गुरुवार, ३ मे, २०१२

सचिनच्या खासदारकीचे रहस्य काय आहे?


   कशी गंमत आहे बघा. सचिन तेंडूलकर आता खासदार होणार आहे. आजवर अनेक मान्यवर खासदार झाले आहेत. त्यात लता मंगेशकर यांच्यापासून हेमा मालिनी, शबाना आझमीपर्यंत अनेक मान्यवरांचा समावेश होतो. त्याच शबाना आझमीचे पती जावेद अख्तर नंतर राज्यसभेचे सदस्य झाले. राज्यसभेत अशा मान्यवरांना राष्ट्रपती नियुक्त करतात. ज्यांनी समाजजीवनाच्या कुठल्या तरी क्षेत्रात नाव कमावले आहे, खास कामगिरी बजावली आहे, अशा चार लोकांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यांची गणना कुठल्या पक्षाचे सदस्य म्हणून होत नाही. अर्थात त्यांना पक्षात जाण्याची मुभा असते. पण त्यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभवाचा संसदेला लाभ द्यावा, अशी मुळात अपेक्षा आहे. अशा यादीत आता सचिनचा समावेश झाला आहे. त्याच्या सहीत अभिनेत्री रेखा व उद्योगपती अनु आगा यांचाही समावेश आहे. पण त्या इतर नावांवर वादळ उठले नाही. वाद चालू आहे तो एकट्या सचिनच्या नावावरून. तो वाद करावा तरी कोणी? त्याच्या विरोधकांनी वा सत्ताधार्‍यांच्या विरोधकांनी असा वाद केला असता तर समजू शकते. पण मजेची गोष्ट म्हणजे इथे सचिनच्या खास चहात्यांनी वाद उकरून काढला आहे. म्हणजे ही राजकारणातली अत्यंत चमत्कारिक घटना आहे.  

   उदाहरणार्थ, क्रिकेट समिक्षक हर्ष भोगले, द्वारकानाथ संझगिरी, हे सचिनचे कौतुक आपल्या लिखाण वा समालोचनातून करताना कधी दमत नाहीत. जेव्हा सचिन चांगला खेळत नव्हता आणि त्याच्यावर चौफ़ेर टिकेची झोड उठली होती, तेव्हा त्याच्या अपयशावर पांघरूण घालण्यात जे आघाडीवर होते; त्यांनीच आज सचिनच्या खासदारकीवर नाराजी व्यक्त करावी का? क्रीडाक्षेत्राची गोष्ट ठाऊक नाही. पण राजकारणात असे कधीच घडत नाही. ज्याचे वाईट दिवस चालू असतात, त्याचे समर्थक आपल्या लाडक्यावर अशा विपरित प्रसंगीसुद्धा मोठीच निष्ठा दाखवतात. कालपरवाच उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात अहोरात्र वाहिन्यांवरून झळकणार्‍या राहुल गांधींच्या आक्रमक प्रचाराने कॉग्रेसवर नामुष्कीचा पराभव पत्करण्याची वेळ आली. त्या दारूण पराभवाचे खरे व संपुर्ण श्रेय द्यायचेच असेल तर ते राहुललाच द्यावे लागेल. पण त्या प्रसंगी त्यांचे खंदे पाठीराखे दिग्विजय सिंग, सलमान खुर्शीद, तमाम कॉग्रेसजन त्या अपयशाचे "श्रेय" घ्यायला पुढे धावले होते. नुसते अपयश आपले म्हणून ते सांगत नव्हते, तर त्या पराभवातही राहुलच्या यशस्वी प्रचाराचे कौतुकच सांगत होते. पराक्रम तो राहुलचा आणि अपयश ते आमचे पाप; अशीच त्यांची भाषा होती. अशा राजकारणात सचिन आला तर त्याच्या चहात्यांनी खरे तर एव्हाना त्याचे तोंड फ़ाटेस्तोवर कौतुक करायला हवे होते. पण इथे उलटेच काही घडताना दिसते आहे. त्याच्या खास चहात्यांनाच सचिनच्या या राजकीय खेळीने थक्क करून सो्डले आहे. खरे व स्पष्टच सांगायचे तर त्यांना आपल्या लाडक्याने राजकारणात शिरलेले अजिबात आवडलेले नाही, रुचलेले नाही. अशी ही विचित्र परिस्थिती का व्हावी?  

   त्याची व्यक्तीश: ओळख असलेले नुसते हे त्याचे खास चहातेच नव्हे, तर त्याच्यावर ओळख नसताना अपार प्रेम करणारे व त्याच्या अपयशाच्या काळातही त्याच्या चुकांचे समर्थन करणारे, अनंत चहातेही त्याच्या या नव्या खेळीवर नाराज आहेत. सचिनने जाहिरात करावी, त्याने मुंबई मराठी माणसाचीच नव्हे तर सर्व भारतीयांची आहे असे म्हणावे; तरी त्याचे समर्थन करणारे आज त्याच्यावर असे नाराज का आहेत? कुठेतरी काही गडबड आहे. मग त्याचा अंदाज घेत काही निष्कर्ष काढले जात आहेत. त्यात पुन्हा वाहिन्यांवर चर्चा असली मग बघायलाच नको. तिथे मुद्दा सोडून वादळ माजवायचे असल्याने अर्थाचा अनर्थ व्हायचाच. सचिनला भारतरत्न द्यायला नको म्हणून ही पळवाट काढण्यात आली, असाही शोध लावला गेला आहे. जो राजकारणात वा संसदेत खासदार आहे त्याला भारतरत्न देता येत नाही, हे सांगताना तसा दाखला नाही इथपर्यंत मजल मारली गेली. त्यामुळे भारतातली सर्वच रत्ने बहुधा मराठी वाहिन्यावर कार्यरत असावीत, असेच म्हणायला हरकत नसावी. कारण त्यांना आजवर कोणाकोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला, हेच ठाऊक नसल्याचे जाणवले. इंदिरा गांधी यांना तो सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. चार दशकांपुर्वी भारत पाक युद्ध झाले आणि त्यातून बांगला देशची निर्मिती झाली, त्याला बांगला युद्ध म्हणतात. त्यात पाकिस्तानला चारीमुंड्या चित केल्याबद्दल पंतप्रधान असताना इंदिराजींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्या तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या. म्हणजेच संसद सदस्य किंवा खासदारसुद्धा होत्याच ना? मग जो  खासदार आहे त्याला भारतरत्न देता येत नाही हा शोध कोणी कुठून लावला?

   अशी कोणी सरकार वा कॉग्रेसवर सक्ती केलेली नाही, की सचिनला आताच भारतरत्न द्यायलाच हवे. मग ते टाळण्यासाठी सचिनला राज्यसभेत खासदार म्हणून नेमण्याचा विषयच कुठे येतो? तेव्हा भारतरत्न नाकारण्यासाठी त्याला राज्यसभेत पाठवण्याचा जावईशोध हा निव्वळ मुर्खपणा आहे. त्याहीपेक्षा वेगळे काही कारण यामागे असायला हवे. आणि त्याचे उत्तर नेमके शोधायचे असेल तर भलतीकडे भरकटत जाऊन ते मिळणार नाही. त्याच्यासोबत रेखा व अनु आगा यांनाही राष्ट्रपतींनी राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. पण त्यांची नेमणूक व सचिनची नेमणुक यात एक मोठा फ़रक आहे. अन्य दोन व्यक्ती अचानक दिल्ली येथे जाऊन कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना घरी भेटल्याचे वृत्त नाही. सचिनला खासदार होण्यासाठी जे करावे लागले, तेच त्या दोघांना का करावे लागले नाही? की त्यांची नेमणूक करताना त्यांची संमती घेण्याची गरज नव्हती? आणि सचिन हा असा एकमेवाद्वितिय आहे, की त्याची नेमणूक करताना त्याची संमती आधी घ्यावी अशी कायदेशीर तरतूद आहे? हा सर्वात लक्षणीय फ़रक आहे. पण कुठल्याही वाहिनी वा वृत्तपत्रात त्याबद्दल कुठलीही चर्चा झाल्याचे आढळून आले नाही. अनु आगा, रेखा व सचीन समान दर्जाचे राज्यसभा सदस्य असतील तर त्यांच्या नेमणूकीबाबत हा दुजाभाव कशाला? खर्‍या चौकस पत्रकाराला हा प्रश्न पडायला हवा. कारण सचिन १० जनपथ या सोनियांच्या निवासस्थानी गेला आणि लगेच तो खासदार म्हणुन नेमला जात असल्याची बातमी आली. पण त्याप्रमाणे रेखा किंवा आगा तिकडे फ़िरकल्याची कुठलीही बातमी निदान माझ्या तरी वाचनात वा ऐकीवात नाही. की अन्य नेमणूका गृहखाते परस्पर करते आणि सचिनला नेमायचा तर त्यासाठी सोनियांची मंजुरी आवश्यक आहे, असा काही कायदा आहे?

   गफ़लत सगळी तिथेच तर आहे. पण दोन दोन दिवस व दोन दोन तास चर्चा रंगवणार्‍यांनी त्याकडे ढूंकूनही बघितले नाही. कॉग्रेस नेते प्रवक्ते यांना सवालच विचारायचे होते, तर या फ़रकाबद्दल विचारले गेले पाहिजेत. सचिन सोनियांच्या घरी का गेला? बाकी ज्यांची नेमणूक झाली, ते तिकडे का गेले नाहीत? कुठल्या कॉग्रेस नेत्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर आहे काय? कोणी उत्तर दिले आहे काय? सचिनला सन्मानित केले, याच्या अनुभवाची देशाला गरज आहे, त्याच्या दोन शब्दांना लोक मानतात, अशी जुजबी उत्तरे कॉग्रेस प्रवक्ते देत होते. हा सगळा  शुद्ध भंपकपणा होता. राजीव शुक्ला यांच्यासारख्या तोंडपुज्या माणसाने सचिनची थोरवी सांगावी, इतके सचिनचे कर्तृत्व अजून तरी रसातळाला गेलेले नाही. जेव्हा योग्य व नेमके उत्तर हवे असते, तेव्हा चुकीचा प्रश्न विचारू नये असे इंग्रजीत म्हणतात. सचिनच्या खासदारकीबाबत नेमके तेच घडलेले आहे. सगळ्या चर्चा चुकीचे प्रश्न विचारून चालल्या होत्या. मग त्यावरचे योग्य व खरे उत्तर मिळणार कसे? मग योग्य प्रश्न काय होता? किंवा काय असू शकतो?

   आजवर राष्ट्रपतींनी नेमलेल्या कुणाही खासदाराला आधी कॉग्रेस अध्यक्ष वा कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाला त्याच्या घरी जाऊन भेटावे लागलेले नाही; तर सचिन तेंडूलकर यालाच सोनियांच्या निवासस्थानी का जायची पाळी यावी? पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सचिन भेटला असता तर गोष्ट वेगळी होती. पण जो निर्णय पंतप्रधान वा त्यांच्या मंत्रीमंडळात होतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती नामनियुक्त खासदारांची राज्यसभेवर नेमणूक करतात, त्याकरीता सचिनला सोनियांच्या निवासस्थानी १० जनपथ येथे का जावे लागले? हाच योग्य प्रश्न आहे. पण तो कोणी विचारलाच नाही आणि म्हणूनच या विषयावर योग्य व खरे उत्तर कुणालाच मिळू शकलेले नाही. मिळणार पण नाही. कारण ते उघड उत्तर आहे, सर्वांना ठाऊक आहे. पण सत्य कोणाला बोलायचे नाही, ऐकायचे नाही. सांगायचे नाही. मग नुसता घोळच घातला जाणार ना? प्रतिभाताई पाटिल राष्ट्रपती असताना सोनिया सचिनला खासदार करतातच कशा? हा खरा प्रश्न आहे.   (क्रमश:)
भाग  ( २५४ )    ४/५/१२

1 टिप्पणी:

  1. अगदी मुद्देसूद लिहील आहे...... मला वाटत राजीव शुक्ला ने नेमका डाव साधला.... मुंबई ईंडीइन्स ची म्याच दिल्लीत होती...सचिन नेमका दिल्लीत होता... सोनियाजीना सचिनच १०० शतकांसाठी अभिनंदन करायचं आहे अस सांगून त्याने सोनियाची भेट घडून आणली आणि त्याच दिवशी सचिनच राज्यसभे साठी नाव जाहीर करण्यात आल... ह्या भेटीचा कॉंग्रेस ने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि इतर विषयावरून लक्ष हटवण्यासाठी उपयोग करून घेतला... एक प्रकारे सचिन पहिल्यांदाच राजकीय गोलंदाजीत हिट विकेट jhaala.

    उत्तर द्याहटवा