आपली अवस्था रिदा शेखसारखी झाली आहे
काही गोष्टी जरा शांत डोक्याने समजून घेण्याची गरज असते. तुम्ही संगणकाशी संबंधित काही करत असाल, तर त्यातली एक स्वतंत्र भाषा असते. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात काही करत असाल तर त्यातली वेगळी भाषा असते. सरकारी आणि साहित्यिक भाषा वेगळी असते. अशा भाषेत इकडचे शब्द तिथेही येतात. पण त्यांचे अर्थ संदर्भाने बदलत असतात. सहाजिकच ते संदर्भ बाजूला ठेवून तुम्ही तिथे वापरलेल्या शब्दांचे कोषातले अर्थ लावून बघितले; तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो. माझाच एक अनुभव सांगतो. आज ऐशी वर्षाच्या घरात असलेल्या एक आजींना एक प्रश्न दिर्घकाळ सतावत होता. तशा त्या खुप शिकलेल्या अगदी एमएपर्यंत. शाळेत शिक्षिका म्हणुनही काम केलेले. पण त्यांच्या निवृत्तीनंतर आपल्या देशात संगणक आले. नातवंडे खुप शिकली आणि आता घराघरात संगणक आलेत. त्या आजीच्याही घरात संगणक गुण्यागोविंदाने नांदतो आहे. मात्र नातवंडे त्याबद्दल बोलतात; तेव्हा त्या आजींची मोठी तारांबळ उडते. फ़ाईल्स आल्या, फ़ाईल्स पाठवल्या किंवा मेल केली, मेल पोहोचली; असे मुले बोलतात त्याचे त्यांना खुप नवल वाटते. कारण त्यांच्या लेखी फ़ाईल म्हणजे जाड कागदाचा फ़ोल्डर असतो. तसे काही दिसत नाही. मग ही मुले फ़ाईल कशी उघडतात व बंद करतात किंवा कुणाला कशी पाठवतात, त्याचे आजींना आश्चर्य वाटत रहाते. नातवंडे घरात नसताना एके दिवशी त्यांनी मला हा सवाल केला. मी त्यांना खुप समजावले. पण त्यांच्या काही लक्षात येत नव्हते. इवल्या संगणकात शेकडो हजारो फ़ाईल्स कशा रहातात, ते त्यांना काही केल्या समजून घेता येत नव्हते. असे फ़क्त त्याच आजींचे नाही. अगदी अनेक शहाण्या व बुद्धीमान लोकांचेही होत असते. त्यांचे जे संदर्भ असतात, त्याच्या पलिकडचे संदर्भ त्यांना समजूनच घ्यायचे नसतात, मग त्यांना नवे विषय किंवा शब्दांचे बदललेले अर्थ लागत नाहीत व त्यांचा गोंधळ उडत असतो. मग असा शब्द बातमीतला असो किंवा ऐकलेल्या भाषणातला असो.
‘पांडगो इलो रे बा इलो’ या नावाचे मच्छिंद्र कांबळीने गाजवलेले प्र. ल. मयेकर यांचे एक अत्यंत विनोदी नाटक आहे. त्यात सुन सासर्य़ाला (मच्छिंद्र) चहा आणून देते. चहा पिवून झाल्यावर सासरा तिला कप घेऊन जायला सांगत असतो. पण तिचे लक्ष नसते. तेव्हा सासरा तिला गो, गो अशी हाक मारतो. पण ती लक्ष न देताच निघून जाते. तर वैषम्याने सासरा म्हणतो ‘इंग्रजीत ऐकलान वाटता.’ म्हणजे काय? मालवणीत गो म्हणजे अग आणि इंग्रजीत गो म्हणजे जा. तसेच काहीसे आझाद मैदान परिसरातील दंगलीचे झाले आहे. कोणी त्याला हिंसाचार म्हणतो आहे, कोणी त्याला दंगल म्हणतो आहे, कोणी त्याला धार्मिक नाव देतो, आहे तर कोणी त्याकडे राजकीय गुंडागिरी म्हणुन बघतो आहे. पण यातला कोणी त्या घटनेचे वास्तविक रूप बघायलाच तयार नाही. तिथे ज्यांनी धुडगुस घातला किंवा हिंसक वर्तन केले, त्यांचा त्यामागचा हेतू व संदर्भ सोडून त्याकडे बघितले, मग अर्थाचा अनर्थ होणारच. समोर जे दिसत असते ते डोळ्यांना सत्य सांगतेच असे नाही. अनेकदा आपण जे बघत असतो आणि त्याच्या जोडीला जे शब्द आपल्या कानावर पडत असतात, त्यातून सत्याला बगल देणारी भलतीच समजूत आपल्या मनात तयार होत असते आणि आपण तिलाच सत्य समजून बसत असतो. आझाद मैदान परिसरात ११ ऑगस्ट रोजी झाले ती दंगल होती आणि फ़ारतर धर्मांध मुस्लिमांनी केलेली दंगल होती; असेच आपल्या डोक्यात घालण्यात आजची माध्यमे यशस्वी झाली आहेत. पण ती नुसतीच दंगल होती का? तिचे स्वरूप दंगलीसारखे असले तरी त्यामागे जो हेतू असतो त्याप्रमाणे अर्थ बदलत असतो.
दंगली आजवर अनेक झाल्या आहेत. पण कधीच कुठल्या दंगलीत कुठे पोलिसांवर हात टाकला गेलेला नाही. पोलिसांच्या गाड्या पेटवणे, पोलिसांच्या बंदूका पळवणे असे घडलेले नाही. असे काश्मिरात जिहादी कारवाया म्हणुन होत असते. असे नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या विरोधात होत असते. त्याला कोणी कधी दंगल म्हटले आहे का? असे घडते तेव्हा त्याला घातपात किंवा सरकारविरुद्ध होणारे बंड, देशद्रोह वा शासनाला दिलेले आव्हान म्हणतात ना? मग तसेच परवा आझाद मैदान परिसरात झाले; त्याला दंगल कसे म्हणता येईल? ती दंगल नव्हती तर पोलिस म्हणजेच शासकीय सत्तेला, घटनात्मक सत्तेला दिलेले आव्हान होते. आणि कशाला असे आव्हान द्यायचे? ज्या कारणास्तव हा मोर्चा मेळावा आयोजित केला होता, त्याची कारणे मुंबईत किंवा महाराष्ट्रातली नाहीत. तर मग मुंबई पोलिसांवर असा हिंसक हल्ला करायचे कारणच काय होते? त्यातून हे हल्लेखोर काय सिद्ध करू पहात होते? त्यात हिंदू किंवा मुस्लिम धर्माचा कुठे संबंध होता? त्या दंगलीत मुस्लिमच सहभागी झाले किंवा आयोजक मुस्लिम संघटना होती; म्हणुन त्याला मुस्लिम धर्माचा रंग द्यायचा काय? जे कोणी गेले दोन आठ्वडे या घटनेच वर्णन किंवा मिमांसा करू बघत आहेत, त्यांची शब्दांनी मोठीच तारांबळ उडवली आहे. कुठले शब्द कोणत्या अर्थाने वापरले जात आहेत आणि त्यांचा अर्थ काय होतो, त्याचाच थांगपत्ता मिमांसा किंवा विश्लेषण करणार्यांना लागलेला नाही. आणि असे लोक जेव्हा आपल्याला सर्व काही समजले म्हणुन निदान करू लागतात तेव्हा ते अधिकच गोंधळ माजवत असतात. म्हणूनच मिमांसा करणार्यांपासून त्यातले राजकीय अर्थ शोधणार्यांपर्यंत; सर्वांचाच पुरता गोंधळ उडाला आहे. प्रत्येकजण आपापला शब्दकोष घेऊन त्यानुसार त्याचे अर्थ शोधतो आहे आणि तोच वास्तव अर्थ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे हत्ती आणि चार आंधळे अशी जी गोष्ट आहे, त्याप्रमाणे प्रत्येकजण भलताच अर्थ लावताना दिसतो आहे.
पहिली गोष्ट म्हणजे अशी घटना घडते; तेव्हा आपल्या समजूती आणि आपले आग्रह, पुर्वग्रह बाजूला ठेवून त्याही छाननी करण्याचै गरज असते. अन्यथा रिदा शेखसारखी अवस्था होऊन जाते. आज कोणाला रिदा शेख कोण ते नुसते नावावरून आठवणार सुद्धा नाही. अशी आपली दांडगी स्मृती आहे. आठवते रिदा शेख कुणाला? अवघ्या तीन वर्षात आपण तिचे नाव सुद्धा विसरून गेलो की नाही? तीन वर्षापुर्वी तिचे नाव देशाच्या प्रत्येक माध्यमात गाजत होते. कारण तेव्हा देशभर स्वाईनफ़्लू नामक नव्याच साथीच्या रोगाने सर्वांना भयभीत केलेले होते. रिदा शेख ही त्याचा भारतातला पहिला अळी ठरली होती. मात्र तिचा जीव स्वाईनफ़्लूच्या विषाणूंनी घेतला असला, तरी तिचा बळी मात्र समजूतीने घेतला होता. कारण तिला झाला होता स्वाईनफ़्लू आणि तिच्यावर अद्ययावत इस्पितळामध्ये न्युमोनियाचे उपचार चालू होते. म्हणजेच रिदा उपचाराअभावी मृत्यू पावली नव्हती, तर चुकीच्या उपचारांनी तिला मारले होते. अगदी जे उपचार चालु होते, त्याचा तिच्यावर कुठलाही परिणाम होत नाही हे दिसत असूनही; डॉक्टरमंडळी आपले उपचार बदलायला तयार नव्हती, की वेगळा विचार करायला तयार नव्हती. त्या समजूतीने किंवा वैद्यकीय अज्ञानी अंधश्रद्धेनेच रिदा शेखचा बळी घेतला होता. कारण तिला झाला होता स्वाईनफ़्लू आणि डॉक्टर मात्र तिच्यावर बिनदिक्कत न्युमोनियाचे उपचार करत राहिले होते. त्यामुळे नसलेला न्युमोनिया बरा होण्याचा प्रश्नच नव्हता. आणि स्वाईनफ़्लू तिला झाला होता, त्यावर उपचार होत नसल्याने त्याचा प्रभाव व अपाय वाढतच चालला होता. अखेर त्याच्यासमोर रिदाने शरणागती पत्करली आणि तिचा बळी गेला. देशातला पहिला स्वाईनफ़्लूचा बळी असा वैज्ञानिक वैद्यकीय अंधश्रद्धेने आणि बौद्धीक अडाणी हटवादाने घेतला होता.
आपल्या देशाची आणि समाजाच्या सुरक्षेची अवस्था सध्या अगदी त्या रिदा शेखसारखीच दयनिय झालेली आहे. कारण मुंबईत असो, की काश्मिर वा आसाममध्ये असो; चालू आहे तो देशद्रोह किंवा देशविघातक कारवाया आणि त्यालाच सेक्युलर विचार म्हणून खतपाणी घातले जात आहे. देशद्रोह किंवा घातपातालाच दंगल म्हटले, की देशद्रोहावर उपाय योजले जात नाहीत आणि दंगल म्हणुन उपाय योजून परिणाम साधता येत नाही. ज्यांनी हे कृत्य केले त्यांनी देशाच्या विरोधात युद्ध पुकारल्याची घोषणाच आपल्या कृतीमधून केली आहे आणि आमचे सरकार व कायदा यंत्रणा मात्र त्याला दंगलीचा सामान्य गुन्हा म्हणून हाताळते आहे. मग हा देश सुरक्षित रहायचा कसा? एका जमावाने धुडगुस घातला तर त्याला दंगल म्हणतात हे सत्य आहे. पण ११ ऑगस्ट रोजी आझाद मैदान परिसरात घडलेले प्रकार काय होते? हल्ल्याची चित्रे व त्यातला रोख व आवेश काय सांगतात? ते उद्या वाचू. ( क्रमश:)
भाग ( ९ ) २४/८/१२
१००% सत्य.
उत्तर द्याहटवा