गेल्या ११ ऑगस्ट रोजी आझाद मैदान परिसरात जे काही घडले आणि ज्या वेगाने व पद्धतीने घडले; तेव्हा अशा विषयातले एकूण एक जाणकार गोध्रा नामक एक रेल्वे स्थानक आपल्या देशात आहे, हे कसे विसरून गेले? देशात शेकडो नव्हेतर हजारो रेल्वे स्थानके आहेत. पण त्यात जेवढा बातम्यांमधून माध्यमांमधून गोध्रा रेल्वे स्थानकाचा उल्लेख झाला आहे, तेवढा क्वचितच अन्य कुठल्या स्थानकाचा उल्लेख आलेला असेल. कारण याच गोध्रा स्थानकाने एकविसाव्या शतकातली पहिली ऐतिहासिक घटना घडवली होती. तिला आता साडे दहा वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. २७ फ़ेब्रुवारी २००२ रोजी दुपारच्या सुमारास ती घटना घडली होती. इथे मुद्दाम काय घडले त्याचे छायाचित्र दिले आहे. त्यात एक रेल्वेचा डबा आगीत भस्मसात होताना दिसतो आहे. ती ऐतिहासिक घटना नाही. तर त्या जळीताने पुढल्या ऐतिहासिक घटनाक्रमाला चालना दिली होती. आज दहा वर्षे उलटू्न गेली तरी कोणी तो घटनाक्रम विसरायला तयार नाही. कुठेही दंगल किंवा हिंदू-मुस्लिम विषय निघाला; मग स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारी मंडळी तिथूनच श्रीगणेशा करत असतात. कारण असो वा नसो, त्या गोध्रा जळीतकांडाच्या उल्लेखाशिवाय सेक्युलर विचारवंत पुढले पाऊलच टाकू शकत नाहीत. मात्र त्यातल्या कुणालाच तत्पुर्वीच्या गोध्रा जळीताबद्दल बोलायची गरज वाटत नाही. काय झाले होते २७ फ़ेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकात?
तेव्हा अयोध्येमध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या शिलान्यासाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गुजरातमधून तिकडे गेलेल्या कारसेवकांचा परतीचा प्रवास सुरू होता. त्यातले काहीजण त्या दिवशी साबरमती एक्सप्रेस गाडीने अहमदाबादला परत येत होते. त्यातले बहुतांश एकाच डब्यात बसलेले होते. ती गाडी गोध्रा स्थानकात आल्यानंतर तिथे म्हणे प्रवासी व स्थानकावरील विक्रेत्यांची बाचाबाची झाली. त्याचे अनेक बिनपुराव्याचे किस्से माध्यमातून झळकलेले आहेत. मग तिथून साबरमती गाडी सु्टली आणि किलोमिटरभर अंतरावर पुन्हा थांबली. काय होते आहे ते कळण्यापुर्वीच त्या गाडीच्या एका डब्यावर प्रचंड जमावाने हल्ला चढवला. भितीने प्रवाशांनी डब्याच्या खिडक्या दारे बंद करून घेतली. मग तर तो डबाच ज्वालाग्राही पदार्थ ओतून पेटवून देण्यात आला. मग त्यातून बाहेर पडू बघणार्यांना आत ढकलले जात होते. ती वर्णने आलेली आहेत. सर्वपरिचित आहेत. त्यात ५९ प्रवाश्यांचा जळून व होरपळून मृत्यू झाला. गोध्रा स्थानकावर बाचाबाची झाल्याने स्थानिक रहिवाश्यांनी केलेला तो हल्ला होता, असे सांगण्यात आले. तो सगळा घटनाक्रम अवघा तासाभरात पार पडला होता. आणि म्हणुनच तो अत्यंत संशयास्पद होता.
गोध्रा स्थानकात प्रवासी किंवा कारसेवक आणि फ़ेरीवाले यांच्यात बाचाबाची झाली हे खरे मानले; तरी त्यानंतर त्या फ़ेरीवाले किंवा त्यांच्या सहकार्यांनी जो प्राणघातक खुनी हल्ला रेल्वेच्या डब्यावर चढवला, त्याचे कुठलेही तार्किक उत्तर मिळत नाही. इतक्या कमी वेळात त्या चिडलेल्या फ़ेरीवाल्यांनी आपल्या साथिदार दोस्तांना ते कळवणे, जमवणे आणि त्या प्रचंड जमावाने सुटलेली गाडी रुळावरच अडवून पेटवून देणे अशक्य गोष्ट आहे. कारण तिथे गाडी अडवणे शक्य आहे आणि अगदी मशीदीतून आवाहन केल्यावर इतका मोठा जमाव एकत्र येणेही एकवेळ मान्य करता येईल. पण पोलादी पत्रे व धातूने बनलेला रेल्वे डबा पे्टवून द्यायला, अत्यंत ज्वालाग्राही पदार्थाची गरज असते आणि तो पदार्थ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असायला हवा. तेवढा त्या ज्वालाग्राही पदार्थाचा साठा त्या जमावाने इतक्या अल्पवधीत मिळवला कुठून? त्याचे तार्किक उत्तर सापडत नाही. म्हणजेच त्या हल्ल्याची व आग पेटवण्य़ाची तयारी खुप आधीपासून झाली होती. त्यासाठी निमित्त मिळावे म्हणून मग साबरमती गाडी स्थानकात आल्यावर प्रवाशांशी कुरापत काढून बाचाबाची करण्यात आली. ही कुरापत आहे ते प्रवाशांना ठाऊकही नसेल. पण सर्वकाही योजनेनुसार झाल्यावर स्थानक सोडल्यावर गाडी अडवण्यात आली आणि नेमका कारसेवकांचा डबाच पेटवून देण्यात आला. ही जी तयारी आहे तशीच तयारी परवाच्या आझाद मैदान दंगलीत आढळून येत नाही काय? दोन्ही घटनांमध्ये दहा वर्षाचे अंतर असले तरी त्यातली मोडस ऑपरेंडी सारखीच आहे. जेवढ्य़ा अल्पावधीत गोध्रा येथे रेल्वेचा डबा पेटवून प्रवाश्यांना जाळण्यात आले आणि एकत्र आलेला जमाव झटपट पांगला; तेवढ्याच वेगाने आझाद मैदानावरील दंगल पेटली आणि संपलीसुद्धा आहे. ह्या दोन्हीतले साम्य निव्वळ योगायोग आहे काय? की इथे मुंबईत गोध्राची पुनरावृत्ती घडवायचा हेतू होता?
कारण नसताना गोध्रामध्ये ५९ प्रवाशांना आणि त्यातही कारसेवकांना जिवंत जाळण्याची घटना अत्यंत चिड आणणारी होती. तरीही एक दिवस शांततेत गेला. गुजरात सर्द झाला होता. मात्र शवचिकित्सा होऊन त्या जळलेल्या कारसेवकांचे कोळसा झालेले मृतदेह दुसर्या दिवशी अहमदाबादला आणले गेले तिथून गडबड सुरू झाली. त्यात मुख्य भूमिका माध्यमे व वाहिन्यांनी पार पाडली. त्यांनी ते कोळसा झालेल्या मृतदेहांचे थेट प्रक्षेपण केले आणि सामान्य माणसाचा धीर सुटला. बघताबघता दंगल सुरू झाली गोध्रा येथे कारसेवकांना जिवंत जाळणारा जमाव मुस्लिमांचा होता आणि त्याचेही चित्रण वाहिन्यांनी दाखवले होते. बातमीतून सांगितले होते. मग त्यातून हिंदूंच्या भावनांचा कडेलोट झाला आणि बघताबघता संपुर्ण गुजरातभर हिंदू मुस्लिम दंगल पेटली. त्यात अर्थातच अधिक मुस्लिम मारले गेले. कुठल्याही देशात असेच होते. जेव्हा दंगल होते तेव्हा जो समाजगट अल्पसंख्य असतो त्याचीच जास्त हानी व नुकसान होत असते. मग त्या भयंकर दंगलीत मुस्लिम अधिक मारले गेले तर नवल नव्हते. पण केवळ मुस्लिमांचीच कत्तल झाली वा करण्यात आली असेच चित्र माध्यमांनी कायम रंगवले. प्रत्यक्षात गुजरातच्या दंगलीत मुस्लिमांच्या तुलनेत निम्मे हिंदूही मारले गेले आहेत. तेव्हा ती दंगल एकतर्फ़ी नव्हती हे स्पष्ट व्हावे. पण तो इथे मुद्दा नाही. मुद्दा आहे तो आझाद मैदानची जाळपोळ आणि गोध्राची जाळपोळ कशी समान व सारखी आहे त्याचा. दोन्हीकडे पुर्वनियोजन व पुर्वतयारीनीशी हल्ले करण्यात आले आणि झटपट ठरल्या वेळेत काम उरकण्यात आले. त्यातली सफ़ाई उघड दिसणारी आहे. दोन्हीकडला हल्ला उत्स्फ़ुर्त नव्हता. तर पुर्वनियोजित होता.
ज्यांनी ते कारस्थान रचले व पार पाडले त्यांना त्याचे परिणाम देखिल ठाऊक असतात. त्यातून दंगल भडकली तर त्यात अधिकाधिक मुस्लिमच मारले जातील, याची कारस्थान रचणार्यांना पुर्ण कल्पना होती; तरीही त्यांनी हा उद्योग केला होता. कारण त्यातून त्यांना हिंदू मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करायची होती. आणि त्यानंतर किंवा त्यापुर्वीही अशाच प्रकारे मुद्दाम दंगली घडवण्याला चिथावणी देण्याचे उद्योग झालेले आहेत. मग मुंबईतले बॉम्बस्फ़ोट असोत किंवा कसाब टोळीने केलेली कत्तल असो. त्यामागचा हेतू स्पष्टच आहे आणि असतो. एक म्हणजे मुस्लिम इतरांशी सहजीवन जगू शकत नाहीत वा इच्छित नाहीत हे सिद्ध करणे. दुसरे त्यातून दोन्ही समाज घटकांमध्ये परस्परांविषयी अविश्वासाची भावना निर्माण करणे. परवा आझाद मैदान येथे जो दंगा घडवण्यात आला त्यामागच हेतूसुद्धा तोच होता. पोलिस व माध्यमांवरील हल्ल्याबरोबर महिला पोलिसांशी करण्यात आलेले वर्तन अत्यंत बोलके आहे. त्यात म्यानमार किंवा आसामच्या विषयावर चीड व्यक्त करण्यापेक्षा दुसर्या कुणाच्या भावना दुखावण्य़ाचा हेतू अजिबात लपून रहात नाही. कोणी तरी चिडून उलट हल्ला चढवावा; असाच त्यामागचा हेतू नाही काय? नाही तर अमर जवान ज्योतीची मोडतोड कशाला? त्याची जी छायाचित्रे प्रकाशीत झाली आहेत, ती कुणाही स्वाभिमानी भारतीयाला चीड आणणारी नाहीत काय? ज्यांनी असे कृत्य केले त्यांचा धर्म कुठला त्यापेक्षा त्यांचा देश कुठला असा प्रश्न मनात येतो की नाही? मग ज्यांनी हा उद्योग केला त्यांना मुंबईत गुजरातप्रमाणे सार्वत्रिक दंगे घडवून आणायचे होते, असा आरोप का होत नाही? कोणाला अशी शंका का येत नाही? पुण्यात फ़ुसके बॉम्ब फ़ुटले तर त्यात कुणा संशयिताचे नाव पाटिल आहे म्हणुन त्यात हिंदू दहशतवाद शोधू बघणार्यांना आता आझाद मैदानच्या दंगलीनंतर त्यातली जिहादी मानसिकता कशी दिसत नाही? ( क्रमश:)
भाग ( ८ ) २३/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा