आजही आमच्या सेक्युलर पत्रकार व माध्यमांना गुजरातच्या दंगलीची आठवण सतत येत असते. नरेंद्र मोदी नाव निघाले, मग त्यांना फ़क्त दंगला आठवते. पण त्याच दंगलीच्या काळात घडलेले आणि आणि गाजलेले बडोद्याचे बेस्ट बेकरी प्रकरण आता कोणालाच फ़ारसे आठवत नाही. मग त्यातल्या कोणाला जाहिरा शेख तरी कशाला आठवणार? ही जगातली एक अशी चमत्कारिक केस आहे, की ज्यात एका निरागस अजाण तरूणीला सेक्युलर लोकांच्या नादी लागल्याने न्यायाच्या बदल्यात शिक्षा भोगावी लागली आहे. आता त्याला काही वर्षे उलटून गेली आहेत. सेक्युलर मंडळींच्या नादाला लागून मुस्लिमांचे काय हाल झालेत, त्याचा तो सर्वात भयंकर नमूना आहे.
दहा वर्षपुर्वी गुजरातमध्ये ज्या भीषण दंगली झाल्या, त्यात बडोदा शहरातील बेस्ट बेकरी जाळण्यात आली होती. त्यात जाहिरा शेखचे सर्व कुटुंबच बेकरीसह जाळले गेले होते. त्यासंबंधीचा खटला भरण्यात आला. तपास झाला आणि त्यात एका भाजपा आमदारासह कॉग्रेसच्या नगरसेवकालाही आरोपी करण्यात आलेले होते. पण कोर्टात जेव्हा तो खटला उभा राहिला, तेव्हा त्या घटनेतील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या जाहिरा शेखला आरोपी ओळखता आले नाहीत. तिने पोलिसांना जो जबाब दिला होता तोही नाकारला. त्यामुळे सर्व आरोपींची सुट्का झाली. मग एकदम कल्लोळ माजला. खटला चालला, तेव्हा त्यात जाहिरा किंवा तिच्या आईला मदत करायला कोणीही सेक्युलर गेला नव्हता. पण आरोपी सुटल्यावर धुमाकुळ सुरू झाला. जाहिरावर दडपण आणून तिला साक्ष फ़िरवायला लावली, धमकावले असे आरोप सुरू झाले. मग एके दिवशी तिला बडोद्याहून उचलून मुंबईत आणले गेले आणि थेट पत्रकारांसमोर तिला पेश करण्यात आले. इतक्या पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देण्याचीही बिचारीला हिंमत नव्हती. तिस्ता सेटलवाड नामक एका तोंडाळ महिलेच्या पुढाकाराने चालणार्या एनजीओच्या माध्यमातून हे प्रकरण चालू झाले होते. त्या पत्रकार परिषदेत जाहिराने आपल्याला धमक्या मिळल्याचे सांगितले आणि माध्यमातून धुमाकुळ सुरू झाला. गुजरातमध्ये न्यायव्यवस्थाही हिंदूत्ववाद्यांच्या दडपणाखाली आहे, म्हणुन दंगलीतले मोठे खटले गुजरात बाहेर मुंबईत चालवण्याचा आग्रह सुरू झाला. बेस्ट बेकरीचा खटला नव्याने मुंबईत चालवण्याची मागणी सुप्रिम कोर्टाने मान्य केली आणि त्यासाठी मुंबईत माझगाव येथे खास न्यायालय नेमण्यात आले. मधल्या कालात जाहिरा शेख हिचा ताबा तिस्ता सेटलवाड यांच्याकडे होता. तिस्ताच्या परवानगीशिवाय जाहिराला कोणी पत्रकारसुद्धा भेटू शकत नव्हता. जणु जाहिरा तिस्ताच्या कोंडवाड्यात पडली होती. तिचे कुटुंब किंवा त्यांची झालेली हत्या यासंदर्भात तिस्ताच सर्व काही माध्यमांना सांगत होती.
मग त्या खटल्याची नव्याने मुंबईत सुनावणी होईपर्यंत आणखी एक चमत्कार घडला. एके दिवशी अचानक जाहिरा मुंबईतून गायब झाली आणि जशी मुंबईत अचानक उगवली होती; तशीच ती गुजरातमध्ये अवतरली. तिथे तिची पत्रकारांसमोर पेशी करण्यात आली. तेव्हा तिने धक्कादायक माहिती दिली. तिस्ताने आपल्याला कोंडून ठेवले होते. आपण आधीच सत्य बोललो होतो. पण गुजरातमध्ये खटल्याचा निकाल लागल्यावर आपल्याला पैशाचे आमिष दाखवून तिस्तानेच खोटे बोलायला भाग पाडले असा जाहिराचा आरोप होता. त्यातून तिस्ता आणि सेक्युलर थोतांड उघडे पडले. पण बिचार्या जाहिराचा त्यात उगाच बळी गेला. कारण आता तिच्यावरच सारखी साक्ष बदलते असा शिक्का बसला आणि कोर्टाला खोटी साक्ष दिली किंवा खोटे प्रतिज्ञापत्र दिले म्हणून तिलाच शिक्षा भोगायची पाळी आली. कारण कुठलीच भाषा लिहिता वाचता न येणारी जाहिरा, तिस्ताच्या शब्दावर विसंबून फ़सली होती. तिने सांगितले त्या त्या कागदावर जाहिरा सही करत गेली होती. त्या कागदावर काय लिहिले आहे त्याच तिला पत्ताच नव्हता. पण तिचा दावा मान्य करायचा तर पहिल्यांदा खटल्यातून आरोपी निर्दोष सुटल्यावर तिस्ताच्या सेक्युलर टोळीने जाहिराला आमिष दाखवले होते. जर तिने नव्याने खटला चालवायची व आधी धमक्या मिळाल्याने साक्ष फ़िरवल्याचे सांगितल्यास नवे घर बांधायला पैसे मि्ळतील असे आमिष दाखवले होते. त्याच पैशाचा अर्ज म्हणुन आपली कागदपत्रावर सही घेण्यात आल्याचे जाहिराने नंतर सांगितले. पण मुंबईत आपल्याला तिस्ताच्या घरी बंगल्यात कोंडून ठेवलेले होते आणि आपल्या भाऊ व आईलाही भेटू दिले जात नव्हते; असेही तिने सांगितले. मात्र इतके दिवस उलटून गेल्यावरही नवे घर बांधायला पैसे मिळत नाहीत, म्हटल्यावर जाहिराचा धीर सुटला आणि तिने तिस्ताच्या बंगल्यातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण सेक्युलर दहशत असल्याने आपण गुजरात पोलिसांची मदत घेऊन पळालो, असेही जाहिराने सांगितले. त्यानंतर मात्र तिस्ता व सेक्युलर टोळीची भलतीच तारांबळ उडाली. न्यायाच्या गप्पा मारणार्या तिस्ताने अटकपुर्व जामीनासाठी धावाधाव केली. तिला तो मिळालाही. पण बळी गेला तो बिचार्या जाहिराचा.
पुढे जेव्हा खटला चालला तेव्हा जाहिराने आपली साक्ष पहिल्या खटल्याप्रमाणेच देऊन आरोपींना ओळखायचे नाकारले. तरीही त्यावर कोर्टाने विश्वास ठेवला नाही. उलट जाहिराला कोर्टाची फ़सवणुक केल्याबद्दल एक वर्षाच्या कैदेची शिक्षा झाली. ज्या मुलीचे संपुर्ण कुटुंब दंगलीच्या जाळपोळीत मारले गेले, त्यातल्या संशयितांना शिक्षा झा्लीच. पण फ़िर्यादीलाही शिक्षा होण्याचा अजब प्रकार घडला. जिचे कुटुंब मारले गेले, तिलाही कैदेची शिक्षा भोगावी लागली. जगाच्या पाठीवर असा चमत्कार कुठेच अन्यत्र कधी घडला नसेल. असा चमत्कार फ़क्त भारताच्या अनाकलनिय सेक्युलर कारभारतच घडू शकतो. तेव्हा जाहिराने आणखी एक गोष्ट सांगितली होती. पठाण नावाच्या तिस्ताच्या एका दलालाने आपल्याला खोट्या साक्षीसाठी फ़ुस लावली आणि मुंबईला घेऊन गेला असे जाहिराने तेव्हा सांगितले होते. पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. त्यालाही गुजरातमध्ये अटक होण्याची भिती असल्याने तिस्ताने आपल्या सोबत त्याच्याही अटकपुर्व जामिनाचा अर्ज केला होता. आता इतक्या वर्षानंतर पठाण यानेही जाहिराच्याच तेव्हाच्या आरोपाला दुजोरा दिलेला आहे. गुजरात दंगलीच्या हिंसाचारातल्या बळी व पिडीतांचे खटले भरण्यासाठी भलतेसलते आरोप करण्याचे व साक्षिदारांना पढवण्याचे काम आपण तिस्ताच्या आग्रहाखातर करत होतो. पण अशा प्रकरणातून दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी परदेशातून भरपुर पैसे व देणग्या मिळाल्यावर तिस्ताने आपल्याला हाकलून लावले असा पठाणचा दावा आहे. याच महिन्यात तिस्ताच्या या जुन्या सहकार्याची मुलाखत लंडन येथील ‘गार्डियन’ वृत्तपत्रात छापून आलेली आहे.
याला म्हणतात सेक्युलॅरिझम. या सर्व गुजरात दंगल प्रकरणात तिस्ता माध्यमांची मोठी लाडकी होऊन राहिली आहे. कुठेही कुठल्याही कोर्टत गुजरात दंगलीचे काहीही घडो की माध्यमे तिस्ताला वाहिन्या बोलावणारच. तिचे मत विचारणारच. त्या सेक्युलर तिस्ताने वा तिच्या सेक्युलर टोळीने किती मुस्लिम वा दंगल पिडीतांना न्याय मिळवून दिला मला माहिती नाही. पण तिच्या नादाला लागलेल्या तिच्या दोन अत्यंत निकटवर्तिय अशा जाहिरा व पठाण अशा दोन मुस्लिमांची दुर्दशा त्यांनीच कथन केलेली आहे. आणि गंमत अशी, की आज तिस्ताच्या व सेक्युलर टोळीच्या आहारी गेलेले अनेक मुस्लिम अन्यायाची शिकार झालेले आहेत, भरकटत राहिले आहेत. कारण तिस्ता किंवा तिच्यासारख्या सेक्युलर लोकांसाठी दंगलीतले बळी किंवा पिडीत हे कमाईसाठी व्यापाराचे भांडवल किंवा कच्चा माल झाले आहेत. याला सेक्युलॅरिझम म्हणतात. जो मुस्लिमांच्या न्यायाची भाषा अखंड बोलत असतो. पण त्याच मुस्लिमातील गुंडांना पाठीशी घालत असतो. व त्यातून सामान्य जनतेच्या मनात मुस्लिमांची विकृत प्रतिमा मात्र तयार करत असतो. कारण असे सेक्युलर हे मुस्लिम गुंडांच्या पाठ्शी उभे राहून मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन करत असतात. परिणामी जेव्हा तेढ विकोपास जाते, तेव्हा त्या विकृत प्रतिमेचे परिणाम मात्र सामान्य मुस्लिमाला भोगावे लागत असतात. गुजरातची दंगल त्याचाच परिपाक होता. माध्यमांनी गुजरातच्या दंगलीचे सेक्युलर चित्रण कसेही करो, पण वस्तुस्थिती भलतीच आहे. त्यात मुस्लिमांचाच बळी गेला आहे. पण ती दंगल का झाली, इतका दिर्घकाळ का चालली आणि तरीही मोदीच तिथे सातत्याने का जिंकतो, ह्या प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत. कारण त्याटा सेक्युलर थोतांडाबरोबरच सामान्य मुस्लिमांचे भवितव्य दडलेले आहे. ( क्रमश:)
भाग ( १५ ) ३०/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा