मुंबईत शनिवारी मोठी भीषण परिस्थिती निर्माण झाली. दुपारी अचानक छत्रपती शिवाजी टर्मिनस या प्रमुख रेल्वेस्थानकाच्या परिसरात दगडफ़ेक, जाळपोळ, लाठीमार असा धिंगाणा सुरू झाला, त्या परिसरात हजर असलेल्यांना काय झाले व कशामुळे झाले, कुठून सुरू झाले व काय चालू आहे, त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. आणि तिथे हजर असलेल्यांना असे मी म्हणतो, तेव्हा त्यात खुद्द पोलिस आयुक्तांपासून सामान्य पोलिस शिपायापर्यंत सर्वांचाच समावेश होतो. मात्र जे लोक घरी होते, किंवा टिव्हीवर बातम्या वगैरे बघत होते, किंवा अन्य मार्गाने इतरांच्या संपर्कात होते, त्यांना रझा अकादमीच्या मेळाव्यातून दंगल उसळली हे कळले होते. पण ज्यांना कळले होते, ते घटनास्थळापासून खुप दूर होते आणि घटनास्थळी होते, त्यांना काय चालले आहे, त्याचाच पत्ता नव्हता. सामान्य भाषेत ज्याला दंगल म्हणतात, ते तिथे चालू होते. आणि वृत्तवाहिन्यांना एक सनसनाटी ब्रेकिंग न्यूज मिळाली म्हणुन ते खुश होते. मात्र ही नेहमीसारखी मजेतली ब्रेकिंग न्यूज नव्हती. या ब्रेकिंग न्यूजमध्ये खरेच न्यूज ब्रेक केली जात होती. म्हणजे जे बातम्या देणारे किंवा घटनांचे चित्रण करून त्याचे प्रक्षेपण करणारे होते, त्यांनाही ब्रेक करायची कामगिरी सुरू होती. जी दंगल पेटली होती त्यातले दंगलखोर पोलिस आणि वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपण करणार्या वाहनांवर तुटून पडले होते. डोळ्याचे पाते लवते न लवते; तोपर्यंत त्यांनी अनेक पोलिस गाड्या व टिव्हीच्या ओबी व्हॅन आगडोंबात ढकलून दिल्या होत्या. जेवढ्या वेगाने ही दंगल पेटली तेवढ्य़ाच वेगाने ती आटोक्यात सुद्धा आली. जणू एक वावटळ उठावी तशी ही दंगल झाली आणि संपली सुद्धा. मजेची गोष्ट म्हणजे जिथे ती झाली तिथल्या कोणाचा त्यात सहभाग नव्हता; की तिथल्या कोणाचे त्यातून नुकसान वगैरे झाले नाही. जणू ठरलेल्या मैदानात दोन भलतीकडचे संघ येऊन त्यांच्यात सामना व्हावा, त्यातलाच प्रकार होता. आता पाच दिवस होत आले, पण त्यावरचे कवित्व संपलेले नाही. मागले पाच दिवस वाहिन्यांपासून राजकीय पक्ष व बुद्धीमंत अभ्यासकांपर्यंत सगळेच त्या दंगलीचा चोथा चघळत आहेत.
मला सगळ्यात गंमत वाटते ती वाहिन्यांवर तावातावाने त्यावर तोंडाची वाफ़ दवडणार्यांची. कारण त्यांचा एकूण आवेश असा असतो की जणू पहिल्यांदाच मुंबईत अशी दंगल घडली असावी. खरे सांगायचे तर जे घडले त्याला दंगलही म्हणता येणार नाही. तो ठरवून केलेला घातपात होता. आणि हे माझे आजचे पाच दिवसानंतरचे मत नाही. ते अगदी पहिले दृष्य मी वाहिन्यांवर बघितले तेव्हाच झालेले ‘ठाम मत’ आहे. कारण चित्रे वा प्रक्षेपण बघितले तर अगदी निर्बुद्ध माणसालाही त्यातली तयारी, नियोजन व सज्जता सहज नजरेत भरते. जे कोणी जाळपोळ करत होते, मोडतोड करत होते, दगडफ़ेक करत होते, त्यांना तसे कृत्य करण्यासाठी लागणारे साहित्य अचानक उपलब्ध होऊ शकणारे नाही. लाठ्याकाठ्या झेंड्याच्या असतात. पण अनेक हेल्लेखोरांच्या हाती हॉकीस्टिक दिसतात. मोर्चाला कोणी हॉकीस्टिक घेऊन येतो काय? मोर्चात अशा वस्तूचे काय प्रयोजन होते? ज्या परिसरात हा सर्व धुडगुस चालू होता, तिथे फ़ेकायला इतक्या मोठ्या प्रमाणात दगड मिळूच शकत नाहीत. मग इतक्या झटपट दगड आले कुठून व फ़ेकणर्यांना मिळाले कसे? तिसरी गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. ज्या गाड्या पेट्वून देण्यात आल्या त्या बहुतांश पोलादी, लोखंडी वा धातूच्या आवरणातल्या आहेत. त्यांच्या आत अत्यंत सुरक्षित बंदोबस्तामध्ये त्यांना लागणार्या इंधनाची टाकी लपवलेली असते. बाहेरून गाडीने पेट घेऊन भडका उडाल्याशिवाय आतले इंधन पेट घेऊ शकत नाही. म्हणजेच त्या गाड्या बाहेरून ज्वालाग्राही पदार्थ ओतूनच पेटवण्यात आल्या. ज्या परिसरात हे घडले तिथे जवळपास पेट्रोलपंप नाही किंवा अन्य ज्वालाग्राही पदार्थ मिळू शकतील अशी दुकानेही नाहीत. म्हणजेच मोर्चा मेळाव्याला येणार्यांनी सोबतच हे ज्वालाग्राही पदार्थ आणलेले होते. मग सगळा प्रकार अकस्मात घडला असे कोण म्हणू शकेल? जो कोणी असा दावा करतो तो शुद्ध मुर्ख माणूस असला पाहिजे किंवा तो ऐकणार्याची दिशाभूल करत असला पाहिजे.
घटना घडून गेल्यावर तपासाला लागलेल्या पोलिसांनाही त्या वस्तू सापडल्या आहेत. म्हणजे ज्वालाग्राही इंधनाचे कॅन, हॉकीस्टिक वगैरे. आणि आता पोलिसही त्यामागे पुर्वनियोजन असल्याचा दावा करत आहेत. मग जे घडले त्याला दंगल म्हणता येईल काय? एक दावा असा केला जातो, की तिथे आलेल्या लोकांच्या भावना भडकवण्यात आल्या आणि त्यामुळेच चिडलेल्या एका जमावाने हे कृत्य केले. ही धादांत बनवेगिरी आहे. समजा मेळाव्यात भाषण करणार्या कोणी चिथावणीखोर वक्तव्य केले आणि पुढली परिस्थिती उदभवली असेल, तर त्यासाठी लागणारे साहित्य आधीपासून कसे सज्ज होते? की मेळाव्याला येणार्यांना आपल्या भावना चिथावणीखोर भाषणातून भडकवल्या जाणार आहेत आणि भावना भडकल्या मग दंगल करावी लागणार आहे याची पुर्वकल्पना देण्यात आली होती? म्हणुन आधीपासून सामानानिशी सज्ज रहायला सांगण्यात आले होते? कुठल्याही मेळाव्यात वा सभेत भडकावू भाषणे होतात, पण त्यातून चिडलेला जमाव जी दंगल करतो ती पोलिसांना आवरणे अवघड नसते. कारण तो जमाव विस्कळीत व बेशिस्त असतो. त्याच्याकडे कुठलीच तयारी नसते. त्यामुळेच मग असा बेभान झालेल्या बेशिस्त जमावाला मुठभर पोलिस वेसण घालू शकतात. कारण पोलिसांकडे त्यासाठी आधीपासून योजलेली सज्जता व रणनिती असते. म्हणुनच अशा उत्स्फ़ुर्त दंगलीचे प्रसंग ओढवतात, तेव्हा एखादा दुसरा पोलिस जखमी होतो आणि अनेकपटीने जमावातले दंगेखोर किंव अगदी रस्त्या्वरचे सामान्य निष्पाप पादचारीही जखमी होतात. पण इथे त्याही बाबतीत उलट स्थिती आहे. पन्नास लोक जखमी आणि त्यात पंचेचाळीस पोलिस आहेत. किती विरोधाभास आहे ना?
असे का होते? उत्स्फ़ुर्त दंगल असते तेव्हा जमाव बेभान असला तरी पोलिस दिसल्यावर तो एकदम बचावात्मक पवित्रा घेतो. पोलिस आक्रमक झाले मग दंगेखोर पळू लागतात, जीव वाचवण्याचा प्रयत्न करू बघतात. इथे त्याचा लवलेश दिसत नाही. त्यांच्यापेक्षा पोलिसच आपला जीव वाचवायला धडपडताना दिसतात. महिला पोलिसांची छेड काढली जाते आणि कुणा पोलिसांची हत्यारेही लांबवली जातात. म्हणजेच परिस्थिती दंगेखोरांच्या काबूत होती आणि पोलिसच पळायच्या भूमिकेत होते. म्हणूनच अधिक पोलिस जखमी झाले व दंगेखोर जवळपास सुरक्षित निसटले. असे केव्हा घडते? असे अलिकडे कधी व कुठे घडले? बरोबर दहा दिवसांपुर्वी पुण्यात असेच घडले ना? जंगली महाराज रोडवर पाचसहा बॉम्ब फ़ुटले आणि पळापळ पोलिसांची चालू होती. कोणी बॉम्ब ठेवले, तो कुठून आला व कुठे गेला, अशा गोष्टी घटना घडून गेल्यावर सुरू झाल्या. किती अल्पकाळात ती घटना घडली होती? तेवढ्य़ाच अल्पावधीत मुंबईतील ११ ऑगस्टची घटना घडली नाही काय? मग पुण्यात घडले त्याला घातपात म्हणायचे आणि मुंबईत घडले त्याला दंगल का म्हणायचे? दोन्ही घातपातच नाहीत का? फ़रक अगदी किरकोळ आहे. एका घटनेत संशयित बिनचेहर्याचा व गाफ़ील असलेल्यांना नकळत गाठणारा आहे. इथे मुंबईत संशयितांना लोक बघत आहेत, पोलिस समोर आहेत त्याची अजिबात फ़िकीर नाही.
जितक्या बेफ़ीकीरीने अजमल कसाब व त्याची टोळी मुंबईत येऊन घुडगुस घालत होती, त्यापेक्षा शनिवारी झालेला प्रकार तसूभर वेगळा आहे काय? एकच किरकोळ फ़रक आहे आणि तो नसता तर ही दंगल अल्पावधीत आटोपल्याची फ़ुशारकी ना पोलिस मारू शकले असते ना आबा पाटिल बोलू शकले असते. तो फ़रक आहे हत्यारांचा. जी व जेवढी हत्यारे कसाबच्या टोळीकडे होती, तेवढी सज्जता परवाच्या मोर्चा मेळाव्यासाठी आलेल्यांकडे असती तर काय घडले असते? पाऊण एक तासात तिथला हिंसाचार संपला असता काय? केवळ दहा लोक कराचीहून शस्त्रसज्ज होऊन आले आणि त्यांनी अवघी मुंबईच अडिच दिवस ओलिस ठेवली होती. रझा अकादमीच्या मेळाव्याने त्याची आठवण करून दिली. जणू त्यांनी तिकडे पाकिस्तानात बसलेल्या सईद हफ़ीजला दाखवून दिले, की तिथे प्रशिक्षित करून जिहादी इथे पाठवण्याची गरज नाही. हत्यारे व युद्धसाहित्य असेल तर पाचशे हजार दंगेखोरही मेळाव्याच्या नावाने जमवून मुंबई ओलिस ठेवता येऊ शकते. हे शनिवारी घडले त्यातले वास्तविक गांभिर्य आहे. कुणा वाहिनीवरक्या दिडशहाण्याला ते कळले तरी आहे का? रकानेच्या रकाने लिहिणार्या बुद्धीमंतांना त्याचा सुगावा तरी लागला आहे काय? नसेल तर असे गाफ़ील पोलिस, नेभळट सरकार आणि दिवाळखोर शहाण्यांच्या विश्वासावर आपण सुरक्षित जीवन जगू शकतो काय? ( क्रमश:)
भाग ( १ ) १५/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा