सत्यमेव जयते या मालिकेच्या पहिल्या भागातच आमिरखान याने स्त्रीभृणुहत्येचा जिव्हारी लागणारा विषय हाताळला. त्यावर खळबळ माजणारच होती. त्यातले आकडे, त्यातले वास्तव मनाला चटके देणारे होते. पण म्हणून तेच एकमेव सत्य होते काय? तेवढ्य़ाने समाज त्यातून बाहेर पडू शकणार आहे काय? त्यासाठी समाजमन खुप संवेदनाशील असावे लागते. रोज चुलीवर भाकर्या भाजणार्या महिलेच्या हाताला चटक्याची इतकी सवय झालेली असते, की एखादेवेळी तिचा हात चुकून तव्याला लागला किंवा जाळाने हात पोळला; तर ती फ़ुंकर घालते आणि पुढली भाकरी थापायला घेते. जणू काही घडलेच नाही, अशा थाटात तिचे काम चालू रहाते. ओठातून सुटलेली चुकचुक किंवा फ़ुंकर यापेक्षा अधिक काही होत नाही. पण तिच्या जागी अननुभवी नवखी महिला किंवा पुरूष असेल तर पुढली भाकरी थापायचे सोडा, आहे तिच भाकरी तव्यावरून उतरली जाणार नाही. ती तशीच जळून जाईल आणि पोळलेल्या हाताचे कौतुक सुरू होईल. हा फ़रक का पडतो? तो फ़रक दोन व्यक्ती वा त्यांच्या अनुभवातला नसतो, तर त्यांच्या सवयी व संवेदनशीलतेचा फ़रक असतो. त्या नियमित भाकर्या भाजणार्या महिलेसाठी हात भाजण्यातल्या वेदनेच्या संवेदना बधीर बोथट होऊन गेलेल्या असतात. तिच्यासाठी ती नेहमीची गोष्ट असते. पण नवख्या व्यक्तीसाठी तो अनुभवच नवा असतो. चटका बसणे व त्याच्या पोळलेल्या वेदना सहन करणे त्याला शक्यच नसते. त्या बाबतीत त्या नवख्याच्या संवेदना तजेलदार जीवंत असतात, तर नेहमी चटके सोसणार्यांच्या संवेदना संपलेल्या असतात. तिथे मग परिणाम बदलत असतो. या कहाण्या सांगताना व सादर करताना आमिरच्या डोळ्यात अश्रू येत होते. तो त्याच्या संवेदना जाग्या असल्याचा पुरावा होता. अनेक बघणार्या व ऐकणार्यांचेही डोळे त्यातून पाणावले. पण बाकी लाखो नव्हे, तर करोडो लोक असे आहेत की त्यांचे डोळे पाणावले नसतील. कारण त्यांच्या अशा बाबतीतल्या संवेदना बोथटलेल्या आहेत. बधीर झालेल्या आहेत. मेलेल्या आहेत. कुठल्या ना कुठल्या बाबतीत आपल्याही भावना व संवेदना अशाच बधीर बोथट झालेल्या असतात. त्या नेहमी भाकरी भाजताना चटके सोसणार्या महिलेसारख्या.
सदा मरे त्याला कोण रडे असे म्हणतात, तशीच समाजाची अवस्था असते. हे असे विषय बाजूला ठेवू आणि जरा अशा विषयावर आमिरच्या अश्रूंनी हळवे झालेल्या अनेक पत्रकार व जाणकार विश्लेषकांच्या संवेदना किती जाग्या आहेत बघू. संवेदना म्हणजे तरी काय असते? काही विपरीत घडले वा बघितले मग मन विस्कटून जाते, अस्वस्थ होते, विचलीत होते, त्याला संवेदनशीलता म्हणतात ना? आपल्याला त्याचे जरा तरी कौतुक आहे काय? स्त्रीभृणूहत्येने आपण म्हणजे समाजाने चिडून उठले पाहिजे, सरकारला जबाब विचारला पाहिजे, अशीच या शहाण्याची अपेक्षा आहे ना? अशा गैरप्रकाराची, अमानुष वर्तनाची चीड, संताप. राग आला पाहिजे, हीच त्यांची अपेक्षा आहे ना? हरकत नाही. पुढे काय? अशी चीड वा राग आला, मग पुढे लोकांनी काय करावे? जे गैर आहे, चुकीचे आहे, अमानुष आहे, ते पाहिल्यावर माणुसकी म्हणून त्यात हस्तक्षेप करावा लागतो. नुसते बघून काही करता येत नाही, तेव्हा ते सतत बघून माणसाच्या संवेदना बोथट व बधीर होऊन जातात. कारण हस्तक्षेप करता येत नाही, करायची सोय नाही. हस्तक्षेप करायचा अधिकारच नाही. कोणी तसे केलेच तर त्याने कायदा हाती घेतला म्हणून बोंबा कोण मारतो? एका बाबतीत माणूस संवेदनाशील व दुसर्या बाबतीत बधीर असू शकत नाही. संवेदना जाग्या असल्या तर माणुस तात्काळ प्रतिक्रिया देत असतो. नाही तर बधीर असतो. नेहमीच्या जीवनात जेव्हा माणूस अन्याय, अत्याचार बघतो आणि इच्छा असूनही काही करू शकत नाही, तेव्हा क्रमाक्रमाने त्याच्यातल्या संवेदना बधीर होत जात असतात. भावना सुकून जात असतात. त्याच्यामध्ये एकप्रकारची अगतिकता येत असते. आज तेच झाले आहे. याचा थांगपत्ता ज्यांना नाही, त्यांचे सत्यमेव जयते बघून डोळे ओलावतात. ज्यांना हेच रोज बघावे लागत असते त्यांच्या भावना, संवेदनाच नव्हेतर डोळ्यातले अश्रूही सुकून गेले आहेत. संवेदनाच मरून गेल्या आहेत.
आज सत्यमेव जयते पाहून ज्यांचे डोळे ओलावले, ज्यांना प्रचंड कळवळा आलेला आहे, त्यापैकी कितीजणांना असे आसपास घडते आहे याचा थांगपत्ता नव्हता? आमिरखानची गोष्ट सोडून द्या. सुपरस्टार म्हणून त्याला लोकांत मिसळण्यास मर्यादा आलेल्या आहेत. पण त्याच्या मुलाखती वाहिन्यांवर घेतात, त्यातले बहूतेक पत्रकार सामान्य माणसातच वावरत असतात ना? त्यांच्या इर्दगिर्द याप्रकारे सोनोग्राफ़ी सेंटर चालतात, तिथे काय चालते हे त्या पत्रकारांना अजिबात ठाऊक नव्हते? कॉग्रेस वा भाजपा नेत्यांच्या ढुंगणाला कायम नाक लावून बसलेल्यांना, आसपास प्रसुतीगृहात चाललेले गर्भपात अजिबात ठाऊक नाहीत? की त्यांच्या यासंबंधीच्या भावनाच बोथटल्या आहेत? कुठयाही सरकारी वा पालिका दवाखाना व रुग्णालयात जाऊन थोडा कानोसा घेतला, तरी विशीतल्या लाखो मुली आजकाल सरसकट गर्भपात करून घेतात, हे तिथला डॉक्टर सांगू शकेल. अगदी शाळकरी, कॉलेजीयन, नोकरी करणार्या शहरी मुली सर्रास हे करत असतात. अर्थात त्या गर्भलिंग तपासणी करून मग गर्भपात करत नाहीत. स्वैर वागण्यातून जे पदरी पडले, त्यापासून मुक्तीसाठी गर्भपात ही आता सोय झाली आहे. विवाहपुर्व, विवाहबाह्य संबंधातून झालेली गर्भधारणा संपवण्याची सोय म्हणूनच त्याकडे बघितले जात असते. मग पुढे वैवाहिक जीवनात नावडता गर्भ काढून टाकण्यात पाप कुठले? ही आजची सर्वसाधारण समजूत आहे. मुळात कुठलाही गर्भ पाडण्याच्या वेदना व त्यातून होणारी महिलेची शारिरीक हानी, याचा विचारच मागे पडला आहे. केस कापावे, नखे काढून टाकावी, तशा पद्धतीने हा उद्योग चालतो. एकूणच गर्भाविषयी समाज संवेदनाशून्य होऊन गेला आहे. स्त्रीभणूहत्या हा त्याचा एक भाग आहे. लिंगचाचणी त्याचे एक अंग आहे. पण स्त्रीच्या शरिराची व आरोग्याची हानी व दुर्दशा याची कोणाला फ़िकीर आहे का? त्या बाबतीत एकूणच बधीरीकरण झाले आहे, खरे तर समाजमनाचे पद्धतशीर बधीरीकरण करण्यात आले आहे.
सततचे चटके बसून हाताला जसा बधीरपणा येतो, तशा स्त्रीच्या मातृत्वाच्या भावनाच बधीर करून टाकण्यात आल्या आहेत त्याचे काय? कोणी तिच्या मनाचा, भावनांचा यात विचार केला आहे काय? नावडते किंवा नकोसे मातृत्व संपवायची सोय कायदेशीर झाली, तिथून या बाबतीत समाजाची संवेदनशीलता बधीर होत गेली. तीनचार दशके मागे जाऊन बघा. जेव्हा गर्भपात कायदेशीर नव्हता किंवा कायदेशीर झाला त्याच्या आसपास, कोणी असे कृत्य केल्यावर उजळमाथ्याने समाजात मिरवत नव्हता. कुणाला कळू देत नव्हता. उघड बोलत नव्हता. अगदी बेकायदा असले तरी असे प्रकार व्हायचे. पण लपूनछपून होत. कुणाला कळू दिले जात नसे. जो करायचा तोही तोंड लपवून वावरत होता. कारण असे करणे पाप आहे किंवा गैर आहे, हीच समाजाची धारणा होती. त्याला पाप समजण्याचा रिवाज होता. त्या समजूतीच्या साखळदंडाने समाज बांधलेला होता. त्यापासून तो समाज मुक्त होत गेला आणि गर्भपात हा रिवाज बनत गेला. आपण फ़क्त स्त्रीभृणूहत्येबद्दल ओरडतो आहोत. पण एकूण किती प्रमाणात गर्भपात होत आहेत, यावर आपण सगळे गप्प आहोत ना? आमिरनेही आवाज उठवला तो मुलींची घटलेली संख्या यापुरताच. पण ज्या मोकाट गर्भपाताने कोवळ्या वयात मुली व तरूणींच्या आरोग्याची नासाडी होते आहे, त्याबद्दल कोणी बोलतो आहे काय? कारण अनावश्यक गर्भापासून मुक्ती हा आता रिवाज झाला आहे. मुलगा हवा म्हणून लिंगचाचणी करून गर्भपात करण्यापुरता आक्षेप आहे काय? ती चाचणी न करता होणार्या गर्भपातामध्ये स्त्रीभृणूहत्या होत असतील त्याचे काय? त्यातही स्त्रीलिंगी गर्भ पाडले जात असतील ना? त्याबद्दल अवाक्षर का नाही? की या तमाम क्रांतीकारकांनी त्याला रिवाज म्हणुन स्विकारले आहे?
सत्यमेव जयते म्हणजे सत्याचाच विजय होतो, असे मला वाटते. पण इथे सत्यकथन तरी झाले आहे काय? संपुर्ण सत्य समोर आले आहे काय? लिंगतपास करून गर्भपात गुन्हा आहे आणि बिनाचाचणी गर्भपात गुन्हा नाही? त्यात स्त्रीलिंगी गर्भ मारला जाणे गुन्हा नाही? गर्भपात म्हणजे स्त्रिच्या आरोग्याची हानी व अपाय आहे, याची वाच्यताच कुठे नाही? ज्यांचा जन्म झालेला नाही त्या स्त्रियांबद्द्ल किती आस्था व काळजी आहे. पण ज्या स्त्रिया अनेक गर्भपाताच्या यमयातना सोसत आहेत, त्यांची कुणाला तरी फ़िकीर आहे काय? की त्याबाबतीत आमची मने हात पोळायची सवय लागलेल्या महिलेसारखी बधीर होऊन गेली आहेत? तिने हातावर फ़ुंकर घालावी आणि पुढली भाकरी थापायला घ्यावी, इतका गर्भपात आता संवेदनाहीन विषय झाला आहे काय? मग ज्यांचे डोळे पाणावले ते सत्य पाहून की अर्धसत्य ऐकून? मग जिंकले कोण सत्य, की अर्धसत्य? (क्रमश:)
भाग ( २८० ) ३०/५/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा