बुधवार, २५ जुलै, २०१२

अण्णांची व्यसनमुक्ती तालिबानी ठरवणारे कुठे आहेत?


   काही महिन्यांपुर्वीची गोष्ट असेल. अण्णा हजारे यांचा खुप गाजावाजा चालू होता. जवळपास सर्वच वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपण करणार्‍या गाड्या राळेगण सिद्धीमध्ये कायम उभ्या केलेल्या असायच्या. अण्णा काय जेवले किंवा कोणाला भेटले किंवा त्यांना कोण भेटायला आले; अशा लहानसहान गोष्टींची चर्चा वाहिन्यांवर अखंड चालू होती. मग एखाद्या दिवशी अण्णा काही बोललेच नाहीत, तर त्यांच्या जुन्या गोष्टींना फ़ोडणी देऊन ऊत आणला जायचा. तेव्हा अण्णांच्या राळेगण सिद्धीमधील जुन्या कामाचा अनुभव किंवा आठवणींची चर्चा होत असे. त्यांच्यावरील पुस्तकाचाही उहापोह व्हायचा. त्यातून एकाने मोठा शोध लावला, की अण्णांनी आपल्या गावात व्यसनमुक्ती केली ती गांधीवादी मार्गाने केली नव्हती तर तालिबानी पद्धतीने सैतानी काम केले. कोणी अण्णांच्या पुस्तकातले हवाले दिले तर कोणी मुद्दाम अण्णांना त्या काळातील आठवणी विचारून त्यांच्याकडून ते वदवून घेतले. अण्णांनी आपल्या गावातले अनुभव सांगितले आहेत. सैन्यातून निवृत्त होऊन अण्णा गावात परतले, तेव्हा तिथे दुष्काळ व व्यसनाधिनता माजलेली होती. दारूच्या भट्ट्या होत्या आणि सर्वांनाच दारूने गिळलेले होते. त्यातून गावाला मुक्त करण्याचा चंग अण्णांनी बांधला आणि कामाला सुरूवात केली. तेव्हा अण्णांकडे कुठली सत्ता नव्हती की अधिकार नव्हते. त्यामुळेच दारूच्या व्यसनातून लोकांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी कसे करावे? 

   अर्थात आधी त्यांनी त्या व्यसनाचे बळी होते त्यांना एकत्र केले. म्हणजे महिलांची फ़ळी बांधली आणि त्यांच्या मदतीने गावातली दारू निर्मिती व विक्री बंद केली. म्हणजे काय केले? त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण सहज समजेल त्याला व्यसनी म्हणत नाहीत. साम दाम दंड भेद अशाच मार्गाने अण्णा व त्यांचे सहकारी गेले. ज्याला जशी भाषा समजते त्याला तशा भाषेत समजावून त्यांनी राळेगण सिद्धीमधून दारू व व्यसनांना हद्दपार केले. त्यातही ज्यांनी दाद दिली नाही त्यांना चौदावे रत्न म्हणजे फ़टके हाणले. म्हणजे झाडाला बांधून ठेवणे, फ़टके मारणे अशी दहशत घातली. व्यसन करण्याविषयी भिती लोकांच्या निर्माण केली. आणि आपले हे काम अण्णांनी लपवून ठेवलेले नाही. पण त्याच उतार्‍यांचे दाखले देऊन मग वाहिन्यांवरच्या बुद्धीभेदी शहाण्यांनी अण्णा कसे तालीबानी दहशत माजवणारे आहेत, त्याची वर्णने सांगितली होती. व्यसनी माणसाला स्वत:वर ताबा ठेवता येत नाही, तेव्हा त्याला नियंत्रणाखाली आणावे लागते. विशेषत: जो दारूसारख्या नशेच्या आहारी गेलेला असतो, त्याला शुद्धच उरत नाही, त्याला समजावण्याची भाषा कुठली असू शकते? जेव्हा दारूची वा व्यसनाची तल्लफ़ येते तेव्हा माणूस जनावर होत असतो, त्याला बोलून रोखणे अवघड असते. तो हिंसक होत असतो. जेवढा तो हिंसक होतो तेवढा त्याला रोखणाचा उपाय आक्रमक असावा लागतो. अण्णांनी तसे उपाय योजायला मागेपुढे पाहिले नाही. पण अंतिमत: त्यांनी आपले गाव व्यसनमुक्त केले. त्याला आमचे वाहिन्यांवरचे दिडशहाणे तालिबानी मार्ग म्हणतात.

   तालिबानांनीही व्यसनापासून मुक्त होण्यासाठी असेच सक्तीचे उपाय योजल्याचे त्यांनी ऐकले आहे. पण जिथे मर्यादा ओलांडल्या जातात, तिथे तालिबान गोळ्या घालून व्यक्तीला ठार मारून टाकतात. मग ठार मारणे आणी व्यसनी माणसात संचारलेला सैतान शांत होईपर्यंत त्याला झाडाला किंवा खांबाला बांधून ठेवणे, यात काही फ़रक आहे की नाही? झिंग उतरली मग त्याच्यातला माणुस पुन्हा जागा होईल, असे वागणे हिंसक नसते तर त्याच्याच हिताचे असते. हे ज्यांना कळत नाही त्यांची बुद्धी शेण खायला गेलेली असते. म्हणूनच त्यांनी अण्णांच्या राळेगणमधील व्यसनमुक्तीची तुलना तालिबानांशी केली होती. तालीबान आपल्या आदेशाचे पालन न करणार्‍यांना गोळ्या घालत होते. अण्णांनी व्यसनाधीन लोकांसाठी सक्तीचा मार्ग अवलंबला होता. पण त्याचे शेवटी आलेले परिणाम चांगले होते. चांगले आणि वाईट ठरवण्यासाठी नुसती कुशाग्र बुद्धी असून भागत नाही तर विवेकबुद्धी जागृत असावी लागते. दुर्दैवाने आपल्या वाहिन्यांवरील शहाण्यांची विवेकबुद्धिच गहाण पडलेली आहे. त्यामुळे त्यांना नुसत्या कुशाग्रबुद्धीचाच वापर करता येतो आणि मग अर्थाचे अनर्थ होत असतात. त्यामुळेच ज्या अण्णांनी हाताशी कुठली सत्ता नसताना आणि अधिकार नसतात, आपल्या गावात व्यसनमुक्ती करून दाखवली, त्यातले सत्य समजून घेण्यापेक्षा त्यातले तालिबान या लोकांनी शोधले. पण मग आज सरकार तरी काय करते आहे? सरकारच्या हाती अधिकार व सत्ता आहे. तिचाच वापर करून संपुर्ण महाराष्ट्रावर गुटखाबंदीची सक्ती सरकार करत नाही काय? फ़रक अगदी किरकोळ आहे. सरकारला राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे. अण्णा हजारेंना तो नव्हता. पण परिणामातला फ़रकही मोठा आहे. अण्णांची व्यसनमुक्ती यशस्वी झाली आणि टिकून राहिली आहे. सरकारची एकही बंदी परिणाम करताना दिसत नाही. त्याचे कारण अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमागे शुद्ध हेतू होता. त्यांना आपली दादागिरी सिद्ध करायची नव्हती तर गाव व्यसनमुक्त करायचा होता.

   तसे पाहिल्यास त्यांच्या कृती कायद्याच्या कक्षेत बसणार्‍या नव्हत्या. त्यामुळेच गावातला कोणीही त्यांच्या असल्या कारवायांबद्दल पोलिसात जाऊन तक्रार करू शकला असता. पण कोणाची तक्रार आली नाही, की कोणी अण्णांच्या विरोधात साक्ष द्यायला उभाही राहिला नाही. अगदी व्यसनी गावकरी किंवा त्याचे आपतस्वकीय सुद्धा अण्णांच्या त्या "दादागिरी"विरुद्ध उभे राहिले नाहीत. कारण जे चालले आहे ते आपल्या भल्यासाठी आहे अशी फ़क्त गावाचीच धारणा नव्हती, तर ज्याला कठोर शिक्षा व्हायची त्याच्या कुटुंबीयांना्ही तसाच विश्वास वाटत होता. याचा अर्थ इतकाच, की गावासाठी आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी व्यसन अपाय आहे आणि म्हणूनच आपल्या गावात कोणीच व्यसनी असू नये, असा आत्मविश्वास अण्णा गावात निर्माण करू शकले होते. याचाच दुसरा अर्थ असा की व्यसनी गावकरी व त्याच आप्तस्वकीय यांनाही व्यसन हे पाप आहे; असेच वाटण्याची पाळी अण्णांच्या प्रयत्नांनी निर्माण झाली होती. तीच त्यांच्या व्यसनमुक्तीच्या मोहिमेची ताकद नव्हती. म्हणूनच राज्यघटनेने दिलेले अधिकार व सत्ता हाती असून सरकार जे करू शकले नाही, तेच एका छोट्या गावात अण्णा व त्यांचे कटीबद्ध सहकारी हाती कसलाही अधिकार नसताना करू शकले. जिथे अण्णांचे व राळेगण सिद्धीचे यश सामावले आहे, तिथेच सरकारचे अपयश दडलेले आहे. अण्णांनी लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून लोकभावना जागवली आणि व्यसनमुक्तीसाठी अवघ्या गावालाच सिद्ध करून घेतले. त्यांना कायदा किंवा पोलिसांची मदतही घ्यावी अलागली नाही. कारण कायद्यापेक्षाही मोठी प्रभावी ताकद त्यांच्या मागे उभी होती. जिला सामान्य जनता असे नाव आहे. त्याचे उलटे टोक सरकार आहे. त्याचा सामान्य जनतेच्या चांगुलपणावर अजिबात विश्वासच नाही. पोलिस हेच सरकारला आपले बळ वाटते. तिथेच सर्व सरकारी धोरणे व योजना फ़सता असतात.

   लोकांचे हित आपल्यालाच कळले आहे आणि आपण करू ते हिताचेच आहे, असे निमुटपणे जनतेने मान्य करावे, अशी जी सरकारी अरेरावीची भावना किंवा भूमिका आहे, तिथेच सरकारचे अपयश सुरू होते. जे जनकल्याणाचे आहे त्यात कायदे बनवून त्याचा पोलिसांकरवी अंमल करण्याआधी सामान्य जनतेला त्यासाठी विश्वासात घेतले तर काम खुप सोपे होत असते. सर्वच जनता तुमच्या बाजूने कधी उभी रहात नाही. पण जेव्हा बहुसंख्य लोक तुमच्या बाजूने उभे असतात, तेब्हा मुठभर विरोधकांना त्याच बहुसंख्य लोकांच्या भावनांपुढे शरणागती पत्करावी लागत असते. जेव्हा बहुसंख्य लोक एखादी गोष्ट पाप किंवा अपराध मानू लागतात, तेव्हा ती गोष्ट करणार्‍यावर पोलिसांना लक्ष ठेवावे लागत नाही. सामान्य जनताच पहारेकरी होत असते आणि तिची नजर चुकवून कायदा मोडणे कुणाही माणसासाठी सोपे काम रहात नाही. असा सामान्य जनतेचा पाठींबा व शुभेच्छा ज्या योजना, कायदा किंवा धोरणामागे असतात, त्यांचे यश अपरिहार्य असते. त्यासाठी बडगा किंवा पोलिसाचा दंडूका उगारावा लागत नाही. ते काम सामान्य जनतेची उग्र नजरच करत असते. त्या जनतेच्या नजरेचा धाकच कायद्याची पतिष्ठा, दबदबा व वचक निर्माण करत असतो. राळेगण सिद्धीमध्ये तोच अलिखित कायदा यशस्वी झाला आणि व्यसनमुक्ती यशस्वी झाली. त्याच बळाचा अभाव आजच्या गुटखाबंदीमध्ये आहे. म्हणुच तिचे यश शंकास्पद आहे. किंबहुना त्य बंदीच्या अपयशाचीच खात्री देता येते.     ( क्रमश:)
 भाग  ( ३३५ )     २४/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा