एक गोष्ट लहानपणी ऐकलेली आठवते. दहाजण असतात. ते गोंधळलेले असतात. आपण कुठे चुकू नये, हरवू नये म्हणुन ते सतत स्वत:ची संख्या मोजत असतात. पण कितीही मोजणी केली तरी एकने संख्या कमी भरत असते. मोजणारे बदलूनही मोजणी दहा येत नाही. मग ते एकमेकांचे चेहरे तपासतात. आपण कितीजण निघालो ते आठवून बघतात. सर्व काही आठवतात. पण कोण हरवला आहे, तेच त्यांच्या लक्षात येत नसते. कोणीही मोजणी केली तरी संख्या नऊच भरत असते. मात्र हरवला कोण, त्याचा पत्ता लागत नसतो. कारण सगळे तर समोर दिसत असतात. असे का व्हावे? म्हटले तर ही हास्यास्पद गोष्ट आहे. कारण प्रत्येकवेळी मोजणी करताना, मोजणारा स्वत:ला सोडून उरलेल्यांची मोजणी करत असतो. मग संख्या दहा होणार कशी?
असे बावळट मोजणी करत असले, तर दुसरे काय होणार? असा्ही विचार डोक्यात येतो की नाही? पण ते बावळट असतात, असे म्हणून त्यातला बोध आपण विसरत असतो. आपल्या जीवनात तरी वेगळे काय घडत असते? आपण शहाणे असतो का? अशीच वेळ आपल्यावर आली, तर आपण मोजणी नेमकी करू शकू काय? जेव्हा जबाबदारीची वेळ येते, तेव्हा आपण कधी स्वत:ची त्यात मोजणी करतो का? तेव्हा नेमके स्वत:ला बाजूला ठेवून इतर सर्वांना हिशोबात धरत असतो ना? काम करायचे असेल तर ते दुसर्याने करावे, हीच आपली अपेक्षा असते की नाही? सगळी गडबड तिथेच होते. दुसर्याने काही करावे अशी अपेक्षा आपण बाळगत बसतो. मात्र आपण काही करायला हवे, याची आपल्याला आठवणच नसते. तिथे समस्या सुरू होते. कंफ़्युशिअस हा चिनी तत्ववेत्ता म्हणतो, "इथला डोंगर तिथे करणारा माणुस एक छोटा दगड उचलून आरंभ करत असतो".
सार्वजनिक आयुष्यात समाज असाच पराक्रम घडवत असतो. त्यात खुप सामान्य माणसे आपापली जबाबदारी योग्यरितीने पार पाडतात, तेव्हा मोठे पर्वताएवढे कार्य पुर्ण होत असते. खुप जुनी गोष्ट आहे. मी तेव्हा नवखा पत्रकार होतो. १९६९ सालातली असा्वी ती घटना. अपोलो-११ यानाने चंद्रावर यशस्वी स्वारी केली होती. नील आर्मस्ट्रॉग हा अंतराळवीर चंद्रभूमीवर उतरला होता. मानवी इतिहासातील त्या अपुर्व घटनेनंतर नासा अंतराळ संशोधन संस्थेमध्ये काम करणार्या अनेकांच्या गोष्टी मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या. तेव्हा तिथल्या संशोधनशाळेतील एका लिफ़्ट्मनची छोटीशी मुलाखत वाचलेली मला अजून आठवते. तो सामान्य कर्मचारी होता. पण त्याने काही सहासात वर्षे सुट्टी घेतली नव्हती. त्याबद्दल त्याला विचारले, तर त्याने मुलाखतीत दिलेले ते उत्तर मला अजून लक्षात राहिले आहे. एक सामान्य लिफ़्टमन म्हणतो, "मी सुट्टी घेतली असती तर चंद्रावर माणूस इतक्या लौकर पोहोचू शकला नसता." कुणालाही हास्यास्पद वाटेल असेच ते उत्तर आहे. एवढ्या मोठ्य़ा महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये एका लिफ़्टमनचे महत्व ते काय? पण त्याने त्यासाठी दिलेले कारण चक्रावून सोडणारे आहे.
"शास्त्रज्ञ संशोधक आपापल्या विचारात मग्न असतात. इकडून तिकडे जाताना त्यांचे मन विचलीत झाले, तर त्यांना पहिल्यापासून विचार करावा लागतो. तेवढा त्यांचा वेळ वाया जातो. हे शास्त्रज्ञ केव्हा कुठे जातात वा त्यांना कुठे जायचे असते, ते मला सवयीने ठाऊक झालेले होते. त्यामुळे मी असलो मग त्यांना कितवा मजला हे सांगावे लागत नसे. मी त्यांना अपेक्षित मजल्यावर न बोलता सोडत असे. माझ्या जागी एक दिवस जरी दुसरा कुणी आला, तर त्यांची विचारशृंखला खंडीत झाली असती, तर त्यांना उत्तरे शोधायला वेळ लागला असता ना? मी रजा न घेतल्याने त्यांचा तो वेळ वाचला. तेवढे चंद्रावतरण लौकर शक्य झाले."
एका संशोधन संस्थेतील लिफ़्टमन तिथल्या कामाशी किती एकरूप झाला होता, त्याची ही साक्ष आहे. आपण एका मोठ्या संशोधन प्रकल्पाच्या यंत्रणेचे अविभाज्य घटक आहोत. मोठ्या संशोधकाएवढेच आपले कामही त्यात मोलाचे आहे, असे समजून जेव्हा तिथली माणसे काम करतात, तेव्हा त्यात अपयशाला शिरकाव करायला जागाच नसते. जेव्हा समाज किंवा माणसांचा गट अशा समुह भावनेने कामाला लागतो, तेव्हाच गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे सोपे होऊन जाते. त्यात या लिफ़्टमनसारखी समर्पित भावना असायला हवी. मग समस्या एकूण समाजला भेडसावणारी असो किंवा मर्यादित लोकसंख्येची असो. जे काम करायचे आहे, ते दुसर्या कुणासाठी करत नसून आपल्यासाठी आपण करतो आहोत, अशी धारणा असेल तर काम किती सोपे होऊन जाते. त्याचा आपण स्वत:च अनुभव घेण्याची गरज आहे. त्यातून काय मोबदला मिळाला. स्वार्थ काय साधला गेला, असा विचार करण्यापेक्षा, आपण काहीतरी करू शकलो, याचा अभिमान व समाधान मोठे असते. पुन्हा कंफ़्युशिअसच्या शब्दात सांगायचे तर, "तुमच्या आवडीची कामगिरी शोधा, मग बघा आयुष्यात एकही दिवस तुम्हाला कष्ट करावे लागणार नाहीत." किती चमत्कारिक विधान आहे ना?
तुमच्या नावडते काम असले, मग ते आपण जीवावर आल्यासारखे उरकू बघतो. उलट आवडते काम असले तर ते कधी पार पडले तेच लक्षात येत नाही. जे नावडते असते ते करताना त्यात कामापेक्षा कष्ट वाटू लागतात. पण आवडती गोष्ट करताना वेळ व श्रम याकडे लक्षच रहात नाही. अमुक एक काम आपल्याशिवाय दुसरा कुणी करूच शकत नाही, अशी आपली धारणा असेल तर ते कितीही कष्टाचे काम असो, ते आपण लिलया पार पाडतो. ते कितीही दमवणारे असले, तरी आपण तेवढे कष्ट उपसूनही ताजेतवानेच असतो. अनिच्छा आणि इच्छा यातला हाच तर मोठा फ़रक आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करतो, तेव्हा त्यात दमायला होत नाही. त्यात कष्ट जाणवत नाहीत. तेच कंफ़्युशिअस सांगतो आहे. आवडेल असे काम शोधा. किंवा दुसर्या प्रकारे विचार करून बघा. जे काम आपल्यावर सोपवले आहे ते आवडीने करून बघा, तुम्हाला त्याचे कष्ट वाटेनासे होतील.
ज्यातून समाधान मिळते ते कष्ट मोबदल्यात मोजले जात नाहीत. उलट ज्यातून समाधान मिळत नाही त्याचा विचार आपण मोबदल्याच्या हिशोबात करत असतो. आज आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणतो, तो त्यातूनच आलेला आहे. शिक्षक असो, सरकारी कर्मचारी-अधिकारी असो, अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करणारा माणुस असो, त्याचे दुखणे हेच आहे. तो काम आवडीने करतच नाही. वेतन ही त्याची गरज आहे. पैसे मिळावेत एवढ्यासाठी तो तिथे आलेला आहे. केल्या कामातून आनंद मिळवणे, त्याच्या मनालाही शिवत नाही. आपल्या सगळ्या समस्या तिथून सुरू झाल्या आहेत. आपल्याला काहीतरी हवे आहे आणि ते दुसर्या कोणीतरी आणुन दिले पाहिजे, अशी आपली अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्याला काही करायला लागू नये, ही आपली धारणा आहे. त्यात अडचण एकच आहे. की जो विचार आपल्या मनात घोळत असतो, तसाच विचार समोरच्याच्या मनातही घोळत असतो. मग तो आपल्याकडून अपेक्षा करतो; तर आपण त्याच्याकडून तीच अपेक्षा करत रहातो. शेवटी कोणाचेच समाधान होऊ शकत नाही. दोघेही एकमेकांबद्दल निराश होतात. जी गोष्ट या दोघांची, तीच पलिकडल्या दोघांची आहे. त्याच्या पलिकडे असेच दोघे चौघे पन्नास शंभर हजार लाखो आहेत. जे एकमेकांच्या तोंडाकडे आशाळभूतपणे बघत बसले आहेत. त्यामुळे होत काहीच नाही. कारण कोणीच सुरूवात करत नाही. दहाजणांच्या मोजणीत तिथे गडबड होती. इथे तर रोजच्या जीवनात लाखो करोडो लोकांची मोजणी चुकते आहे. कारण मोजणीत ज्या पहिल्याला मोजून आरंभ करायचा तो पहिलाच कोणी नाही. आपण आपल्यापासून सुरूवात करायला हवी आहे. तेच तर आपण विसरून गेलो आहोत.
मग आपण अण्णांनी काही करावे म्हणून त्यांच्याकडे आशेने बघतो. स्वामी रामदेव यांच्याकडे बघतो. कधी शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, राज वा अजितदादा, कधी नरेंद्र मोदी वा सोनिया-राहुलकडे बघू लागतो. पण आपण स्वत:कडे बघायला तयार नसतो. सगळी गफ़लत तिथेच होते. हाताशी असलेले सोडुन पळत्यामागे लागणे म्हणतात, तशी आपली अवस्था आहे. आपण स्वत: किती पराक्रम गाजवू शकतो, तेच आपल्याला सुचू नये यासारखे दुर्दैव नाही. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फ़ुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, शहीद भगतसिंग अशी किती तरी नावे सांगता येतील. त्यांनी स्वत;च सुरूवात केली होती. त्यांनी दुसर्या कुणाच्या येण्य़ाची प्रतिक्षा केली असती, तर आज आपण त्यांच्याकडे महापुरूष म्हणून बघितले तरी असते का? त्यांनी उचलेले व हलवलेले डोंगर पाहून आपण भारावून जातो. पण त्यांनी एक पहिला दगड हलवून त्या अपुर्व कार्याचा आरंभ केला होता, त्याकडे आपण कधी तरी बघतो का? शंभर शतके हा सचिनचा विक्रम एका दिवसातला वा वर्षातला नाही. तेविस वर्षापुर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हा विक्रम त्याच्या डोळ्यापुढे नव्हता. फ़क्त उत्तम खेळ एवढेच मर्यादित लक्ष्य त्याने बाळगले होते. वाटचाल करताना विक्रम कधी होऊन गेले, त्यालाही कळले नाहीत. त्याने फ़क्त आरंभ केला होता. त्याच्यापाशी जेवढी शक्ती होती तिथून त्याने आरंभ केला होता. आपण आपल्या आयुष्याला आरंभ तरी केला आहे काय? (क्रमश:)
भाग ( २५३ ) ३/५/१२
भाऊ, खूप सुंदर लेख! धन्यवाद.
उत्तर द्याहटवाbhau dhanywad ! inspiring one !
उत्तर द्याहटवाअडचण एकच आहे. की जो विचार आपल्या मनात घोळत असतो, तसाच विचार समोरच्याच्या मनातही घोळत असतो. मग तो आपल्याकडून अपेक्षा करतो; तर आपण त्याच्याकडून तीच अपेक्षा करत रहातो. शेवटी कोणाचेच समाधान होऊ शकत नाही. दोघेही एकमेकांबद्दल निराश होतात. जी गोष्ट या दोघांची, तीच पलिकडल्या दोघांची आहे. त्याच्या पलिकडे असेच दोघे चौघे पन्नास शंभर हजार लाखो आहेत. जे एकमेकांच्या तोंडाकडे आशाळभूतपणे बघत बसले आहेत. त्यामुळे होत काहीच नाही. कारण कोणीच सुरूवात करत नाही. दहाजणांच्या मोजणीत तिथे गडबड होती. इथे तर रोजच्या जीवनात लाखो करोडो लोकांची मोजणी चुकते आहे. कारण मोजणीत ज्या पहिल्याला मोजून आरंभ करायचा तो पहिलाच कोणी नाही. आपण आपल्यापासून सुरूवात करायला हवी आहे. तेच तर आपण विसरून गेलो आहोत.
उत्तर द्याहटवा