शनिवार, ५ मे, २०१२

राष्ट्रपती भवनाचा पत्ता ’१० जनपथ’ असा आहे का?


   ज्याप्रकारे अचानक सचिनच्या खासदारकीची घोषणा झाली, त्यामुळे संझगिरी, भोगले यांच्यासारखे त्याचे मित्र चहाते सुद्धा थक्क झाले. कारण त्यांनाही तो धक्काच होता. त्यांनाही असे काही घडते आहे वा घडणार आहे याचा सुगावा त्यांना आधी लागला नव्हता. त्यांची पत्रकार समिक्षक म्हणून ती वेदनाही असू शकते. पण हे दोघेही केवळ समिक्षक नाहीत. ते सचिनचे मित्र आहेत, तेवढेच त्याचे हितचिंतकसुद्धा आहेत. त्यामुळेच त्यांना या खेळीत सचिन आजवर कमावलेले गमावणार काय, याची चिंता अधिक भेडसावते आहे. वाहिन्यावरील त्यांचे मतप्रदर्शन व भाषा त्याच चिंतेची होती. त्याना सचिन राज्यसभेवर नियुक्त झाला तर त्यात असलेला सन्मान सुद्धा कळतो. त्याचप्रमाणे नेमणूक झालेल्या खासदाराला पक्ष नसतो, ह्याचीही पुर्ण जाणीव असावी. मग त्यांनी सचिन राजकारणात शिरल्याचे सांगत नाराजी कशाला व्यक्त करावी? त्याचे कारण सचिनची खासदारकी नसून त्याचे तत्पुर्वी १० जनपथ येथे जाणे या दोघा मित्रांना रुचलेले नाही. एक नामवंत लोकप्रिय खेळाडूने सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाला भेटल्याबद्दल ते मित्र सचिनवर नाराज नाहीत. सोनियांना भेटून सचिनने खासदारकी मिळवली, असे जे चित्र तयार झाले आहे त्याने हे मित्र गडबडून गेले आहेत. कारण राष्ट्रपतींनी नेमलेल्या खासदाराला पक्ष नसतो असा खुलासा देता आला, तरी ती पळवाट लोकांना पटणारी नाही. त्या एका चुकीमुळे आता सचिनवर कॉग्रेसवाला असा शिक्का बसणार आहे, आणि त्यामुळेच हे त्याचे दोन्ही जाणकार मित्र अस्वस्थ झालेले आहेत. त्याचे कारण पक्षिय राजकारण सुद्धा नाही. तर आज देशभरात जे कॉग्रेस विरोधी वातावरण आहे त्यात सचिनचा बळी पडणार, हे कळते म्हणून हे दोघे व्यथित आहेत.

   रेखा वा अनु आगा यांची नेमणूक सरकारच्या सल्ल्यावरून राष्ट्रपतींनी केली हे कोणी नाकारणार नाही. पण सचिनची नेमणुक सोनियांच्या इच्छेने झाली, हे लपून राहिलेले नाही. किंबहुना सचिन सोनियांच्या आग्रहाला बळी पडला, असेच चित्र त्यातून निर्माण झालेले आहे. तीच भोगले व संझगिरी यांच्यासह सचिनच्या असंख्य चहात्यांची व्यथा आहे. ज्याने आपल्या वागण्यातून देशातल्या करोडो लोकांच्या भावनांना आवाज द्यावा अशी अपेक्षा असते; त्याने नेमका त्याच्या विरुद्ध सुर लावला तर काय होईल? वर्षभरापुर्वी अण्णांनी जंतरमंतर येथे जनलोकपाल विधेयकासाठी पहिले उपोषण केले, तिथे मुद्दाम जाऊन अभिनेता आमीरखान याने हजेरी लावली होती. तेव्हा त्याने एकही षटकार न मारता सचिन इतकी लोकप्रियता झटक्यात मिळवाली होती. सचिनने या एका फ़टक्यात आपल्या शतकांच्या शतकावर पाणी ओतले आहे. खासदारकी सोडा, सचिन आता भारतरत्न पुरस्काराच्याही पलिकडे गेला आहे. त्याने अशी खासदारकी मिळवणे हा त्याच्यासाठी सन्मान अजिबात नाही. आज कॉग्रेसची जनमानसातील जी प्रतिमा आहे, ती सावरण्यासाठी त्या पक्षाला उजळ चेहरा हवा आहे. दिवाळखोरीत गेलेल्या एअर इंडीयाला जशी बॅंकेत पत राहिली नाही म्हणून सरकारची गॅरेंटी हवी असते; तशी आज कॉग्रेस पक्षाची जनमानसातील स्थिती आहे. राहुल व प्रियंका यांना वापरूनही उत्तरप्रदेशात फ़टका खाल्ल्याने तो पक्ष आपली राजकीय पत परत मिळवायला धडपडतो आहे. अशा वेळी सचिनने सोनियांच्या घरी जाऊन खासदारकी मिळवणे म्हणजे त्याने कॉग्रेस पक्षाला सार्वजनिक जीवनात जामीन रहाणेच आहे. त्यामुळेच त्याचे चहाते व्यथित झाले आहेत. राज्यसभेत जावे लागल्याने सचिनला खेळता येणार नाही किंवा राजकारण त्याला क्रिकेटमधून संपवील, अशीही चहात्यांना चिंता नाही. तर सचिनच्या सचोटी, संवेदनशिलता या अजोड गुणांना या एका घटनेने ग्रहण लागले आहे, तीच त्याच्या चहात्यांची व्यथा आहे.

   कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सचिनचा सन्मान खरेच करायचा होता का? तर मग त्यांनी त्याची अशी कोंडी करण्याचे काय कारण होते? ज्या प्रक्रियेतून रेखा व अनु आगा यांना नामनियुक्त यादीत टाकले, त्याच पद्धतीने त्यांनी सचिनची वर्णी लावायला हवी होती. नसेल तर त्यांनी त्या अन्य दोघांना आपल्या निवासस्थानी का आमंत्रित केले नाही? तर एक गोष्ट स्पष्ट होते यातून. आपण सचिनला पटवले असे त्यांना दाखवायचे आहे. किंबहूना सचिन आपल्या इच्छेखातर राज्यसभेत यायला तयार झाला, असा समज त्यांना निर्माण करायचा असावा. जेणे करून सचिन आपले मानतो व आपल्यावर विश्वास ठेवतो, तर त्याच्या चहात्यांनी सुद्धा आपल्यावर तेवढीच श्र्द्धा ठेवावी; असा संदेश सोनियांना द्यायचा नसेल का? नेमका तोच संदेश लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्यामुळेच सचिनचे चहाते अस्वस्थ झालेले आहेत. आपण ज्याच्या खेळावर प्रेम केले आणि ज्याच्या माणुसकीवर जीव टाकला, तो आज संपुर्ण संवेदनाशुन्य झालेल्या पक्षाच्या आहरी जातो, याच समजुतीने  त्याच्या चहात्यांना विचलित करून सोडले आहे. अर्थात काही मंडळी सचिनच्या या पवित्र्याने कॉग्रेस पक्षाकडे आकर्षित होऊ शकतात. पण मोठ्या प्रमाणात सचिनची पुण्याई पणाला लागणार आहे. कारण सवाल सचिनच्या गुणवत्ता, सचोटी वा प्रामाणीकपणाचा नसून, तो कोणाच्या संगतीत आहे त्याच्याशी आहे. जो सत्ताधारी पक्ष आज घोटाळे, भ्रष्टाच्रार व महागाई यांनी लोकांच्या मनातून उतरला आहे व संपुर्ण असंवेदनाशील म्हणून ओळखला जातो आहे, त्याच्या पारड्यात वजन टा्कून सचिनने मागल्या दोन दशकात कमावलेली लोकप्रियता पणाला लावली आहे.

   कॉग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, कॉग्रेस म्हणजे घोटाळे, कॉग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचा आदर्श, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई अशीच प्रतिमा आहे. अगदी खेळाचा विषय घेतला तरी त्यातही खेळाडूंच्या तोंडचा घास काढून घेऊन फ़स्त करणारा राष्ट्रकुल घोटाळा आहेच. त्याबद्दल सचिनने सोनियाना सवाल करायला हवा. तेच त्याच्यासारख्या वजनदार खेळाडूचे धर्मकर्तव्य आहे. पण ते विसरून खेळाच्या क्षेत्रातही राजरोस लूटमार करणार्‍या कलमाडींच्या पंक्तीत बसायला सचिन तयार झाला; ही त्याच्या चहात्यांची व्यथा आहे. कारण सचिन इतक्या पराक्रमी खेळानंतर आता नुसता खेळाडू उरलेला नाही. तो फ़क्त खेळाडू आणि क्रीडा विषयापुरता मर्यादित व्यक्ती राहिलेला नाही. तो सामान्य माणसांचा आवाज उठवू शकेल अशा पातळीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यानेच तो आवाज उठवण्य़ाऐवजी तेच घोटाळे करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसावे काय? बोफ़ोर्स भानगड उजेडात येण्याआधी कॉग्रेसचा अलाहाबाद येथून खसदार झालेला अमिताभ म्हणुन तर नंतर तात्काळ राजिनामा देऊन मोकळा झाला होता. कारण कॉग्रेसशी संबंध वा जवळीक त्याच्या प्रतिमेला पोखरू लागली होती. त्याच्या तुलनेत आजची कॉग्रेस म्हणजे साफ़ रसातळाला गेलेली आहे. अशा पक्षाशी जवळीक दाखवत खासदारकी पत्करणे, म्हणजे खाईत उडी घेणेच आहे. म्हणूनच त्याचे चहाते इतके विचलित व उद्विग्न झाले आहेत. ती व्यथा सचिनच्या खासदार होण्याची वा खेळ सोडून राजकारणात लुडबुडण्याशी संबंधित नाही; तर कॉग्रेसशी जवळीक दाखवण्याशी त्या व्यथेचा संबंध आहे.

   जसे अचानक रेखा व अनु आगा यांचे नावे लोकांसमोर आले तसेच सचिनचे आले असते तर तो लोकांना नक्कीच सन्मान वाटला असता. आणि सचिनचा कुठलाही सन्मान लोकांना आवडतो यात शंकाच नाही. पण कॉग्रेसला त्याला सन्मानित करायचे नव्हते, तर त्याची पत आपल्या राजकीय दिवाळखोरीसाठी वापरायची होती. म्हणूनच त्याला आधी १० जनपथ येथे हजेरी लावण्यास भाग पाडण्यात आले. त्यातून एक संदेश जगाकडे पाठवण्याचा त्यातला राजकीय हेतू स्पष्ट होता. ही नेमणूक भले राष्ट्रपतींच्या सहीने झालेली असो. पण सचिनला सोनियांनी व पर्यायाने कॉग्रेस पक्षानेच खासदार केले हे दाखवायचे होते. ज्या सचिनवर देशभरचे लोक जीव टाकतात, तो कॉग्रेससाठी आपली पत पणाला लावतो; हेच त्यातून दाखवायचे होते. तो हेतू साध्य झाला असला तरी त्यातून जो परिणाम अपेक्षित आहे; तो साधला जाईलच याची मात्र खात्री कोणी देऊ शकत नाही. उलट त्याची संतप्त प्रतिक्रिया सचिनच्या चहात्यांमध्येच उमटली आहे. नुसते फ़ेसबुक व इंटरनेटवरील त्याचे चहाते विचलीत झालेले नाहीत. तर त्याने कुठलेही विक्रम केले नव्हते तेव्हापासून त्याच्यावर प्रेम करणारे, त्याला दिर्घकाळ जवळून ओळखणारेही या घटनेने चक्रावून गेले आहेत. कारण हा सचिनचा सन्मान नाही तर आजवर त्याने मिळवलेल्या प्रतिष्ठा व लोकप्रियतेचा लिलाव आहे; हे त्यांना कळते आहे. उरला प्रश्न सचिनला असा पणाला लावण्यामागे कॉग्रेसचा डाव कुठला इतकाच. त्याचे उत्तर उद्या शोधू. (क्रमश:)
भाग    ( २५५)    ५/५/१२

1 टिप्पणी:

  1. काँगेसचा हा डाव सचिनने खरच अगोदरच समजायला हवा होता. पण सचिनला खेळातही कधी राजकारण करावेसे वाटले नाही आणि हे राजकारणही समजले नाही. आज काँग्रेसचा राजीव शुक्ला जी बोंब मारतो आहे त्याचे कारण सचिनने काँग्रेसचा प्रचार केला नाही. कमीतकमी सचिन याला बळी पडला नाही ते बरे झाले.

    उत्तर द्याहटवा