मंगळवार, १ मे, २०१२

गजानन घोटेकर टाहो फ़ोडून काय सांगतोय?




  "माझा ट्रॅक्टर जुना होता. त्याच्यासाठी रिपेरिंगला खूप खर्च आला. माझं खातं थकीत झालं, सोनंनाणं विकलं गेलं. मी कर्जबाजारी झालो, माझं ग्रामिण बँकेचं पीककर्ज थकीत झालं. मी बेजार झाल्याने आत्महत्या करत आहे. माझ्या मुलीचे लग्न मी करू शकलो नाही. माझ्या कुटुंबाला वाचवा. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नका व माझ्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका. ते देशाला बरबाद करतील."

   एप्रिलच्या उत्तरार्धात विदर्भाच्या दोन जिल्ह्यात तीन शेतकर्‍यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्या. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. त्यापैकीच एक शेतकरी गजानन घोटेकर याने मरण्यापुर्वी लिहिलेले हे पत्र आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापुर तालुक्यात कोठोडा नावाचे गाव आहे. घोटेकर त्याच गावचा रहिवासी. त्याने आत्महत्या करण्यापुर्वी असे पत्र का लिहून ठेवावे? सर्वसाधारणपणे आत्महत्या करणारी माणसे आपली वेदना व जीवाला कंटाळल्याची कारणे लिहून ठेवत असतात. दुसरीकडे अशा पत्राला मृत्यूपुर्व जबानी असेही म्हटले जाते. मरताना माणुस खोटे बोलत नाही असे गृहीत असल्याने, अशा जबाबाला (conclusive evidence) निर्णायक पुरावाही म्हटले जाते. आत्महत्या करण्यापुर्वी असे पत्र लिहिणार्‍या गजाननला कायद्याचे इतके ज्ञान असेल असे वाटत नाही. पण त्याने मोजक्या शब्दात जगायला धडपडणार्‍या आपल्या शेतकरी बांधवांना इशारा देण्याचा शेवटचा प्रयास त्यातून केला आहे. अर्थात त्याने आज दिसणारे सत्य त्यात कथन केले आहे. आज दहाबारा वर्षे राज्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची महाराष्ट्रात संयुक्त सत्ता आहे. त्यामुळेच त्याने आपल्या दुर्दशेला त्याच पक्षांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या जागी शिवसेना भाजपा युतीचे सरकार असते तर त्याने हेच शब्द त्यांच्यासाठी लिहिले असते. मग त्याच्या या पत्राचा अर्थ काय लावायचा? कसा लावायचा?

   त्याने आपल्या मृत्य़ुसाठी दोन सत्ताधारी पक्षांना जबाबदार धरून त्यांच्यासाठी शापवाणी उच्चारली आहे. मग त्याचे भांडवल शिवसेना व भाजपा करणार हे उघड आहे. पण म्हणून या गजानन घोटेकरला आपण कॉग्रेस विरोधी राजकारण करणारा म्हणायचे काय? त्याच्या पत्रातले शेवटचे शब्द काय आहेत?  "काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नका व माझ्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका. ते देशाला बरबाद करतील."  म्हणजे तो सरळसरळ कॉग्रेस  व राष्ट्रवादी यांना निवडणुकीत पराभूत करा असेच सांगतो आहे. याचा अर्थ तो भाजपा शिवसेनेला मदत करतो, असा लावायचा काय? त्याने शिवसेना भाजपा युतीला निवडणूक जिंकणे सोपे व्हावे, म्हणून आत्महत्या केली असा अर्थ लावायचा काय? त्याने तर उघडउघड सत्ताधारी आघाडी पक्षाच्या विरोधात आवाहन केले आहे. अर्थात तुम्ही राजकीय विश्लेषक नसाल वा संपादक जाणकार व सेक्युलर विचारवंत नसाल, तर तुम्ही त्याला राजकारण खेळतो असे म्हणणार नाही. पण थोडा वेळ विसरून जा, की तुम्ही सामान्य नागरिक आहात आणि त्याऐवजी एखाद्या वाहिनीवरचे सेक्युलर जाणकार ज्येष्ठ पत्रकार आहात असे समजून, त्या घोटेकरच्या त्याच आवाहनाचा अर्थ लावून बघा.

   तुम्हाला चटकन सांगता येणार नाही, याची मला जाणीव आहे. कारण तुम्ही व्यावसायिक पत्रकार नाही. तेव्हा तुम्हाला उत्तर शोधणे सोपे व्हावे म्हणून मी एक अलिकडचा संदर्भ देतो. नुकत्याच काही राज्यांच्या विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्या होण्यापुर्वी अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयक अडवून बसलेल्या केंद्रातील कॉग्रेसप्रणित युपीए सरकारच्या विरोधात निवडणूक प्रचार करणार असे नुसते जाहिर केले होते. त्यांच्यावर काय आरोप झाले होते? माध्यमांनी त्यालाच अण्णा राजकारण खेळतात असे म्हटले होते ना? अण्णा भाजपाच्या मदतीसाठी वा फ़ायद्यासाठी कॉग्रेसविरुद्ध प्रचार करतात असाच कल्लोळ केला होता ना? मग त्यापेक्षा हा घोटेकर काय वेगळे करतो आहे? जनलोकपाल अडवणार्‍या कॉग्रेस विरुद्धचा प्रचार म्हणजे भाजपासाठीचे अण्णा हजारे यांचे राजकरण असेल, तर गजानन घोटेकर अशी कॉग्रेस राष्ट्रवादीला मतदान करू नका सांगणारे पत्र लिहून आत्महत्या करतो, हे सुद्धा राजकारणच नाही काय? याला शेतकर्‍याची आत्महत्या किंवा शोकांतिका कसे म्हणता येईल?

   गजानन घोटेकर याच्या आत्महत्येचे कारणही तपासण्यासारखे आहे. कारण त्याची सर्व कैफ़ियत नेमकी अण्णांसारखीच आहे. गेल्या वर्षी निर्यातबंदीमुळे कापसाच्या किमती अचानक ढासळल्यामुळे, कापूस उत्पादकांना झालेल्या नुकसानापोटी दोन हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा राज्य सरकारने डिसेंबर २०११मध्ये केली होती. मात्र, त्याला चार महिने लोटल्यानंतरही मदत मिळाली नाही. कठोर लोकपाल विधेयकाची आश्वासने देऊन सरकारने अण्णांच्या तोंडाला पाने पुसली. तर घोटेकरसारख्या हजारो लाखो शेतकर्‍यांना भरपाईचे आश्वासन देऊन त्यांच्याही तोंडाला प्रत्यक्षात पानेच पुसण्यात आली. त्यामुळेच त्याने सत्ताधारी पक्षाला दोषी मानले आहे व त्याच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अण्णांची कथा वेगळी आहे काय? त्यांनीही तशाच परिस्थितीत सत्ताधारी म्हणून कॉग्रेस विरोधी पवित्रा घेतला होता. पण त्याला भाजपासाठी प्रचार ठरवण्यात आले. मग घोटेकर सुद्धा भाजपासाठीच आत्महत्या करतो म्हणायला नको का? दुसरा काही अर्थ निघतो का?  

   अण्णा हजारे जनलोकपाल आणले नाही तर कॉग्रेस विरुद्ध प्रचार करणार म्हणतात, तेव्हा त्यामागची तळमळ, चिड नेमकी त्या गजानन घोटेकर सारखीच असते. जर त्यात कोणी शहाणा राजकारण शोधत असेल, तर त्याला घोटेकरच्या आत्महत्येमध्येही तेच राजकारण मिळायला हवे. बातम्या, त्यांचे विश्लेषण व त्यावरील चर्चा; यातून आपली किती व कशी दिशाभूल चालू असते, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यातून खर्‍या समस्या व प्रश्नांना कशी बगल दिली जात असते, ते लक्षात घेतले, तर इतक्या प्रचंड प्रमाणात माध्यमात का पैसा गुंतवण्यात आला आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. दाखवायचे की आपण लोकांचे प्रबोधन करतो, पण प्रत्यक्षात मात्र लोकांची दिशाभूल करण्यासाठीच माध्यमे आजकाल राबत असतात, त्याचा पुरावा देण्यासाठीच गजानन घोटेकर हा एक गरीब शेतकरी शहीद झाला आहे. आपण त्याचे हौतात्म्य समजून घेणार आहोत काय? त्याला जेवढा राजकारणात रस नाही तेवढाच अण्णा व त्यांच्या सहकार्‍यांना कुठल्या सत्ता राजकारणात रस नाही. पण आपल्यासमोर असे चित्र उभे केले जात असते, की लोकपालसाठी चाललेले आंदोलन हे एकूणच राजकारण आहे. आपण हे पचवले तर उद्या घोटेकर सारख्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यासुद्धा भाजपाने वा कॉग्रेस विरोधकांनी सरकारला बदनाम करण्यासाथी चालवलेले नाट्क आहे, असे सांगण्यापर्यंत माध्यमांची मजल जाणार आहे.

   एक खोटे पचले मग दुसरे खोटे बोलायची सवय लागणे हा मानवी स्वभा्वच असतो. जेव्हा खोटे उघडपणे बोलले जाते व विरोध होत नाही, तेव्हा अधिकच मोठे खोटे सांगायची हिंमत वाढत असते. कांदा उत्पादक असो, दूध उत्पादक असो, ऊस उत्पादक असो किंवा मुंबईतला गिरणीकामगार वा दुष्काळी भागातला उध्वस्त गावकरी असो, त्याची राजरोस फ़सवणूक करण्यासाठी आज माध्यमे अहोरात्र राबत आहेत. खर्‍या सम्स्या, प्रश्न, अडचणी यावरून त्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी माध्यमांचा सर्रास वापर होत असतो. म्हणून तर अण्णा वा रामदेव यांच्या विरोधात एकही पुरावा नसताना त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याप्रमाणे वाहिन्यावरच्या चर्चेत वा अग्रलेखातून जाब विचारला जात असतो. त्यातून शेतकरी, गिरणीकामगार, कर्जबाजारी, दुष्काळग्रस्त यांच्या खर्‍या दुखण्याला झाकण्याचा आटापिटा चाललेला असतो. शेतमालाला पुरेसा भाव न मिळणे, शेतकरी दिवाळखोर होणे, गिरणीकामगार देशोधडीला लागणे, गावोगावी दुष्काळाची परिस्तिती निर्माण होणे; या सर्वाना मूळात भ्रष्टाचारच कारणीभूत आहे. तो करतात त्यांना वाचवायचे असेल तर लोकांचे लक्ष त्याकडून दुसरीकडे वळवणे भाग आहे ना? आजवर कोणी घोटेकर प्रमाणे असा थेट सत्ताधारी पक्षावर आपल्या आत्महत्या पत्रातून आरोप केला नव्हता. मग त्यावर विरोधी पक्षांनी आवाज उठवला, तर आत्महत्येचे राजकारण केल्याचा आक्षेप विरोधकांवर कोण घेत होते? माध्यमेच घेत होती ना? त्यांच्या खोटेपणाचा मुखवटा या घोटेकरने आपल्या लेखी आत्महत्या पत्राने टरटरा फ़ाडला आहे. अण्णा असोत, की विरोधी पक्ष असोत, त्यांनी कर्जबाजारी शेतकर्‍याच्या आत्महत्यांबद्द्ल आवाज उठवताना राजकारण केलेले नव्हते. तर तसा आरोप विरोधकांवर करणार्‍या माध्यमांनीच राजकारण करून यातल्या खर्‍या आरोपी गुहेगार सत्ताधार्‍यांना आजवर पाठीशी घातले, असे घोटेकर प्राण सोडताना सांगतो आहे. कोणाचे कान उघडे आहेत काय त्याचा टाहो ऐकायला?   (क्रमश:)
भाग  ( २४८ )   २७/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा