माजी सनदी अधिकारी आणि समकालिन राजकारणाचे अभ्यासक अविनाश धर्माधिकारी यांनी शरद जोशी यांच्या जुन्या शेतकरी चळवळीचा संदर्भ दिला, त्यापेक्षा अलिकडल्या काळातील अयोध्येतील राममंदिराच्या आंदोलनाचा संदर्भ अधिक योग्य ठरला असता. तसे पाहिल्यास गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेली स्वातंत्र्य चळवळ किंवा आंदोलन अणि नंतरचे जयप्रकाशांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन; यांचीही राजकारणात शिरल्यावर झालेली वाताहत त्याचीच उदाहरणे आहेत. कारण जेव्हा एखादी चळवळ किंवा आंदोलन सत्तेचा किंवा शिस्तीचा गणवेश अंगावर, चढवते तेव्हा ती चळवळ उरत नाही आणि शिस्तबद्ध संघटनाही होत नाही. कारण चळवळ किंवा आंदोलन ही झूंड असते, जमाव असतो. त्याला विचार करायला आवडत नाही, त्याला सोपी उत्तरे हवी असतात आणि अशी उत्तरे देणारा त्यांना आवडत असतो. त्या आवडणार्या नेत्याच्या शब्दावर सर्वस्व झोकून द्यायला ही झूंड तयार असते. ती विध्वंस करू शकते, तशीच प्रचंड मोठे विधायक काम देखिल करून दाखवू शकते.
1984 सालात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी लाट उसळली, त्यात सगळे पक्ष वाहून गेले होते. कॉग्रेसने अफ़ाट यश मिळवले होते. तेव्हा हे सगळे पक्ष आपापसातले विरोध व मतभेद विसरून पुन्हा कॉग्रेस विरोधाच्या मुद्द्यावर एकत्र आले. कारण सेक्युलर थोतांड सोडून त्यांना आपली राजकीय मुळे पुन्हा कॉग्रेस विरोधात शोधावी लागली होती. म्हणूनच मग एका बाजूला भाजपाचा किंवा लालकृष्ण अडवाणी यांचा प्रखर हिंदूत्ववाद आणि दुसरीकडे मार्क्सवाद्यांची डावी आघाडी यांच्या पाठींब्यावर विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार 1989 सालात अस्तित्वात आले होते. राजीव लाटेत दोन खासदारांपर्यंत घसरगुंडी झालेल्या भाजपाने गांधीवादी समाजवादाचा मुखवटा फ़ेकून देत पुन्हा हिंदुत्वाची कास धरली; तेव्हा त्यांचे पुनरुज्जीवन झाले होते. त्यासाठी त्यांनी विश्व हिंदू परिषदेचा अयोध्येतील राममंदिराचा अजेंडा उचलला होता. त्यातून त्यांची नवी घोडदौड सुरू झाली. 2 संख्येवरून त्यांनी लोकसभेत थेट 89 खासदारांपर्यंत मजल मारली होती. मात्र कॉग्रेस विरोधासाठी सिंग यांच्या सरकारला पाठिंबा देताना अडवाणी यांनी हिंदूत्व सोडायचा विचारही केला नव्हता. उलट अधिक आक्रमकपणे त्यांनी त्यांचा तोच अजेंडा पुढे सरकवला होता. जोवर त्यांनी आपला अजेंडा सोडला नाही तोवर त्यांची धोड्दौड सुरू होती. 1989, 1991, 1996, 1998 अशा पुढल्या चार लोकसभा निवडणुकीचे आकडेच त्याचे साक्षीदार आहेत. आणि त्याला नुसते हिंदूत्वाच्या भावना भडकावून मिळवलेली मते असे म्हणता येणार नाही. ती मते सत्ता मिळवण्य़ासाठी नव्हती, तर जे सेक्युलर थोतांड या देशात बोकाळले आहे; त्याला कंटाळलेल्या लोकांची ती मते होती.
इथे हिंदूत्व, मशीद-मंदिर वाद यात पडण्याचे कारण नाही. लोकांना अयोध्येत भव्य मंदिर हवे होते, असे अजिबात नाही. त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी भाजपाला मते दिलेली नव्हती. पण सेक्युलर राजकारण म्हणजे हिंदूंची गळचेपी, अशी जी भावना लोकांमध्ये आहे, त्याच्यावर लोकांनी दिलेली ती प्रतिक्रिया होती. त्यात अडवाणी किंवा वाजपेयी पंतप्रधान व्हावेत; अशी लोकांची अतीव इच्छा वगैरे काही नव्हती. लोकांना सेक्युलर थोतांडाचा संताप व्यक्त करायचा होता. त्याचे भाजपा तेव्हा प्रतिक झाला होता. म्हणूनच व्ही. पी. सिंग यांनी सेक्युलर नाटक केल्यावर त्यांना दिलेला पाठींबा भाजपाने काढून घेतला, त्याचे लौकरच झालेल्या 1991 च्या मतदानात मतदाराने स्वागतच केले. त्या निवडणुकी बरोबरच जनता दल पक्ष संपुष्टात आला. तेव्हा लोकसभेत दुसर्या क्रमांकाच्या जागा जिंकणारा तो पक्ष मागे पडत असताना, भाजपाने मात्र लोकसभेत शंभराच्या पुढे झेप घेतली होती. "गर्वसे कहो हम हिंदू है" या अजेंडाला मिळालेला तो प्रतिसाद होता. मग दिड वर्षातच बाबरी मशीद पाडली गेली. त्यामुळे भाजपा संपला असेच सेक्युलर राजकीय निरिक्षक म्हणत होते. पण उलट आपल्या हिंदूत्वाला चिकटून राहिलेल्या भाजपाने साडेतीन वर्षात थेट लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. इतिहासात प्रथमच कॉग्रेसची लोकसभेतील संख्या १४१ इतकी खाली आली. मग देवेगौडा यांना कॉग्रेसच्या पाठींब्याने सत्तेवर बसवून सेक्युलर थोतांडाचे नवे नाटक रंगले. त्याचाही भाजपाला लाभच मिळाला. कारण त्यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणूकीत पुन्हा भाजपाची ताकद वाढली. 160 वरून भाजपाची संख्या 186 पर्यंत जाऊन पोहोचली. मजेची गोष्ट म्हणजे ज्यांनी म्हणुन सेक्युलर थोतांड रंगवण्यात पुढाकार घेतला होता, त्या तमाम सेक्युलर पक्षाची ताकद प्रत्येक निवडणुकीत घटत गेली होती. पण तिथूनच म्हणजे 1998 पासून भाजपाची बुद्धी भ्रष्ट होऊ लागली. लोक आपल्याला सत्तेवर बसवायला आतुरले आहेत अशा भ्रमाने त्या पक्षाच्या नेत्यांना खुळावले आणि त्यांची घसरगुंडी सुरू झाली. लोकांना वाजपेयींना पंतप्रधान म्हणून बघायचे नव्हते तर सेक्युलर थोतांडाचा कंटाळा आला होता. हळुहळू बहुसंख्य हिंदू भाजपाला प्रतिसाद देत होता, तो यांना सत्तेवर बसवण्य़ासाठी नव्हे, तर या देशातील हिंदूंचा आवाज दडपला जातोय त्या दडपशाहीला झुगारण्यासाठी.
मंदिर मशीद वादात खमकेपणाने उभ्या राहिलेल्या भाजपाला प्रतिसाद मिळत होता तो मतदानातला परिणाम होता, तरी त्याचे श्रेय मंदिराच्या नावाने चाललेल्या आक्रमक हिंदू आंदोलनाला होते. त्याचे म्होरकेपण मुरब्बी अडवाणी यांच्याकडे होते. त्यामुळेच जोवर ते आंदोलनाचे नेतृत्व करत होते, तोवर आंदोलन जोरात होते आणि भाजपाला त्याचा लाभ मतपेटीत परिणाम मि्ळत होता. पण 1998 सालात त्यांना सत्तेचे डोहाळे लागले आणि आंदोलन विस्कटत गेले. 543 सदस्यांच्या लोकसभेत भाजपा 186 संख्येपर्यंत पोहोचला तरी त्यांच्याकडे बहुमत नव्हते आणि त्यांना कोणी बहुमतासाठी पाठींबा द्यायला तयार नव्हता. अशावेळी भाजपाला सत्ता बळकावण्याचा मोह पडला आणि त्यांनी त्यांनाच मते देणार्य़ा मतदारांचा अपेक्षाभंग केला. बहुमताचे गणीत जुळवण्यासाठी त्यांनी आक्रमक हिंदूत्वाची कास सोडली, म्हणजेच आपल्या पाठीराख्या मतदाराचाच मुखभंग केला होता. एनडीए नावाची जी आघाडी बनवण्यात आली त्यातील स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणार्या किरकोळ पक्षांच्या आग्रहाखातर भाजपाने मंदिर, समान नागरी कायदा आणि घटनेतील काश्मिर विषय कलम 370 असे मुद्दे आपल्या अजेंडामधून बाजूला केले. तेवढेच नाही तर क्रमाक्रमाने मतदार जे सेक्युलर थोतांड नाकारत चालला होता, त्याच थोतांडाचा स्विकार भाजपा करत गेला. तिथून त्यांच्याकडे येणारा मतदार थांबला. बाजारात अस्सल पाखंडी सेक्युलर उपलब्ध असताना मतदार भाजपासारख्या बाटलेल्या सेक्युलर पक्षाला कशाला साथ देईल? त्यातूनच भाजपाची मते वाढण्याचा ओघ थांबलेला दिसेल. मतांचे आकडे आणि लोकसभेतील जागाच त्याची साक्ष देतात.
सत्ता टिकवण्य़ासाठी बहुमत संभाळणार्या भाजपाकडे सेक्युलर थोतांडाच्या विरोधात येणारा मतदार थांबला. म्हणुनच १९९८ साली एकाच मताने पडलेले वाजपेयी सरकार पुन्हा मध्यावधी निवडणुकीला सामोर गेले, तेव्हा त्याची सत्ता टिकली तरी त्याच्या जागा वाढल्या नाहीत किंवा मतेही वाढली नाहीत. कारण लालकृष्ण अडवाणीसह हिंदू आंदोलनाचे बहूतेक नेते सत्तेत मशगुल झाले होते. सत्तेच्या राजकारणात ते इतके भरकटत गेले होते, की भाजपा नावाच्या त्यांच्या राजकीय पक्षाचे संघटन संभाळू शकेल असा एकही नेता सरकार बाहेर शिल्लक राहिला नव्हता. जणू भाजपाला आता पक्षसंघटना किंवा कार्यकर्त्यांची गरजच भासेनाशी झाली होती. त्यामुळे कधी व्यंकय्या नायडूसारखा तोंडाळ वाचाळ किंवा जयकृष्णमुर्ती यांच्यासारखा बिनचेहर्याचा माणुस भाजपाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आला. तेवढ्य़ावर भागले नाही म्हणुन मग बंगारू लक्ष्मण याच्यासारखा उंडारू माणुस त्या अध्यक्ष पदावर बसवण्यात आला. ज्याने पक्षाच्या कार्यालयातच बसून काही लाख रुपयांची लाच घेत पक्षाची अब्रू थेट जगाच्या वेशीवर टांगली. तिथे मग भाजपाकडे हिंदूंच्या गळचेपीविरुद्ध आवाज उठवणारा पक्ष म्हणुन बघणार्या मतदाराचा पुरता भ्रमनिरास होत गेला. एकीकडे भाजपाने तथाकथित सेक्युलर थोतांडाची झुल पांघरली होती आणि दुसरीकडे कॉग्रेस वा अन्य पक्षांप्रमाणे आपणही भ्रष्ट असल्याची साक्ष दिली होती. पण ही घसरगुंडी कुठून सुरू झाली? मंदिर किंवा मशिद हा विषय दुय्यम होता. त्यापेक्षा या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना आपली सेक्युलर थोतांडामुळे गळचेपी होते अशी जी धारणा आहे; त्यातुन भाजपाला पाठींबा मिळत होता. त्या करोडो लोकांना मंदिराचे आंदोलन आपला दबलेला आवाज उठवण्याचे आंदोलन वाटले होते. तेच भाजपाने सोडून दिले आणि त्याची घोडदौड थांबली. मतदार किंवा सामान्य माणुस आपल्याकडे कोणत्या आशेने बघतो आहे, याचा ज्या चळवळ किंवा आंदोलनाच्या नेत्यांना विसर पडतो त्याच्याकडे लोक पाठ फ़िरवत असतात. आजच्या अण्णा टीमच्या नेत्यांना, सदस्यांना त्याचे भान आहे काय? भाजपाची घसरगुंडी कशी झाली? ( क्रमश:)
भाग ( ३५४ ) १२/८/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा