असा मी ज्यांचा गौरव केला आहे, त्या अजितदादांच्या लाडक्या संजय देशमुखांनीही माझ्या शंकाचा प्रतिवाद केलेला नाही. अनेकदा आपण लिहितो, ते सबंधितांच्या वाचनात आलेले नसते, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया आली नाही, तर त्याबद्दल त्यांना संशयाचा फ़ायदा देऊन सोडून द्यावे लागत असते. पण या प्रकरणात तसे करायची मला सवलत नाही. कारण ज्यांच्याबद्दल मी लिहिले ते संजय देशमुख व त्यांचे आगडोंबातले अन्य सवंगडी हे जनसंपर्क अधिकारी आहेत. त्यामुळेच माध्यमातून व वृत्तपत्रातून सरकार व विशेषत: (त्यांना मृत्यूच्या सापळ्यातून खेचून बाहेर आणणारे) उपमुख्यमंत्री अजितदादा, यांच्याबद्दल काय छापून येते, ते शोधणे-वाचणे व त्याला समर्पक उत्तरे देणे; हेच तर संजयरावांचे काम आहे. आणि तरीही त्यांच्याकडून माझे मुद्दे व शंका खोडून काढल्या गेल्या नाहीत, याचे म्हणूनच आश्चर्य वाटते. मला नव्हे, तर वाचकांना त्याचे नवल वाटते. मला वाटत नाही, कारण जनसंपर्क अधिकार्‍याचे कामच मुळ विषयावरून लक्ष उडवण्याचे असते. मग असा अधिकारी नेमक्या प्रश्नांना उत्तरे कशाला देईल. खर्‍या समस्या व प्रश्नांकडे काणाडोळा करण्याचाच वसा घेतलेल्या सत्ताधार्‍यांच्या दिर्घकाळ सहवासात राहिल्यावर संजय देशमुख यांच्यातला जनसंपर्क अधिकारी झोपी गेला तर नवल कसले? त्यानी झोपा काढल्या नाहीत तर दादांमधल्या कार्यकर्त्याला जागरण कसे करता येईल? देशमुख जागे राहिले तर दादांमधल्या कार्यकर्त्याला झोपी जावे लागेल ना? तेव्हा देशमुख यांच्याकडुन उत्तराची अपेक्षाच मी केली नाही.  

   पण ज्याअर्थी देशमुख वा अन्य आगीत होरपळलेले जनसंपर्क अधिकारी माझे मुद्दे खोडून काढत नाहीत व गप्प बसतात, तेव्हा त्यांना माझ्या शंका मान्य आहेत असेच गृहीत धरावे लागते. पण दुसरीकडे त्यांनी जे काही तर्कविसंगत व वस्तुस्थितीला सोडून कथन केले आहे, त्यावरही त्यांचा तेवढाच ठाम विश्वास दिसतो. माझे मुद्दे खोडण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नसतील तर हरकत नाही. पण मला खोटा पाडण्याचा व त्यांना खरे ठरवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि तो मला सुचलेला नाही तर एका चिकित्सक वाचकाने सुचवला आहे. त्या वाचकाने मला फ़ोन करून तशी सुचना जनता व देशमुखादी जनसंपर्क अशिकार्‍यांसमोर मांडावी अशी विनंती केली. मलाही त्याची सुचना आवडली. अजितदादा असोत, की त्यांची गौरवगाथा सांगणारे जनसंपर्क अधिकारी असोत, त्यांनी आपले दावे खरे करणा्साठी एक शिफ़ारस राज्य सरकारतर्फ़े केंद्राला, म्हणजे राष्ट्रपतींना करावी. ती दादांच्या या धाडसाचे राष्ट्रीय कौतुक होण्याची. प्रतिवर्षी प्रजासत्ताकदिनी राजपथावर जो लष्करी संचलनाचा सोहळा होतो, त्यातच देशभरच्या धाडसी, हुशार व पराक्रमी मुलांचे कौतुक केले जाते. त्यांच्या धाडसी कृतीचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले जाते व संचलनात त्यांना हत्तीवर बसवून मिरवत आणले जाते. या वाचकाचे म्हणणे असे आहे, की मंत्रालयाच्या अग्नीकांड प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी जो पराक्रम गाजवला व धैर्य दाखवले असे देशमुख आदींचे म्हणणे आहे, त्याचे त्याच पद्धतीने कौतुक झाले पाहिजे.  

   मला ती सुचना पोरकटपणाची वाटली. कारण तो गौरव छोट्या मुलांचा होत असतो. कुठलाही अधिकार हाती नसताना, व आपली क्षमता नसताना, त्या छोट्यांनी प्रसंगावधान राखून धैर्य दाखवले, म्हणुन त्यांना राष्ट्रीय मान्यता देण्याचा तो प्रघात आहे. उपमुखमंत्री हे अधिकार हाती असलेले गृहस्थ आहेत. त्यांना अशा श्रेणीत बसवता येणार नाही. पण त्यावरही त्या वाचकाचे उत्तर तयार होते. पहिली गोष्ट म्हणजे दादांचे काका केंद्रात मंत्री आहेत. म्हणजे तुलनेने अजितदादा हे राजकारणातील मुलच आहेत. दुसरी बाब म्हणजे देशमुख यांनी अग्नीकांडाचे जे अदभुतरम्य कथानक तयार केले व मांडले आहे, तेही बालबुद्धीला शोभणारे आहे. तेव्हा, त्या पोरकटपणात राज्यकारभार चालवणारे दादा बालवीर ठरायला काहीच हरकत नसावी. मी त्या वाचकाच्या तर्कबुद्धीला दाद दिली आणि त्याची सुचना सरकार समोर जाहिरपणे मांडणाचे मान्य केले. इथे त्याला दिलेला शब्द मी पुर्ण केला आहे. ज्यांना या संदर्भात पुढील कृती करायची असेल त्यांनी महिला वालकल्याण मंत्र्यांकडे त्यासाठी शिफ़ारशी पाठवायला हरकत नाही. माझ्यापुरते विचाराल तर देशमुख वा अन्य जनसंपर्क अधिकार्‍यांनी असल्या बातम्या पसरवण्याचे काही कारण नव्हते. कारण जे घडत होते ते शेकडो चॅनेलवर लोक थेट बघत होते. आणि त्यात कॅमेराने टिपलेले नसेल त्यावर बोलायला हरकत नव्हती. शिवाय असे काही सांगताना घड्याळ नावाची वस्तू आहे व त्यानुसार घटनेचे कालमापन होत असते, याचेही भान ठेवायला हवे होते. तिसरी गोष्ट स्वत: अजितदादांनी अशा पोरकटपणाला प्रसिद्धी मिळू नये याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवे होते.

   शेवटी एवढेच सांगावेसे वाटते. खोटे आणि खरे याच्यामध्ये कुठेतरी थापेबाजी वावरत असते. खरे सहज बोलता येते. कारण त्यात कसली जु्ळवाजुळव करावी लागत नाही. को्णी तपासून पाहिले तर, अशी भिती बाळगण्याचेही कारण नसते. त्याच्या उलट खोटे बोलण्याची बाब आहे. खोटे बेधडक बोलता येते. कारण ते खोटे पडले तरी बिघडत नसते. कारण जो खोटे बोलत असतो त्याला खरे ठरण्याची चिंता अजिबात नसते. तो रेटून खोटे बोलत असतो. समोरच्याला खोटे वाटले तरी त्याला त्याची पर्वा नसते. मात्र थापा मारणार्‍याची गोष्ट अजिबात वेगळी असते. त्याला खोटे तर बोलायचे असते. पण समोरच्याला ते खरे वाटावे, अशी त्याची अपेक्षा असते. त्यामुळेच त्याला खुपच जुळवाजुळव करावी लागत असते. म्हणूनच त्याला खरे व खोट्याची सराईतपणे सरमिसळ करावी लागत असते. इतकेच नाही तर खरे ठरले नाही तरी बेहत्तर. पण खोटे पडू नये याची खास काळजी घ्यावी लागत असते. कारण जे खरे नाही ते खोटेच आहे, असाही दावा करता येत नसतो. म्हणूनच खर्‍यासारखे वाटेल असे खोटे बोलण्याला थापेबाजी म्हणतात. जी आजकाल महाराष्ट्राचे तीन माजी मुख्यमंत्री सराईतपणे करत आहेत. त्यांच्यावर खरे बोलत नसल्याचा आक्षेप कोणीही घेऊ शकतो. पण आदर्श चौकशी समितीसमोर सुशिलकुमार शिंदे, विलासराव देशमुख व अशोक चव्हाण बोलले, ते खरे नाही; असे को्णीही म्हणू शकतो. पण ते खोटे बोलले असे कोणी छातीठोकपणे म्हणु शकतो का? त्यालाच थापा मारण्याची कला म्हणतात. ते वाटते तेवढे सोपे काम नाही. अत्यंत कौशल्याचे काम आहे.

   मंत्रालयाच्या आगीचे बरेच चित्रण झालेले आहे. ती आग कोणी लावली, मुद्दाम लावली का, तिला आवरण्यात हलगर्जीपणा झाला का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत. पहिल्या दिवसापासून घोटाळे झाकण्यासाठीच ही आग मुद्दाम लावली; असा आरोप सर्रास झालेला आहे. पण मी इतके लेख लिहिताना तशी एकदाही शंका घेतएली नाही. कारण आग लावणे ही भले विध्वंसक कृती असेल. पण शेवटी ती कृती आहे. गुन्हा असला तरी तो करावा लागतो. तो करण्याची निदान इच्छा तरी असावी लागते. विकास असो की विध्वंस असो, तो करण्यासाठी कृती आवश्यक असते. आजच्या सत्ताधार्‍यांकडे काही करण्याची इच्छा आहे यावरच माझा विश्वास नाही. मग ते आग लावतील अशी शंका तरी मी कशाला घेईन? उलट माझी शंका पहिल्या दिवसापासूनची अशी आहे, की आग लागली व त्यात जळून मरायची वेळ आली, तरी हे सत्ताधारी त्यात जळून खाक होतील. पण हातपाय हलवणार नाहीत, याची मला खात्री आहे. किंबहूना त्या दिवशी सुरक्षा रक्षकांनी या मंत्र्यांना धावपळ करून बाहेर काढले नसते, तर ते स्वत:हून बाहेर पडले नसते असेच मला वाटते. मग ज्यांना स्वत:चा जीव धोक्यात असताना काही करायची इच्छा होत नाही, ते अन्य कुणाला कशाला वाचवायला धावतील? आणि देशमुखांना तशी खात्रीच असेल तर त्यांनी अशा महापराक्रमी पुरूषांचा प्रजासत्ताकदिनी सत्कार होण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी मी त्यांना म्हणूनच विनंती करतो.              ( क्रमश:)
 भाग ( ३१५ )   ४/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा