गुरुवार, ५ जुलै, २०१२

अभ्यास आवडला तर काय होते बघा


   कोळसा उगाळावा तेवढा काळाच असे म्हणतात. सेक्युलर म्हणुन जी मंडळी आपल्या देशात मिरवत असतात, त्यांचे कर्तृत्व आणि कारभार तसाच काळाकुट्ट आहे. त्याचा पाढा वाचायचा किती; हा प्रश्न असतो. असो. त्यापेक्षा सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील समस्येकडे पुन्हा वळणे मला अगत्याचे वाटते. काही दिवसांपुर्वी लिहिताना, मी बालकांच्या बाबतीतला एक वेगळा अनुभव सांगण्याचे कबूल केले होते. अनेक पालक वाचकांचे मला फ़ोन आले, त्यांचेही त्या अनुभवातून थोडेफ़ार निरसन होऊ शकेल अशी मला खात्री आहे. मुलांना शिकवणे खुप अवघड असतेच. पण तुम्ही सावधपणे मुलांना हाताळत असाल, तर तेच काम खुप सोपे व सहजसाध्य सुद्धा होऊ शकते. निदान माझा तरी अनुभव तसा आहे.

   २००६ च्या मध्यास मी अमेरिकेत काही महिने होतो. त्याच काळात तीन आठवडे माझे वास्तव्य जर्सी सिटी या शहरात होते. तिथे माझी भाची आहे. तिथल्या प्राथमिक शाळेत तिची छोटी मुलगी अदिती पहिलीच्या वर्गात जात होती. मात्र तिला लिहिण्यावाचण्याचा खुप कंटाळा होता. मग आपल्याकडे जशी अभ्यासावरून मायलेकरांची भांडणे चालतात, ती तिथेही मला बघायला मिळाली. माझ्या स्वभावानुसार मी त्यांचे निरिक्षण करत होतो. आठदहा दिवस असेच गेले. मग एके दिवशी ती छोटी लाडात बोलताना मला म्हणाली, आजोबा तुम्हाला इंग्लिश येत नाही. मी मुलांशी बोलताना खुप सावध असतो. म्हणुनच क्षणार्धात उत्तरलो, "काय करू, मी इंडियात शिकलो. तिथे मला मराठीतूनच शिकावे लागले ना." मग ती मोठेपणाचा आव आणुन म्हणाली, You must learn english. तेव्हा मी सावधपणे उत्तरलो, Ok, you teach me.  

   मुले किती निरागस असतात बघा. मी तिला उत्तर इंग्लिशमध्येच दिले होते. म्हणजे मला इंग्लिश येते हे उघड होते. पण त्या बालिकेचे माझ्या चुकीकडे कुठे लक्ष होते. मला इंग्लिश येत नाही, म्हणजे मी तिच्या लेखी अडाणी होतो आणि ती शहाणी होती. तिला हवा असलेला मोठेपणा त्यातून मिळत असल्याने ती साफ़ गाफ़ील होती. मी त्याचाच गैरफ़ायदा उचलला होता. तिचे आईवडिल तिच्या आगावूपणाने थोडे अस्वस्थ झालेले मला दिसत होते. माझ्यासारख्या वडिलधार्‍याची अवज्ञा त्यांना आवडली नव्हती. पण इशार्‍यानेच मी त्यांना गप्प बसायला भाग पाडले होते. दोघेही कुतुहलाने काय घडते ते बघत होते. मग त्या छोटीने मला इंग्लिश कसे शिकवायचे ते मलाच विचारले आणि मीच तिला मार्ग दाखवला, तिला कल्पना आवडली. Teach me five words everyday, असे मी अदितीला सुचवले. तिने मान्य केले. आता गंमत समजून घ्या. मला पाच शब्द इंग्लिशमधले शिकवायचे, तर तिला ते रोजच्या रोज पुस्तकातून शोधणे भाग होते. नुसते शोधून भागणार नव्हते. ते शब्द तिने एका वहीत लिहून, मगच मला अक्षरे म्हणजे स्पेलिंगसकट सांगायचे होते. म्हणजे तिला पुस्तक उघडून वाचणे, वहीत लिहून काढणे व मला स्पेलिंगसह सांगणे भाग होते. ती खुप गाफ़ील, पण खुश होती. आजोबाने मुर्ख बनवून अभ्यासाला जुंपले आहे, ते तिच्या लक्षातही आले नाही. घरात लहानगी म्हणुन तिला कोणताही अधिकार नव्हता. आता तिला माझी टीचर म्हणुन मोठेपणा व अधिकार मिळाला होता.

   सकाळी आईवडिलांसोबत बाहेर पडलेली अदिती संध्याकाळी घरी आल्याआल्या प्रथम पुस्तक घेऊन माझ्यासाठी शब्द शोधून लिहायला लागली. मग माझ्याकडून इंग्लिशचा अभ्यास करून घेण्यात एक दिड तास खर्ची पडायचा. कारण रोज नवे शब्द शोधायला लागत होते. त्यांचे स्पेलिंग मला शिकवायचे म्हणून दोनतिनदा बोलले जायचे. हा खे्ळ आठवडाभर रंगला. तिचे आईवडील खुश होते. त्यांनाही गंमत वाटली. मग मी तिथून दुसर्‍या दुरच्या शहरात जाणार होतो. तिची आई अस्वस्थ झाली. कारण महिनाभर असेच चालले, तर अदिती अभ्यासाला लागली असती. त्यावर मी उपाय काढला. मी कुठेही असेन तरी रोज संध्याकाळी ठरल्या वेळी तिने मला फ़ोनवरून शिकवावे. अदितीही खुश होती. अवघ्या चारपाच दिवसातच ती कंटाळली. मग ती म्हणाली. शब्द शिकणे खुप झाले. आता मला वाक्ये शिकली पाहिजेत. मला काहीच अडचण नव्हती. मी निमुटपणे तिचे मान्य केले. मग ती मला फ़ोनवरून इंग्लिश वाक्ये शिकवू लागली. म्हणजे तिचाच अभ्यास वा काम वाढले होते. ती दिवसेदिवस शाळेतील पुस्तके वाचणे व त्यातले शब्द, वाक्ये लिहिणे, वाचणे यात गुरफ़टून गेली. रोज नवे शब्द किंवा वाक्ये शोधायचे काम सोपे नव्हते. पण माझ्यावर हुकूमत गाजवण्याच्या नादात ती त्यात इतकी रममाण झाली, की वाचण्याचा तिला कधी छंद लागला, ते तिचे तिलाच कळले नाही. हा प्रकार सुरू झाला होता ऑगस्ट महिन्यात. काही आठवड्यातच मला शिकवणे बाजूला पडले आणि अदिती पुस्तके वाचण्यात रंगून गेली. मग मी पुन्हा तिच्या वाढदिवसासाठी डिसेंबर महिन्यात जर्सीला गेलो; तेव्हा तिला चांगली गोष्टीची पुस्तके भेट दिली. तोवर तिच्यात पडलेला फ़रक तिच्या शाळेतील शिक्षकांनाही जाणवला होता. कारण त्या चार महिन्यात तिने शाळेतली छोट्या मुलांसाठी असलेली अर्धीअधिक पुस्तके वाचून संपवली होती.

   इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तिचे पालक किंवा शाळेत तिच्यावर ज्या गोष्टीची सक्ती केली जात होती, तीच गोष्ट मी सहजगत्या तिच्याकडून करून घेतली. पण इथे मी तिच्यावर सक्ती केली नव्हती. आजोबाला शिकवण्याचा मोठेपणा करायच्या नादात ती फ़सली होती. पण ते करताना तिला कंटाळा येत नव्हता. याचे कारण तेच काम सक्तीचे होते, तेव्हा कंटाळा होता. पण तेच काम आवडीचे झाल्यावर कामच उरले नाही. चीनमधला एक जुना बुद्धिस्ट विचारवंत कंफ़्युशिअस म्हणतो, "आवडणारे काम शोधा, मग आयुष्यभर एकही दिवस काम करावे लागणार नाही." त्याचा मतितार्थ इतकाच, की जे काम आवडते त्याने आपण दमत नाही. म्हणुनच ते काम वाटत नाही. पण जे आवडत नाही, ते काम कितीही सोपे असले तरी त्याचा कंटाळा येतो. मुलांना अभ्यास आवडत नाही, म्हणुन त्याचा कंटाळा येतो. उलट तोच अभ्यास आवडण्य़ासारखा असेल तर अथक मुले त्याच्या मागे लागतात. सहजगत्या अभ्यास पार पाडतात. आज मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, कारण अभ्यासच कंटाळवाण्या पद्धतीने घेतला जात असतो. शाळेत असो की घरात असो, अभ्यास म्हणजे छळवाद असेच मुलांना वाटत असते. त्यातून मुलांची मुक्तता करा व आवडेल अशा पद्धतीने त्यांच्यासमोर अभ्यास पेश करा, मग बघा तीच मुले कशी तुम्हाला कंटाळा येईपर्यंत अभ्यास करू लागतील.

   याचा अर्थ इतकाच, की शाळेत वा घरात अभ्यासाची जी सक्ती असते, त्याने मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. इंग्रजी माध्यमात मुल असले, मग आणखीनच हाल असतात. कारण जो अभ्यास करायचा त्याची भाषाच अपरिचित असते. मग कंटाळा अधिकच येतो. शिवाय आजकाल शाळेतील शिकवण्याच्या पद्धती इतक्या कंटाळवाण्या आहेत, की अभ्यास म्हणजे मुलांना छळवाद किंवा शिक्षाच वाटत असते. त्यातून मुलांना बाहेर काढायचे असेल तर कुठली शाळा त्यात पुढाकार घेईल असे मला वाटत नाही. ते काम पालकांना करावे लागेल. शिकताना मुलाने शिकायचे आहे व त्यासाठी त्याला शिकतो ते समजणे अगत्याचे आहे, ही गोष्ट आपण विसरतो, तिथून समस्या सुरू होते. त्या समस्येकडे पाठ फ़िरवली, म्हणुन ती समस्या संपत नाही, ती अधिकच गुंतागुंतीची होत जाते. पण बहूतेक पालक त्याकडे काणाडोळा करतात. पोर इंग्रजीची बाराखडी म्हणजे एबीसीडी बोलते तेवढ्यानेच पालक खुश असतात. त्यांना पुढल्या परिणामांकडे बघायची इच्छाच नसते. म्हणून परिणाम टाळता येत नाहीत. त्याची पहिली लक्षणे चौथी पाचवीच्या वर्गात मुल पोहोचले, मग दिसू लागतात. आणि ही बाब आपल्या देशातच नाही अगदी अमेरिकेतसुद्धा आहे.

   इंग्रजी भाषा आणि बोली यातला फ़रक आपण समजून घेत नाही, तिथेच सगळी गल्लत होत असते. उच्च शिक्षणात इंग्रजी येणार आहे, म्हणुन आपण आतापासूनच मुलांना इंग्रजीत शिकवू पहातो. त्याची खरेच गरज नाही. कारण इंजिनियरींग, मेडिकल वा अन्य तंत्रज्ञानाच्या उच्चशिक्षणात लागणारी इंग्रजी भाषा व मुळ इंग्रजी भाषा; यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे. पेशा व विषयानुसार भाषा बदलत असते. शिकताना भाषा हे एक माध्यम आहे. शालेय शिक्षणात भाषेला महत्व फ़ारसे नाही. तिथे मुळात कुठलाही विषयसुद्धा महत्वाचा नाही. तर शिकण्याचा सराव म्हणजे शालेय शिक्षण असते. म्हणुनच त्यात अनेक विषय येतात, तशीच पुढल्या वर्गात इंग्रजी सुद्धा येतच असते. पहिली ते चौथी या वर्गात भूमिती, विज्ञान, असे विषय नसतात. पण पाचवी नंतरच्या वर्गात मुले ते विषय आत्मसात करू शकतात, तशीच इंग्रजी ही नवी भाषाही आत्मसात करू शकतात. मुद्दा आहे तो भाषा वा विषयांचा नव्हेतर अभ्यास आवडण्याचा.     ( क्रमश:)
  भाग ( ३१६ )   ५/७/१२

१६ टिप्पण्या:

  1. भाऊ, आजकालचे पालक जगाराहाटीत इतके व्यस्त आहेत की ते बाल मानस शास्त्र पूर्णपणे विसरले आहेत. त्यामुले बालके हट्टी झाले आहेत. मुलांवर भरपूर पैसे खर्च केले म्हणजे आपण त्यांच्यावर खुप प्रेम करतो असे पालकांना वाटते. त्यातच एकत्र कुटुंब पद्धति पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुले आनंदी आनंद आहे. छान लेख आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान , मुलांना शिकवण्यासाठी मस्त युक्ती , आता पहिला प्रयोग मुलीवर , तू माझी मास्तर होच ग असा गोड सल्ला देयीन मी तिला

    उत्तर द्याहटवा
  3. खुप उत्तम लेख आहे ! सर पालकांनी अवश्य वाचावा असा लेख आहे. धन्यवाद भाऊ !

    उत्तर द्याहटवा
  4. ज्या विषयाची गरज होती त्याला हात घातल्याबद्दल धन्यवाद..

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान , लहान मुलांना त्यांच्या न कळत अभ्यासाची गोडी लावण्यासाठी योजलेली मस्त युक्ती खूपच भावली.

    उत्तर द्याहटवा