सेक्युलर म्हणून जे काही थोतांड आहे, त्याने मुस्लिम गुंडगिरीला मोकाट रान दिले असून आमच्या ईमाम नदाफ़सारखे सामान्य मुस्लिम त्याचे बळी होत आहेत. यात सामान्य मुस्लिमांचा बळी कसा जातो, असा अनेकांना प्रश्न पडेल. असे मी काल म्हटले होते. ज्यांच्या मनात मुस्लिमांविषयी राग आहे किंवा थोडाफ़ार संशय आहे, त्यांना माझ्या या वाक्याचे आश्चर्य वाटू शकेल. कारण मुस्लिम धर्मवेडे असतात आणि त्यातून दंगे करतात आणि त्यात हिंदू किंवा अन्य निरपराधांचा अकारण बळी जातो; अशी एक सर्वसाधारण समजूत अलिकडल्या काळात निर्माण झाली आहे. ती सर्वस्वी चुकीची नसली तरी तेच संपुर्ण सत्य आहे, असेही म्हणता येणार नाही. आजवरचा इतिहास बघितला तर बहुतेक वेळी मुस्लिमांच्या आक्रमक वृत्तीमुळेच दंगलींना सुरूवात झाली आहे. पण म्हणून सगळेच मुस्लिम वा सर्वच मुस्लिम लोकसंख्या तशीच आक्रमक आहे, असे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. पण मुस्लिम लोकसंख्या कायम एकजीव रहाण्याचा प्रयत्न करते हेसुद्धा तेवढेच खरे आहे. त्यांच्यातल्या याच प्रवृत्तीचा काही मुठभर धर्मवेडे फ़ायदा घेऊन संपुर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने आपण आक्रमक झालो आहोत; असा देखावा निर्माण केला जातो. तो खरा नसला तरी जे कोणी आक्रमक होऊन पुढे सरसावतात, त्यांना अडवण्याची व संयम दाखवायला भाग पाडण्य़ाची क्षमता मुस्लिम लोकसंख्येत नाही. तिथेच सगळी गड्बड होऊन जाते. मग जे मुठभर लोक कुरापत करतात, तेच आधी मुस्लिम लोकसंख्येवर कब्जा करतात आणि तेच म्होरके असल्याप्रमाणे वागू लागतात. परंतू जेव्हा परिस्थिती बिघडते किंवा बाजू उलटते, तेव्हा तेच आक्रमक कुरापतखोर शांतताप्रिय मुस्लिमांना ढालीप्रमाणे पुढे करून त्यांच्या मागे लपत असतात.
आता परवाच्याच मुंबईच्या आझाद मैदान परिसरातील हिंसाचाराची गोष्ट घ्या. ज्यांनी कुरापती करायच्या होत्या, त्यांची माथी भडकवण्याचे पाप ज्यांनी केले ते सर्वकाही घडून गेल्यावर बेपत्ता होते. अगदी रझा अकादमीचे म्होरकेही गायब होते. आणि त्या सर्वापासून दुर असलेले घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करीत ‘हे सर्व इस्लाम धर्माला मंजूर नाही" अशी ग्वाही देत होते. पण जे अन्यवेळी मोठे छाती फ़ुगवून आपणच मुस्लिमांचे तारणहार आहोत, असा आव आणतात, ते अबू आझमीसारखे लोक बेपत्ता होते. त्यांना कंठ फ़ुटला तो राज ठाकरे यांच्या मोर्चानंतर. तोपर्यंत जे घडले त्याची आझमी यांनी एका शब्दाने तरी माफ़ी मागितली होती काय? घडले त्याबद्दल खेद व्यक्त करणे सोडा, त्याचा निषेध केला होता काय? पण तेच आझमी इतर प्रसंगी कायम हातात तलवार घेऊन जिहाद करायला युद्धासाठी बाहेर पडलेल्या आवेशात असतात. त्यातून ते जी प्रतिमा जनमानसात निर्माण करतात, तो समंजसपणाचा चेहरा असतो काय? तिथून सगळी गडबड सुरू होते. तिकडे कुठे इराकवर अमेरिकेने हल्ला केला किंवा अफ़गाणिस्तान विरोधात युद्ध पुकारले; मग आझमीसारखे मुठभर लोक जिहादच्या गर्जना करू लागतात. त्यातून जे मुस्लिम नाहीत त्यांच्या मनात मुस्लिमांविषयी कोणती प्रतिमा तयार होते? ती समंजस किंवा शांतता्प्रिय नागरिकाची असते काय? कारण एक आझमी लोकांना वाहिन्यांवर किंवा बातम्यातून दिसत असतो आणि तो कधीही रक्त सांडण्याच्या गर्जना सातत्याने करत असतो. आणि तीच प्रतिमा अन्य लोकसंख्येच्या मनात घर करून रहाते. ही झाली या समस्येची एक बाजू.
दुसरी बाजू आहे ती अशी प्रतिमा पुअली जाण्यासाठी न होणारे प्रयास. जे शांतताप्रिय मुस्लिम आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, तेही तिथल्या तिथे किंवा अल्पावधीत आझमी जे बोलतात, त्याचे खंडन करायला पुढे येत नाहीत. मग जी गैरलागू प्रतिमा अन्य लोकांच्या मनात तयार झाली, ती तशीच रहाते आणि घर करून बसते. असेच जेव्हा वारंवार घडू लागते, तेव्हा ती आधीच तयार झालेली प्रतिमा पक्की होत जाते. मुस्लिम म्हटला मग तो धर्मवेडा धर्मांध किंवा धर्मासाठी हिंसक होणारा, अशी एक भ्रामक पतिमा मध्यंतरीच्या काळात तयार झालेली आहे. त्याची काही वेगळीच कारणे आहेत. साधारण १९८० नंतरच्या काळात त्याची सुरूवात झाली. अरबी देशातून धर्माच्या नावाने ज्या देणग्या अन्य देशात पेट्रोडॉलर्सच्या पैशातून पाठवल्या जाऊ लागल्या; त्याचा हा एक विपरित परिणाम आहे. तेव्हा अबू आझमी, दाऊद इब्राहीम वगैरेंना कोणी ओळखत नव्हते. मुस्लिमांची राजकीय संघटना वगैरे काही मोठी प्रबळ नव्हती. पण किरकोळ मंडळी तशी धडपड करत होत्या. त्यात सनदी सेवेतले निवृत्त अधिकारी सय्यद शहाबुद्दीन असा अत्यंत सुशिक्षित व हाजी मस्तानसारखा कुख्यात गुन्हेगार यांचा समावेश होतो. अशा परकीय देणगीचे पैसे आपल्यालाच मिळावेत म्हणून त्यांच्यात अधिकाधिक आक्रमक चिथावणीखोर धर्मांध भाषा बोलण्याची जणू स्पर्धाच चालली होती. हळूहळू त्यात इतर भडभूंजे सहभागी होत गेले. त्या प्रवृत्तीला मुस्लिम लोकसंख्येचा फ़ारसा पाठींबा मिळतही नव्हता. पण त्या आगीत तेल ओतण्याचे पाप इथल्या तथाकथित सेक्युलर मुखंडांनी केले.
शहाबुद्दीन किंवा हाजी मस्तान यांच्या धर्मांध भाषेला आक्षेप घेतले गेल्यावर आधी प्रतिकार करायला पुढे सरसावले ते सेक्युलर. अर्थात या आक्रमक भाषेला भाजपा किंवा हिंदूत्व मानणार्या पक्ष संघटनांकडून आक्षेप घेतला जाऊ लागला. तर त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न बाजूला ठेवून सेक्युलर शहाण्यांनी उलट त्याच आक्रमक मुस्लिम उपटसुंभांना पाठीशी घालायला सुरूवात केली. जी आक्रमक भाषा चिथावणीखोर होती, तिलाच धर्मस्वातंत्र्य असे लेबल लावण्याचे पाप सेक्युलर मंडळींनी प्रथम केले. त्यातून हे बिनबुडाचे मुस्लिम एकांडे शिलेदार शिरजोर होत गेले. तेवढेच नाही तर त्यांनाच मुस्लिमांचे नेते म्हणून मग सेक्युलर पक्षांनी आपल्यात मुस्लिम चेहरा म्हणून सामावून घेतले. त्यात मग समंजस, संयमी व सहिष्णु मुस्लिम कार्यकर्ता मागे पडत गेला. आज भाजपाचा नेता असलेला मुख्तार अब्बास नकवी हे त्यातले एक नाव मला चांगले आठवते. हा मुळचा समाजवादी चलवळीतला कार्यकर्ता. पण तिथे धर्मवेड्या मुस्लिमांनाच प्राधान्य मि्ळते व त्यांच्या धर्मांधतेलाच खतपाणी घातले जाते; म्हणुन तिथून बाजूला झालेला तो एक चांगला कार्यकर्ता आहे. पण त्याला कोणा सेक्युलर पक्षाने किंवा विचारवंत माध्यमांनी कधी साथ दिली आहे काय? उलट असे दिसेल, की जेव्हा जेव्हा नकवी किंवा शहानवाज यांच्यासारखे मुस्लिम चर्चेत येतात, तेव्हा वाहिन्या किंवा वृत्तपत्राचे पत्रकार त्यांना भाजपाचे भाडोत्री मुस्लिम म्हणून हिणवतात. एखादा मुस्लिम भाजपात, शिवसेनेत असेल तर पत्रकारच त्याला जाब विचारल्याप्रमाणे म्हणतात, ‘तू या पक्षात कसा?’
यातून हे पत्रकार किंवा तथाकथीत सेक्युलर जाणकार काय सुचवत असतात? मुस्लिमाने भाजपात असता कामा नये. तो शिवसेनेत गेला म्हणजे त्याने जणू मोठेच पाप केलेले आहे. ही काय प्रवृत्ती आहे? हे सेक्युलर मुस्लिमांना भाजपा शिवसेनेचा द्वेष करायला शिकवत नाहीत काय? पण दुसरीकडे जे अन्य तथाकथित सेक्युलर पक्षातले मुस्लिम नेते आहेत, त्यांनी भाजपावर टिका केली तर त्याचे स्वागतच होत असते. थोडक्यात सेक्युलर म्हणून जी माध्यमे किंवा पत्रकार आहेत त्यांनी मुस्लिम व हिंदू तेढ वाढवण्याचे पद्धतशीर काम केलेले दिसेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे मुस्लिमांची कत्तल करायला निघालेला सैतान आहे अशी प्रतिमा जणिवपुर्वक मुस्लिम जनमानसात सेक्युलर माध्यमांनी रुजवलेली नाही काय? ताजी घटना मी सांगू शकतो. कायबीइन लोकमत वाहिनीवर संपादक निखिल वागळे यांनी कोणताही पुरावा न देताच सुनिल देवधर या संघ कार्यकर्त्यावर मुस्लिमांच्या विरोधात खोट्या अफ़वा पसरवतो, असा जाहिरपणे आरोप केला होता. पुण्यातल्या एका घटनेचा दाखला देवधर यांनी दिला तर मग त्याबद्दल पोलिसात तक्रार का केली नाही, असा जाब निखिल देवधरांना तावातावाने विचारत होता. पण निखिलचा तो आवेश खरा असेल आणि आरोप खरा असेल; तर तोच कार्यक्रम संपल्यावर स्वत- निखिलने देवधर यांच्या विरोधात अफ़वा पसरण्याची तक्रार पोलिस ठाण्यात जाऊन का केली नाही? कारण निखिल धडधडीत खोटे बोलत होता. त्याच्याकडे देवधर खोटे बोलत असल्याचा वा ती अफ़वा असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता. पण तो मुंबईतील हिंसा आणि त्यानंतर अन्य राज्यातून आसामी लोकांचे पलायन होत असतानाही निखिलसारखे सेक्युलर मुस्लिम धर्मांधतेचीच पाठराखण करत होते. तिथेच सगळी गडबड होते. कारण त्यातून धर्मांधतेचे नाटक रंगवणारेच मुस्लिमच त्या समाजाचे नेते असल्याची प्रतिमा तयार होत असते. थोडक्यात मुस्लिम धर्मांधतेचे पालनपोषण मुस्लिमांनी नव्हेतर इथल्या सेक्युलर विचारवंत, माध्यमे, पत्रकार व राजकारण्यांनी केलेले आहे. त्यांच्या पापांची लांबलचक यादीच देता येईल. ( क्रमश:)
भाग ( १३ ) २८/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा