सोमवार, ३० जुलै, २०१२

नशा जरूर असावी पण कशी असावी?


    खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता.

   १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण?

    १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले.

   वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय?

   गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते.   ( क्रमश:)
भाग  ( ३४१ )  ३०/७/१२

1 टिप्पणी:

  1. भाऊ, बाबांच्या कर्तृत्वाला सलाम, आपल्या लेखणीला कुर्निसात...आपल्यासोबत काम करतानाचे माझ्या कॉलेजचे दिवस आठवले....नमन- नवनाथ सकुंडे 9870408702

    उत्तर द्याहटवा