प्रकाश बाळ किंवा तत्सम स्वयंघोषित जाणकार व बुद्धीमंतांचा एक कायमचा आरोप अण्णा हजारे यांच्यावर आहे आणि तो लोकशाही न जुमानण्य़ाचा. अशी भाषा वापरणार्यांना लोकशाही किती कळली आहे? त्यांच्या लोकशाहीची नेमकी व्याख्या तरी काय आहे? कारण प्रत्येकवेळी त्यांच्या व्याख्या आणि निकष बदलत असतात. उदाहरणार्थ मागल्या वर्षी अण्णांच्या उपोषणाच्या निमित्ताने प्रचंड गर्दी व जनसमुदाय लोटला, तेव्हा लोकांचा जमाव म्हणजे लोकशाही नव्हे असे तत्वज्ञान हीच मंडळी मांडत होती. आज त्याच लोकांना गर्दी नाही म्हणजे अण्णांचा पाठींबा संपल्याचा शोध लागला आहे. म्हणजे लोकांचा पाठींबा मिळवा किंवा न मिळवा, त्यामुळे तुम्ही योग्य नाही, तर आम्हा बुद्धीमंतांचा पाठींबा असेल तरच तुम्ही योग्य आहात; असाच दावा नाही काय? लोकशाही म्हणजे ज्या प्रस्थापित संस्था आज उभ्या आहेत, त्यांना शरण जाणे असा एकूण दावा आहे. आणि तोच खरा मानायचा तर आजवर जगात जेवढे उठाव झाले किंवा क्रांत्या झाल्या, त्या सगळ्याचे चुकीच्या म्हणायला हव्यात. कारण कुठलीही क्रांती ही शेवटी तिथे प्रस्थापित असलेल्या संस्थांच्याच विरोधात होत असते.
इजिप्तमध्ये दोनतीन दशके एक राजकीय व्यवस्था कार्यरत होती. तिथेही एक राज्यघटनेनुसारच राज्यकारभार चालू होता. मग गेल्या वर्षी तिथे लोकांनी उठाव केला त्याला लोकशाहीचा विनाश म्हणायचे काय? कारण तिथेही होस्ने मुबारक नावाचा माणूस दिर्घकाळ निवडणूका घेऊनच सत्तेवर येत होता. तो किंवा त्याच्या सत्तेखाली ज्या निवडणूका व्हायच्या; त्यावर लोकांचा विश्वास नव्हता. म्हणुनच मग लोकांनी उठाव केला आणि त्या लोकांसमोर लष्कराच्या बंदूका व रणगाडेही असमर्थ ठरले होते. तो उठाव कशाच्या विरुद्ध होता? एका मुबारक नामे सत्ताधारी व्यक्तीच्या विरोधातला नव्हता, तर लोकशाहीच्या नावाने तिथे जी हुकूमशाही प्रस्थापित झाली होती व लोकांवर लादली गेली होती, त्या थोतांडाच्या विरोधातला तो उठाव होता. आणि अवघ्या जगाने त्या उठावाला लोकशाहीच्या प्रस्थापनेचे आंदोलन असेच नाव दिले. जगभरातून त्या उठावाचे समर्थन सर्वच लोकशाही देशांनी व समाजांनी केले. हे कधी प्रकाश बाळ यांच्यासारख्या बुद्धीमंतांनी वाचले किंवा ऐकले आहे काय? की जुन्यापान्या पुस्तकातच त्यांची लोकशाही घुसमटून गेली आहे? लोकशाही ही जिवंत प्रक्रिया असते आणि परिस्थितीनुसार ती आपले स्वरूप बदलत असते. पण तीसचाळीस वर्षापुर्वी कधीकाळी राज्यशास्त्राचा परिक्षेपुरता अभ्यास केलेल्या अशा पढतमुर्खांना वास्तविक लोकशाही किंवा राजकारणाचा गंधच नसतो. म्हणुन त्यांना लोकांची भाषा किंवा भावना समजू शकत नाहीत. मग असे दिडशहाणे लोकशाही सांगतात ती वास्तविक लोकशाही नसते; तर ती होस्ने मुबारकची लोकशाही असते. आणि प्रकाश बाळ असोत, की त्यांच्यासारखे वाहिन्यांवर दिसणारे जाणकार विद्वान असोत, ते नेमक्या मुबारकच्या भाषेत बोलत असतात. आणि त्यांचे लाडके सत्ताधीश सिरियाच्या बशर अल असदप्रमाणे सत्ता राबवत असतात. त्यांची लोकशाही कागदावर आणि शब्दात अडकून पडलेली असते.
लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या सामान्य माणसाला संरक्षण किंवा न्याय देण्यासाठी आहेत. त्याच अन्याय करू लागल्या तर त्यांची महत्ता किंवा पुण्याई संपलेली असते. उदाहरणार्थ ए.राजा नावाचा मंत्री होता. त्याचे काम भारत सरकारच्या तिजोरीत भर घालणे व जे दुरसंचार धोरण आहे, त्यातून सरकारच्या हिताची जपणूक करणे. पण त्यानेच सरकारी तिजोरीची लूट करणार्याशी संगनमत केले होते. मग त्याला मंत्री महणायचे की दरोडेखोर म्हणायचे? मंत्री व मंत्रीमंडळ ही सुद्धा एक लोकशाही संस्थाच आहे. तिने देशाचे व जनतेचे हितसंबंध जपावेत अशी तिची जबाबदारी आहे. पण ते अधिकार वापरून जेव्हा तिथे बसलेली माणसे लूटमार करू लागतात, तेव्हा ती संस्था उरत नाही. त्या दरोडेखोरांनी ओलिस ठेवलेली संस्था बनून जाते. तिची त्या दरोडेखोरांपासून मुक्तता करणे म्हणजेच उठाव असतो. खरे तर ते आंदोलन किंवा तो उठाव त्या संस्थेच्या विरोधातला नसतो तर त्या संस्थेला वाचवण्यासाठी केलेले मदतकार्य असते. पण हे समजण्यासाठी सामान्य बुद्धी आवश्यक असते. प्रकाश बाळ किंवा तत्सम विद्वानांची बुद्धीच इतकी असामान्य असते, की त्यांना या छोट्या व सामान्य गोष्टी दिसत नाहीत की समजत सुद्धा नाहीत. मग ते इंजेक्शन देणार्या डॉक्टरला इजा करणारा हल्लेखोर ठरवून टाहो फ़ोडू लागतात. अण्णांचे आंदोलन लोकशाही संस्था उध्वस्त करण्यासाठी नाही तर या संस्थांना जो भ्रष्टाचाराचा रोग जडला आहे, त्यापासून मुक्त करण्याचा लढा आहे. पण ‘बाळ’बुद्धीच्या विद्वानांना ते कसे कळावे?
लोकशाहीत लोक महत्वाचे कारण लोकांपासून लोकशाहीची सुरूवात होते, हेच ज्यांना ठाऊक नाही, त्यांनी लोकशाही संस्थांबद्दल बोलावे यासारखा विनोद नाही. ज्या लोकशाही संस्थांचे इतके कौतुक चालू असते, त्या मुळात कशासाठी निर्माण झाल्या आहेत? लोकांसाठीच त्यांची स्थापना झाली आहे ना? मग त्यांच्यापेक्षा लोक दुय्यम कसे ठरवले जातात? या बाळबुद्धीच्या विद्वानांना लोकशाहीची व्याख्या कळावी म्हणुनच की काय अमेरिकेच्या एका विख्यात न्यायमुर्तीने उपदेश केलेला आहे. न्या. अलेक्स फ़्रॅन्कफ़र्टर म्हणतात, "लोकशाहीमध्ये सर्वोच्च अधिकार पद असते ते नागरिकाचे". वाहिन्यांवर विद्वत्तेच्या लाथा झाडणार्यांनी असले उपदेश कधी वाचले किंवा ऐकले आहेत काय? कशाला वाचतील? हे सगळे त्या इजिप्तच्या होस्ने मुबारकचे अनुयायी. आणि त्याच्याच भाषेत लोकशाहीची विटंबना करीत लोकशाही बचावाचे नाटक करणारे. तिथे तो मुबारक तहरीर चौक अडवून बसलेल्या लाखो लोकांवर मुस्लिम ब्रदरहुडचे हस्तक असल्याचा आरोप करत होता. इथे कॉग्रेसचे सत्ताधीश आणि त्यांचे बाळसारखे बगलबच्चे अण्णांच्या आंदोलनावर संघाचे पित्ते असल्याचा आरोप करणार. दोघांचा भाषेतले शब्द किंवा नावे वेगळी असतील, पण हेतू दोघांचा सारखाच व दिशाभुल करण्यचाच नाही काय? पण अशा फ़सव्या गोष्टींना लोक फ़ारकाळ फ़सत नसतात. हे जगाचा इतिहासच सांगतो. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनावर घेतले जाणारे आक्षेप नवे नाहीत. लोकांनी आज जंतरमंतर येथे गर्दी केली नसेल म्हणुन लोकांना भ्रष्टाचार मान्य आहे, असे कोणी समजू नये. कामधंदा सोडून लोक तिकडे जाऊ शकत नाहीत, ही त्यांची लाचारी आहे. म्हणून लोकांनी अण्णांकडे किंवा लोकपालकडे पाठ फ़िरवली असा होत नाही. पण हे बाळ यांना कधीच कलणार नाही. कारण त्यांना त्यातले काही समजून घ्यायचेच नाही. असते तर त्यांनी अशी वाचा्ळता करून आपल्याच अज्ञान किंवा मुर्खपणाचे प्रदर्शन कशाला मांडले असते?
कुठल्याही देवळात किंवा श्रद्धास्थानी लोक गर्दी करतात तशाच लोकशाही किंवा राज्यव्यवस्थेच्या विविध संस्था असतात. जेव्हा त्या संस्था नेमून दिलेले काम योग्य रितीने करत नाहीत, तेव्हा त्यांच्यावरची लोकांची श्रद्धा संपत असते. मग त्याच संस्थेच्या पायरीवर डोके टेकणारे लोक त्याच संस्था उध्वस्त करायला जमाव करून पुढे येतात. तेव्हा त्यांना संस्था किंवा त्या श्रद्धास्थानाचे महात्म्य सांगून संस्था वाचवता येत नसते. कधीकाळी रोगनिवारक म्हणून जगभर गाजावाजा झालेल्या डीडीटी या जंतुनाशकाची महती आज संपली आहे. म्हणुनच अनेक देशात आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. मग प्रकाश बाळ शंभर वर्षे जुनी डीडीटीची महत्ता सांगून तिचे समर्थन करणार आहेत काय? करतील सुद्धा. कारण त्यांची बुद्धी तिसचाळीस वर्षे मागेच असेल तर दुसरे काय करतील? ज्या लोकशाही संस्थेचे महात्म्य सांगून ते आज भ्रष्टाचारावर पांघरूण घालत आहेत, त्या संस्था लोकशाही येण्या आधीपासूनच्या आहेत. अनेक तर ब्रिटीश सत्तेचे कालबाह्य अवशेष आहेत. जे लोकशाही आल्यावर मोडीत काढायला हवे होते. पण तसेच अडगळ होऊन जनजीवनातला व्यत्यय बनुन राहिले आहेत. पाऊस पडत नाही तर देव पाण्यात बुडवा किंवा होमहवन करून बोकडाचे बळी द्या, म्हणावे तशीच बाळबुद्धीच्या या शहाण्याची भाषा नाही काय? शेकडो वर्षापुर्वी विज्ञान पुढारलेले नव्हते तेव्हा दुष्काळ घालवण्यासाठी गाढवाचे चिमणी, कोंबड्याचे लग्न लावले जायचे. त्याही प्रथा म्हणजे समाजसंस्थाच होत्या. त्याही जपणारे अजून आढ्ळतात, प्रकाश बाळसारखे विद्वान त्यापैकीच एक असतात. लोकशाहीत सत्तधीश नव्हे तर सामान्य नागरिक हाच सर्वोच्च आणि म्हणुन सर्वात मोठी लोकशाही संस्था असतो, हे त्यांच्या मेंदूत कधीच शिरणार नाही. ( क्रमश:)
भाग ( ३४५ ) ३/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा