शेकडो पिढ्यांपासून आपण अनेक परीकथा ऐकत आलो आहोत. त्यातच एक गोष्ट आहे ती परिसस्पर्शाची. कुठल्याही भंगार लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, मग त्याचे सोने होते; अशी ती कथा आहे. त्याचा पुरावा कोणी कधीच दिलेला नाही. तेवढेच नाही, लोखंडाचे सोने होते हे प्रत्येकजण अगत्याने सांगत असतो. पण अशा स्पर्शानंतर त्या परीसाचे काय होते, याचे उत्तर मी कधीच कोणाकडून ऐकू शकलेलो नाही. किती चमत्कारिक गोष्ट आहे ना? ज्याचे भले झाले किंवा ज्याला लाभ झाला ते अगत्याने सांगितले जात असते. पण त्याचा लाभ होत असताना त्या लाभाचे कारण असलेल्याचे काय झाले, ते मात्र कधीच सांगितले जात नाही. कोणीच कधी ते सांगत नाही. का सांगत नाही? की जाणीवपुर्वक ते सत्य लपवले जात असते? परीसाची ती कथा ऐकल्यापासून मला नेहमी तो परीस व त्याने केलेले भंगाराचे सोने सतावत राहिले आहेत. तसे सोने मला बघायला मिळालेले नाही आणि तो सोने करणारा परीसही बघायला मिळालेला नाही. पण त्याचा शोधही मी सोडलेला नाही. कधीतरी तो आपल्याला सापडेल अशी आशा असावी. अन्यथा माझ्यासारखा तर्ककठोर माणुस अशा आशेवर कशाला राहिला असता?
मीच कशाला आपल्यातले अनेकजण अशा परीसाचा शोध घेत असतील. कोणी त्यांना अंधश्रद्ध म्हणतील, कोणी त्यांची संभावना मुर्खात करतील. हरकत नाही. पण अशा परीकथा किंवा दंतकथा कुठल्या तरी अनुभवातून जन्माला येतात असा माझा विश्वास आहे. म्हणूनच मी त्याचा शोध घेत राहिलो आहे. मग एके दिवशी मला तो परीस सापडला. नुसता परीसच नव्हे तर त्याने ज्या भंगाराचे सोने केले, ते सोनेही मला बघायला मिळाले. कोणाचा याच्यावर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. आणि जो भाऊ तोरसेकर पुराव्याशिवाय बोलत, लिहित नाही; तो अशा भाकडकथा सांगतो हे वाचून वाचक देखिल चकीत होईल, याची मला खात्री आहे. म्हणूनच मी पुरावा घेऊनच तुमच्यासमोर आलेलो आहे. अर्थात हा परीसाचा शोध मी स्वत: लावलेला नाही. तो एका सामान्य माणसाचे लावलेला शोध आहे. मात्र ज्याने तो अपुर्व शोध लावला, त्यालाही त्याच्या या महान शोधाचा थांगपत्ता नव्हता. त्याचे नाव मी तुम्हाला सांगितले, तर तुमचाही त्यावर विश्वास बसणार नाही. त्याचा चेहरा ओळखताना तुम्हीही चकीत होऊन जाल. पण बिचकू नका, चकीत होऊ नका. परीस शोधून काढणार्या महान संशोधकाचा चेहरा तुम्हाला पहायचा असेल आणि त्याचे नाव जाणून घ्यायचे असेल, तर तसेच उठा आणि जवळच्या आरशा समोर जाऊन उभे रहा. त्यात जो चेहरा दिसेल त्याला त्याचे नाव विचारा. तो त्याचा चेहरा आणि तेच त्याचे नाव आहे. त्यानेच त्या परीसाचा शोध लावला आहे. खरे नाही ना वाटत? पण तेच शंभर टक्के सत्य आहे. तुम्ही प्रत्येकजण तो शोध लावणारे आहात. फ़क्त तुम्ही लावलेल्या शोधातला परीस व त्यातले भंगार लोखंड तुम्हाला ओळखता आले नाही, इतकीच काय ती गफ़लत आहे.
आपण तर सामान्य माणसे, आपण कसला शोध लावणार; असाच विचार आला ना तुमच्या मनात? आणि तुमचाच चेहरा आरशात दिसणार आणि तुमचेच नाव असणार, तर तो परीस व ते सोने तुम्हालाच कसे ठाऊक नाही, हा प्रश्न मनात आला की नाही? येणारच. कारण अजून तुम्हाला तो परीस वा ते भंगाराचे झालेले सोने, मी स्पष्ट करून सांगितलेले नाही. गेल्या कित्येक वर्षात मी अनेक राजकीय नेत्यांचे निवडणुकीनंतर सोने झाल्याच्या कथा ऐकत आलो आहे, अगदी चहाच्या टपरीवर किंवा वडापावच्या गाडीवर, बसमध्ये किंवा गावाच्या पारावर चालणार्या गप्पांमधून असे भंगाराचे सोने झाल्याच्या कहाण्या मी ऐकल्या आहेत. साला बेकार होता, घरात खायला अन्न नव्हते, असा कोणी तरी निवडून आला आणि दोनतीन वर्षात त्याच्या आयुष्याचे सोने झाल्याच्या कहाण्या मी ऐकत आलो आहे. तुम्हीही ऐकलेल्या असतीलच ना? कदाचीत त्या सांगणारेही तुम्हीच असाल. मग ज्याचे सोने झाले तो निवडणुकीपुर्वी कोण होता? भंगार होता ना? निवडून आल्यावर त्याचे सोने झाले, हा दावाही तुमचाच आहे ना? मग त्याचे सोने कशामुळे झाले? कोणी केले त्याचे सोने? असा काय चमत्कार घडला त्याच्या आयुष्यात? कसला स्पर्श झाला त्याच्या आयुष्याला? कुणाचा स्पर्श झाला त्याच्या आयुष्याला?
यातले प्रश्न माझे आहेत. पण त्यातले दावे तर तुमचे आमचे सर्वांचेच आहेत ना? कोण भंगार होता आणि त्याचे सोने झाले, हा माझा शोध आहे का? तो तर तुम्ही आम्ही सामान्य माणसाने लावलेला शोध आहे. म्हणजे भंगाराचे सोने होते, ही परीकथा किंवा भाकडकथा उरते काय? भंगाराचे सोने होऊ शकते याची साक्ष आपल्यातलेच अनेकजण रोजचा रोज देत असतात. राहिला प्रश्न यातल्या परीसस्पर्शाचा. भंगाराचे सोने झाले हे तुम्ही आता मान्य कराल. पण त्याला कोणत्या परीसाने स्पर्श केला? ते मी सांगायला हवे का? त्या भंगाराला निवडणुकीत मतांचा स्पर्श कोण करतो? मतदार कोण आहे? तुम्ही आम्हीच ना? मग या कथेतला परीस कोण आहे? ज्याच्या स्पर्शाने भंगाराचे सोने झाले तोच परीस असणार ना? मग तो परीस तुम्हीआम्ही सामान्य मतदारच नाही का? आपल्याच परीस स्पर्शाने कुणाचे तरी दर पाच वर्षांनी सोने होऊन जाते ना? हा माझा दावा नाही. असे मी सर्वत्र आजकाल ऐकत असतो. ते खोटे असेल तर तसे बोलणारे खोटारडे आहोत. नाहीतर परिसाची कथा भाकड नाही. कारण त्या कथेतला परीस व भंगाराचे सोने आपल्या समोरच आहे. विश्वास कशावर ठेवायचा? स्वत:च्या अनुभवावर की अन्य कुणाच्या शब्दावर? मागल्या कित्येक निवडणुकीत आपण किती भंगार लोकांचे सोने करून टाकले, त्याची आपण मोजदाद तरी ठेवली आहे काय? झोपडीत जगणारे, बसच्या रांगेत दिसणारे, उदरनिर्वाहासाठी कष्ट उपसणारे, कित्येकजण आज सोन्याचे होऊन गेले आहेत. अंगाखांद्यावर मावणार नाही, इतके सोने परिधान करताना दिसतात. ती किमया कोणाची? आपलीच ना? जनता, मतदार नावाच्या परीसाने केलेली ती जादू नाही काय? ज्यांचे सोने झाले त्याबद्दल बोटे मोडत बसलेले आपण, कधी परीस आहोत म्हणजे काय; त्याचा गंभीर विचार तरी केला आहे काय? तेही सोडून द्या. आपल्या स्पर्शाने ज्या भंगाराचे आपण सोने केले, त्याच्या बदल्यात आपले काय झाले; त्याकडे तरी आपण बारकाईने कधी बघितले आहे काय? हीच तर खरी शोकांतिका असते. परीसाचे काय झाले ते गोष्टीतही कोणी सांगत नाही आणि आपल्या जीवनातही आपण परीस असताना, आपले काय झाले त्याकडे बघायला आपल्याला सुचत नाही.
होय मित्रांनो, भंगाराचे सोने करताना परिसाचे जे होते, तेच आपले मागल्या कित्येक वर्षात प्रत्येक निवडणुकीनंतर झाले आहे. भंगाराला सोने करण्याच्या जादूचे यशस्वी प्रयोग करताना, आपण मात्र स्वत:चे भंगार करून घेतले आहे. परीस आपल्या स्पर्शाने भंगाराचे सोने करतो; या गोष्टीची दुसरी बाजू अशी, की त्यासाठी परीसाला मात्र स्वत:चे भंगार करून घ्यावे लागत असते. परीस म्हणजे आपली पुण्याई, आपली कष्टाची कमाई असते. कधी आपण ती मताच्या रुपाने कुणाच्या पारड्यात टाकतो, तर कधी कसल्या मोहात सापडून कुठल्या गुंतवणूक योजनेत घालत असतो. त्यात आपली फ़सवणूक करणार्याचे सोने होऊन जाते आणि आपली किंमत भंगारापेक्षाही कवडीमोल होऊन जाते. कुठे कोणाला आणि कशाला स्पर्श करावा; याचे भान ठेवले नाही तर परीसाचे असेच भंगार होत असते. परीसाची भंगाराला गरज असते. परीसाला बाजारभाव नसतो. पण त्याच्या स्पर्शाने सोने झाल्यास भंगाराला बाजारभाव मिळणार असतो. म्हणुनच परीसाने आपला स्पर्श जपून व सावधपणे करणे अगत्याचे असते. कुणाचे सोने करण्यापेक्षा आपले भंगार होऊ नये याची परीसाने काळजी घ्यायला हवी असते. तिथे चुक झाली मग संपले. याचा आपण सामन्य जनताच सर्वात मोठा पुरावा आहोत.
गुंतवलेले पैसे वाढावेत, ही अपेक्षा चुकीची नाही. पण ते दुप्पट चौपट होण्याची अपेक्षा खोटी व फ़सवी असते. तिथेच आपण भंगाराच्या नादी लागत असतो आणि स्वत:चे भंगार करून घेत असतो. उलट निदान आपले भंगार होऊ नये एवढी काळजी घेतली तरी खुप आहे. परीस स्वत:चे सोने करायच्या मोहातब सापडून जेव्हा चुकीच्या जागी स्पर्श करतो, तेव्हाच भंगाराचे सोने होताना परिसाचे मात्र भंगार होऊन जात असते. कोणी तरी फ़ुकट टीव्ही देतो म्हणतो. फ़ुकट विजपुरवठ्याचे आश्वासन देतो. आरक्षणाचे आमिष दाखवतो. त्या मोहात कोण सापडतो? मग कोणाचे भंगार होते? सचिन तेंडूलकरच्या खासदारकीत मध्येच ही परीसाची गोष्ट कुठून घुसली? त्याचे उत्तर उद्या देईन. (क्रमश:)
भाग ( २५९ ) ९/५/१२
आज सोने झालेल्यांनी कधीतरी हा परिस जबरदस्तीने हिसकावून आपल्याला लावून घेतला आहे असे नाही तुम्हाला वाटत ? परिसाने स्वेच्छेने भंगाराचे सोने केले असे जे व्यक्त होते आहे ते फारसे खरे नाही असे मला वाटते.
उत्तर द्याहटवाकधी अनुदानाच्या, कधी जातीच्या, कधी आरक्षणाच्या तर कधी आमिषाच्या मोहात सापडून आपणच त्यांच्या जवळ जातो आणि स्पर्शाने त्यांचे सोने होऊन जाते. आपल्याला जाग येते ती आपले भंगार झाल्यावर
उत्तर द्याहटवाभाऊ साहेब,तुमच म्हणन सर्वांना कळतं...पण वळत कुणाच नाही.
उत्तर द्याहटवाhe ase parisache hot rahanarach karan parisala swat:che mahatv kalat nahi.
उत्तर द्याहटवा