शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२

दंगली घडवून आणणारा सामुहिक भयगंड


   सामुहिक भयगंड प्राण्यांच्या कळपामध्ये उपजत समुह मनोवृत्तीची जाणिव उत्पन्न करत असतो आणि मग त्यामुळे जे आपल्या कळपातले नाहीत असे वाटते, त्यांच्या विरोधा्त भयंकर क्रुर प्रतिक्रियेचा उदभव होतो - बर्ट्रांड रसेल

   रसेल हा विसाव्या शतकातला जगप्रसिद्ध विचारवंत चिंतक मानला जातो. त्याच्या या विधानातला नेमका अर्थ समजून घेतला तर आपल्याला भारतात वारंवार होणार्‍या दंगलीचे योग्य विश्लेषण करता येईल. पण दुर्दैवाने आपल्याकडे कधीच दंगलीचे विश्लेषण होत नाही. त्याऐवजी त्यावर राजकीय शेरेबाजी चालते. मग त्यात सहभागी होणारे अभ्यासक, विचारवंत आपापल्या राजकीय हितसंबंधानुसार दंगलीचे अर्थ लावत असतात आणि त्यामुळे समस्येचा उलगडा होण्यापेक्षा ती अधिकच जटील होत जाते. किंबहुना हे शहाणे कोंबडीप्रमाणे शंभर दाणे पायाने उडवतात आणि दोनतीनच दाणे खाण्याचे कष्ट घेतात. म्हणूनच आज दहा वर्षे उलटून गेली तरी गुजरातच्या दंगलीचे उत्तर सापडलेले नाही, की त्यातल्या पिडितांना न्याय मिळू शकलेला नाही. तीच अवस्था मुंबईतल्या १९९२-९३ सालाच्या दंगल व बॉम्बस्फ़ोट हिंसाचाराची आहे. त्यावर प्रचंड राजकारण झालेले आहे. पण अजून त्याची योग्य कारणमिमांसा होऊ शकलेली नाही. मग पुन्हा पुन्हा दंगली होतच आहेत आणि त्यात निरपराध लोकांचे अकारण बळी जातच आहेत. मुंबईत ११ ऑगस्ट रोजीची दंगल त्यातलाच एक प्रकार होता काय? ती दंगल व हिंसा का झाली? जे कोणी तिथे दंगल करणारे होते ते अगदी तयारीनिशी आले व त्यांनी हिंसा केली, यात शंकाच नाही. पण जर फ़क्त दंगलच करायची होती; तर जिथून आले तिथूनच दंगल करत आझाद मैदानावर ते का पोहोचले नाहीत? असे अनेक प्रश्न विचारता येतील. त्याची गरज नाही. कारण असे प्रश्न विचारून झाले आहेत. पण त्याची उत्तरे कोणीच कधी देत नाही की शोधत नाही. म्हणुनच आधी दंगलीची मानसिकता कशी तयार होते व कशी निर्माण केली जाऊ शकते, त्याचे उत्तर शोधले पाहिजे. विचारवंत रसेल यांच्या उपरोक्त विधानात त्याचे उत्तर सामावलेले आहे.

   गेल्या आठवड्यात मी मुद्दाम दोन छायाचित्रे छापली होती. ती इंतरनेटवर उपलब्ध असताना कुठल्याही वृत्तपत्राने छापलेली नव्हती किंवा वाहिनीने दाखवली नव्हती. पण त्याच छायाचित्रांच्या आधारे त्या दोन्ही दंगलखोरांना नंतर पकडण्यात आले. त्या छायाचित्रांबद्दल लेख लिहिला, त्यात मी मुद्दाम त्यातला आवेश आणि रोख बारकाईने बघायला वाचकाला सूचवले होते. तो आवेश दंगलखोराचा असतो. दिसायला तो दंगलखोरही माणुसच असतो. पण जेव्हा तो तसा वागत असतो, तेव्हा त्याच्यातल्या मानवी उपजत वृत्ती संपलेल्या असतात आणि त्याच्या मनाचा व समजूतींचा ताबा पाशवी उपजत प्रवृत्तीने घेतलेला असतो. आपण पकडले जाऊ, कदाचित पोलिसांनी गोळीबार केला तर मारले जाऊ, जखमी होऊ; अशी कुठलीही भिती त्यांच्या मनाला शिवलेली दिसत नाही. परिणामांची पर्वा न करता ते अमर जवान स्मारकाची नासधुस करत आहेत. कुठलाही सामान्य माणुस परिणामांचा विचार करतो, सावध असतो, दंगलखोर मात्र त्याला अपवाद असतो. तो स्वत:चा विचारच करत नसतो, की परिणामांचा विचारही त्याच्या मनाला शिवत नसतो. त्या चित्रामध्ये दोघाही तरूणांचा आवेश तेच सांगतो ना? ते बेभान व बेफ़ाम आहेत. इकडे तिकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. खरे सांगायचे तर ते दोघे त्या आवेशात असताना किंवा तसे वागत असताना, ती सामान्य माणसे नव्हतीच. म्हणुनच ते तसे वागत होते. आणि त्यासाठी कोणीतरी त्यांना प्रवृत्त केलेले होते, फ़ुस लावली होती. त्यांच्यातल्या विचार करू शकणार्‍या जाणिवा निष्क्रिय करून त्यांच्यातल्या उपजत पाशवी वृत्तीला चिथावणी दिली होती. त्यांच्यातला पशू जागा केला होता आणि माणूस झोपवला होता.

   ते दोघे किंवा त्या दिवशी, त्यावेळी तिथे ज्या हजारो लोकांनी धुडगुस घातला व हिंसा केली; त्या प्रत्येकामध्ये माणूस अस्तित्वातच नव्हता. चित्रात ते माणसासारखे दिसत असले तरी ते वर्तनाने पशू होते. आणि तेच कशाला कुठल्याही दंगलीत भाग घेतलेले हल्लेखोर असेच पशू असतात. मग ते कुठल्या देशातले आहेत, कुठल्या धर्माचे आहेत व कुठल्या जातीपातीचे, वंशाचे आहेत; याच्याशी त्यांच्या कृतीचा संबंध नसतो. त्यालाच रसेल भेदरलेल्या कळपाची उपजत पाशवी वृत्ती म्हणतात. भयगंड लोकांच्या मनात घालून ती पाशवीवृत्ती प्रेरित करता येत असते. भितीमधून भयंकर क्रूर प्रतिक्रिया उमटत असते. कारण पशू जसे कळपात असताना आपल्यावरील व्यक्तीगत परिणामांची पर्वा न करता क्रौर्याचे प्रदर्शन घडवतात, तसेच दंगलीत घाबरलेली माणसे करत असतात. त्यात भाग घेणार्‍यामध्ये क्रुर पशू संचारलेला असतो. तो दिसत माणसासारखा असला तरी त्याचा आवेश, देहाच्या हालचाली किंवा वर्तन पशूलाही लाजवणारे असते. मग सिंह, वानर किंवा डिस्कव्हरी वाहीनीवर दिसणारे कळप, एकमेकांशी रक्तपात करत झगडताना दिसतात, तशीच माणसेही वागतात. त्याला झुंड म्हणतात. मग ती मुंबईतली असोत, लखनौमधली असोत किंवा गुजरात वा आसाममधली असोत. जे आपण आझाद मैदानावर बघितले, तेच सर्व दंगलीत होत असते. जी माणसे अशी कळपात हिंसक होतात, ती मुळातच भयगंडाने प्रभावित झालेली असतात. कसल्या तरी भितीने ती पछाडलेली असतात. ती भिती खरी असेल किंवा खोटी असेल. पण जे भयभित झालेले असतात, त्यांचा प्रतिहल्ला चढवण्याचा आवेश मात्र शंभर टक्के खरा असतो. कुणीतरी त्यांच्या मनात कमाली्ची भिती निर्माण केलेली असते. मग त्या भितीमधूनच ही भयावह प्रतिक्रिया उमटत असते.

   अर्ध्या तासाच्या अल्पावधीत आझाद मैदानचा परिसर त्या पाचसातशे दंगेखोरांच्या जमावाने अक्षरश: युद्धक्षेत्र बनवून टाकला. त्यांनी पत्रकार बघितले नाहीत, पोलिस बघितले नाहीत, बसने प्रवास करणारे बघितले नाहीत, की बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांना सोडले नाही. कारण त्यातला फ़रक करण्याच्या मानवी जाणिवा ते दंगेखोर हरवून बसले होते. ती माणसेच नव्हती तर त्यांच्याकडून माणसाप्रमाणे वर्तनाची अपेक्षा करता येईल काय? अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी जी हिंसा केली, ती अधिक काळ चालली असती तर गुजरात व्हायला वेळ लागला असता काय? जे इथे झाले आणि गुजरातमध्ये दहा वर्षापुर्वी झाले, त्यात कुठला नेमका फ़रक आहे? त्यापेक्षा १९९२ ची मुंबईतली दंगल वेगळी होती काय? तेव्हाही अशाच घटना घडलेल्या नाहीत काय? प्रत्येकवेळी दंगा करणारी माणसे झुंड करून अमानुष हिंसा करणारी दिसतील. त्यांचे वर्तन पाशवी दिसेल. आणि ती पाशवी वृत्तीच खरे संकट आहे. पण त्या प्रवृत्तीचा बिमोड करण्याचा कधीच विचार झालेला नाही, की शोध घेण्याचा प्रयास झालेला नाही. उलट अशा दुर्दैवी घटनांचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फ़ो्डण्यातून पळवाटा शोधल्या जातात आणि ती पाशवी वृत्ती मोकाटच रहाते. मग पुन्हा कुठेतरी ती पाशवी वृत्ती अचानक डोके वर काढते. तेव्हा पुन्हा तीच पळवा्ट शोधली जाते. कारण आता अशा पाशवी वृत्तीला हातशी धरूनच लोकांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण आपल्या देशात स्थिरावले आहे.

   आझाद मैदानच्या दंगलीसाठी सरसकट रझा अकादमीला दोषी ठरवण्यात आलेले आहे. त्या संघटनेने पुर्वनियोजन करून ही दंगल घडवून आणली असेच म्हटले जात आहे. पण कितीही प्रयत्न केले तरी ते पुराव्यानिशी सिद्ध करता येणार नाही. कारण कोणी कोणाच्या मनात सामुहिक भयगंड निर्माण केल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसतो. शिवाय त्य दिशेने कधीच पोलिस तपास होत नाही आणि कायदाही अशा मानसशास्त्राचा आधार घेत नसतो. म्हणुनच त्यात झूंड झालेले किंवा झुंडीत सहभागी झालेले पकडले जातात. पण ती झूंड निर्माण करणारे सहीसलामत बाजूला रहातात. म्हणुनच त्या दंगेखोरांना पकडुन किंवा त्यांच्यावर गुन्हे सिद्ध करून भविष्यातल्या दंगली कधीच थांबवता येत नाहीत, की थांबलेल्या नाहीत. कारण भयगंड निर्माण करून दंगलखोरांच्या झूंडी तयार करणारे कायम मोकाटच असतात, कायदा त्यांना हातही लावू शकत नाही. आणि त्यांचा बंदोबस्त कायद्याने होणारही नाही. त्याला जनमानसातील परस्पर विश्वासच लगाम लावू शकतो. पण कोणीही तो लगाम लावायचा विचारही करत नाही, की त्या दिशेने पाऊल टाकले जात नाही. मात्र मुंबईतल्या ह्या छोट्या दंगलीमागचा हेतू सफ़ल झाला नाही. पण अशाच प्रयत्नातून गुजरात मात्र दोन महिने धुमसत राहिला होता. तो सुद्धा सामुहिक भयगंडाचा परिणामच होता. अमानुष होता.     ( क्रमश:)
भाग  ( १७ )    १/९/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा