२८ जुनच्या उटतपासणीमध्ये मी मुद्दामच सकाळ व पुढारी दैनिकातील मुळ बातम्या शब्दश: वाचकांसमोर (भाग ३०९ मध्ये) मांडल्या आहेत. त्यांची तुलना केली तरी त्यात कितीतरी विसंगती आढळतात. नुसत्या विसंगती बाजूला ठेवा. त्यातले परस्पर विरोधी दावे थक्क करून सोडणारे आहेत. कारण पुढारीच्या बातमीत कुठेही सुरक्षा रक्षकाने आग लागली असा इशारा दिल्याचा उल्लेख नाही. पण सकाळच्या बातमीत मात्र तसा उल्लेख आहे. जो देशमुखांच्या पुढारीमधल्या कथनात अजिबात नाही. दोन्हीकडल्या बातम्यात देशमुख यांचा सहभाग आहे. मग ही तफ़ावत कशी? पुढारीत ते म्हणतात, अजितदादा बैठकीसाठी आले व त्यांना धुराचा वास आला, म्हणून ते सचिवांच्या दालनात बसायला निघून गेले. पण सका्ळच्या बातमीत मात्र "अजित पवार बरोबर 2.45 वाजता बैठकीच्या दालनात दाखल झाले आणि तेवढ्यातच सुरक्षा रक्षकाने आग लागल्याचा निरोप देत बाहेर पडा... बाहेर पडा... असा आवाज दिला", असा उल्लेख आहे. मग धुरामुळे देशमुख यांना ऐकू येत नव्हते की दिसत नव्हते? ते दादांनी ऐकले व ते सरळ कक्षातुन बाहेर पडले व मुख्य दरवाजाच्या जिन्याकडे गेले असे सकाळची बातमी म्हणते. मग यात खोटे कोण बोलतो आहे? देशमुख व अन्य जनसंपर्क अधिकारी यांच्यात इतकी तफ़ावत कशी? की देशमुख अजितदादांचे कौतुक करताना त्यांनाच खोटे पाडण्यासाठी पुढारीतले फ़ार्सिकल निवेदन लिहितात?
पुढारीतील बातमी म्हणते दादांना धुराचा वास आला म्हणुन ते समिती कक्षातून सचिवांच्या दालनाकडे बसायला गेले. तर सकाळची बातमी म्हणते सुरक्षा रक्षकाने आग लागल्याची सुचना नव्हेतर "आवाज दिला". आता आवाज देणे म्हणजे ओरडणे असते ना? मग तो आवाज तिथेच थांबणार्यांना का ऐकू आला नाही? की त्यावेळी तिथे दादा सोडून उरलेले सगळेच बहिरे झाले होते? आणि ऐकू आलाच नसेल तर ते आता वृत्तपत्रात बातम्या देतांना "आवाज दिला" हे कशाच्या आधारे सांगत आहेत? अजितदादांना फ़क्त सुरक्षा रक्षकांनेच आवाज दिला नाही. त्यानंतर, "आग लागल्याचे कळताच अजित पवार यांचे खासगी सचिव विजय पाटील यांनी बाहेर पडा, अशी विनंती केली. दादा उठले, बाहेर पडले" असे सकाळची बातमी म्हणते. म्हणजेच दादांना दोनदा आगीची सुचना मिळाली होती. त्यांनाच नव्हेतर त्यांनी बैठकीला बोलावलेल्या बहुतेकांना ती सुचना लगेच मिळाली होती. मग ही मंडळी तिथे धुरात काय करायला थांबली होती? की तिथेच थांबा व आपले पुढले आदेश मिळेपर्यंत जागचे हलू नका, असा दम त्यांना दादांनी भरला होता? जे नंतर सहाव्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारायचा विचार करतात, तेच लोक आधी आगीची सुचना मिळाल्यावर समिती कक्षात थांबतातच कशाला? अजितदादांनी बाहेर पडा, निघा असे आदेश दिल्यावरही त्यांनी त्या आगडोंबात थांबावेच कशाला? की अजितदादा अग्नीशमन दलाची शिडी आपल्यासाठी पाठवतात की नाही, याची "अग्नीपरिक्षा" घ्यायला हे सर्व जनसंपर्क अधिकारी मुद्दाम तिथेच थांबून राहिले होते?
अर्थात पुढारीच्या बातमीबद्दल देशमुख यांना जाब विचारता येईल. पण सकाळची बातमी त्याच वृत्तपत्राच्या कुणा वार्ताहराने लिहिली आहे. मिस्कीन असे त्याचे नाव आहे. समोरच्यांनी सांगितले तसेच त्याने लिहून काढले असेल, तर त्याला महाराष्ट्राचा मु्ख्यमंत्रीच बनवायला हरकत नसावी. कारण आयोगासमोर साक्ष देताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी, न वाचता व विचारही न करता सह्या करायची कुवत, ही महाराष्ट्राच्या मुखयमंत्र्यासाठी नवी पात्रता असल्याचे अलिकडेच सिद्ध केले आहे. त्यामुळे सकाळ दैनिकातला हा जो कोणी मिस्कीन नावाचा रिपोर्टर आहे, त्याला त्या दैनिकाने तिथेच कुजवत ठेवू नये. त्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवावे. कारण थोडेही डोके न वापरता त्याने आगीत फ़सलेल्या जनसंपर्क अधिकार्यांची ही थरारकथा बेधडक छापून टाकली आहे. त्यातला खरेखोटेपणा. विरोधाभास वा विसंगतींची छाननी करावी असे त्याला सुचले नाही. होलीवुडमध्ये सुपरमॅन, स्पायडारमॅन बॅटमॅन अशा अभूतपुर्व कृती करणार्या नायकांवर चित्रपट निघाले आहेत. त्यांचे लेखक पटकथाकार कोण मला ठाऊक नाही. पण उद्या बॉलिवुडने असा कोणी चमत्कारी पुरूष रंगवायचा निर्णय घेतला, तर त्याचे कथानक हा सकाळचा रिपोर्टरच लिहिणार याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण त्याला अजितदादांच्या रुपाने साक्षात सुपरमॅन सापडला आहे. सकाळच्या त्या बातमीत त्याने अजितदादांच्या सुपरमॅनसारख्या विक्रम पराक्रमाचे वृत्त दिले आहे. तो काय लिहितो वाचा,
"अजित पवार यांचे खासगी सचिव साजणीकर देशमुख, सुरेश जाधव यांची दादांनी सोबत घेत जिन्याकडे धाव घेतली. धुरांच्या लोटामुळे काहीही दिसत नव्हते. अधिकार्यांनी मोबाईलच्या प्रकाशात बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दादांनी जिना गाठला आणि तळमजल्याच्या दिशेने धावत सुटले. सहाव्या मजल्यावरून खाली उतरताना आगीची भीषणता त्यांना जाणवली. काही तरी भयानक असल्याची जाणीव त्यांना झाली; मात्र केवळ एका मिनिटाच्या आत त्यांनी जिन्यातून तळमजला गाठला."
इथे शेवटचे शब्द व वाक्य बारकाईने वाचा. "मात्र केवळ एका मिनिटाच्या आत त्यांनी (अजितदादांनी) जिन्यातून तळमजला गाठला." आता बोला? दादा होते कितव्या मजल्यावर? सहाव्या मजल्यावर ना? म्हणजे सहा मजल्यांचे जिने दादांनी एका मिनीटात पार केले असे मिस्कीन याला म्हणायचे आहे. मंत्रालयाचे मजले साधारण बारा चौदा फ़ुट उंचीचे आहेत. म्हणजेच सहावा मजला किमान ७५-८० फ़ूट उंचीवर आहे. त्याच्या पायर्या किमान दिडशेहून अधिक होतात. एका मिनीटात त्या उतरायचे, तर दर सेकंदाला अडिच तीन पायर्या उतरण्याचा वेग हवा. आणि अजितदादांकडे तेवढा वेग असेल तर मंत्रालयातले उदवाहन त्यांना लागतेच कशाला? (बॉलिवुडने उद्या तसा चित्रपट काढलाच तर त्याला बब्रुवाहन असे नाव द्यावे) इतक्या उंचीवरून थेट खाली उडी मारली तरी एका मिनीटात तळमजला गाठणे सामान्य माणसाला अशक्य आहे. पण अजितदादा काय सामान्य असामी आहे? देशमुखांच्या भाषेत दादांमध्ये कार्यकर्ता जागा असला, मग ते काहीही अगम्य, अतर्क्य करू शकतात. त्यांना सहा मजल्यांचे जिनेच कशाला, न्युयॉर्कच्या जागतिक व्यापार केंद्राच्या शंभराव्या मजल्यावर नेऊन ठेवले असते, तरी दादा एका मिनीटात तळमजल्यावर अवतीर्ण झाले असते. एका उपमुख्यमंत्र्याचा दबदबा किती असू शकतो, याचा हा पुरावा आहे ना? तेवढ्यावर ही रम्यकथा संपत नाही. मिस्कीन पुढे काय लिहितात वाचा,
"पाचव्या मजल्यावर सुरू असलेला हा जीवघेणा थरार अजित पवार यांच्यासह सर्व जण पाहत होते. दादा फायर ब्रिगेडला बोलावण्याचे आदेश देत होते. शिडी शोधा, असे सांगत होते. मदतीसाठी स्वत: धावत होते."
पुढारीत देशमुख सांगतात, दादा अग्नीशमन दलाच्या अधिकार्यांना काम वेगात करण्यासाठी दम देत होते. तर मिस्कीन लिहितो, दादा अग्नीशमन दलाला बोलावण्याचे आदेश देत होते. शिडी शोधायला सांगत होते. म्हणजेच अग्नीशमन दलाचा तोवर पत्ता नव्हता आणि शिडीचाही पत्ता नव्हता. पण जे लोक तिथे नव्हतेच, त्यांना दादा कामाचा वेग वाढवायला दम भरत असल्याचे, पाचव्या मजल्यावरून संजय देशमुखांना साफ़ दिसत होते. याला दिव्यदृष्टी नाही तर काय म्हणायचे? जी शिडी शोधायला दादा सांगत होते त्या शिडीची गाडी आत आणण्यासाठी दम दादा देतांना देशमुख बघू शकतात, ऐकू शकतात हे दैवी शक्तीशिवाय शक्य आहे काय? सामान्य जनता किंवा वृत्तपत्राचा वाचक मुर्ख व बुद्दू असल्याचा भयंकर आत्मविश्वास असल्याखेरीज अशी विधाने कोणी करू शकतो काय? असे पत्रकार व असे मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी असल्यावर, तुमचे आमचे काय व्हायचे? आणखी एक मजा वाचा,
"विशाल ढगे आणि संजय देशमुख हे अजितदादांचे जनसंपर्क अधिकारी मृत्यूच्या दाढेतून परतल्यावर भावविवश होऊन सांगत होते. दोन मिनिटे थांबण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला असता, तर तेही अशाच प्रकारे अडकले असते, असे सांगताना या दोन्ही अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले होते."
दोन मिनीटे थांबण्याचा निर्णय दादांनी घेतला नाही, तर लगेच निसटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मग तोच निर्णय त्यांनी आपल्याकडे बैठकीला आलेल्या जनसंपर्क अधिकार्यांवर का लादला नाही? इतर प्रत्येकाला दम देणारे. कामाला जुंपणारे व आदेश देणारे अजितदादा; आगीतून सुटताना सहकार्यांना आदेश का देत नाहीत. दम का भरत नाहीत? जे अग्नीशमन दलाचे अधिकारी त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत, त्यांना दम देणार्या दादांना सहाव्या मजल्यावर असताना आपल्याच नेहमीच्या अधिकार्यांना जीव वाचवण्यासाठी निर्णय घेता येत नसेल, तर दम भरून खाली पिटाळने अशक्य होते का? पण दादांनी तिथेच तेवढे काम केले नाही. त्यांना तसेच आगीच्या जबड्यात सोडून, स्वत:चा जीव वाचवण्याचा निर्णय "दोन मिनीटे" आधी घेतला. पण तो सहकार्यांना कळू दिला नाही. समजू दिला नाही किंवा त्यांच्या भल्याचा असूनही त्यांच्यावर लादला नाही. हीच या दोन्ही बातम्यातील वस्तुस्थिती नाही काय? ( क्रमश:)
भाग ( ३१३ ) २/७/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा