गेल्या अर्धशतकात कॅच 22 अशी एक उक्ती इंग्रजी भाषेत प्रचलित झाली आहे. त्याचे कारण त्याच नावाचे खुप गाजलेले एक पुस्तक आहे. दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एका लेखकाने लिहिलेले हे उपरोधिक विनोदी पुस्तक आहे. युद्धासारख्या गंभीर पार्शवभूमीवर विनोद म्हणजे कोणालाही चमत्कारिक वाटेल. पण खरेच हे पुस्तक कमालीचे विनोदी तेवढेच बोचक व रोचक आहे. त्यातला लेखक हा सक्तीच्या भरतीमुळे युद्धात लोटला गेलेला आहे. त्याची लढण्याची अजिबात इच्छा नाही. पण कायद्याची सक्ती त्याला त्यात ओढून घेते. मग जुलमाचा रामराम म्हणुन त्यात उतरलेल्या या माणसाने अत्यंत तटस्थपणे युद्धाकडे बघताना त्यातला विरोधाभास व उपरोध शोधुन त्यावर नेमके बोट ठेवण्याचा प्रयत्न त्या पुस्तकातून केला आहे. त्या पुस्तकाच्या नावातच तो विरोधाभास सामावला आहे. कॅच 22 म्हणजे अमेरिकन हवाई दलाच्या वैमानिकांसाठी असलेल्या नियमावलीतील 22 वा नियम आहे.
सेनादलात कधीही आज्ञा शिरसावंद्य असते. वरिष्ठांच्या आज्ञेला झुगारता येत नाही, ती तुम्हाला पटणारी असो किंवा नसो, तिचे पालन करावेच लागते. हवाई दल त्याला अपवाद नाही. त्यामुळेच ज्या हवाई दलातील वैमानिकाला हल्ला करण्यासाठी उड्डाण करायची आज्ञा मिळत असे, त्याला जावेच लागत असे. त्यातून सुटका नव्हती. ज्याला एखादे दिवशी उड्डाणाला जायचे नसेल त्याने अगोदर नियम 22 नुसार सुट्टी घेतली पाहिजे. ती सुट्टी फ़क्त एकाच कारणास्तव मि्ळत असे. डोके ठिकाणावर नाही किंवा मनस्थिती ठिक नाही, एवढे एकच कारण उड्डाणापासून सवलत मिळवायला मान्य व्हायचे. हा त्या 22 व्या नियमाचा पहिला भाग होता. दुसरा भाग असा, की अशा सुट्टीसाठी अर्ज करताना डोके ठिकाणावर व मनस्थिती ठीक असली पाहिजे. आता या नियमाचे पालन कसे करायचे?
डोके ठिकाणावर असताना किंवा मनस्थिती ठीक असताना, तेच नाही असा अर्ज करायचा कसा? थोडक्यात जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा मनस्थिती ठीक नसेल तर तुम्ही अर्जच करू शकत नाही. आणि मनस्थिती ठिक असताना तुम्ही अर्ज करू शकता, पण सुट्टीसाठी तुमच्याकडे कारणच नसते. थोडक्यात तुम्हाला उड्डाण करण्यातून सुट्टी व सवलतीसाठी जे नियम आहेत त्यानुसार ती सुट्टी मिळूच शकत नाही. जी सवलत नियमाचा पहिला भाग देतो, तीच सवलत नियमाचा दुसरा भाग काढून घेतो. म्हणजे दोन्हीकडून तुमची फ़सगत आहे. सुट्टी मिळत नाही असा दावा तुम्ही करू शकत नाही. आणि नियमात बसत नाही म्हणून तुम्हाला सुट्टी मिळूच शकत नाही. मराठीत आपण त्याला इकडे आड तर तिकडे विहीर असे म्हणतो. आपल्या देशाची एकूण परिस्थिती सध्या नेमकी तशीच आहे. अगदी कुठल्याही विषयाचा, प्रश्ना्चा वा समस्येचा विचार करा, सोडवायला गेलात मग नेमके तसेच गुंतून पडाल. समस्या सुटत नाही आणि सांगणारे म्हणतात नियमानुसारच समस्या सोडवल्या पाहिजेत. मग समस्या सुटत नाहीत. कारण त्या सोडवताच येत नाहीत. जर समस्या असेल तर ती नियमानुसार सोडवली पाहिजे आणि त्यासाथी समस्या नियमात बसणारी असायला हवी. ती समस्या असेल, पण नियमांच्या चौकटीत बसणारी नसेल तर ती समस्याच नाही आणि त्यावर काहीही करताच येत नाहीत.
म्हणूनच जे कोणी समस्या सोडवायला मोठ्या हिरीरीने पुढे सरसावतात ते चक्रव्युहात फ़सलेल्या अभिमन्यूप्रमाणे अगतिक होऊन जाताना दिसतात. अण्णा हजारे यांच्यापासून रामदेवांपर्यंत आणि सुब्रह्मण्यम स्वामींपासून आमिर खानपर्यंत सगळेच कॅच 22 परिस्थितीत फ़सलेले तुम्हाला दिसतील. अण्णा म्हणतात, लोकपाल कायदा आणा. सरकार म्हणते तसा मसूदा संसदेसमोर आहे. रामदेव म्हणतात परदेशात दडवलेला काळापैसा परत आणा. सरकार म्हणते त्यासाठी कसोशीचे प्रयत्न चालू आहेत. अशा लोकांची यादी व बॅंक खात्याची माहिती सरकारकडे आली आहे. पण नियमनुसारच कारवाई होऊ शकते. ती का होत नाही, त्याचे उत्तर सरकारपाशीसुद्धा नाही. सुब्रह्मण्य़म स्वामी कोर्टात याचिका घेऊन झगडत आहेत. त्याच्या तारखेवर तारखा पडत आहेत. निकाल कुठलाच लागत नाही. आमिर खान ‘सत्यमेव जयते’मधून लोकांना नवनवे प्रश्न, अन्याय, अत्याचार याबद्दल सांगतो आहे. म्हणजे जे अन्याय अत्याचार राजरोस चालू आहेत व लोकच ज्या अनुभवातून जात आहेत, त्याचा त्याच पिडीतांना पत्ता नाही. आमिर खानला त्यासाठी पुढे यावे लागले आहे. ज्यांना दुखते आहे त्यांना त्यांचे दुखणे समजावाणे त्याला भाग पडते आहे. मात्र उपाय काही होत नाही. समस्या संपत नाहीत. अन्याय संपत नाहीत. भ्रष्टाचारही अधिकच बोकाळत चालला आहे. नवा दिवस उजाडला, मग कालचा दिवस बरा होता म्हणायची वेळ, सामान्य माणसावर आली आहे. स्पेक्ट्रम घोटाळा मोठा वाटत असताना राष्ट्रकुल घोटाळा समोर आला. त्यावर कल्लोळ सुरू असताना आदर्श घोटाळा आला. तो पचवतो आहोत तोवर कोळसा खाणीचा घोटाळा समोर आला. त्याच्या मध्यंतरी लष्कराच्या खरेदीत जुने चिलखती ट्रक चौपट किंमतीत खरेदी करण्याचा घोटाळा समोर आला. गारूड्याच्या फ़ाटक्या पोतडीतून सापाने डोके बाहेर काढावे, तसाच प्रकार चालू आहे. एका सापाला झाकले तर दुसरा नव्या भोकातून तोंड बाहेर काढतोच आहे. मग ती पोतडी झाकण्यातच सत्ताधार्यांची सगळी शक्ती खर्च होते आहे आणि बाकी सरकार म्हणुन ज्या जबाबदार्या पार पाडायच्या त्याला सत्ताधार्यांना सवडच मिळेनाशी झाली आहे.
मात्र इतके असूनही कोणाला जाब विचारण्याची सोय नाही. सत्ताधारी पक्ष वा आघाडीवाले नियमानुसार कारवाई होईल असे ठासून सांगत असतात. आणि नियम काय आहे? कुठलेही प्रकरण घ्या; आधी सरकार आरोपांचा साफ़ इन्कार करते. मग स्पेक्ट्रम असो की राष्ट्रकूल घोटाळा असो. नंतर त्याची लक्तरेच चव्हाट्यावर येत असतात. जेव्हा त्यावर न्यायालयाचा बडगा बसतो, तेव्हाच सरकार कामाला लागते. पण आधी शंका व्यक्त झाली वा आरोप झाला मग स्वच्छ चारित्र्याच्या पंतप्रधानांवर आरोप करणार्यालाच गुन्हेगार ठरवण्याची स्पर्धा चालते. आता ताजी बातमी घ्या. अण्णा टीम जंतरमंतर येथे उपोषणाला का बसली आहे? दोन महिन्यांपुर्वी अण्णा टीमच्या अरविंद केजरीवाल यांनी कोळसा खाणीचे परवाने देताना अब्जावधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप केला. थेट पंतप्रधान कार्यालयावर आरोप केला. तेव्हा त्यांनाच बेताल ठरवण्य़ाचा प्रयत्न झाला. पण या संबंधात कोणा खासदाराने दक्षता आयोगाला पत्र लिहीताच, आयोगाने ते सीबीआयकडे पाठवले आणि प्रथमदर्शनी पुरावा असल्याने सीबीआयने तपास हाती घेतला. नंतर त्याची चौकशी चालू झाली आहे. मग आधी इन्कार कशाला झाला? केजरीवाल यांनी पंतप्रधानावर नव्हेतर त्यांच्या कार्यालयावर आरोप केला होता. मग त्यात पंतप्रधानांच्या स्वच्छ चारित्र्याचा संबंध काय होता? म्हणजेच स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान, हा दावा एक दिशाभूल होऊन बसली आहे ना? की स्वच्छ चारित्र्याचा पंतप्रधान पुढे ठेवून बाकीच्यांनी त्याच्याआडून मोकाट भ्रष्टाचार करायचा अशी रणनिती आहे? आणि त्यालाही कोणी दाद दिली नाही, मग नियमानुसार कारवाईची पळवाट काढायची. थोडक्यात कायद्याने सर्व काही व्हायला हवे आणि कायदा काहीच करणार नाही. आहे ना कॅच 22?
शुक्रवारी अण्णा टीमने आपले उपोषण मागे घेतले तेव्हा ते लोक असेच कॅच 22 सापळ्यात अदकले होते. मग काही महत्वाच्या व्यक्तींनी व निवृत्त सनदी अधिकार्यांनी पुढाकार घेऊन अण्णा टीमची त्या सापळ्यातून सुटका केली. सरकार कुठलाही प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर पुधे काय करायाचे ही अण्णा टीमची समस्या बनली होती. तेव्हा सरकारकडे मागण्या करण्यापेक्षा रस्त्यावरचा लढा संसदेच्या आत घेऊन जाण्याचा पर्याय त्या मान्यवरांनी अण्णांसमोर मांदून त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. ती अर्थातच मानली गेली. कारण टीमसमोर अन्य पर्याय नव्हताच. कारण ते स्वत:च सरकारी व कॉग्रेसच्या जाळ्यात फ़सले होते. सवाल इतकाच आहे की यातून अण्णा टिम काय शिकणार आहे? अनुभवासारखा शिक्षक नसतो म्हणतात. मुंबई पाठोपाठ जंतरमंतरच्या अनुभवाने खुप काही शिकवले आहे. सवाल अण्णा टीम शिकणार की नाही इतकाच आहे. पुन्हा कॉग्रेसच्या कॅच 22 सापळ्यात अडकायचे नाही एवढे शिकले तरी खुप झाले. ( क्रमश:)
भाग ( ३४८ ) ६/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा