रविवार, २९ जुलै, २०१२

काळच बदलला, की व्यसन प्रतिष्ठीत झाले


   सहासात वर्षापुर्वीची गोष्ट असेल, माझ्या मित्राचा इंजिनीयर मुलगा, एक अशी गोष्ट आमच्यासमोर बोलला की मी त्याच्याकडे अचंबित होऊन बघतच राहिलो. असेच दिवस होते. श्रावण महिना अजून सुरू झाला नव्हता. तो कुठल्या तरी नामांकित माहिती तंत्रज्ञानाच्या कंपनीत नोकरी करत होता. पंचविशीत बापाच्या तुलनेत मोठा पगार मिळवत होता. बापाने तीस वर्षाच्या नोकरीनंतर जेवढा मासिक पगार मिळवला नव्हता, तेवढी मोठी रक्कम या मुलाला मिळत होती. मी त्याला लहान असतानापासून ओळखत होतो. तसा हुशार व गुणी मुलगा तो. पण त्या दिवशी त्याचे एक विधान मला खुपच धक्कादायक वाटले. आम्ही बापलोक बसलो होतो आणि घरातून निघताना त्याने सहज आपल्या पित्याला संध्याकाळी उशीर होणार असल्याची सूचना दिली. उशीर होणार होता, कारण तो आपल्या मित्रांसह गटारीला जाणार होता. गटारी म्हणजे आषाढातला शेवटचा दिवस. उद्यापासून श्रावण सुरू होणार आणि त्या महिन्यात किंवा पुढल्या चातुर्मासात मांसाहार काही लोक करत नाहीत. त्यासाठी ते तत्पुर्वी मनसोक्त मांसाहार करून घेतात अशी अमावास्या असते. मुंबईत त्याला गटारी म्हणतात. कारण मुंबईतले अस्सल दारूडे त्या दिवशी मनसोक्त दारू पिवून घेतात अशी जुनी परंपराच आहे. जणू पुढल्या महिन्याभराची किंवा चार महिन्यांची दारू एकदम पिवून घेतात म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच मुंबईत त्या आषाढी अमावास्येला गटारी हे उपनाव लागले आहे. 

   माझे बालपण मुंबईच्या गिरणगावात गेले. तिथे तर त्या काळात गटारी साजरी करणे म्हणजे अती दारू पिणारे शुद्ध हरपून चक्क गटारात पडायचे. त्यातून त्या अमावास्येला गटारी अमावास्या नाव पडल्याचे ऐकलेले आठवते. पण गिरगाव दादरसारख्या सभ्य उच्चभ्रू भागात, त्या शब्दाची हेटाळणी होत असे. कारण असे दारू पिवून झिंगणे किंवा बेफ़ाम होऊन गटारात पडणे असभ्य मानले जात होते. किंबहूना दारू पिणे हीच हलकी वा असभ्य गोष्ट मानली जात होती. चार दशकात जग इतके पुढारले की अत्यंत सुशिक्षित उच्चभ्रू वर्गात गटारी साजरी होऊ लागली. तेवढेच नाही तर सुशिक्षित मुलगा आपल्या बापाला गटारी आहे म्हणून उशीर होईल, असे बेधडक सांगत होता. त्याच्या तोंडून तो गटारी एन्जॉय करण्याचा विष्य ऐकला आणि म्हणून मी थक्क झालो होतो. मजा म्हणजे मुलाचे ते उद्गार पित्याला चकीत करू शकले नाहीत. आणि मी जेव्हा मुलगा गेल्यावर मित्राला त्या विषयावर छेडले; तेव्हा त्याने माझीच टवाळी केली. कुठल्या जमान्यात जगतो आहेस, म्हणत मलाच जुनाट वृत्तीचे ठरवले. जेव्हा बालपणी मी लालबाग परळच्या गिरणगावात जगलो, तेव्हाही कुणा मुलाला किंवा पत्नीला आपल्या घरचा प्रमुख दारू पिवून पडतो; याचा अभिमान वाटत नव्हता किंवा दारू पिण्यात कसला मोठेपणा वाटत नव्हता. दारुड्य़ाच्या कुटुंबियांनाही ते पापच वाटत होते. दारू पिणारा बाप वा भाऊ घरातल्यांची मान खाली घालण्याचे कारण होता. अगदी कष्टकरी कामगार वर्गातही ती बाब कमीपणचीच मानली जात होती. आणि आज सुशिक्षित घरातला मध्यमवर्गिय मुलगा बापाला गटारी एन्जॉय करणार म्हणून बेधडक सांगतो आहे.

   हा बदल आहे, की उलथापालथ आहे? नंतर मी एकदा त्या मुलाशी त्याबद्दल बोललो सुद्धा. तो थोडा गोंधळला. त्याला त्याच्या तशा वागण्य़ात गैर काय होते, तेच लक्षात येत नव्हते. आपण व्यसन करत नाही तर एन्जॉय करतो असा त्याचा दावा होता. आणि त्या एन्जॉयमेन्टच्या पुराव्यासाठी त्याने मला जे सांगितले ते आणखी धक्कादायक होते. त्याच्या त्या गटारीमध्ये ऑफ़िसच्या अनेक मुलीही सहभागी झाल्या होत्या म्हणे. ज्या गोष्टी आता तरूण मुलीसुद्धा सहज करतात, त्याचा इतका बागुलबुवा कशाला, असा प्रतिप्रश्न त्यानेच मला केला. मी अवाक झालो. आता तो मुलगा विवाहित आहे व एक मुलाचा बापही आहे. आता एन्जॉयमेन्ट संपली आहे आणि रोज तो रिलॅक्स होण्यासाठी घरातच एखादा पेग घेत असतो. काय करणार, कामाचा थकवा शिणवटा असतो ना? असे त्याचीच तरुण पत्नी म्हणते. अधिक मुर्ख ठरू नये म्हणून त्यांना त्याबद्दल काहीव विचारत नाही. पण जो मुलगा बापाला दाद देत नाही, तोच अशावेळी मी त्याच्या घरी असलो तर अपराधी भावनेने मला असले खुलासे देतो किंवा त्याची पत्नी त्याच्या समर्थनार्थ असली कारणे देते. मी विचारण्याची गरजच नसते. ती एन्जॉयमेन्ट त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. म्हणून तो दारूडा झालेला नाही. कोणी त्याला दारूडा म्हणू शकणार नाही. कारण त्याची शुद्ध हरपत नाही, की तो बेफ़ाम होत नाही. मात्र आता त्याला गटारीची प्रतिक्षा करावी लागत नाही. गटारी त्याच्या अंगवळणी पडली आहे. मीच मुर्ख आहे कारण मी अस्वस्थ होतो. त्याच्या पत्नीप्रमाणे आईबापांनाही त्यात काही गैर वाटत नाही.

   अशा स्थितीतून एन्जॉय करताना आयुष्य़ भटकलेले अनेकजण मी बघितले आहेत. माझे नशीब इतकेच, की मुलाच्या टाईमपासमध्ये माझा मित्र अजून सहभागी झालेला नाही. कदाचीत त्याचा नातू ती उंची गाठू शकेल. कारण आता नशापान ही एन्जॉयमेन्ट झाली आहे, पाप उरलेले नाही. माझ्यासारखा एखादा आजच्या पत्रकार मित्रांच्या बैठ्कीत गेला तर त्यांना छान शिजलेल्या भातात खडा दाताखाली यावा तसा खटकतो. आता दारू ही प्रतिष्ठेची बाब बनली आहे. जे यापासून अलिप्त असतात किंवा हट्टाने तसे अलिप्त रहातात, ते मुर्ख मानले जातात. सकाळी वा दुपारी गांधीवादाचे किर्तन करणारे कितीजण दिवस अंधारताच घसा खुप कोरडा झाला म्हणुन ओला करायला बसतात, ते मी पाहिले आहे. त्यापैकी काहीजणांन तुम्ही वाहिन्यांवर अण्णांना गांधीवाद शिकवताना ऐकता. त्यातले कितीजण गांधींच्या विचारांचा शिणवटा उतरवण्यासाठी एन्जॉय करायला बसतात, ते बघितले मग गांधी ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे व तिचे निर्मूलन करण्यासाठी हे लोक पेय हाती घेऊन बसलेत काय अशी मला शंका येते.  मुद्दा त्यांच्या व्यसनाचा नाही. मुद्दा आहे तो दारू नावाच्या व्यसनाला मिळालेल्या आधुनिक प्रतिष्ठेचा आहे. ज्यांना असे प्रतिष्ठाप्राप्त व्हायचे आहे, त्यांची गोष्ट महत्वाची नाही. त्यांच्या त्या प्रतिष्ठेमुळे जे भारावून जातात, त्यांची मला चिंता वाटते. कारण कनिष्ठ मध्यमवर्गात मग अशा प्रतिष्ठांचे अनुकरण सुरू होते. शहरांच्या गल्लीबोळात आणि अगदी लहानश्या गावातही आता बार उभे राहिले आहेत. त्यातून आयुष्य़ एन्जॉय केले जाते, की आयुष्याची माती केली जात असते? रस्त्यावर अशा नशेत बेफ़ाम गाड्या चालवून लोकांच्या पादचार्‍यांच्या जीवाशी खेळण्याची तुफ़ानी एन्जॉयमेन्ट आता नवी राहिलेली नाही. कारण आता दारूप्राशन हे व्यक्तीगत मजेचा विषय राहिलेले नाही तर इतरांच्या आयुष्याशी खेळायचा गेम बनला आहे. पण सरकारला त्याची कुठे पर्वा आहे? हजारो कोटी रुपये त्यातून उत्पाद शुल्क मिळते ना? सरकार खुश आहे, आपण खुश आहोत, कारण शेकडो जनकल्याण योजनांसाठी त्यातून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीत येत असतात ना?

   किती सहजगत्या माणुस दारूच्या नशेत ओढला जातो, त्याचे हे मी स्वत: अनुभवलेले उदाहरण आहे. माझ्या बालपणी आम्हाला जे पाप वाटे; लोकांना अपमानास्पद वाटत असे. तेच आता एन्जॉयमेन्टचा विषय बनले आहे. पण किती लोकसंख्या अशा व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे, त्याची सरकारला फ़िकीर तरी आहे काय? गुटख्याचे व्यसन जिवावरचे आहे म्हणणार्‍या सरकारला, दारूचे व्यसन व्यक्तीच्या नव्हेतर एकूणच कुटुंबाच्या आरोग्यावरचे संकट आहे, हे कळतच नसेल काय? दोन दशकांपुर्वी पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांच्यावर राज्यात अधिक दारूची दुकाने उघडू दिल्याचा आरोप झाला होता. तर आपण कुठल्याही वाईनशॉपला नवा परवाना दिल्याचे पवारांनी नाकारले होते. आणि पवार चक्क खरेच बोलले होते. त्यांनी दुकानांना नवे परवाने दिले नव्हते. पण बार थाटण्याच्या अटी इतक्या शिथील केल्या, की जवळपास निम्म्याहून अधिक उडूपी हॉटेलचे रुपांतर दोनतीन वर्षात बारमध्ये झाले. मुद्दा किती बार झाले हा नाही, तर सरकारी वा सत्ताधारी मानसिकतेचा आहे. आणि तीच मानसिकता असेल तर गुटखाबंदीमध्ये मोठा उदात्त हेतू असल्याचा आव आणण्य़ाचे कारणच काय? समाजाच्या आरोग्याचे हवाले देण्याचे ढोंग कशाला? कारण गुटख्यापेक्षा दारुच्या व्यसनाने अधिक लोकसंख्या व माणसे रोगट होत चालली आहेत. हे विष मोठ्या लोकसंख्येच्या रक्तात भिनत चालले आहे. ते विष अधिकधिक लोकांना आपल्या सापळ्यात ओढून पशू वा जनावर बनवत आहे. कधी ते व्यसन साक्षात यमदूत बनून एखाद्या वस्ती्त अवतरते आहे, तर कधी व्यसनाधीन माणसालाच यमदूत बनवून इतरांच्या आयुष्य़ाचा घास घेते आहे. पण त्याबद्दल सरकार एक शब्द तरी बोलते आहे काय?     ( क्रमश:)
भाग  ( ३३८ )     २७/७/१२

३ टिप्पण्या:

  1. bore aahe...coldrink pinare asech bolatat ...2-3 blog lihle mhanje yana shahana zalyasarkha vatta....swatacha kartutva, samajseva kaahich nahi aani dusryana shikavtat

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ, हे व्यसन म्हणजे खुपच वाईट आहे. याच्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होत असते. शहरच नाही तर गावागावात हे व्यसन नव्या पिढीला बरबाद करत आहे. सध्या रोज एक दोन पेग घेतले तर हृदयासाठी चांगले असते असा प्रचार चाललेला आहे. पण एकदोन पेग घेणारा मनुष्य कधी त्याच्या आहारी जातो ते कळतही नाही. नंतर दारूचे व्यसन सोडणे अवघड होऊन बसते. कोणाला जर दारू सोडायची असेल तर Alcoholic Anonymous ही दारुड्या लोकांनी चालवलेली संस्था खुपच उपयोगी आहे.

    उत्तर द्याहटवा