आता जंतरमंतर येथील उपोषणातून काही निष्पन्न होत नाही म्हटल्यावर अण्णा टीमने काही मान्यवरांचे आवाहन मान्य करून राजकीय पर्याय निर्माण करण्याची घोषणा केली आहे. त्याची गरज होती काय? आधीपासून योग्य दिशेने वाटचाल केली असती, तर असे नामोहरम होऊन अन्य पर्याय शोधायची वेळ नक्कीच आली नसती. लोकांचा पाठींबा मिळाला त्याचा लाभ घेऊन अण्णांनी राजकीय पर्यायाकडे तेव्हाच वळायला हवे होते. जो लोकपाल मान्य करील त्याला पाठींबा. मग तो उमेदवार भ्रष्ट आहे की स्वच्छ आहे ,त्याची पर्वा करण्याचे कारण नाही. युद्धामध्ये शेवटी साध्य महत्वाचे असते आणि आहे. आज ज्या संसदेकडून लो्कपाल पास करून घेण्याचा अट्टाहास आहे, तिथे किमान वीस टक्के भ्रष्ट व आरोपी खासदार बसलेत; असे अण्णा टीमच म्हणते ना? मग त्यांनी संमत केलेला लोकपाल चालणार असेल, तर लोकपाल आणायचे आश्वासन देणारा भ्रष्ट उमेदवार का नको? एकदा अशी भूमिका मागल्या ऑगस्टच्या यशानंतर घेतली असती; तर कॉग्रेसची बोबडी वळली असती. कारण तेव्हा अण्णा टीमचा दबदबा निर्माण झालेला होता. पण तशी ठाम भूमिका घ्यायची टाळाटाळ झाली. अण्णांबद्दल सहानुभूती असलेला जो सामान्य समाज आहे; त्याला भ्रष्टाचार नको आहे. पण त्याचवेळी त्याला ठामपणे सत्ता चालवणारे व राबवणारे सरकार सुद्धा हवे असते. म्हणुन तर कितीही बदनाम झाले असले; तरी नरेंद्र मोदी निवडून येतात. कारण ते खंबीर सरकार चालवू शकतात. शुद्ध पवित्र माणसापेक्षा खंबीर व हुकूमत गाजवू शकणारा धाडसी नेता लोकांना हवा असतो. मग तो भ्रष्ट असला तरी चालेल. हे अण्णा टीमला लक्षात घ्यावेच लागेल. राजकीय पर्याय देण्याची घोषणा सोपी आहे. पण तो पर्याय म्हणजे काय, त्याचा आधी अभ्यास करावा लागेल.
ज्या इंदिरा गांधींना त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातही लोकांनी 1977 साली पराभूत केले होते, त्याच इंदिराजींना त्याच मतदाराने अवघ्या तीन वर्षात पुन्हा देशाची सत्ता बहाल केली होती. तेव्हा इंदिराजीमध्ये लोकांनी काय बघितले? तेव्हा लोकांनी विरोधी जनता पक्षीयांची कुठली गोष्ट नाकारली होती? इंदिरा गांधींपेक्षा जनता पक्षीय अधिक शुद्ध व चांगले होते. पण त्यांची धरसोडवृत्ती लोकांना नकोशी झा्ली होती. इंदिराजींच्य़ा हुकूमशाहीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी लोकांनी जनता पक्षाला त्याच्या अंतर्विरोधासहीत निवडून दिले होते. पण ती हुकूमशाही संपण्यापुर्वीच त्यातले समाजवादी उपटसुंभ हिंदुत्वाचा बागुलबुवा करुन आपसात लढू लागले. तेव्हा लोकांनी इंदिराजींची हुकूमशाही मान्य केली. आजसुद्धा तशीच द्विधा अवस्था अण्णांची आहे. एकीकडे त्यांना नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे आकर्षण आहे. पण आपला सेक्युलर चेहरा जपण्यासाठी त्यांना भाजपा किंवा मोदींचे नाव घ्यायची भिती वा्टते. तिथेच त्यांची फ़सगत झाली आहे. त्याऐवजी ‘जो लोकपाल आणायचे मान्य करील तो’ असा ठाम पवित्रा घेण्याची अण्णांची धमक आहे काय? मग तो नरेंद्र मोदी असेल किंवा नितीशकुमार असेल, त्याची फ़िकीर अण्णांनी करू नये. लोकांना आणि अण्णंना लोकपाल हवा आहे, लोकांना भ्रष्टाचारापासून मुक्तता हवी आहे. लोकांना परदेशात दडवून ठेवलेला काळापैसा मायदेशी परत आणणारा खमक्या नेता पंतप्रधान म्हणून हवा आहे. त्यांना सेक्युलर किंवा हिंदुत्ववादी असा कोणी नको आहे. जो खंबीरपणे देशाचा कारभार चालविल आणि समस्यांवर ठामपणे उपाय शोधून अंमलात आणायची हिंमत दाखविल, असा नेता हवा आहे. नुसता लोकपाल नको आहे. अण्णांपाशी असा कुठला पर्याय आहे काय? नसेल तर लोक अण्णांना सहानुभूती दाखवतील. पण त्यांच्या धरसोडवृत्तीच्या पक्ष वा उमेदवारांना मते देणार नाहीत. म्हणुनच राजकीय पर्याय देणार म्हणजे काय ते आधी अण्णा टीमला नक्की करावे लागेल.
मजेची गोष्ट बघा. देशाच्या पातळीवर असा कोणीच नेता कुठल्याही पक्षाने समोर आणलेला नाही. पण एका बाजूला पंतप्रधान मनमोहन सिंग सत्तेत आहेतच आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले जात आहे. काही उद्योगपतींनी त्यांचे नाव पुढे केलेले आहे. तर माध्यमातूनही त्यांच्याच नावाची चाचपणी चालू आहे. दोन महिन्यांपुर्वी घेतलेल्या विविध चाचण्यांपमध्ये मोदी यांना देशात सर्वाधिक मान्यता असल्याचे दिसून आले. अगदी आजच्या विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापेक्षाही मोदींच्या नावाला देशभरात लोकांची अधिक मान्यता का असावी? ज्या माणसाला गेली दहा वर्षे तमाम माध्यमे व राजकीय पक्ष सतत बदनाम करीत आहेत, त्याचा पक्षही त्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार बबवण्यास बिचकतो आहे, त्याला देशाच्या तमाम राज्यातून इतका पाठींबा का मिळावा? त्याची प्रतिमा स्वच्छ आहे काय? तो देशव्यापी नेतृत्व केलेला नेता आहे काय? त्याच्याकडे फ़क्त बदनामी आहे. पण त्याने जे काम दहा वर्षात एका राज्यात केले आहे व ते करताना जो ठामपणा दाखवला आहे, त्याच्या तुरळक बातम्याही लोकांना त्याच्याबद्दल आस्था निर्माण करणार्या ठरल्या आहेत. त्यातून त्याचे देशभर चहाते निर्माण झाले आहेत. इंदिराजींनंतर तोच दुसरा असा खंबीर भारतीय नेता म्हणून उदयास येतो आहे. कारण तो जे बोलतो, ते करू शकतो, असा विश्वास त्याने कृतीमधून निर्माण केला आहे. मग त्याच्या चारित्र्यावर कितीही डाग पडलेले असोत किंवा त्याच्याबद्दल कितीही आक्षेप घेतले जात असो. राजकीय पर्याय तसा असावा लागतो. ज्याच्या हाती सत्ता सोपवली तर देश सुरक्षित असेल असे लोकांना वाटते, तसा पर्याय द्यावा लागतो. नुसता लोकपाल देईन, असे म्हणुन निवडणुका लढता येणार नाहीत की जिंकता येणार नाहीत.
म्हणुनच गेल्या गुरूवारी अण्णांनी जी घोषणा केली आहे, त्याचे गांभिर्य किंवा व्याप्ती त्यांना किती कळली आहे याची शंका वाटते. चांगल्या चारित्र्याचे उमेदवार देऊन निवडणुका लढवता येत असतात, पण जिंकता येत नसतात. आणि राजकीय पर्याय म्हणजे निवड्णूका जिंकायचा पर्याय असावा लागतो. नाहीतर त्याची तिसरी आघाडी होते. तेव्हा स्वत:चा पक्ष काढण्याचे अण्णांचे मनसुबे कितीसे यशस्वी होतील, याची शंकाच आहे. कॉग्रेस भाजपा यांना दुर ठेवून तिसरा पर्याय द्यायला पुढे आलेल्या अनेक सेक्युलर डाव्या पक्षांना अनेक वर्षात ते जमले नाही, तर नवख्या अण्णा टीमला जमेल अशा भ्रमात कोणी रहाण्याची गरज नाही. त्यापेक्षा अण्णांनी आपल्या मूळ हेतूला सुरूंग लावणार्या कॉग्रेसला पराभूत करण्याचा मनसुबा बांधून विरोधी पक्षांना लोकपाल आणण्याच्या बोलीवर पाठींबा देण्याचे राजकारण करावे हे उत्तम. मग तो पक्ष कुठला आहे किंवा त्याचे तत्वज्ञान कुठले आहे; त्या भानगडीत पडायचे कारण नाही. जर कॉग्रेसला मतांसाठी शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यात लाज वाटत नसेल; तर लोकपाल मिळवण्यासाठी अण्णांनी भाजपा किंवा मार्क्सवादी अशा कोणाचीही मदत घेण्यात गैर काहीच नाही. महाभारताच्या युद्धात चिखलात रुतलेले रथाचे चाक बाहेर काढणार्या कर्णावर हल्ला करायचा सल्ला अर्जुनाला श्रीकृष्णानेच दिला होता ना? तो अधर्मच होता. पण ज्या कर्णाने अभिमन्यूला चक्रव्युहामध्ये एकाकी गाठून मारताना धर्म पाळला नाही, त्याला तशीच वागणुक देताना धर्म म्हणजे तत्व गुंडाळून ठेवायचे असते, हीच त्यातून मिळणारी शिकवण आहे. तेव्हा कर्ण क्षत्रिय धर्माचा हवाला देतो आणि श्रीकृष्ण त्याला चक्रव्युहाची आठवण करून देतो. अण्णांना ते करता आले पाहिजे. कोणी संघ वा मोदी यांची मदत घेतल्यास नाके मुरडत असेल तर प्रणबदा मातोश्रीवर का गेले, असे ठणकावून विचारण्याची हिंमत अण्णांना दाखवता आली पाहिजे.
राजकारण हा प्रामाणिकपणाचा खेळ नाही, तिथे एकमेकांशी हसतखेळत केलेल्य दगाबाजीलाच राजकारण म्हणतात. अनेकदा इतर पक्षातले चांगले कार्यकर्ते किंवा उमेदवार फ़ोडूनही शरद पवार त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे दोस्तच राहिले आहेत, त्याला राजकारण म्हणतात. दिला शब्द फ़िरवण्याची व सोयीनुसार तत्वज्ञान गुंडाळून ठेवण्याची बेशरम क्षमता म्हणजे राजकीय धुर्तपणा मानला जातो. अण्णा टीमला त्याची जाणीव आहे काय? मुंबईत येऊन, "बिहारी युवकोंने कसाबसे मुंबईको बचाया" किंवा "उत्तरप्रदेशी मुंबई आकर विकास करते है", असे बोलायचे आणि तिकडे उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत "मुंबईत कशाला भिक मागायला जाता", असाही बेछूट सवाल करायचा, हे राहुल गांधींना जमते ते अण्णा टीमला जमणार आहे काय? त्यालाच राजकारण म्हणतात. ( क्रमश:)
भाग ( ३५१ ) ९/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा