अण्णा हजारे, स्वामी रामदेव, श्री श्री रविशंकर, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, डॉ.अब्दुल कलाम, ही अशी मोजकी नावे आहेत, की त्यांच्याबद्दल भारतीय माणसांच्या मनात एकप्रकारचा आदर व प्रेमभावना वसत असते. त्यांच्यावर कोणी काहीही आरोप करू शकत नाही. त्यांना भाषा, प्रांत, जात वा धर्माच्या मर्यादा लागू होत नाहीत. म्हणूनच त्यांच्या शब्दाला किंमत असते. ते बोलतील त्याबद्दल कोणाच्या मनात शंका येऊ शकत नाहीत. ते पक्षपात करतील वा मतलबासाठी कुठली गोष्ट सांगतील, असे कोणी मानत नाही. हाच त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. ज्याच्यासाठी त्यांच्या विषयी लोकमानसात त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. आणि म्हणूनच त्यांचा ज्याला स्पर्श होईल त्याची चौकशी वा तपास आवश्यक नसतो. ही धारणा आहे. ती धारणा जपण्यावरच त्यांच्याबद्दल जनमानसात असलेल्या भावनेचे भवितव्य अवलंबून असते. सहाजिकच त्यांना खुप जपून बोलावे व वागावे लागत असते. २००४ सालच्या लोकसभा निवडणूका लागल्या तेव्हा राष्ट्रपती पदावर आरूढ झालेल्या डॉ. कलामांनी सार्वजनिक कार्यक्रम वा भाषणे करण्याचे थांबवले होते. आपल्या एखाद्या शब्दाचा विधानाचा राजकीय अर्थ लावला जाईल, तर त्यातून आपल्या निष्पक्षतेला बाधा येईल; म्हणून त्यांनी जणू मौन धारण केले होते. कारण आपण ज्या पदावर व स्थानावर आहोत, त्याची महत्ता नि:पक्षपातीपणावर अवलंबून आहे, याची जाणीव त्यामागे होती. सचिन आज त्याच पातळीवर आहे.
वाजपेयी पंतप्रधान असताना संसदेत प्रचंड गोधळ कायम चालू होता. कुठल्याही विषयावर सत्ताधारी व विरोधकांत एकमत वा सहमती होत नव्हती. त्याच कालखंडात एका कसोटी सामन्यात सचिनवर चेंडू कुरतडल्याचा आरोप झाला होता. त्यावरून भारतीय संसदेत गदारोळ उठला होता. सचिनवर असा आरोप करणार्यांचा संसदेने एकमुखाने निषेध केला होता. ज्यांच्यात कुठल्याही विषयावर एकमत होत नव्हते, अशा खासदारांचे सचिनचा प्रामाणीकपणा यावर मात्र एकमत होते. यातून सचिनची महत्ता कळते. पक्ष, राजकारण, स्वार्थ, प्रतिष्ठा, विवाद अशा सर्वसाधारण गोष्टींच्या पलिकडे सचिन असल्याचा तो पुरावा होता. त्याची तटस्थता हीच त्याची सार्वजनिक जीवनातील ताकद होती व असली पाहिजे. त्या महत्तेला राज्यसभेतील नेमणूकीने बाधा आलेली आहे. कॉग्रेसप्रणित सरकार असताना त्याची नेमणूक झाली हे त्याचे कारण नाही. तर त्याची नेमणूक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर झाली, हे त्या बाधेचे कारण आहे. त्याची नेमणूक राष्ट्रपतींनी केली हेच कुणाला पटलेले नाही. त्याने कॉग्रेस प्रवेश केला असावा अशी लोकभावना बाधक ठरली आहे. अजून तरी कोणी त्याच्यावर कॉग्रेसमध्ये गेल्याचा आरोप केलेला नाही. पण लोकांमधील अस्वस्थता त्यातूनच आलेली आहे. पांडवातला धर्म युधिष्ठीर सत्यवचनी होता. म्हणून त्याचा रथ वितभर उंचावरून धावत होता असे म्हटले जाते. पण युद्धात "अश्वत्थामा मेला, नरोवा कुंजरोवा" असे अर्धसत्य बोलल्यावर त्याचा रथ खाली जमीनीला टेकला म्हणतात. तशी आजच्या सचिनची अवस्था झालेली आहे. त्याच्यात आणि कॉग्रेसचा खासदार झालेल्या अझरुद्दीन याच्यात लोकांना साम्य दिसू लागले आहे.
परीसाची गोष्ट तीच आहे. सचिनच्या या एका नेमणुकीने त्याच्या लक्षावधी नव्हे तर करोडो चहात्यांच्या मनात पाल चुकचुकलेली आहे. सचिन नावाचा परीस कॉग्रेसला स्पर्श करतो तेव्हा कॉग्रेसचे सोने कितपत होईल याचे काही सांगता येत नाही. पण सचिन आजघडीला कॉग्रेसच्या गोटात गेला, म्हणून त्याच्या आजवर कमावलेल्या पुण्याईचे भंगार होणार आहे. त्याच्या चाहत्यांच्या मनात तीच धाकधुक आहे. अर्थात सचिन राज्यसभेत गेल्यावर भारतीय क्रिकेट व क्रिडा क्षेत्राला न्याय मिळवून देऊ शकेल अशी पोपटपंची अनेकांनी केली आहे. म्हणून सत्य लपलेले नाही. खरेच सचिनच्या शब्दात तेवढी ताकद असेल व त्याला खरेच् भारतीय क्रिडा क्षेत्राचे कल्याण करण्याची एवढीच उत्सुकता असेल, तर सोनियांकडे गेल्यावर किंवा त्यांनी राज्यसभा सदस्यत्व देऊ केल्यावर सचिनने काय केले असते? बाकी भारताचे सोडून द्या, ज्या खे्ळाच्या क्षेत्रातले ७०-८० हजार कोटी रुपये राष्ट्रकुल स्पर्धेच्या नावाखाली लुटले गेले आहेत, त्याचा खुलासा त्याने विचारायला हवा होता. आपल्याला खेळासाठी संसदेत बोलावता, तर त्या संसदेत खेळाचा पैसा लुटणारे दरोडेखोर आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून कसा बसू, एवढे तरी सचिन नक्कीच बोलू शकला असता. आधी खेळाडूंच्या तोंडचा घास काढून घेणार्या कलमाडीला पक्षातून हाकलून दाखवा, असे म्हणायचे धाडस सचिन नाही तर कोणी करायचे? की त्याच्याशी सचिनला काहीच कर्तव्य नाही? खेळाला वा खेळाडूंना न्याय मिळवून देणे दुरची गोष्ट झाली. जे अन्याय करणारे आहेत त्यांच्या पंक्तीत बसणे सचिनला शोभादायक वाटते काय?
सचिनने अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा द्यावा काय? तो लोकपाल विधेयकावर काय भूमिका घेईल? क्रीडाक्षेत्रासाठी त्याचे योगदान खासदार म्हणूण काय असेल? हे सर्व नंतरचे गौण प्रश्न आहेत. एक साधा सवाल आहे, तो राष्ट्रकुल स्पर्धेतील करोडो रुपयांच्या घोटाळ्यांचा. सोनियांसमोर त्यावर बोलायची ताकद असलेला एकही मर्द कॉग्रेस पक्षात नाही. प्रणब, मनमोहन, चिदंबरम कोणीही नाही. ना शरद पवार वा अन्य कोणी त्याबद्दल सोनियांशी बोलू शकतो. कारण त्यांना सोनियांची भेट घेण्यासाठी फ़ाटकाबाहेर तासंतास ताटक्ळत बसावे लागते. सचिनची गोष्ट तशी नव्हती. १० जनपथला गेल्यागेल्या तिथले फ़ाटक त्याचासाठी उघडले होते. विनाविलंब सोनिया त्याच्या स्वागताला आल्या होत्या. म्हणूनच त्यांना खेळासंबंधी दोन खडेबोल ऐकवण्याची कुवत असलेला सचिन हा एकमेव खेळाडू होता. त्याचे ते कर्तव्य देखिल होते. आपला लाडका सचिन त्याबद्दल काही बोलला काय? खेळातील करोडो रुपयांची अफ़रातफ़र करणार्यांना ज्या पक्षात अभय आहे, तिथे बसून सचिन कुठल्या खेळाचे कल्याण करणार आहे? ज्या पक्षात कलमाडींना अभय मिळाले आहे, त्या पक्षाच्या जवळ सचिन गेल्याने त्या पक्षाचे सोने कदाचित होणार आहे. पण त्याचे सोने ज्या परीसाने होणार आहे, त्या परीसाचे काय होईल? सचिनच्या चहात्यांना त्याच वेदनेने अस्वस्थ करून सोडले आहे. आपण सचिनवर आजतागायत खुप प्रेम केले त्या प्रेमाचे भंगार झाले काय अशी त्याच्या चहात्यांची धारणा होते आहे. त्यातून ही अस्वस्थता पसरली आहे.
सचिनची लोकप्रियता ही फ़क्त त्याच्या क्रिकेटमधील विक्रम पराक्रम यापुरती मर्यादित नाही. कुठल्याही वादग्रस्त गोष्टीपासून दुर असण्यातून त्याची पुण्याई जमा झालेली आहे. त्याच्या खेळातील गुणवत्तेचे कौतूक करण्यासाठी त्याला राज्यसभेत पाठवण्याचा अट्टाहास कॉग्रेसने केलेला नाही. आज कॉग्रेस पक्षाची अवस्था भंगारासारखी झालेली आहे. त्याला त्यातून सावरण्यासाठी कुठल्या तरी परीसस्पर्शाची तातडीची गरज आहे. आजवर प्रियंका वा राहूल हेच तो परीसस्पर्श आहेत, अशी कॉग्रेसवाल्यांची समजूत होती. पण मागल्या अनेक निवडणुकात त्यांनी आपली पुण्याई पणाला लावली आणि आता त्यांच्या स्पर्शात ती जादू उरलेली नाही. म्हणुनच कॉग्रेसला राहूल प्रियंकापेक्षा प्रभावी जादूई स्पर्शाची गरज भासू लागली आहे. विशेषत: उत्तरप्रदेशात राहुल प्रियंकाची जादू फ़सल्यावर कॉग्रेसला आपले भंगार झाल्याची जाणीव झाली आहे. आणि त्यासाठीच मग सचिनला ओढण्यात आले आहे. सचिनला १० जनपथ येथे हजेरी लावण्यास भाग पाडून सोनिया गांधी यांनी सचिनला कॉग्रेसचा अघोषित ब्रॅंड अंबॅसेडर बनवले आहे. ते सचिनच्या लक्षात आले की नाही ठाउक नाही. अण्णा हजारे कॉग्रेसला भ्रष्ट म्हणत असतील तरी सचिनसारखा एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस कॉग्रेसला तसे मानत नाही, हेच त्यांना दाखवायचे होते व सचिनच्या खासदारकी स्विकारण्याने ते साध्य झालेले आहे.
आता सवाल इतकाच आहे की सचिनच्या या परीस स्पर्शाने कॉग्रेसचे सोने होईल का? तर ते निदान मला तरी शक्य वाटत नाही. पण कॉग्रेसला हा असा राजकीय स्पर्श केल्याने सचिनच्या पुण्याईला किती बाधा येणार हा खरा सवाल आहे. आजच त्याच्या चहात्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष पराभूत झाल्यावर अमिताभने त्यापासून स्वत:ला दुर केले होते. मग संसदेतील नोटांचे प्रकरण चव्हाट्यावर येऊन अमरसिंग यांना अटक झाल्यावर, त्याने अमरसिंग यांची संगत टाळली. पण मोदी संबंधाने कितीही टिका झाली तरी त्याच अमिताभने गुजरात सरकारची जाहीरात फ़ुकट करण्याचा धोका पत्करला. सचिनला त्यातले तारतम्य कितपत उमगले आहे? युधिष्ठीराप्रमाणे सचिनचा रथ आता वितभर उंचीवरून धावू शकणार नाही. त्याच्या चहात्यांची नाराजी त्याचाच पुरावा आहे. (क्रमश:)
भाग ( २६० ) १०/५/१२
kay karwe hya sachin che khup motha adarsh hota adarsh ghotala howu naye mahnje miliwalie
उत्तर द्याहटवा