आता अण्णांच्या रामलिला मैदानावरील ऐतिहासिक उपोषणाला वर्ष होईल. १६ ऑगष्ट २०११ रोजी त्या उपोषणाचा मुहूर्त ठरला होता. पण तो दिवस उजाडण्यापुर्वीच दिल्ली पोलिस अण्णांच्या रहात्या जागी गेले आणि त्यांनी अण्णांना ताब्यात घेतले. दुसरीकडे केजरिवाल, शांतीभूषण, प्रशांत भूषण, किरण बेदी अशा अन्य सहकार्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना रामलिला मैदानावर पोहोचू देण्यात आले नाही. मग ती घटना ब्रेकिंग न्यूज झाली आणि संपुर्ण देशात वाहिन्यांनी खळबळ माजवली. आधी अण्णांना अटक केली तरी ठेवायचे कुठे, तेही पोलिसांना ठाऊक नव्हते. मग खुप चर्वितचर्वण झाल्यावर त्यांना तिहार तुरूंगात हलवण्यात आले. तेव्हा तिकडे लोकांचा लोंढा लोटला. पण काय चालले आहे ते सरकारही सांगू शकत नव्हते. पोलिस आपले काम करीत आहेत असे सांगून सत्ता भोगणारे हात झटकत होते. पण अशा पळवाटेने लोकांना मुर्ख बनवता येत नव्हते. कारण त्या अटकेने चिडलेल्या लोकांचा लोंढा तिहारकडे धावू लागला. तेव्हा लोकांना शांत करण्यासाठी सरकारला पळापळ करायची वेळ आली. राहुल गांधी पंतप्रधानांना जाऊन भेटले. मग संध्याकाळ होता होता अण्णांना सोडून देण्याचा फ़तवा निघाला होता. दरम्यान हजारो लोकांनी अण्णांच्या समर्थनासाठी स्वत:ला अटक करवून घेतली होती. त्यांना एका स्टेडियमवर डांबून ठेवण्यात आले होते. तर इकडे सुटका झाल्यावरही अण्णा तुरूंगाबाहेर जायला तयार होईनात. तेव्हा बिचार्या तुरुंगाधिकार्याची पंचाईत झाली. त्याच्याच ऑफ़िसमध्ये अण्णांनी पहिल्या दिवसाचे उपोषण केले. जे पोलिस अण्णांना रामलिला मैदानावर जाऊ द्यायला तयार नव्हते, त्यांनीच अखेर अण्णांच्या तिथल्या सोयीसुविधांची तयारी करून दिली. या सर्व घट्ना क्रमात कुठेतरी सोनिया गांधींचा उल्लेख आला होता काय? राहुल गांधींचे नाव कुणाच्या कानी आले होते काय? आणि आमचे बाळबुद्धीचे प्रकाशराव त्याच दोन्ही कॉग्रेस नेत्यांच्या भव्य सभा भरवून अण्णांच्या उपोषणाला चोख उत्तर देण्याच्या वल्गना करत आहेत. समजा वर्षभरापुर्वी त्याच कालखंडात हेच प्रकाशाचे बाळ कॉग्रेसचे रणनितीकार असते तर काय झाले असते?
अण्णांचा सर्व तमाशा हाणून पाडण्यासाठी प्रकाश बा्ळ यांनी कॉग्रेस बरोबरच सोनिया राहुलना कामाला जुंपले असते. आणि या प्रकाशाचा बाळहट्ट पुरवण्यासाठी सोनियांना अमेरिकेत उपचारासाठी जाता आले नसते. का्रण अण्णांना नामोहरम करणे मोलाचे होते, त्याच्या तुलनेत सोनियांवरच्या उपचारांची महती ती काय? झकास कार्यक्रम झाला असता ना? काय अक्कल आहे बघा. गेल्या वर्षी अण्णांचे रामलिला आंदोलन सुरू झाले तेव्हा सोनिया देशाबाहेर गेल्या होत्या आणि कॉग्रेसमध्ये निर्नायकी माजली होती; याचा या बाळकोबांना अजून थांगपत्ता लागलेला नाही. अण्णांचे उपोषण किंव त्यानंतरचे काही आठवडे सोनिया किंवा काही काळ राहुल गांधी भारतातच नव्हते, तर त्यांच्या भव्यदिव्य सभा मेळावे कॉग्रेसने भरवावेत तरी कसे? पण असल्या समस्या बाळ सारख्या विश्लेषकांना पडत नाहीत. कारण त्यांचा वास्तव जगाशी संबंधच नसतो. ते आपल्या कल्पनाविश्वात रममाण झालेले असतात. मग तिथे कोणालाही कुठूनही कुठेही हलवण्याची सोय असते. कारण सगळेच निव्वळ भास असतात. तेव्हा अण्णांच्या उपोषणाला विरोध म्हणुन कॉग्रेसने भव्य मेळावे भरवण्य़ाची बाळची आयडीया अशीच संभ्रमावस्थेतली आहे. पण कॉग्रेसवाले बाळप्रमाणे भ्रमात नव्हते म्हणुनच त्यांनी सोनिया परदेशी गेल्या असल्याने तसला कुठला प्रकार केला नाही. कारण तो शक्यच नव्हता. अण्णांचे उपोषण चालू असतानाची गोष्ट सोडाच. पुढले काही महिने मायदेशी परतल्यावरसुद्धा सोनिया कुणाला भेटत नव्हत्या. मग जाहिर मेळावे घेऊन अण्णांना चोख उत्तर कुठून द्यायचे? पण हे सगळे बघायला व लक्षात यायला जगाकडे डोळे उघडून बघायला तरी हवे ना? त्या वास्तव जगाशी संबंध तरी हवा ना? प्रकाश बाळ यांच्यासारखे लोक आपल्या भ्रमात वावरतात, त्याला अण्णा काय करणार आणि कॉग्रेस तरी काय करणार?
प्रकाश बाळ जगाकडे डोळे उघडून बघायलाही तयार नसतात, म्हणुनच असेल, की त्यांना नेहमी कायबीईन लोकमत वाहिनीवरच आमंत्रण असते. कारण तिथे डोळे झाकून काहीही खोटेनाटे बोलण्याची मुभा आहे. मात्र जे काही खोटे वा चुकीचे बोलाल त्याबद्दल तुमचे मत ठाम असले पाहिजे. आणि प्रकाश बाळ त्या पात्रतेत ठामपणे बसतात. पण म्हणुनच ते कधी एबीपी माझा वाहिनीवर दिसत नाहीत, की त्यांना आमंत्रण मिळत नसावे. कारण माझावाल्यांच्या दोन अटी आहेत. पहिली "उघडा डोळे" आणि दुसरी आहे "बघा नीट". बिचार्या बाळाला दोन्ही गोष्टी अशक्य. त्यामुळे की काय "माझा" त्यांच्यावर "प्रसन्न" होत नाही. मागल्या वर्षी अण्णांच्या आंदोलनाचे प्रक्षेपण किंवा बातम्या नीट डोळे उघडून बघितल्या असत्या तर सोनियांच्या भव्य सभा भरवून अण्णांच्या गर्दीला फ़िके पाडायची कल्पना बाळाला कशी सुचली असती? सोनियाच भारतात नाहीत तर त्यांच्या सभा कशा भरवायच्या, असे वास्तविक प्रश्न भ्रामक जगात वावरणार्या प्रकाश बाळांना कधी पडत नाहीत. पण वास्तव जगात सत्ता भोगणार्या कॉग्रेसवाल्याना पडतात, म्हणुनच ते अशा बाळाने पाडलेल्या प्रकाशाकडे बघत नाहीत, उलट डोळे मिटून घेतात. हे सर्व इतक्या तपशीलात का सांगायचे? तर प्रकाश बाळ स्वत:ला अभ्यासू व अनुभवी समजतात व त्यानुसार जगाला उपदेश करत असतात म्हणून. अण्णांचा अनुभव गाव पातळीवरचा आहे असे ते हिणवणार्या भाषेत बोलतात. पण त्यांचा अनुभव किती वास्तव आहे? जे समोर घडताना दिसते तेही बघायचा अनुभव त्यांना नाही, त्यांनी विश्लेषक म्हणुन मिरवावे काय? ज्यांना येदीयुरप्पा यांच्या भानगडी अण्णा टीमचे संतोष हेगडे यांनी चव्हाट्यावर आणल्या, हे ठाऊक नाही. ज्यांना अण्णांच्या उपोषण काळात सोनिया उपचारासाठी परदेशी गेल्याचे माहित नाही, ज्यांना देशातल्या कुठल्याच पक्षात संस्थात्मक लोकशाहीचा मागमुस नाही, हे माहित नाही, ज्यांना देशातल्या लोकशाही संस्थाच लोकशाहीचा गळा घोटत आहेत याचा थांगपत्ता नाही, ते कसले विश्लेषण करणार आणि कसले उपाय सुचवणार?
आज देशाची हीच तर शोकांतिका झाली आहे. स्वत:ला राजकीय अभ्यासक म्हणवणारेच अर्धवटराव झाले आहेत. आपल्या सोयीसाठी समर्था घरीचे सेवक असल्याप्रमाणे आपली बुद्धी गहाण टाकून वावरत आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादाने गुंड बदमाश सत्तेत बसून कायद्याचे वस्त्रहरण करत आहेत. म्हणुन तर अण्णा हजारे किंवा रामदेव बाबा यांच्यासारख्या राजकारणबाह्य लोकांना लढ्ण्यासाठी पुढे यावे लागले आहे. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी लुडबुडण्याचे कारण नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. पण ते काम ज्यांनी करायचे तेच दिवाळखोर झाले, तर दुसरे काय होणार? लहान तोंडी मोठा घास अशी मराठी भाषेतली उक्ती आहे. मोठे घास मोठ्याच तोंडानी घ्यायला हवेत. पण अशी मोठी तोंडेच मुग गिळून गप्प बसली, तर लहान तोंडांनी काय त्यांची मोठी तोंडे बघत बसायचे काय? त्यापेक्षा त्यांनीच पुढाकार घेऊन जमेल तेवढा प्रतिकार करायचा असतो. जेव्हा राजकीय किंवा बौद्धिक क्षेत्रातल्या चळवळी समर्थ क्षमतेच्या लोकांनी चालविलेल्या होत्या, तेव्हा कुणा बुवा, महाराजाला वा समाजसेवकाला राजकीय आंदोलनाच्या आखाड्यात उतरावे लागत नव्हते. आज बौद्धिक व राजकीय नेतृत्वच खुजे होऊन गेले आहे. जनमानसात त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. आणि त्याचे प्रत्यंतर अगदी त्याच लोकमत वाहिनीच्या मतचाचणीतून दिसत होते. इथे प्रकाश बाळसारखे विद्वान गुण उधळत होते आणि तो कार्यक्रम बघणारे प्रेक्षक मात्र नेमके त्यांच्या विवेचनाच्या विरुद्ध भरघोस मतांनी अण्णांवर विश्वास प्रकट करत होते.
एक छोटीशी गोष्ट घ्या. लोकांचा अण्णांना पाठींबा उरलेला नाही. लोकांचा अण्णांबद्दल भ्रमनिरास झालेला आहे. लोकांनी अण्णांकडे पाठ फ़िरवलेली आहे, असे दावे माध्यमे गेले अनेक महिने करीत आहेत. ते खरे असेल तर ही माध्यमेच अण्णांकडे पाठ का फ़िरवत नाहीत? दर आठवड्यात एकदा तरी त्यांना अण्णांच्या आंदोलनावर चर्चा कशाला करायची असते? आसबे किंवा प्रकाश बाळ इत्यादी जे कोणी त्या चर्चेत अक्कल पाजळणारे जाणकार सहभागी होतात, ते आपला बहुमोल वेळ संपलेल्या अण्णांवर चर्चा करण्यासाठी का वाया घालवतात? त्यांनी या वाहिन्यांना स्पष्टच सांगून टाकावे. ज्या अण्णांना लोक विचारतसुद्धा नाहीत, त्यांच्यावर बोलायला आम्हाला वेळ नाही. अण्णांच्या मुर्खपणासाठी आम्ही आमची शक्ती वाया घालवू इच्छीत नाही. जेवढे कोणी अण्णा संपले असे छातीठोकपणे सांगत असतात, ते खरेच प्रामाणिक असतील तर त्यांनी एवढे व्रत पाळावे. मग अण्णा संपलेच म्हणून समजा. बघा बाळाजीराव जमते का. ( क्रमश:)
भाग ( ३४७ ) ५/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा