बुधवार, २३ मे, २०१२

माणूसही अखेर पशूच असतो ना?


   नागपूरमध्ये एका वस्तीत माणसे अशी का वागली? त्यांच्यात सैतान संचारला होता काय? आज तिथले पोलिस आयुक्त अफ़वांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जनतेला करत आहेत. पण लोक अफ़वांच्या आहारी का जातात, याचा त्यांनी कधी विचार तरी केला आहे काय? ते आयुक्तच कशाला, अशा विषयावर गंभीर चेहरा ठेवून चर्चा रंगवणारे जे विद्वान व जाणकार अक्कल पाजळत असतात, त्यांनी तरी कधी लोकांमध्ये असा भयगंड कशामुळे निर्माण होतो, त्याकडे गभीरपणे बघितले आहे काय? असते तर आज अशी परिस्थिती ओढवली नसती. नेहमीच्या भाषेत ज्याला सौ सोनारकी एक लोहारकी असे म्हणतात, त्यातलाच हा प्रकार असतो. त्यात मग त्या नाथजोग्यांसारखे निरपराध बळी पडतात. ते जसे अफ़वांचे बळी असतात, तसेच त्यांना मारणारेही अफ़वांचेच बळी असतात. कायद्याने सुरक्षा मिळते, न्याय मिळतो अशा समजूती जोवर कार्यरत असतात, तोवरच माणसांचा समाज पशूंप्रमाणे वागत नसतो. जेव्हा त्याच विश्वासाला तडा जातो, त्यानंतर पशूवत वर्तन सुरू होत असते. जर लागोपाठ दरोडे पडत असताना व लोकांना असुरक्षित वाटत असताना, पोलिसांनी तातडीचे उपाय योजले असते तर तो भयगंड मुळात निर्माणच झाला नसता आणि त्याचे असे संशयाने बळी झाले नसते.  

   लागोपाठ चोर्‍या व घरात घुसून गुंडगिरीचे अनुभव, लोकांना अफ़वांवर विश्वास ठेवायला भाग पाडत असतात. त्यामुळेच अशा घटनांची गंभीर दखल घेऊन ताबडतोब कृती केली जाणे आवश्यक असते. ती कृती म्हणजे नुसते गुन्हे नोंदवणे नसते, तर गुंडांना दहशत बसणे आवश्यक असते. जिथे म्हणून गुंड गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक दिसतील, त्यांच्यावर पोलिसांनी दंडूका त्याचवेळी उगारला तर गुन्हेगारीला लगाम लावला जात असतो. आपोआप लोकांचा कायद्याच्या राज्यावरील व सुरक्षेवरील विश्वास वाढत असतो. आज नेमका त्याच गोष्टीचा मोठाच दुष्काळ पडला आहे. गुन्हेगारी व सुरक्षितता ही समस्या नसून कायद्याचा नाकर्तेपणा ही समस्या आहे. जेव्हा अशी अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा आधी त्याच्याकडून मार खायचा, की आपणच त्याला मारायचे; यातून निवड करावी लागत असते. जमाव नेहमी दुसरा पर्याय निवडत असतो. नागपुरला तेच घडले आहे. ज्यांच्यावर संशय होता, त्यांना लोकांनी पकडले व हटकले होते. त्यांना पोलिसांच्या ताब्यातही दिले होते. पण मुद्दा असा, की पोलिसांकडून कारवाई होईल याची लोकांना आता खात्री उरलेली नाही. आणि त्याचा दाखला लगेच मिळाला. नागपुरच्याच दुसर्‍या भागात याचप्रकारे संशयितांना मारले जाणार होते. पण सुदैवाने कोणा जागरुक व्यक्तीच्या फ़ोनमुळे पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि हल्ल्याचे बळी बचावले. पिपली फ़ाटा भागात दुसर्‍याच दिवशी तशीच घटना घडत होती. लोकांचा जमाव साड्या नेसलेल्या बहुरुपी नाथजोग्यांचा पाठलाग संशयाने करत होता. त्याची खबर फ़ोनवरून मिळाल्यावर पोलिस तिकडे धावले व दुर्घटना टळली.

   कित्येक दिवस पोलिस हातावर हात ठेवून बसले व त्यांनी वाढत्या गुन्ह्यांसाठी कुठली कारवाई केली नाही. म्हणून लोक भयभीत होऊन स्वत:च कामाला लागले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुन्हेगार पकडला म्हणून भागत नाही. गुन्हेगारी थांबावी अशी लोकांची अपेक्षा असते. मुलत: सामान्य जनतेला शांततेने जगायचे असते. त्यात व्यत्यय आला, मग हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायदा असतो. तो राबवणार्‍याना त्याचे भान राहिलेले नाही. म्हणून मग ते गुन्हेगारीला लगाम लावण्याऐवजी लोकांवरच रुबाब मारत असतात. सुरक्षेचा अभाव आणि गुन्हेगारीला मोकळे रान; यातून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण कायद्याचे राज्य आहे, कायदा संरक्षण देतो, ही आज वस्तुस्थिती राहिलेली नसून, तीच एक अफ़वा बनली आहे. कारण याच दरम्यान नागपुरमधील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भर दुपारी एका अशाच वस्तीत दोन गुंड एका घरात घुसले व त्यांनी तिथे असलेल्या एका तरूण मुलीवर अतिप्रसंग केला. तिने ओरडाआरडा केला, तेव्हा आसपासचे लोक धावून गेले. त्यापैकी एकाने पळ काढला तर दुसर्‍याला लोकांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. ही परिस्थिती काय सांगते? नागपुरमध्ये कायद्याचे राज्य असल्याचा हा पुरावा आहे काय?

   अनुभव असा आहे, की असे गुन्हेगार पकडले मग त्यांना काही दिवसातच जामिन मिळतो आणि मग ते मोकाट फ़िरू लागतात. जेव्हा एक गुन्ह्यातून जामीन मिळतो, तेव्हा निरपराध असेल तो तोंड लपवून बसतो. पण जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतो, तो इसम मोठ्या उजळमाथ्याने त्याच वस्तीत फ़िरू लागतो व कायदा आपला बाल बाका करू शकत नाही, म्हणत लोकांना आणखीच दहशत घालू लागतो. मग गुन्हे वाढत जातात, आणि जामीनावर सुटण्यातून त्यांचा वचकही वाढतच जातो. अशा गुन्हेगाराशी दोन हात करणे एकेकट्या रहिवाश्याला शक्य नसते. त्यांची ताकद संख्येत असते. त्यातूनच मग जमाव आकार घेत असतो. जेव्हा अशा प्रवृत्तीला पोलिस व कायदा वेसण घालत असतो, तेव्हा कायद्याचा दबदबा असतोच; पण जमावाची ताकद वापरण्याची लोकांना गरजच भासत नाही. किंबहूना लोकांनी जमाव वा झुंडीने असे वागू नये, म्हणूनच कायदा व पोलिसांची कल्पना समाजात आणली गेली आहे. ती प्रभावी असेल तर गुंड कायद्याला घाबरून असतात. लोक कायद्याचा सन्मान करतात. त्या दिवशी पोलिसांच्या हवाली केलेल्या त्या चार नाथजोग्यांवर लोकांनी म्हणजे जमावाने हल्ला का केला असेल?

   एक म्हणजे पोलिस गुंडाला कोर्टात नेउन जामीनावर सोडून देतील आणि पुन्हा तेच गुंड वा चोर मोकळे फ़िरू लागतील, अशी लोकांची धारणा झाली आहे. कित्येक वर्षे साध्या प्रकरणातील खटल्यांचे निकाल लागत नाहीत आणि बहुधा गुन्हेगार निर्दोष सुटतात. हा आता लोकांचा अनुभव झाला आहे. मुंबईत शेकडो लोकांची कत्तल करणार्‍या कसाबला किंवा संसदेवर हल्ला करणार्‍या अफ़जल गुरूला फ़ाशी देण्यातल्या दिरंगाईचे हे परिणाम आहेत. त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा होईल वा गुन्हे थांबतील; यावरचा लोकांचा विश्वासच ऊडाला आहे. त्यामुळेच लोक स्वत:च शिक्षा देण्यासाठी पुढे सरसावू लागले आहेत. कायदा हाती घेऊ लागले आहेत. नागपुरची घटना त्याचीच साक्ष आहे. आणि असे नागपूरात प्रथमच घडले असे मानायचे कारण नाही. अक्कू यादवचा शेवट नागपूर पोलिस विसरले, म्हणुन ही पाळी आज आली आहे. ती गोष्ट मी सांगणारच आहे. पण त्याआधी कायद्याची ताकद कशात असते ते समजून घेणे योग्य ठरेल. संसद वा कायदेमंडळाने एखादा मसूदा संमत केला, म्हणुन कागदावरचा कायदा आकार घेत असतो. पण लोकांची त्यावरची श्रद्धा त्या कायद्याचे बळ असते. जोवर लोक मानतात तोवर तो कायदा असतो. जोवर तो कायदा आपल्याला संरक्षण देईल वा न्याय देईल, अशी लोकांची गाढ श्रद्धा असते, तोवरच त्या कायद्याचे राज्य चालू शकते. जेव्हा जनतेच्या विश्वासाचे ते पाठबळ, तो कायदा वा कायद्याचे राज्य गमावते, तेव्हा त्या कायद्याची करामत संपुष्टात येत असते. म्हणूनच कायद्यावरचा लोकांचा विश्वास उडू नये याची काळजी कायदा राबवणार्‍यांनी व सत्ताधार्‍यांनी घ्यायची असते. आजच्या सत्ताधार्‍यांना त्याचाच विसर पडला आहे. म्हणुनच एका बाजूला गुन्हेगारांसमोर कायदा पांगळा पडतो आहे, तर दुसरीकडे लोक कायदा हाती घेऊन स्वत:च न्यायनिवाडा करू लागले आहेत. म्हणूनच नागपुरच्या नाथजोगी हत्याकांडाकडे वेगळ्या गंभीर नजरेने बघण्याची गरज आहे.

   कुठेही अशा दरोडे बलत्काराच्या एकाहून अधिक घटना घडल्या, मग लगेच त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी पावले उचलली असती तर? आसपासच्या ठाण्यातून वा शहराबाहेरच्या तालुक्यातून अधिक पोलिसांची कुमक मागवून, काही गुन्हेगार दरोडेखोरांना पकडले असते तर लोकांमध्ये कायद्यावरचा विश्वास वाढला असता ना? पण गुन्हे घडतात व त्यांची दखलच घेतली जात नाही, तेव्हा लोकांचा धीर सुटत असतो. त्यातून शंका, संशय व भयगंड अशी वाटचाल होत असते. मग शेवटचा उपाय असतो झूंडशाहीचा. म्हणजे जमावाचा कायदा. कधी जमाव चुक करतो तर कधी जमाव योग्यच करतो. अखेरीस माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे असेच म्हटले जाते ना? प्राणी म्हणजे पशुच असतो. निसर्गाने माणूस नावाचा पशूच निर्माण केला आहे. त्याच्यावर संस्का्र, नियम व विवेक अशा मार्गाने जे लगाम लावलेले आहेत, त्यामुळे तो माणूस होतो. तो अन्य प्राणीमात्रांपेक्षा वेगळा वागू लागतो. जेव्हा त्यातल्या काहींचे लगाम सैल होतात व त्यांना कोणी आवर घालू शकत नाही, तेव्हा उर्वरीत माणसातला पशूसुद्धा बचावासाठी माणूसकी सोडुन पशूच होत असतो. कायद्याचे राज्य राबवणार्‍यांनी म्हणुनच त्याचे भान ठेवूनच राज्य चालवले पाहिजे. कायदा कागदावर असून चालणार नाही. त्याचा जीताजागता अनूभव लोकांना त्यांच्या नित्यजीवनात घेता आला पाहिजे.   (क्रमश:)
 भाग   ( २७३ )    २३/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा