1989 च्या निवडणुकीत 90 जागा मिळवणार्या भाजपाने पुढल्या आठ वर्षात दुप्पट मजल मारली. मात्र सत्तेच्या मागे धावत सुटल्यावर भाजपाची ही घोडदौड थांबली. कारण आता भाजपाने आपल्या मुळ सिद्धांत, विचार व धोरणांना चाट देऊन, सत्तेची गणिते जुळवण्याची कास धरली होती. सत्ता पुढली सहा वर्षे टिकवणे भाजपाला शक्य झाले. पण जनमानसातील त्या पक्षाची विश्वासार्हता ढासळत गेली. सत्तेसाठी भाजपाही वाटेल त्या तडजोडी करू शकतो आणि त्याची वैचारिक बांधिलकी एक ढोंग आहे; हे लोकांच्या लक्षात येत गेले. पहिली बाब म्हणजे सत्तेचे बहुमत जुळवण्यासाठी भाजपाने आपले तीन आग्रह सोडून दिले. काश्मिरविषयक घटनेतील 370- कलम, अयोध्येतील मंदि्राचा आग्रह आणि समान नागरी कायदा; ह्याच त्या तीन गोष्टी होत्या. ज्यांचा पाठींबा हवा त्यांच्या अटी मान्य करताना भाजपाने मतदाराला दिलेल्या आश्वासने व विचारांचाच त्याग केला. त्याला मते देणार्या मतदारापेक्षा सत्तेत पाठींबा देणारे पक्ष मोठे वाटले. आपले धोरण, विचार व आग्रह यापेक्षा सत्ता मोठी वाटली, तिथून भाजपाची घसरगुंडी सुरू झाली होती. आणि ही सत्तालोलुपता फ़क्त मुद्दे व विषयांपुरती नव्हती. पक्षाचे आदर्श नेते म्हणावे त्यांचीही मती सत्तेमुळे भ्रष्ट झाल्याचे लोक बघत होते. कॉग्रेस व भाजपातला फ़रकच लोकांना दिसेनासा झाला होता.
वाजपेयी हे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते असल्याने त्यांची वर्णी पंतप्रधान पदावर लागणे स्वाभाविकच होते. पण अजून पक्ष स्वत:च्या बळावर बहुमत मिळवण्य़ाच्या पातळीपर्यंत सशक्त झाला नव्हता. म्हणूनच पक्ष संघटना समर्थपणे हाताळणे अगत्याचे होते. तेवढेच नव्हे तर सत्तेचा लाभ उठवून पक्षाचा विस्तार करण्याचे मोलाचे काम बाकी होते. पण त्याचे भान अडवाणी यांच्यासारख्या बुजुर्गालाच राहिले नाही. तर तुलनेने छोट्या असलेल्या बाकी नेत्यांकडून तशी अपेक्षा तरी बाळगता येईल काय? अडवाणी यांनी सरकारमध्ये जाण्याची काय गरज होती? गृहमंत्री व उपपंतप्रधान होण्याची हौस त्यांनी फ़ेडून घेतली. पण त्यातून कोणता आदर्श आपल्या कार्यकर्त्यांसमोर ठेवला? प्रत्येकजण सत्ता व अधिकार पदाच्यामागे धावत सुटला आणि पक्ष संघटना संभाळायला वा बांधायला कोणी उरलाच नाही. जनकृष्णमुर्ती किंवा व्यंकय्या नायडू अशा दुय्यम दर्जाच्या लोकांना पक्षाध्यक्ष बनवण्याची पाळी आली. ज्याला आपल्या राज्यातही पक्षाचे नेतृत्व करता आलेले नाही, किंवा जो कार्यकर्त्यांना प्रभावित करू शकणार नाही, त्याला पक्षाध्यक्ष नेमणे, याचा अर्थच वरिष्ठ नेतृत्वाने पक्षसंघटना वार्यावर सोडून देणे होते. त्याचा दोष त्या कमी कुवतीच्या दुय्यम नेत्यांना देऊन चालणार नाही. तो त्यांच्यावरही अन्यायच आहे. तो दोष खरे तर अडवाणी यांचा होता व आहे. वाजपेयी यांच्यासारखा दांडगा अनुभवी नेता सत्तेत गेल्यावर पक्षाची जबाबदारी वाढली होती. ती आपल्या खांद्यावर घ्यायचे सोडून अडवाणी मंत्री व्हायला धावले; तिथेच सगळी गडबड झाली होती. त्यामुळेच लायकी नसलेल्या बंगारू लक्ष्मण यांच्यासारख्याला पक्षाच्या अध्यक्षपदी बसवणे सोपे होऊन गेले. जणू पक्षाध्यक्ष हे पद निरर्थक झाले होते.
दुसरीकडे भाजपामध्ये सत्ता हाती आल्यापासून पक्ष संघटना दुय्यम व पक्षासाठी पैसे जमवू शकणारे मोलाचे होत गेले. आपल्या मराठी भाषेत ज्याला मोकाट सुटणे, भरकटणे वा उंडारणे म्हणतात, तशी त्या पक्षाची अवस्था होऊन गेली. सत्ता मिळताच त्या पक्षाचे वरपासून खालपर्यंतचे नेते ऊंडारले होते. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात उरला नव्हता. कालपर्यंत जे आरोप त्यांनी अन्य पक्षावर व सत्ताधार्यांवर केले, तेच आरोप आता सरसकट भाजपावरही होऊ लागले होते. पण ते ऐकून सावध होणे वा पुन्हा पक्षात लक्ष घालणे, अडवाणी वा अन्य ज्येष्ठ नेत्यांना सुचले नाही. कॉग्रेसची घसरगुंडी व आपल्याला मिळालेला पाठींबा, म्हणजे आपली सत्ता अमरपट्टा घेऊन आल्याच्या थाटात भाजपावाले वागू लागले होते. होणारी टिका, दाखवले जाणारे दोष, दिले जाणारे इशारे, यांची दखल घेण्याइतकीही शुद्ध कुणाला राहिली नव्हती. लागोपाठ तीन सार्वत्रिक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाला दिडशेही जागा मिळाल्या नाहीत, म्हणजे आपण आता पंधरावीस वर्षे सत्ता उपभोगणार; अशीच जणू समजूत भाजपाने करून घेतली होती. पुन्हा निवडणुका होतील, तेव्हा लोक जाब विचारतील याचे भानच कुणाला राहिले नव्हते. आणि तीच मानसिकता बंगारू लक्ष्मण यांच्या रूपाने पक्षाध्यक्ष पदावर आरूढ झाली होती. उंडारलेल्या रामाने बंगारू लक्ष्मणाला पक्षाध्यक्ष बनवले होते.
अनेक रथयात्रा काढणारे, शेकडो सभा घेऊन पक्षाची नव्याने बांधणी करणारे व मंदिराच्य विषयावर देशभर रान उठवणारे अडवाणी, हे तसे भाजपाचे राम म्हणायला हवेत. पण सत्तेच्या मोहात सापडून ते वनस्वासातल्या रामाए रामायण विसरले. तेच सत्तालोभात अडकल्यावर सगळी घडीच बिघडत गेली. एका बैठकीत उमा भारती यांनी कॅमेरे चालू असताना भाजपामध्ये चालू असलेल्या सत्तास्पर्धेचा पर्दाफ़ाश केला होता. माध्यमांना व वाहिन्यांना आतलेच लोक अफ़वा पसरवायला मदत करतात, असा आरोप त्यांनी जाहिरपणे केला होता. उत्तरप्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी ज्या भयंकर अनैतिक तडजोडी भाजपा करत गेला, त्याला उंडारणे नाही तर काय म्हणायचे? ज्याच्या हाती जेवढी सत्ता असेल त्याने तेवढ्या प्रमाणात मनमानी करावी, असा पायंडाच पडला होता. त्याचेच अनुकरण बंगारू लक्ष्मण यांनी केले. अनोळखी व्यक्तीकडून ज्याप्रकारे त्यांनी पैसे घेतले व असेच व्यवहार करत राहू असेही सुचवले, त्याचे चित्रण बोलके आहे. बंगारू यांच्या हालचाली वा भाषेत कुठे तणाव नाही की चिंता नाही. पकडले जाण्याचे भय नाही की पाप करतोय अशी अपराधी भावनाही नाही. दोनतीन वर्षाच्या सत्तेने भाजपाला किती भ्रष्ट केले, त्याचा हे चित्रण म्हणजे उत्तम दाखलाच आहे.
बंगारू लक्ष्मण यंचे प्रकरण खुप जुने म्हणजे दहा वर्षे जुने आहे. लोकांना आज त्याचे मोठेपण वाटणार नाही. कारण त्याच्या हजारो पटीने मोठे घोटाळे आज घडत आहेत. म्हणुनच बंगारू यांच्या दोषी ठरण्याचा मोठा धक्का भाजपाला बसणार नाही. पण तशा माणसाला पक्षाध्यक्ष करण्यातली जी अधोगती होती, त्यातून भाजपा अजून कुठे बाहेर पडू शकला आहे? पाच सहा वर्षाच्या सत्ता भोगण्य़ातुन पक्ष संघटनेचे जे भंगार बनले ते बंगारूला शिक्षा झाल्याने सुधारणार नाही. कॉग्रेस पक्ष जसा विरोधी पक्षांच्या नालायकीवर निवडून येण्याच्या हमीचे राजकारण पहिली चाळीस वर्षे खेळत राहिला, तशीच आज भाजपाची मानसिकता झाली आहे. भ्रष्ट कॉग्रेसला पाडण्यासाठी लोक आपल्याला सत्ता देतील; या आशेवर तो आजकाल जगतो आहे. त्यामुळेच त्याला उत्तरप्रदेशच्या ताज्या निवडणुकीत फ़टका बसला. मागल्या लोकसभा निवडणुकीत दणका बसला. कारण बंगारू लक्ष्मण यांना पक्षाध्यक्ष बनवण्यापर्यंत जी घसरण झाली, त्यातून भाजपा अजून सावरू शकलेला नाही. सत्तेच्या मागे धावताना पक्षिय जबाबदारीचा विसर जाणत्या अडवाणींना पडला असेल, तर बंगारू लक्ष्मण हाच पक्षाचा चेहरा बनतो.
स्वत:ला श्रीरामाचे भक्त म्हणवून घेणार्यांना तत्वासाठी राजसत्ता सोडून वनवास पत्करणारा राम कोणी सांगायचा? त्याने सत्तेचा त्याग करण्याचा आदर्श समोर ठेवला म्हणुन ऐषाराम सोडून लक्ष्मण त्याच्या सोबत वनवासात हट्टाने गेला होता. इथे आधुनिक रामायणात भाजपाचा राम म्हणजे ज्येष्ठ नेता अडवाणीच पक्षाची पर्णकुटी सोडून सत्तेच्या महालाकडे धावत सुटले, तर त्यांनी बंगारू नावाच्या लक्ष्मणापुढे कुठला आदर्श ठेवला? त्याने सात्विक वागावे अशी अपेक्षा तरी करता येईल काय? तहलका प्रकरणाने भाजपाची अब्रू गेली यात शंका नाही. पण त्यापेक्षा मोठे नुकसान संघटनात्मक झाले आहे. कॉग्रेसला पर्याय म्हणून ज्याच्याकडे लोक आशेने बघत होते, त्याचीच कॉग्रेस झाल्याचा दु:खद अनुभव लोकांना आला. मग लोकांनी बंगारू लक्ष्मण यांना विसरून उंडारू रामलाच वनवासात पाठवायचा निर्णय घेतला. कॉग्रेस भ्रष्ट आहेच. पण त्याला जो पर्याय लोक शोधतात तोही भ्रष्ट होताना दिसला तर लोक भ्रष्ट कॉग्रेसला पुन्हा संधी देतात, हाच आपल्या देशातील निवडणुकीचा इतिहास आहे. भाजपाला त्यावर मात करायची असेल तर नुसते बंगारू लक्ष्मण यांना बाजूला करून भागणार नाही. त्या पक्षाला पुन्हा एकदा आपल्या राजकीय निष्ठा व विचारांकडे प्रामाणिकपणे वळावे लागेल. सत्तेकडे आशाळभूतपणे बघणे सोडून आपण भ्रष्टाचार मुक्त कारभार करू शकतो हे लोकांना पटवावे लागेल. गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करावा लागेल. मात्र ते काम सोपे नाही. कारण भाजपा आपली इच्छाशक्तीच गमावून बसला आहे. त्यात आता पकडले जाणार नाहीत, असे अनेक बंगारू शिरजोर होऊन बसले आहेत. मोक्याच्या जागी स्थानापन्न झाले आहेत. खर्या रामायणात रामामुळे लक्ष्मण वनवासात गेला होता. इथे बंगारू सारख्या लक्ष्मणामुळे भाजपाच्या रामाला वनवासात जायची पाळी आली. (क्रमश:)
भाग ( २६२ ) १२/५/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा