रविवार, २६ ऑगस्ट, २०१२

दंगेखोर गुंड सेक्युलर असतात का


    आता आसामच्या दंगलीचा भर ओसरला म्हणेपर्यंत तिथला हिंसाचार पुन्हा पुन्हा डोके वर काढतो आहे. एक जिल्ह्यातली संचारबंदी उठवावी तर दुसर्‍या जिल्ह्यात भडका उडतो आणि तिकडे लष्कर पाठवले जात असते. त्यातून मार्ग काढायचा तर दंगल करणारा कोणीही असो; त्याच्यावर गोळ्या झाडण्याची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे. आणि जेव्हा अशी कायद्याची कठोर पावले उचलली जातात, त्यात जो कोणी आडवा येईल, त्यालाही गजाआड करण्याचे धाडस सरकारमध्ये असले पाहिजे. त्याला कायदा राबवणे म्हणतात. आजच्या सरकारमध्ये ते धाडस उरलेले नाही. त्यातूनच ह्या सर्व समस्या वाढत गेल्या आहेत आणि कायदा लुळापांगळा पडत गेला आहे. त्याला सेक्युलर नावाचे थोतांड प्रामुख्याने जबाबदार आहे. कारण सेक्युलर म्हणजे नेमके काय ते कोणालाच ठाऊक नाही आणि त्याच शब्दांचा आडोसा घेऊन हे अराजक माजवण्यात आलेले आहे. म्हणूनच यातून मार्ग काढायचा असेल तर आधी त्या थोतांड पाखंडातून बाहेर पडण्याची गरज आहे. सेक्युलर किंवा जातियवादी म्हणजे नेमके काय असते? वाहिन्यांवरील राजकीय चर्चेमध्ये नियमित लिखाणामध्ये आपण सेक्युलर व जातिय धर्मांध शक्ती असे शब्द आपण ऐकत-वाचत असतो. त्याचे अर्थ काय? त्यांच्या व्याख्या कोणत्या? कशाला जातीयवादी म्हणायचे आणि सेक्युलर म्हणजे तरी कोण?

   वृत्तपत्रे किंवा राजकीय चर्चेचे सूत्र पाहिले तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोणतीही हिंदूंच्या हिताचे बोलणारी संघटना वा संस्था असेल, तर ती जातीयवादी किंवा धर्मांध असते असे त्यातले गृहीत आहे. मात्र तशाच मुस्लिम हिताची किंवा ख्रिश्चन धर्मियांच्या संस्था संघटना असतील, तर त्यांचा उल्लेख जातीयवादी किंवा धर्मांध शक्ती असा होताना दिसणार नाही. अगदी त्यांच्या नावात धर्माचा उल्लेख असला किंवा धर्माचा विषय आल्यावर अशा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला; तरी त्यांना कोणी धर्मांध शक्ती असे म्हणताना दिसणार नाही. कुठल्याही वृत्तपत्रात त्यांचा जातियवादी असा उल्लेख होणार नाही. हा पक्षपात नाही काय? उदाहरणार्थ मुस्लिम लीग नावाचा पक्ष आहे. त्याची राजकीय भूमिका कायम आक्रमक असते. पण त्या पक्षाला कोणा वाहिनीने वा वृत्तपत्राने जातीयवादी म्हटल्याचे तुम्ही ऐकले आहे काय? त्याच्या खेरीज जमाते इस्लामी किंवा इत्तेहाद अशा अनेक मुस्लिम राजकीय पक्ष संघटना आहेत. पण त्यांना कोणीच जातीयवादी धर्मांध म्हणत नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करायला कुठल्याही सेक्युलर पक्षाला अडचण येत नाही. हे आजच्या सेक्युलर पक्षांचे वा सेक्युलर विचारसरणीचे निकष बनले आहेत. हिंदूंच्या अन्याय वा हितासंबंधी बोलले, तर तो जातीयवाद असतो. पण मुस्लिमांच्या कुठल्याही धार्मिक आक्रमकतेला धर्मांध म्हटले जाणार नाही. किंबहूना तसे म्हटले तर लगेच तुमच्या सेक्युलर असण्यावरच प्रश्नचिन्ह लावले जाते. हा काय प्रकार आहे? ह्याला सेक्युलॅरिझम म्हणतात काय?

   आता अगदी ताजे उदाहरण आपण घेऊ. कालपरवा ज्या रझा अकादमीच्या मोर्च्याने आझाद मैदानाच्या परिसरात धुडगुस घातला, त्यात पोलिसांवर, पत्रकारांवर हल्ला झाला. गाड्या पेटवण्यात व जाळण्यात आल्या. महिलांची अब्रू लुटली गेली. आणि हे सर्व त्या संस्थेने संघटनेने इस्लाम धर्माचे अभिमानी म्हणूनच केले. ज्याची कुठल्याही सच्चा भारतीय मुस्लिमालाही लाजच वाटली आहे. ‘पुण्यनगरी’च्या सोलापुरमधील एक वाचकाची ही बोलकी प्रतिक्रियाच त्याची साक्ष आहे मला पाठवलेल्या एसएमएसमध्ये तो काय म्हणतो बघा-

"भाऊ तोरसेकर तुम्ही लिहिलेला आजच्या लेखामध्ये जे दोन्ही फ़ोटो दाखवले त्यातील दोघांना फ़ाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, पण आपले सरकार असे करणार नाही. म्हणूनच आज काही समाजकंटक आसे कृत्य करतात. मी एक मुसलमान आहे, पण त्याच्या अगोदर एक भारतीय आहे." -ईमाम नदाफ़ सोलापूर

तो एकटाच नाही. गेल्या तीन दिवसात मला अशा सोळा सतरा मुस्लिम वाचकांचे फ़ोन आले. त्यांनाही झाले त्याची लाजच वाटली व संताप आला आहे ना? मग त्याच्याएवढा आपल्या सेक्युलर माध्यमे व राजकारण्यांना का राग येऊ नये? इतके होऊनही कोणी रझा अकादमी या संस्थेचा उल्लेख जातियवादी, धर्मांध असा केला का? का नाही केला? याला सेक्युलर विचारसरणी म्हणतात का? ज्या संघटनेच्या मोर्चात इतका भयंकर धुडगुस घालण्यात आला व राष्ट्रद्रोही कृत्ये करण्यात आली; त्यांना सेक्युलर माध्यमे वा विचारवंत हिंसक जातीयवादी वा धर्मांध म्हणणार नसतील, तर त्यांच्या सेक्युलर भूमिकेचा अर्थ काय घ्यायचा? शिवाय ही रझा अकादमी कोण आहे? जिच्या सहा वर्षापुर्वीच्या अशाच मेळाव्यात दोन पोलिसांची निर्घृण हत्या करण्यात आली, त्यांना जिवंत जाळण्यात आले. त्यांच्याबद्दल बोलताना लिहिताना आपल्या सेक्युलर माध्यमे जातीयवादी असा उल्लेख का करत नाहीत? पण तीच माध्यमे हिंदू परिषद किंवा बजरंग दल यांचा उल्लेख अगत्याने कट्टर हिंदूत्ववादी, जातीयवादी संघटना असा मात्र करतात. ही तफ़ावत कशाला होते? याचा अर्थच हिंदूंची संघटना असली तर ती जातियवादी धर्मांध म्हणावी आणि इतर धर्मियांच्या असतील तर त्यांना तसे समजू नये; अशी कायद्याने वा राज्यघटनेने केलेली व्याख्या आहे काय? नसेल तर हा भेदभाव कशासाठी?

   आता आणखी एक गोष्ट बघा. ज्या रझा अकादमीने २००६ सालात दोन पोलिसांचे भिवंडीत हत्याकांड केले होते; तीच परवाच्या मोर्चाची आयोजक होती. त्याच संस्थेच्या कार्यालयात पाच दिवस आधी गृहमंत्री आर. आर. आबा पाटिल जाऊन आलेले होते. त्या संघटनेचे प्रमुख मोईन नावाचे गृहस्थ आहेत. त्यांच्यासह आबांचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. तिथे जाऊन आल्यानंतर पुढील घटना घडली. त्याबद्दल मी आता आरोप करणार नाही. तसा आओप भाजपाने केला आहे. पण माझा आक्षेप वेगळाच आहे. त्या संस्थेच्या कार्यालयात जाण्य़ापुर्वी आबांना भिवंडीत शहिद झालेल्या आपल्या जगताप व गांगुर्डे अशा दोन पोलिस शिपायांची तरी आठवण यायला हवी होती. कारण जेव्हा त्या दोघांची हत्या झाली व त्यांना जाळण्य़ात आले. तेव्हाही आबाच महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. बाकी कुठल्या नाही तरी आपल्याच दोघा शिपायांच्या जीवावर उठलेल्यांचा पाहुणचार घेऊ नये; एवढी आबांकडून अपेक्षा करायची नाही काय? की आपल्याच महिलांची अब्रू घेणारे, आपल्याच शिपायांची हत्या करणारे असतील, त्यांचे सत्कार घेण्याला आबा पाटिल व आजचे पत्रकार सेक्युलॅरिझम म्हणतात? कारण असा जाब कोणीही आबांना विचारलेला नाही. त्यावर आबांनी असे भाजपावाल्यांचेही फ़ोटो आपणही देऊ शकतो असे म्हटले आहे. सवाल पक्ष वा नेत्यांचा नसून गृहमंत्रीपदाचा आहे. जेव्हा गृहमंत्री अशा मारकेर्‍यांचे सत्कार घेतो, तेव्हा खाली पोलिस दलाकडे कोणता संदेश जात असतो?

   एका बातमीनुसार दोनच दिवस आधी बांद्रा येथील एका महिलेने असा हिंसाचाराचे कारस्थान शिजत असल्याची माहिती पोलिस व सरकारकडे पत्र लिहून कळवली होती. पण तिची दखलही घेतली गेली नाही. का दखल घेतली गेली नाही? तशी सूचना देण्याच्या तीन दिवस आधी गृहमंत्री रझा अकादमीच्या कार्यालयात सत्कार घ्यायला गेल्यावर पोलिसांना तिकडे जायची भिती वाटली असेल ना? त्या पोलिसांनी आधीच सुचना मिळाली तरी दंगा माजवणार्‍यांचा शोध घेतला नाही. त्याबद्दल मिळालेल्या माहितीकडे दुर्लक्ष केले. मग प्रत्यक्ष धिंगाणा घातला गेला आणि जाळपोळ व महिलांचे अब्रू घेतली गेली, तरी पोलिस आयुक्त गप्प बसले. कारण तोच सेक्युलॅरिझम आहे व असतो. जेव्हा गृहमंत्री रझा अकादमीच्या कार्यालयात जातो तेव्हा त्या संस्थेकडून होणारी हिंसा व दंगल जा्ळपोळही सेक्युलर होऊन जाते आणि तिच्यावर हात उचालण्याची हिंमत पोलिस गमावून बसत असतात. म्हणूनच जे कोणी पोलिस कारवाई करायला पुढे सरसावले त्यांना शिव्या हासडून अरुप पटनाईक यांनी गुंडांना मोकाट दंगा करू दिला. जे काही घडले त्यालाच सेक्युलॅरिझम म्हणतात. म्हणून कोणी माध्यम किंवा पत्रकार वा विचारवंतही माध्यमांच्या गाड्या जाळल्या तरी त्याबद्दल एका शब्दानेही रझा अकादमीचा निषेध करायला पुढे आलेला नाही. मग यांच्या सेक्युलर विचारांचा अर्थ कसा लावायचा? सेक्युलर म्हणजे मुस्लिमांचे हित नव्हे, मुस्लिमांचा न्यायही नव्हे; तर मुस्लिम गुंडांचा हैदोस म्हणजे सेक्युलॅरिझम, अशी आजची स्थिती झाली आहे. मात्र त्यात सामान्य नागरिकाप्रमाणेच सामान्य मुस्लिमही भरडला जातो आहे. कारण सेक्युलर म्हणून जे काही थोतांड आहे, त्याने मुस्लिम गुंडगिरीला मोकाट रान दिले असून आमच्या ईमाम नदाफ़सारखे सामान्य मुस्लिम त्याचे बळी होत आहेत. यात सामान्य मुस्लिमांचा बळी कसा जातो, असा अनेकांना प्रश्न पडेल. त्याचे उत्तर उद्या शोधूया.      ( क्रमश:)
भाग  ( १२ ) २७/८/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा