कालचा लेख जेव्हा लिहून संपला, तेव्हा मी थोड्या विश्रांतीसाठी विरंगुळा म्हणून टीव्ही चालू केला. इकडच्या तिकडच्या बातम्या बघत होतो. कुठेच काही विशेष नव्हते. रिमोट वापरून चॅनेल बदलत असताना टाईम्स नाऊ या वाहिनीवर जुन्या चित्रपटासंबंधी काही चालू होते. थोडा रेंगाळलो. जुन्या गाणी किंवा काही तरी सांगत होते. त्यात जुने गाणे लागले म्हणुन ऐकू लागलो. "धुल का फ़ुल" या बी. आर. चोप्राच्या चित्रपटातले ते गीत होते. राजेंद्रकुमार व माला सिन्हा यांच्यावर चित्रीत केलेले. तरूणपणी खुप वेळा ऐकले होते. अगदी आवडते म्हणता येणार नाही, पण बर्यापैकी लक्षात राहिलेले गाणे. "तेरे प्यारका आसरा चाहता हू", असा त्याचा मुखडा आहे. कित्येक वेळा ऐकले आहे. पण त्या दिवशी त्यातल्या एका कडव्याने मला गुंगवून टाकले. एक कवि किती सहजगत्या गुंतागुंतीचे सत्य मोजक्या शब्दात सांगून जातो, त्याची प्रचीती त्यावेळी आली. त्या गाण्यातल्या उत्तरार्धातील माला सिन्हाच्या तोंडची दोन कडवी नवी नाहीत. तब्बल त्रेपन्न वर्षापुर्वीची आहेत. तेवढीच वर्षे ते गाणे मला ऐकून झाली असतील. पण त्यातले बोचणारे सत्य, आज इतक्या वर्षांनी अचानक समोर येऊन उभे राहिले. काही सेकंदातच ते शब्द व गाणे संपून गेले. पण किती तरी वेळ मी त्याच शब्दात व कडव्यात गुरफ़टून गेलो. पुन्हा पुन्हा तेच शब्द गुणगुणत राहिलो.
मुहब्बत की दुष्मन सारी खुदाई
मुहब्बतकी तकदीर मे है जुदाई
जो सुनते नही है दिलो की दुहाई
उन्हीसे मुझे मांगना चाहते हो
बडे नासमझ हो, ये क्या चाहते हो
अण्णा हजारे यांच्या लोकपालापासून आमिरखानच्या सत्यमेव जयतेपर्यंत सगळ्या निमित्ताने चाललेल्या खळबळीचे उत्तर त्या कवीने अर्धशतकापुर्वीचे देऊन ठेवले आहे. मी कितीवेळ ते गाणे ऐकले आहे, लाखो लोकांनी ऐकले आहे. पण तो कवि काय सांगतो त्याकडे आमच्यातल्या कोणीतरी गंभीरपणे कधी बघितले का? काय म्हणायचे आहे, सांगायचे आहे त्या कवीला, या दोन कडव्यातून? अवघ्या आठ ओळी आहेत. पण त्यात केवढे सत्य सामावलेले आहे ना? आपले मन, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, आपल्या अपेक्षा, सगळ्या प्रेमात पडलेल्या प्रियकरासारख्याच असतात ना? जे सहजगत्या मिळणे शक्य नसते, जगाला मान्य होणे शक्य नसते, कदाचित सगळे जग यासाठी आपल्या विरोधात जाऊ शकत असते, पण तरीही आपण त्यासाठी वेडे झालेले असतो. सर्वस्व पणाला लावायला सिद्ध झालेले असतो. जे हवे त्यापासून आपण वंचित असतो, ज्याला कवि जुदाई म्हणतो. जे आपल्याला आवडलेले असते, त्याचे अवघे जग दुष्मन असते. असे जग व त्यातले म्होरके आपल्या इच्छेला कधीच धुप घालत नाहीत. आपल्या आकांक्षा म्हणजे दुहाई त्यांना कवडीमोल वाटते. आणि तरीही आपण त्यांच्याकडूनच अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, मनिषा, मागण्या पुर्ण करून घ्यायला धडफडत असतो. "उन्हीसे मुझे मांगना चाहते हो, बडे नासमझ हो, ये क्या चाहते हो".
आपण कोणाकडून अपेक्षा बाळगत असतो? जे नेहमीच आपल्या आकांक्षा पायदळी तुडवत असतात, त्यांच्याकडूनच ना? शंभर दिवसात महागाई कमी करतो असे आश्वासन तीन वर्षापुर्वी मतदानाच्या वेळी देणार्या कॉग्रेस व मनमोहन सिंग; यांच्याकडून त्याची पुर्तता होणार नाही हे काय आपल्याला ठाऊक नव्हते? स्वातंत्र्योत्तर काळात सहा दशके ज्यांनी सतत अपेक्षाभंग केला व आपल्या आकांक्षा पायदळी तुडवल्या; त्याच कॉग्रेस पक्षाकडून महागाई कमी करण्याची अपेक्षा, ही नासमझी नव्हती का? जे स्वस्ताई देणार नाहीत, त्यांच्याकडूनच तिची मागणी करण्यात शहाणपणा होता काय? आपण किती नासमझ होतो आणि आहोत ना? ज्यांच्या सरकारने इतिहासालाही थक्क करून सोडील इतका भ्रष्टाचार केला. त्यांच्याकडुनच भ्रष्टाचार निपटून काढणार्या लोकपाल कायद्याची मागणी करणे, ही नासमझी नाही काय? कवि तेच तर सांगतो आहे. "जो सुनते नही है दिलो की दुहाई, उन्हीसे मुझे मांगना चाहते हो". अर्थात हे सगळे नंतर सुचलेले शहाणपण आहे. पहिल्यांदा मला धक्का दिला तो शेवटच्या कडव्याने. ज्यात माला सिन्हा जगाची रित आणि रुढीपरंपरांचा हवाला देऊन आपल्या प्रियकराला जागवू पहाते.
गलत सारे दावे गलत सारी कसमे
निभेगी यहॉ कैसी उल्फ़त की रस्मे
यहा जिंदगी है रिवाजो के बसमे
रिवाजो को तुम तोडना चाहते हो
बडे नासमझ हो, ये क्या चाहते हो
प्रेमाच्या गोष्टी व स्वप्ने सांगायला व बोलायला खुप सोपी आहेत. पण जग त्यानुसार चालत नाही. जगाचे व्यवहार रितीरिवाज, रुढीपरंपरांच्या अधीन असतात. प्रेमाच्या आणाभाका एकांतात घ्यायला सोप्या आहेत. पण आपण ज्या जगात रहातो, वास्तव्य करतो, तिथे सर्वकाही रितीभातीच्या मर्यादेतच असावे लागते. त्याच्या बाहेर जाता येत नाही. प्रेम करायला निघालास, म्हणजे तू रिवाज तोडायला निघाला आहेस. तू काय करायला निघाला आहेस ते तरी तुला कळते का, असेच ती त्याला विचारते आहे. प्रेमाने वहावलेल्या प्रियकराला ती जगण्यातले जळजळीत वास्तव सांगते आहे. प्रेम, आणाभाका, शपथा, वादे बोलायला खुप सोपे आहेत. ते पुर्ण करायचे तर अवघ्या जगाशीच लढायला सिद्ध व्हायला हवे; असेच ती सुचवते आहे. आणि ते प्रेमधुंद सख्याला कळत नाही म्हणून त्याला नासमझ ठरवते आहे. जग बदलायला निघालेल्या प्रत्येकासाठी ही गोष्ट खरी आहे. मग तो आंदोलनाने क्रांती घडवू बघणारा कार्यकर्ता असो, की जगाचा विरोध झुगारून प्रेम करणारा प्रियकर असो, की कायद्याचा बडगा उगारून समाज बदलू बघणारा राजकारणी असो. तो नासमझ असतो. कारण जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात वा समाजात वा युगात जा, तिथे जिंदगी म्हणजे समाजजीवन हे रिवाजांमध्ये अडकून पडलेले दिसेल.
रुढीपरंपरा, रितीभाती, प्रथा यांच्या जंजाळात समाज अडकलेला असतो. शेकडो वर्षे जुन्या व अर्थहीन झालेल्या चालीरिती निमुटपणे माणसे अनुसरत असतात. कधी कधी त्या जाचक होऊन जातात. पण त्यात श्रद्धा, समजूती व अभिमान यांचे असे चमत्कारिक मिश्रण जमलेले असते, की वास्तव जीवनाशी त्याची पुर्णपणे फ़ारकत झालेली असते. जे त्याचे अनुसरण करतात, त्यांनाही त्या हास्यास्पद वाटत असतात. पण त्यापासून सुटायची, त्या झुगारण्याची हिंमतच नसते. अमुक एक गोष्ट, कृती, उपचार, विधी का करायचा, त्याचा कार्यकारणभाव विस्मृतीमध्ये गेलेला असतो. पण निमुटपणे त्याचे अनुसरण चालू असते. अर्थहीन, अनाकलनीय, अतर्क्य, कालबाह्य, हास्यास्पद, निरुपयोगी अशा त्या रुढीपरंपराचे आपण गुपचुप अनुकरण करत असतो. कारण त्यांचा पगडा समाजमनावर इतका खोलवर आणि पक्का असतो, की त्यातून बाहेर पडायची इच्छा व हिंमत क्वचितच आढळून येते. मग तिथे संघर्ष सुरू होत असतो. कारण अशा रिवाज, रुढीं पापपुण्याच्या. लाजलज्जेच्या, इज्जत-अब्रूच्या साखळदंडाने सामान्य माणसाला करकचून बांधून ठेवत असतात. त्यापासून समाजाला मुक्त करणे हे सोपे काम नाही. वाहिनीवरल्या पन्नास चर्चा, कुठली संमेलने, परिषदा, विचारप्रवर्तक लेखांच्या मालिका; यातून त्या समजूतींच्या जाडजुड शृंखला तुटत नसतात. कायद्याच्या कुर्हाडीने शेकडो घाव घातले, म्हणून त्या वृक्षाच्या पाळामुळांना अल्पावधीत उखडून टाकता येत नाही. त्यात कित्येक पिढ्या व वर्षे खर्ची पडत असतात. तेव्हा कुठे अशा समजूती व परंपरा मागे पडत जातात, संपू लागतात. पण त्याच कालखंडात नव्या रुढी, परंपरा व रिवाज प्रस्थापित होत असतात. नव्या युगाचे म्हणून आलेले तेच नियम व कायदे लोकांच्या अंगवळणी पडेपर्यंत पुन्हा कालबाह्य होऊन जात असतात. कालचे कायदे व क्रांतीकारी पायंडे आज नव्या पण तितक्याच जाचक रुढीपरंपरा बनत असतात. आणि जग त्याच रिवाजाने चालत असते. मानवी जीवन कायद्याच्या वा सत्तेच्या नव्हे, तर रिवाज, रुढीं व समजूतींच्या नियंत्रणाखाली चालत असते. लोकपाल आंदोलन वा सत्यमेव जयते, ह्या दोन्ही घटना म्हणूनच त्या कसोटीवर तपासून व समजून घ्यायला हव्यात. (क्रमश:)
भाग ( २७९ ) २९/५/१२
भाउ, अफलातून! काही गीतांना अथॆ असतो तो समजून प्रबोधन होईल अश्या भाषेत व्कत होणारे आपले लेख अंजनाप्रती आहेत. खरंच आपल्यात आलेली, व मुरंत चाललेली नासमज आज अनेक संकटांची निमॆितीकेंद्रे बनली आहे. समज असुनही उमज नसलेल्या प्रवाहाला वळणावर आणणारे तुमचे लेख मला तर नवचैतन्य देणारे ठरलेत मनपुवॆक आभार!
उत्तर द्याहटवा