बुधवार, ३० मे, २०१२

आमिरखानचा असर कुठवर झाला आहे?


   स्त्रीभृणूहत्येचे आकडे किंवा बालक शोषणाची टक्केवारी बघून ऐकून आपण खुप अस्वस्थ झालो आहोत काय? हे आपण म्हणजे तरी कोण आहे? वाहिन्या व वृत्तपत्राच्या वातानुकुलीत कचेर्‍यांमध्ये बसणारे, संध्याकाळी बाहेर हॉटेलात जेवायला जाऊन दोनचार हजार रुपये सहज खर्च करणारेच आहोत ना? त्यांची एकू्ण टक्केवारी भारतीय लोकसंख्येच्या प्रमाणात किती आहे? एका आकडेवारीनुसार आमिरच्या त्या खुप गाजत असलेल्या कार्यक्रमाला ३.४ इतकी टीआरपी मिळाली म्हणे. त्याचा नेमका अर्थ मला ठाऊक नाही. पण आजवर यातला मोठा विक्रम अमिताभच्या केबीसीचा आहे. त्याला १९ हुन अधिक टीआरपी मिळाली होती. म्हणजेच तुलनेने आमिरच्या कार्यक्रमाचा प्रेक्षक खुपच मर्यादित आहे. पण तरीही त्याने संपुर्ण देशात खळबळ उडवून दिली, असे सांगितले जात आहे. मग हा संपुर्ण देश नेमका किती लोकसंख्येचा व कुठे आहे असा प्रश्न पडतो. कुठल्याही बाजूने हिशोब केला तरी देशातल्या पाच टक्के लोकांनी आमिरचा कार्यक्रम बघितला असण्याची शक्यता नाही. मग अवघा देश हादरून गेला, गहिवरून गेला; ही भाषा फ़सवी नाही काय? की ज्यांच्या हाती माध्यमे आहेत ते म्हणतील तो देश असतो. त्यांचा प्रभाव जिथेपर्यंत पडतो तेवढाच देश असतो काय? उरलेल्या देशाला किंवा लोकसंख्येला हे माध्यमवाले देशच मानत नाहीत काय? त्या उर्वरित देशातली लोकसंख्या ९० टक्क्यांच्या पुढे जाणारी आहे. त्यांची दखल कोणी घ्यायची? त्यांच्या भावना, संवेदना यांना काहीच मोल नाही काय?

   इथून अन्यायाला सुरूवात होत असते. देश वा देशाच्या भावना म्हणजे मुठभर लोकांची टोळी, असेच आजचे समिकरण झाले आहे. बाकी करोडो लोकांना, भारतीयांना काय वाटते याची दखलसुद्धा घ्यायची कोणाला गरज वाटत नाही. आणि हे मी बिनबुडाचे मतप्रदर्शन करत नाही. याच दरम्यान युपीए सरकारने तीन वर्षाची मुदत पुर्ण केली. त्यासाठी काही वाहिन्या व माध्यमांनी मतचाचण्या घेतल्या. त्यात आताच निवडणूका झाल्या तर कोणाला मतदान करणार व पंतप्रधान म्हणून कोण आवडेल; असे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातली उत्तरे चर्चा रंगवणार्‍यांना आवडणारी नव्हती, म्हणुन त्यावर प्रतिकुल चर्चा रंगवण्यात आल्या. सर्वात लोकप्रिय पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी व सर्वात अधिक प्राधान्य भाजपाला मिळणार म्हटल्यावर, चर्चा रंगवणारे विचलित झाले होते. तिथे त्यांची भूमिका स्पष्ट होते. ज्यात खरोखर लोकमताचे प्रतिबिंब पडते, त्याला किंमत नाही. पण जिथे या मुठभरांच्या इच्छांचे समाधान होते, त्याला ते देशाचे मत ठरवू बघतात. त्याप्रमाणेच त्यांनी आमिरच्या कार्यक्रमाने देश हेलावून गेल्याचा जावईशोध लावला. पण प्रत्यक्षात देशातल्या नव्वद टक्क्याहुन अधिक लोकांनी आमिरचा कार्यक्रम बघितला सुद्धा नसेल. मुद्दा इतकाच की अशा विषयात मन हेलावून जायला आमिर हवाच कशाला? आपण उघड्या डोळ्यांनी व कानांनी जगात वावरत असलो, तर यापेक्षा भयंकर गोष्टी आपल्याला दिसू शकतात.  

   बालक शोषणाचाच विषय घ्या. त्यातला लैंगिक शोषणाची गोष्ट बाजूला ठेवा. बालमजूर कुठे नसतो? जेव्हा कुणी एनजीओ अशा मजुरांची सुटका करते, तेव्हाच वाहिनांच्या कॅमेरावाल्याना ती बालके दिसतात काय? तेच कुठे बातमीच्या मागे भरकटत असताना टपरीवर चहा घेतात, भाजीपाव, वडापाव खातात, तिथे भांडी घासणारे, चहा देणारे मजूर काय वयाचे असतात? ते यांना दिसत नाहीत काय? की ते दाखवायला आमिरनेच पुढाकार घ्यायला हवा? हुंडाबळी, हुंड्यासाठी छळ, स्त्रीगर्भाची भृणूहत्या, असे विषय खरेच चर्चेत रंगलेल्यांना कधीच ठाऊक नव्हते काय? पण तिकडे संवेदनापुर्वक बघायची नजरच हे लोक हरवून बसले आहेत. जो बधीरपणा त्यांनी माध्यमातून समाजाच्या अंगी बाणवायचा उद्योग चालवला आहे, तो त्यांच्याही अंगी चांगला रुजला आहे. म्हणूनच समोर अन्याय, अत्याचार दिसतो, पण तो बघायची नजरच आपण हरवून बसलो आहोत. कुठलाही अन्याय, अत्याचार, हिंसा, रक्तपात, छळवाद, पिडा बघून निष्क्रिय बसणे म्हणजे उत्तम नागरिक; ही शिकवण कोणी दिली व समाजाच्या अंगी बाणवली? समाजाचे असे बधीरीकरण कोणी केले? किंबहूना अन्याय अत्याचाराचे उदात्तीकरण कोणी केले आहे?

   संवेदना म्हणजे जाणिव. जाणीव म्हणजे जिवंतपणा. जे जाणवले त्यावर प्रतिक्रिया देणे, ही जिवंतपणाची खुण असते. जेव्हा कोणी एका मुलीवर बलात्कार होताना बघतो व त्यातुन तिला सोडवायला पुढे धाव घेतो, त्याला संवेदनाशील म्हणतात. जो बलात्कार होऊ देतो आणि नंतर तक्रार करायला जातो, त्याला संवेदनाशील म्हणता येईल काय? जो अन्याय, अत्याचार बघत बसतो आणि नंतर त्यावर पांडित्य सांगतो, तो काय कामाचा? सांगलीच्या रस्त्यावर भरदिवसा अमृता देशपांडे नावाच्या तरूणीवर एका गुंडाने चाकूने हल्ला चढवला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली, तरी कोणी त्या हल्लेखोराला रोखायला पुढे सरसावले नाही. मुंबईत बॉम्बे सेंट्रल भागात विद्या पट्वर्धन नामक एका तरूणीवर रॉकेल ओतून तिला पेटवून देणारा, आरामात जमावा समोरून निघून गेला. कोणी त्याला का अडवू शकले नाही? उल्हासनगरच्या परिक्षाकेंद्रात रिंकू पाटिल नामक मुलीवर वर्गातच रॉकेल ओतून पेटवण्यात आले, तेव्हा तिथले शिक्षक, पोलिस पळून गेले. हे का होऊ शकते? आपल्या म्हणजे समाजाच्या व नागरिकांच्या संवेदना बोथटल्याच्या त्या खुणा व लक्षणे नाहीत काय? एकदोन गुंड गुन्हेगार राजरोस कुणाला असे मारू, जाळू शकतात, कारण आजचा समाज हतबल झाला आहे. तो अन्याय निमुटपणे बघतो, पण प्रतिकार करणार नाही, याची खात्री आहे आणि तेच अशा अन्याय अत्याचार करणार्‍यांचे बळ झाले आहे. कुठून आला हा बधीरपणा? आपण चिडणे, रागावणे, प्रक्षुब्ध होणे, संतापुन जाणेच विसरून गेलो आहोत. पर्यायाने आपल्यातला सामुदायिक पुरूषार्थच निद्रिस्त झाला आहे. अगतिकता आपला स्वभावधर्म झाला आहे. किंबहूना त्यालाच आजकाल सुसंस्कृतपणा म्हणून गौरवले जात असते. षंढपणाला आजकाल शौर्य म्हटले जाते, त्याचे हे परिणाम आहेत.

   आठवते तुम्हाला पावणे चार वर्षापुर्वी मुंबईत कराचीहून एक हल्लेखोरांची टोळी आली. त्यांनी सरसकट माणसे मारायचा खेळ केला. दोन दिवस त्यांचा धुमाकुळ चालू होता. तो संपल्यावर जणू काही झालेच नाही अशी मुंबई कामाला लागली. किती कौतुक झाले मुंबईकरांचे त्यासाठी? "मुंबई स्पिरिट" याच शब्दात प्रत्येक वाहिनी त्यासाठी मुंबईकरांचे गुणगान करत होती ना? मुंबईला कसाबच्या टोळीने इतके रक्तबंबाळ केले, इतक्या जखमा दिल्या, तरी मुंबईची तक्रार नव्हती. याला मुंबईची बधीरता म्हणता येईल. पण त्याचे कौतुक झाले. मग जो मुंबईकर स्वत;ची सुरक्षा धोक्यात आल्यावरही प्रतिकाराची भाषा बोलत नसेल, तो कुणा स्त्रीभृणूहत्या, हुंडाबळी वा बालशोषणासाठी कसा पुढे येणार? ज्याला आपल्याच अंगावर होणार्‍या जखमांच्या वेदना कळत नाहीत, भेडसावत नाहीत, तो दुसर्‍या कुणाच्या जखमांसाठी भांडणार कसा व कशाला? जो निरपराधांचे हत्याकांड करतो, तो त्याचा विशेषाधिकार आहे, जो कुणावर अत्याचार करतो तो त्याचा अधिकार आहे आणि होतील ते अन्याय अत्याचार निमुतपणे सोसणे, ही आपली नागरिक म्हणून जबाबदारी आहे, असेच आता लोकांना वाटू लागले आहे. त्यातून ही बधीरता आलेली आहे. लढायची, प्रतिकाराची इच्छा व हिंमत समाज आज गमावून बसला आहे. त्याच्या त्या संवेदना व हिंमतीचे खच्चीकरण कोणी केले? कसाबचे ते पाप नाही. माध्यमांनी जे नपुंसकतेचे कौतुक सातत्याने चालविलेले आहे, त्यातून हे बधीरीकरण झालेले आहे. किंवा त्यांनी पद्धतशीर रितीने ते केलेले आहे.

शिकारी श्वापदाशी लढायची इच्छा व हिंमतच जशी अन्य जनावरे गमावून बसलेली असतात, तशी आज समाजाची अवस्था आहे. समाजाला ज्यांनी असा बनवला तेच त्याला जबाबदार आहेत. जो समाज कसाबच्या टोळीशी दोन हात करण्यापेक्षा जीव वाचवायला पळत सुटतो, त्याच्याकडून लैंगिक शोषण करणारे, हुंडाबळी घेणारे यांचा प्रतिकार कसा होईल? आपला काय संबंध? उगाच कशाला दुसर्‍याच्या भानगडीत पडायचे? ही मनोवृत्ती कुठून आली? समाजाच्या सामुहिक पुरूषार्थाला ज्यांनी खच्ची केले, त्यांनीच ही वेळ आणली ना? रक्तपातानंतर मेणबत्त्या पेटवून समाजाच्या हिंमतीचे खच्चीकरण होत असते. नपूंसकतेला प्रोत्साहन दिले जात असते. त्याचे हे दुष्परिणाम आहेत. याचे एक भयंकर हृदयद्रावक उदाहरण मी उद्या मुद्दाम सांगणार आहे (क्रमश:)
भाग   ( २८१ )  ३१/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा