मेंदू कसा काम करतो? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. पण कॉंप्युटर म्हणजे संगणक मात्र वाटेल ते काम सहज करतो, असा लोकांचा एक गोड गैरसमज आहे. आपण त्याची कामाची प्रणाली समजून घेत नाही, म्हणून आपल्याला संगणकाचे काम अगदी सोपे आहे, असे आपल्याला वाटते. पण ते यंत्र त्याला जेवढे शिकवले आहे त्यापलिकडे कुठलेही काम करू शकत नाही. सर्व संगणक एकाच पद्धतीने बनवलेले असले, तरी त्यांचा वापर वेगवेगळ्या कामानुसार होत असतो. जशी त्याला शिकवण दिलेली असते त्याप्रमाणेच तो संगणक काम करू शकत असतो. मानवी मेंदूची कहाणीसुद्धा वेगळी नाही. त्यालाही संगणकाप्रमाणेच सज्ज करावा लागतो, तरच तो मेंदू त्याप्रमाणे काम करू शकतो. फ़रक एकच आहे, की संगणक स्वतंत्रपणे निर्णय घेण्याइतका स्वयंभू नसतो वा स्वत:च स्वत:ला घडवू शकत नाही. मानवी मेंदू मात्र स्वत:ला स्वत:च सज्ज करण्याची क्षमता बाळगत असतो. मात्र आपण मेंदूला तेवढी सवड दिली पाहिजे, तेवढी मदत केली आहिजे.
प्रथम संगणक म्हणजे कॉंप्युटर कसा सज्ज केला जातो ते समजून घेऊ. ती एक प्रचंड गुंतागुंतीची यंत्रणा असते. त्याचे सर्व काम स्मृतीच्या आधारे चालते. जेवढी त्या संगणकाची स्मरणशक्तीची क्षमता असते, तेवढा तो संगणक अधिक माहिती साठवून ठेवू शकता असतो. त्यापैकी प्राथमिक माहिती त्यात भरली जाते, तिच्या आधारे तो संगणक आपले काम करू शकत असतो. त्या मुलभूत माहितीला प्रोग्रॅम म्हणतात. तो प्रोग्रॅम म्हणजे विशिष्ठ कामासाठीची मुलभूत माहिती असते. त्याच आधारावर नंतर मिळणार्या संकेतानुसार तो संगणक काम उरकत असतो. जी मुलभूत माहिती त्याला आधीपासून दिलेलीच नसेल तिच्याशी संबंधित संकेत (आदेश) त्याला दिले तर तो ओळखत नाही, समजत नाही असे उत्तर देऊन मोकळा होतो. म्हणजेच आधी त्याच्या स्मरणात काही मुलभूत माहिती भरून त्याला ठरलेल्या कामासा्ठी सज्ज केलेले असते. मग त्या माहितीचा आधार घेऊन तो संगणक तुम्हाला हवी असलेली उत्तरे देतो. दिसायला तुम्ही की बोर्डवर एक कळ दाबत असता, ती ए किंवा बी असू शकते. पण आधी सज्ज केलेल्या प्रोग्रॅमनुसार ए किंवा बी या आदेशाचा अर्थ जसा असेल तशीच प्रक्रिया संगणक करता असतो. थोडक्यात त्याला आधी दिलेली मुलभूत माहिती हाच त्या संगणकासाठीचा अनुभव असतो. त्यानुसार त्याची कार्यपद्धती ठरलेली असते. हे मानवी मेंदू कसे शिकतो?
आग किंवा जाळ म्हणजे काय ते छोट्या बालकाला कळत नसते. म्हणून आपण त्याला आग किंवा धारदार वस्तू यापासून दुर ठेवत असतो. शक्य असेल तेव्हा आग म्हणजे भु होईल असे सांगुन त्याच्या मनात भिती घालत असतो. ही भिती घालणे वा त्याला खरेच आगीचा चटका बसणे वा इजा होणे, त्याच्यासाठी अनुभव असतो. ती माहिती त्याच्या मेंदूमध्ये जाऊन बसते. आधी आग, उजेड, ज्योत, जाळ अशा सर्वच गोष्टी त्या अजाण बालकासाठी समानच असतात. पण जसजसा त्याचा अनुभव संमृद्ध होत जातो, तसतसे त्यातले सुक्ष्म फ़रक त्यालाही कळू लागतात. त्यासंबंधात ते बालक स्वत:चे निर्णय घेऊ शकत असते. भु, हा: असे एकाक्षरी शब्द आपण इजा होण्याशी संबंधीत म्हणून त्याच्या डोक्यात घालत असतो. असे शब्द म्हणजे दुखणे, वेदना, इजा एवढेच त्या बालकाच्या डोक्यात शिरत असते. त्यापेक्षा अधिक त्याला काहीच कळत नसते वा कळणारही नसते. आपलीही तेवढी त्याच्याकडून अपेक्षा नसते. आपल्या अपरोक्ष त्याने चुकून स्वत:ला इजा करून घेऊ नये, इतक्याच अपेक्षेने आपण त्याला असे काही शिकवत असतो. थंड, गरम, अंधार, उजेड अशा गोष्टी अत्यंत सहजगत्या आपण बालकाच्या डोक्य़ात घालत असतो. त्याचप्रमाणे नावे व ओळख त्याला शिकवत असतो. सतत एकच शब्द त्याच्या कानीकपाळी ओरडून आपण त्याला त्याचे नाव शिकवतो. अमुक एक शब्द वा अक्षरांचा उच्चार, म्हणजे आपला उल्लेख, हे बालकाला लक्षात येऊ लागते. त्याचप्रमाणे आई, मम्मी, बाबा, ताई, दादा, भाऊ असे शब्द त्याच्या स्मरणात घालण्यासाठीच सतत उच्चारले जात असतात. अमुक चेहरा म्हणजे आई, तमूक चेहरा म्हणजे बाबा किंवा मावशी. अशी त्याची स्मरणशक्ती आपण संमृद्ध करत असतो. हे सर्व संकेत त्याच्या मेंदूमध्ये ठाण मांडून बसतात. मग ते शब्द, ती अक्षरे उच्चारली म्हणजे बालकाच्या मनात नेमका तोच चेहरा उमटत असतो. शब्द, ध्वनी हे संकेत असतात. त्यातून मेंदू त्याला तो आकार, चेहरा दाखवत असतात, परिणाम सांगत असतात.
असे शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या त्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. मग त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातून आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते. त्याच्या त्याच कामात त्याला मदत करणे म्हणजे बालकाला शिकवणे असते. कारण जेवढे अनुभव व त्यांच्या संमृद्ध स्मृती, तेवढा त्याचा मेंदू तल्लख व कुशल होत असतो. आणि इथे मानवी मेंदूची स्मरणशक्ती लाखो नव्हेतर अब्जावधी संगणकांच्या क्षमतेपेक्षा अधिक असते. जेवढी माहिती जमा केली जाईल, तेवढी स्मरणशक्ती वाढत असते. माझ्याच मुलीचा अनुभव घ्या. ती दिड वर्षाची असताना बडबड करू लागली, तेव्हा तिच्यासोबत असताना मी पाढे म्हणू लागलो. त्याचा अर्थच तिला कळत नव्हता. पण मी म्हणतो म्हणून तीही गुणगुणू लागली. ते पाढे तिच्या लक्षात रहात गेले. दोन नंतर तीन येतात आणि चाळीसनंतर एकेचाळिस हे तिच्या पक्के लक्षात राहिले होते. पण त्या शब्दांचा अर्थ तिला अजिबात माहीत नव्हता. पुढे केव्हातरी त्यांचा तिला उपयोग झाला. पण एवढ्य़ा कोवळ्या वयात तिच्या स्मरणशक्तीने तीनशेपर्यंत इंग्रजी व मराठी पाढे लक्षात ठेवले होते. आजही कोणा पालकाने त्याच्या दिडदोन वर्षे वयाच्या मुलावर हा प्रयोग करून बघावा. काही विशेष करायचे नाही. मुलाला फ़िरायला घेऊन गेले असताना, मांडीवर घेऊन झोपवत असताना, पाढे गुणगुणत रहायचे. किती नकळत बालकाच्या ते लक्षात रहातात, त्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकेल.
अशी जी माहिती जमा केली जात असते, त्याचवेळी त्याचे ठोकताळेही मेंदू तयार करत असतो. आई म्हणजे अमूक चेहरा, बाबा म्हणजे अमूक चेहरा, भूभू म्हणजे कुत्रा अशा शिकण्यातून मेंदूला त्याच्यापर्यंत येणार्या माहितीवर प्रक्रिया करायचा सराव मिळत असतो. जितका तो सराव अधिक तेवढे मुल हुशार होता असते. त्याची बुद्धी तल्लख होत असते. जेवढी बुद्धी तल्लख होते, तेवढे ते मुल माहिती तपासून त्याचा खरेखोटेपणा शोधण्याचाही विचार करू लागते. नुसती माहिती स्विकारण्यापेक्षा त्याची चाचणी व चिकित्सा करण्याने मेंदू अधिक प्रगल्भ होत असतो. इथेच मानवी मेंदू आणि संगणक यात फ़रक पडतो. संगणक स्वत:च विचार करू शकत नाही. मानवी मेंदू स्वयंभू असतो. तो प्राथमिक माहिती आत्मसात केल्यावर स्वत:च नवी माहिती मिळवू बघतो, आली ती माहिती चिकित्सक वृत्तीने तपासू बघतो. आणि हुशारी त्या स्वयंभूपणे तपासण्याच्या चिकित्सक वृत्तीशी संबंधित असते. ती चिकित्सक वृत्ती अनुभवाच्या संमृद्धीतून येऊ शकत असते. जी माहिती समोर आली, ती डोळे झाकून आंधळेपणाने स्विकारण्यातून बुद्धीचा विकास होत नाही. संगणकासारखी बुद्धी कुंठीत होते. सतत अभ्यासाला मुलांना जुंपले, मग त्यांचे यांत्रिकीकरण होते. अमूक प्रश्नाला अमुक उत्तर संगणकही देऊ शकतो. तसेच मुलांचे केल्यास त्याच्यातली चिकित्सक वृत्ती मारली जात असते. म्हणूनच त्याला आधीच्या पिढीने मिळवलेले ज्ञान आयते देत असतानाच, त्याच्यातल्या चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. शालेय शिक्षण हे मुलांनी अनुभवाचे ग्रहण करण्यापुरते महत्वाचे असते. ते ज्ञान नसते तर ती माहिती असते. तिच्या आधारावर त्याच्या बुद्धीचा विकास व्हायला हवा. त्याची बुद्धी कुंठीत होता कामा नये, कुंठीत करता कामा नये.
दुर्दैव असे, की अभ्यासाच्या ओझ्याखाली आज मुलांना स्वत:चा अनुभव घेऊन चिकित्सक वृत्तीचा विकास करण्याची संधी त्यांचेच पालक नाकारत असतात. आपले मुल जिवंत माणुस आहे व त्याला स्वत:चा मानवी मेंदू आहे, याचेच भान रहात नाही, इथून खरी समस्या सुरू होते. जी पाठ उत्तरे देऊन एका परिक्षेत मुल जास्त मार्क्स मिळवील, तीच परिक्षा एखादा संगणक शंभरवेळा देऊ शकतो. पण स्वत: उत्तरे शोधण्याची क्षमता संगणकात कधीच येऊ शकत नाही. ती माणसात येऊ शकते. त्यासाठी मेंदूचा पुर्ण विकास व वाढ व्हायला हवी. मेंदूतल्या ज्ञानपेशी पुर्णत: कार्यान्वित झाल्या पाहिजेत. आणि त्यासाठीच शालेय शिक्षण असते. शालेय शिक्षण हे परिक्षा उत्तिर्ण होण्यासाठी वा चांगले गुण संपादन करण्यासाठी नसते, तर पुढल्या आयुष्यात जे गहन प्रश्न समोर येतील, त्याची उत्तरे चिकित्सक बुद्धीने शोधून काढण्याचे आव्हान मेंदूला पेलता यावे, त्यासाठी मानवी मेंदूला सज्ज करण्यासाठीच शालेय शिक्षणाची योजना आहे. पण त्याचे स्मरण कोणाला राहिले आहे काय? ( क्रमश:)
भाग ( ३२३ ) १२/७/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा